बुधवार, २ नोव्हेंबर, २०२२

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू

बीड, दि. 2 (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा -२०२२ शनिवार दि. ५ नोव्हेंबर २०२२ रोजी बीड जिल्हाकेंद्रातील एकुण ८ उपकेंद्रामधून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण २ हजार ८०८ उमेदवार बसलेले असून परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात फौ.प्र.सं.१९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. आयोगाच्या सुचनेनुसार या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांचेकडील मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रीक वस्तु व अभ्यासाचे इतर साहीत्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही. परीक्षेच्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. परीक्षेचे आवश्यक साहीत्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत : चे आधारकार्ड , निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हींग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही दोन ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांचे परिक्षा उपकेंद्रावर सकाळी ८.३० वाजेपूर्वी उपस्थित राहणेबाबत सूचित करण्यात आले आहे. परिक्षा सुरु झाल्यानंतर परिक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही. असे निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे. -*-*-*-*-

मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

रोजगार मेळाव्याचे आयोजन

बीड, दि. 1 (जि. मा. का) : आजादी का अमृत महोत्सवानिमित्त दि.3 नोव्हेंबर 2022 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन बीड येथील शातांई हॉटेल मागील गुरुकुल इंग्लिश स्कुल येथे करण्यात आले आहे. तरी जिल्याावतील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या रोजगार मेळाव्यात सहभाग नोंदवावा. असे आवाहन बीड कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे. मेळाव्यामध्ये गुरुकुल इंग्लिश स्कुल, जेबीएन इंजिटेक प्रा.लिमीटेड, दिशा सर्हिउचसेस औरंगाबाद, टॅलेनसेतू सर्व्हिस प्रा.लि.ठाणे, क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लिमिटेड बीड, वायरलेस जॉब्स कंसल्टन्सी, हर्षवर्धन सेवाभावी संस्था बीड, द कुटे ग्रुप बीड, ऑरिक ग्रीन औरंगाबाद, मेगा फिड प्रा.लि. आदी कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी याकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करावे व दि.3 नोव्हेंबर रोजी गुरुकुल इंग्लिश स्कुल, गुरुकुल नगर, शांताई हॉटेल मागे, काझी नगर जवळ, जालना रोड, बीड येथे प्रत्यक्ष येवून संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 02442299116 यावर संपर्क साधावा. -*-*-*-*-

सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०२२

जिल्हा वार्षिक योजनेसाठीचे प्रस्ताव सात दिवसात सादर करावे - पालकमंत्री अतुल सावे

*जिल्हा नियोजन समितीचे बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न बीड, दि. 31 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेसाठीचे प्रस्ताव सात दिवसात सादर करावेत, जिल्ह्यातील आमदार, खासदार लोकप्रतिनिधींच्या जिल्ह्याच्या विकास कामांसाठी प्राप्त प्रस्तावांवर पुढील मान्यतेसाठी 15 दिवसात कार्यवाही करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहामध्ये आज पालकमंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीला खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार रजनीताई पाटील, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार लक्ष्मण पवार, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार श्रीमती नमिता मुंदडा, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा नियोजन अधिकारी राधाकिशन इघारे यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, मागील काही दिवसात अतिवृष्टीच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, यासाठी प्रत्यक्षात मी स्वतः पाहणी केली. याबाबतच्या जिल्ह्यातील सर्व खासदार -आमदार यांच्या भावना ध्यानात घेऊन पिक विमा भरपाई जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांना सरसकट मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मुंबई येथे बैठक घेऊन हा प्रश्न सोडविला जाईल, असे पालकमंत्री श्री. सावे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मोठ्या जनावरांमध्ये आढळणाऱ्या लंम्पी साथीचा सामना करण्यासाठी लागेल तेवढा निधी देण्यात येईल या आजाराची जनावरांमध्ये प्रसार होऊ नये यासाठी त्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आलेली आहे. तरी देखील इतर राज्यातून व जिल्ह्यातून येणाऱ्या जनावरे आणले जात आहेत ते रोखण्यासाठी येणाऱ्या रस्त्यांवर चेक नाके उभारण्यात येतील. यावेळी पालकमंत्र्यांनी विकासाशी संबंधित विविध मुद्यांवर माहिती घेऊन उपाययोजनांच्या सूचना दिल्या वीज प्रश्नांबाबत बोलताना ते म्हणाले शासकीय रुग्णालयांच्या विज बिल थकीत राहिल्याने वीजपुरवठा खंडित केला जाऊ नये तसेच नगरपरिषदाचा वीजपुरवठाचा खर्च महावितरणच्या मालमत्ता कर, पाणीपुरवठा कर आदीमधून वजा करता आल्यास हा प्रश्न सुटू शकेल तसेच जास्तीत जास्त सौर ऊर्जातून वीज निर्मितीसाठी प्रकल्प नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. याप्रसंगी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी पिक विमा भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारण्यासाठी 23 ऑक्टोबर रोजी सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे ऑफलाइन अर्ज स्वीकारले नाही तर पिक विमा कंपनीवर कारवाई केली जाईल. कृषी वीज पंपांना सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी सौर रोहित्र संख्या वाढावी यासाठी महावितरण सोबत बैठक घेऊन जिल्हा नियोजन समिती परिपूर्ण माहिती सादर करण्यात येईल. यावेळी खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या अडचणीत आहे यासाठी जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समवेत बैठक व्हावी, शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न व्हावे, असे मत व्यक्त करून बीड नगर रोडचा प्रश्न, पिक विमा भरपाईतील अडचणी, कृषी कर्जाचे प्रश्न आदी बाबत विचार व्यक्त करून मागण्या मांडल्या. खासदार रजनीताई पाटील यांनी सरकार कोणतेही असले तरी त्याच्या केंद्रबिंदू शेतकरी असतो. जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर्वीच्या गोगलगायीच्या आपत्तीमुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी असे नमूद केले. आमदार सुरेश धस यांनी विविध विषयांवर आग्रही भूमिका मांडली ते म्हणाले जिल्ह्यातील सर्व 63 महसूल मंडळात अतिवृष्टीने नुकसान झाले आहे याची सरसकट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावे शिरूर- पाटोदा तालुक्यातून जाणाऱ्या पैठण -पंढरपूर महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न व्हावे. आमदार प्रकाश सोळंके यांनी जिल्ह्यातील जवळपास साडेसात लाख शेतकरी खातेदारांपर्यंत पीक कर्ज पोहोचत नसून सर्व गरजू शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना व विविध लाभ देण्यासाठी उपाययोजना होणे गरजेचे आहे असे नमूद केले. आमदार लक्ष्मण पवार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यास सतत नैसर्गिक आपत्ती सामोरे जावे लागत आहे त्याला पीक विमा व नुकसान भरपाईच्या माध्यमातून तातडीने दिलासा मिळणे गरजेचे आहे असे सांगितले. आमदार नमिता मुंदडा यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानी भरपाई बाबत तसेच लोखंडी सावरगाव येथील शासकीय रुग्णालयाच्या वीज पुरवठ्याचा अडचण, केज जवळील महामार्गावरील पुलाचा कामाचा प्रश्न मांडला. आमदार संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या बीड शहरातून जाणाऱ्या भागात ड्रेनेजसह विविध कामे, शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उंची वाढवणे, नाळवंडी रस्ता, नारायण गड तीर्थक्षेत्र विकासासाठी निधीच्या मागणीसह शेतकरी पिक विमा बाबत आग्रही भूमिका मांडली. आमदार बाळासाहेब आजबे यांनी जिल्ह्यातील मोठ्या गोवंश जनावरांमध्ये लंम्पी आजाराचाया साथ, अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे मोठे नुकसान, आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील विज सब स्टेशनची मागणी, सोलर वीज निर्मितीसाठी गायरान जमिनीचे उपलब्धता आदी बाबत मागण्या मांडल्या. सुरुवातीस जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी पालकमंत्री यांचे स्वागत केले. बैठकीचे सूत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी श्री. इघारे यांनी केले . बैठकीसाठी सभागृहात अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, विभागीय वन अधिकारी एम.बी.कंद, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. निकम, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था समृत जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, पिक विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक तौसिफ कुरेशी, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण राजकुमार शिंदे यासह सर्व प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते. -*-*-*-*-

बीडमध्ये नवीन भव्य क्रीडा संकुल उभारणार - पालकमंत्री अतुल सावे

एकता दौडला बीडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बीड, दि. 31 (जि. मा. का) : जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी जिल्हा क्रीडा संकुलात विविध सुविधा निर्माण करण्यात येतील. तसेच केंद्र शासकीय योजनेतून बीडमध्ये नवीन भव्य असे क्रीडा संकुल निर्माण करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज येथे केले. देशाचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एकता दौड (रन फॉर युनिटी) रॅलीच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी त्यांच्या हस्ते रॅलीस हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापासून सुरू होऊन एकता दौड नगर रोड - शिवाजी चौक - जालना रोड या मार्गाने जाऊन जिल्हा क्रीडा संकुल येथे तिची सांगता झाली. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, राजेंद्र म्हस्के आदिंची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री अतुल सावे म्हणाले, देशाच्या सुरक्षिततेसाठी एकता महत्त्वाची आहे. म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून रन फॉर युनिटी दौड सुरू केली. या एकता दौडमध्ये सर्व नागरिक, युवक, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचाही सहभाग घेतला जावा. एकतेचे प्रतीक असणारा सरदार वल्लभभाई पटेल यांचा गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी प्रेरणादायक आहे, असे ते म्हणाले. पालकमंत्री श्री. सावे यांच्या हस्ते राष्ट्रकुल स्पर्धेतील रौप्य पदक विजेते आंतरराष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळे यांचा ५ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश, स्मृतीचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देऊन बीड, अंबाजोगाई, परळी, गेवराई नगर परिषद आणि कुटे ग्रुप यांच्या वतीने निधी देण्यात आला. आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळविणारा बीडचा भूमिपुत्र अविनाश साबळेंचे कौतुक करताना आपल्याला आनंद होत असून, त्यांनी भविष्यात देखील बीड जिल्हा, महाराष्ट्र आणि भारताचे नाव जगात उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. सावे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी कुस्तीपटू सोहेल शेख याचाही सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पालकमंत्री यांचे स्वागत व सत्कार जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख यांनी केले. याप्रसंगी दिव्यांग क्रिकेट असोसिएशनच्या वतीने कप्तान अविनाश घुले व संघाचे सदस्य यांनी पालकमंत्री यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी पालकमंत्री श्री. सावे यांनी दिव्यांग क्रिकेट स्पर्धांसाठी शुभेच्छा देताना या दिव्यांग क्रीडा स्पर्धांसाठी आपण पाठीशी राहू, असे सांगितले. तसेच, जिल्हा कराटे असोसिएशनच्या वतीने श्री. मुस्ताक यांनी, पतंजली योग समितीच्या वतीने श्री जायभाये व ह. भ. प. नखाते महाराज यांनी, जिल्हा तायक्वांदो असोसिएशन, विविध क्रीडा संघटना आदिंच्या वतीने पालकमंत्री यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. एकता दौडसाठी जिल्हा परिषद अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, बीड उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर , बीड तहसीलदार सुहास हजारे, जिल्हा शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष वसंत मुंडे, डॉ. विक्रम सारूक यासह विविध सामाजिक संघटना, खेळाडू, नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी - कर्मचारी यांचा मोठा सहभाग होता. 00000

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०२२

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

बीड, दि.22 (जि.मा.का.) :- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून 2023 मध्ये विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात आले असून, आयोगामार्फत आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असल्याचे आयोगाचे सह सचिव सुनील अवताडे यांनी कळविले आहे. राज्य लोकसेवा आयोगाकडून सन 2023 मध्ये विविध पदांसाठीच्या घेण्यात येणा-या स्पर्धा परीक्षा जानेवारी ते 7 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत. दिवाणी कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्गाची जाहिरात जानेवारी 2023 मध्ये येणार आहे. त्याची 19 मार्च रोजी परीक्षा होईल व मे महिन्यामध्ये निकाल येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट -ब व गट क सेवा संयुक्त परीक्षेची जाहिरात जानेवारीमध्ये प्रकाशित होणार आहे. या अंतर्गंत येणा-या पदांची 30 एप्रिल रोजी परीक्षा तर जून 2023 मध्ये निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट - ब सेवा मुख्य परीक्षा ही 2 सप्टेंबर रोजी तर निकाल ऑक्टोबर 2023 मध्ये जाहीर होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट क सेवा मुख्य परीक्षा 9 सप्टेंबरला तर निकाल नोव्हेंबरमध्ये घोषित होण्याची शक्यता आहे. सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाची मुख्य परीक्षा 10 सप्टेंबरला तर निकाल नोव्हेंबरमध्ये घोषित होणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात फेब्रुवारी 2023, परीक्षा 4 जून आणि निकाल जुलैमध्ये जाहीर होईल. 33 संवर्गांचा समावेश असलेल्या या पदाची मुख्य परीक्षा 30 सप्टेंबर 2023 ते 1, 7, 8 आणि 9 ऑक्टोबरला आणि निकाल जानेवारी 2024 मध्ये घोषित होईल. महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबरला आणि निकाल डिसेंबर 2023 मध्ये जाहीर होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबरला आणि निकाल डिसेंबर 2023 मध्ये घोषित होईल. महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा ही 15 ऑक्टोबरला होणार असून, डिसेंबर 2023 मध्ये निकाल घोषित होईल. सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर तर निकाल डिसेंबर 2023 मध्ये जाहीर होण्याचा अंदाज आहे. अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबरला आणि निकाल डिसेंबर 2023 मध्ये घोषित केला जाऊ शकतो. तसेच महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा ही 4, 5, 6 आणि 7 नोव्हेंबर 2023 मध्ये होण्याचा अंदाज असून, या पदांसाठी घेण्यात येणा-या परीक्षेचा निकाल जानेवारी 2024 मध्ये घोषित होण्याचा अंदाज आयोगाने प्रसिद्धीपत्रकाव्दारे कळविला आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणा-या उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देऊन अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. -*-*-*-*-

शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०२२

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान बँकेत जमा

बीड, दि. 21, (जि. मा. का.) : बीड तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा योजनेच्या लाभार्थींना माहे सप्टेंबर 2022 अखेरचे अनुदान बँकेमध्ये जमा करण्यात आले आहे. तसेच इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेचे अनुदान प्राप्त होताच लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात येणार असल्याची माहिती बीड तहसिलदार सुहास हजारे यांनी दिली आहे. संजय गांधी निराधार अनुदान योजनचे एकुण 7 हजार 939 लाभार्थी असून त्यांना 2 कोटी 39 लाख 30 हजार रुपये व इंदिरा गांधी योजनेचे एकुण लाभार्थी 5 हजार 226 व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे एकुण 9 हजार 156 लाभार्थ्यांना 4 कोटी 87 लाख 5 हजार 600 असे एकुण 7 कोटी 26 लाख 9 हजार 500 असे सर्व लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर 2022 अखेरचे व इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेच्या 88 लाभार्थ्यांना माहे जानेवारी ते मार्च 2022 चे एकुण 52 हजार 800 रुपये अनुदान बँकेमध्ये जमा करण्यात आले आहे. -*-*-*-*-

ट्रॅव्हल्स चालकांनी बस भाड्याच्या दीड पटीपेक्षा अधिक भाडे आकारु नये

बीड, दि. 21, (जि. मा. का.) : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर खाजगी प्रवासी बस वाहतूकदार हे जादा बस भाडे आकारुन प्रवाशांची लुट करीत असल्यास त्या वाहन धारकांविरुध्द दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश आहेत. त्यानूसार बुधवार दि.19 ऑक्टोबर 2022 रोजी बीड येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात बीड जिल्हा प्रवासी बस ओनर्स असोसिएशनची बैठक घेण्यात आली. यावेळी दिवाळी उत्सवाच्या निमित्ताने एसटी महामंडळाच्या त्या त्या संवर्गाच्या बस भाड्याच्या दीड पटीपेक्षा अधिक भाडे आकारु नये, असे निर्देश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड यांनी दिले. या बैठकीस एम.आय.खान सागर ट्रॅव्हल्स, शेख इसाक सौदागर हिना ट्रॅव्हल्स, विलास डावेकर महाराजा ट्रॅव्हल्स, शेख वसिम ॲपल ट्रॅव्हल्स, शेख सोहेल राजमाता ट्रॅव्हल्स, न्यु हिना ट्रॅव्हल्स आदींचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रवासी वाहतूक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करु नये, वाहनाचा विमा, फिटनेस, कर वैध असल्याशिवाय वाहन रस्त्यावर काढू नये तसेच वाहनांत प्रथमोपचार व अग्निशामक यंत्रणा अद्यावत ठेवण्यात यावी, अशा सुचनाही करण्यात आल्या आहेत. -*-*-*-*-

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाईन अर्ज करावेत

बीड, दि. 21, (जि. मा. का.) : जिल्ह्यातील बेरोजगारांना उत्पादन उद्योगांसाठी जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही गेल्या तीन वर्षापासून राज्यात राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत सेवा उद्योगासाठी 10 लाख रुपये मर्यादेपर्यंत व उत्पादन उद्योगासाठी 50 लाख रुपयापर्यंत बँकेमार्फत अर्थसहाय्य दिले जाते. बेरोजगारांनी जिल्हा उद्योग केंद्रमार्फत maha-cmegp.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, बीड यांनी केले आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत उद्योग विभागामार्फत बँकेच्या कर्ज मंजूरीनंतर जास्तीत जास्त 35 टक्क्यापर्यंत (जात प्रवर्ग/उद्योग कार्यक्षेत्रानूसार) अनुदान देय आहे. तसेच 10 लाख रुपयांच्या कर्ज मर्यादेपर्यंत (सेवा/उत्पादन उद्योग) शिक्षणाची अट नाही. दर सोमवारी छाननीनंतर ऑनलाईन कर्ज प्रस्ताव बँकाना मंजूरीस्तव शिफारस करण्यात येतील. योजनेच्या लाभासाठी पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड, वयाचा दाखला, गुणपत्रिका, व्यवसाय प्रकल्प अहवाल आणि आवश्यकतेनूसार जात प्रमाणपत्र व ग्रामीण भागासाठी लोकसंख्या दाखला आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. -*-*-*-*-

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

नागरिकांना दर्जेदार मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बीड शहरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम टप्पा क्र. 2 च्या 12 रस्ते कामांचा शुभारंभ बीड, दि. 20, (जि. मा. का.) : नागरिकांना दर्जेदार मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असून, बीडचा कायापालट करण्यासाठी जी काही विकासकामे करता येतील ती तातडीने करण्यात येतील. शहरी विकास योजनांसाठी राज्य शासनाने पाठविलेल्या १२ हजार ९०० कोटींच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून नगरोत्थान योजनेंतर्गत बीडच्या विकासकामांसाठी भविष्यात निधीची कमतरता जाणवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम टप्पा दोनचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात मुंबईतून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मंत्रालयातून मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आमदार सुरेश धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते. तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथील कार्यक्रमस्थळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, बीड नगरपरिषद प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी बीड नामदेव टिळेकर, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. दीपा क्षीरसागर आदि उपस्थित होते. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम टप्पा क्र. 2 अंतर्गत 15 प्रस्तावित रस्ते कामांसाठी 91.94 कोटी रुपये रक्कम प्रस्तावित करण्यात आली होती. पैकी 12 रस्ते कामांना नगर विकास विभाग, मुंबई यांच्याकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासाठी रक्कम रुपये 69.85 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामांचा कार्यारंभ आदेश दि. 6 सप्टेंबर 2022 देण्यात आला असून मान्यवरांच्या हस्ते आज कामांचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, बीडसह एकंदरीतच संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी भरीव निधी राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान, अटल अमृत योजनांसाठी केंद्र शासनाकडून भरघोस निधी मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी १२ हजार ९०० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यातून शहरे, महानगरांच्या मुलभूत सोयी-सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात येत आहे. त्याचबरोबर पश्चिम वाहिन्यांमधील वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकास कामांसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीचा प्रशासनाने सदुपयोग करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकास कामांमुळे बीडचा कायापालट होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, बीड शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील १६ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर टप्पा २ अंतर्गत मंजूर कामांचा शुभारंभ आज झाला आहे. या सगळ्या विकास कामांमुळे बीड शहराचा कायापालट होणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना व घरकुल योजना यामुळे शहराला आधुनिकता प्राप्त होईल. केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला स्वच्छ भारत अभियान दुसरा टप्पा आणि अटल अमृत मिशन टप्पा दोन मध्ये भरघोस निधी दिला जात आहे. येत्या काळात राज्यात पिण्याचे पाणी, कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने वर्गीकरण व व्यवस्थापन महाराष्ट्रातील सर्वच शहरात होणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे साडेचार हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिले गेले आणि त्याचे वितरणही पूर्ण झाले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात बीड शहराचा झपाट्याने विस्तार होत असून नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील विविध विकासकामांसह बीड शहरात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करुन त्याचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमास माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, नगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. टप्पा क्र. 2 अंतर्गत नियोजित कामांमधील मुख्य रस्त्याचे नाव, रक्कम रू. अनुक्रमे पुढीलप्रमाणे – 1) अंबिका चौक ते अर्जुन नगर सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे 5.51 कोटी 2) राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कूल (करपरा नदी पूल) सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे 7.31 कोटी 3) राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा ते खोलवाट सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे. 4.72 कोटी 4) बार्शी रोड ते दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन 2.80 कोटी 5) कासट यांचे घर ते शहर पोलीस स्टेशन ते अश्विनी दवाखाना 3.90 कोटी 6) मसरत नगर ते नेत्रधाम ते सावरकर चौक सी. सी. रस्ता व ड्रेन काम करणे 5.41 कोटी 7) शीतल वस्त्र भंडार मोंढा रोड परिसरातील दोन्ही बाजूंचे रस्ते 4.63 कोटी 8) पेठ बीड पोलीस स्टेशन ईदगाह ते नाळवंडी सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे 4.05 कोटी 9) नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे 2.92 कोटी 10) बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे 2.41 कोटी 11) बार्शी रोड मुक्ता लॉन्स ते तकिया मस्जिद ते फ्रुट मार्केट ते खासबाग देवी रोड नाला 7.40 कोटी 12) अंकुश नगर ते पाण्याची टाकी सी. सी. रस्ता व ड्रेन करणे. 00000

बुधवार, १९ ऑक्टोबर, २०२२

विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी केली अतिवृष्टीने नुकसानग्रस्त पिकांची पाहणी

बीड, दि. 19, (जि. मा. का.) : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमिवर मराठवाडा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज जिल्ह्यातील गेवराई, धारूर, माजलगाव व बीड तालुक्यात शेतपिकांची पाहणी केली. गेवराई येथील पाहणीवेळी आमदार लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, बीडचे तहसीलदार सुहास हजारे, गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे आदिंसह संबंधित मंडल अधिकारी, तलाठी उपस्थित होते. दरम्यान, कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे युद्ध पातळीवर वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल पाठवावा, असे निर्देश दिले आहेत. परतीच्या पावसाने जिल्ह्यात सोयाबीन, तूर, बाजरी, कापूस आदि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पिकांची पाहणी केली व प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांशी संवाद साधला. 00000

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदार नोंदणीसाठी आवाहन

बीड, दि. 19, (जि. मा. का.) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची मतदार नोंदणी सुरु झाली आहे. या अनुषंगाने दि. 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी लगतच्या 6 वर्षांपैकी किमान 3 वर्षे माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम केलेल्या व्यक्तिस आपले नाव मतदार यादीत नोंदविता येणार आहे. तरी बीड तालुक्यातील शिक्षण संस्था प्रमुख, प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांनी पात्र व्यक्तिंचे अर्ज नमुना क्र. 19 परिपूर्ण भरुन यादी व सहपत्रे बीड तहसील कार्यालयात दि. 7 नोव्हेंबर 2022 पर्यंत जमा करावीत, असे आवाहन तहसीलदार तथा पदनिर्देशित अधिकारी सुहास हजारे यांनी केले आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदार संघाची मतदार यादी तयार करण्याच्या अनुषंगाने दि. 1 ऑक्टोबर 2022 पासून मतदार नोंदणी सुरु झाली असून मतदानासाठी नाव नोंदणीची मुदत दि. 7 नोव्हेंबर 2022 पूर्वी देण्यात आलेली आहे. 00000

जिल्हा उद्योग केंद्राच्या पुरस्कारासाठी लघू उद्योग घटकांनी अर्ज करावेत

बीड, दि. 19, (जि. मा. का.) : जिल्हास्तरावर लघु उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योग घटकांना सन २०२२-२३ चे जिल्हा पातळीवरील प्रथम व द्वितीय जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी जिल्ह्यातील पात्र सुक्ष्म, लघू उद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात आले असून जिल्ह्यातील लघू उद्योग घटकांनी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, बीड यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मंगळवार दि.15 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. निवड केलेल्या उद्योग घटकास स्मृती चिन्ह व प्रथम पुरस्कारासाठी रु.१५,०००/- आणि द्वितीय पुरस्कारासाठी रु .१०,०००/- रोख रक्कम पालकमंत्री यांचे हस्ते उत्तेजनार्थ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उद्योग घटक मागील दोन वर्षापासून नियमित उत्पादनात असणे आवश्यक आहे, लघू उद्योग घटकाने पाच वर्षापूर्वी स्थायी लघु उद्योग नोंदणी केलेली असावी, मागील दोन वर्षामध्ये घटकास सातत्याने नफा ( Profit ) झालेला असावा व रोजगार निर्मिती मध्ये वाढ होणे आपेक्षीत आहे, उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, लघू उद्योग घटकास या पूर्वी कोणताही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नसावा, उत्पादनासाठी नविन तंत्रज्ञान अवलंबिलेल्या घटकास प्राधान्य राहील अशा पात्रतेच्या अटी आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, बशिरगंज, बीड दुरध्वनी क्र. ०२४४२-२२२२८५ ई मेल आयडी didic.beed@maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा. -*-*-*-*-

मंगळवार, १८ ऑक्टोबर, २०२२

जिल्ह्यात १९ ऑक्टोबर रोजीचा नियोजित रोजगार मेळावा पुढे ढकलला, 3 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळाव्याचे होणार आयोजन

बीड, दि.18 (जि.मा.का.):- सद्यस्थितीत बीड जिल्ह्यात सर्वत्र खुप पाऊस होत असुन जिल्ह्यात पुढील काही दिवस पाऊस असेल असा अंदाज हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आलेला आहे. रोजगार मेळाव्यातील उमेदवारांची पावसामुळे गैरसोय होऊ नये या कारणास्तव दि. १९ ऑक्टोबर २०२२ रोजी नियोजित रोजगार मेळावा रद्द करुन हा रोजगार मेळावा दि. ३ नोव्हेंबर २०२२ घेण्यात येईल. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुशील उचले यांनी दिली आहे. -*-*-*-*-

शेतातील विजेचे पोल, तारा यांचे भूभाडे मिळण्याबाबत रिट याचिका; आदेशाच्या प्रतीसाठी इच्छुकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा

बीड, दि. 18 (जि. मा. का.) : मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे चंदु भागीनाथ शेंडगे व इतरांनी शेतातील विजेचे पोल, तारा यांचे भूभाडे मिळण्याबाबत रिट याचिका क्र. 8108/2022 दाखल केली होती. त्या अनुषंगाने जिल्ह्यातून इतर शेतकरी, अर्जदारांनी देखील भूभाडे मिळण्याच्या अनुषंगाने अर्ज सादर केले आहेत. या याचिकेमध्ये मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी पारीत केलेल्या आदेशाच्या अनुषंगाने जिल्हा दंडाधिकारी, बीड यांनी शुक्रवार, दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तरी संबंधित अर्जदारांना माहिती होण्याचे दृष्टीने सदर आदेशास प्रसिध्दी देण्यात येत आहे. संबंधित अर्जदार व इतर व्यक्तिंना आदेशाची प्रत हवी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख विभागास रीतसर अर्ज सादर करुन नियमानुसार आदेशाची प्रत हस्तगत करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 00000

सोमवार, १७ ऑक्टोबर, २०२२

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी 19 ऑक्टोबर रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

बीड, दि.17 (जि.मा.का.) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा-3 चे आयोजन 19 ऑक्टोबर 2022 रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथे करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यात गरुकुल इंग्लिश स्कुल बीड, जेबीएन इंजिटेक प्रायव्हेट लिमिटेड, दिशा सर्व्हिसेस औरंगाबाद, टॅलेन सेतू सर्व्हिसेस प्रा. लि. ठाणे, क्रेडीट ॲक्सेस ग्रामीण लि. बीड, वायररलेस जॉब्स कन्सलटन्सी, हर्षवर्धन सेवाभावी संस्था बीड, द कुटे ग्रुप बीड, ऑरिक ग्रीन औरंगाबाद या आस्थापना विविध पदे भरण्यासाठी सहभागी होणार आहेत. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुशिल उचले यांनी केले आहे. रोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी पुढीलप्रमाणे सहभागी व्हावे, सर्वप्रथम उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोकरी साधक Job seeker म्हणून नोंदणी करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन Login बटनावर क्लिक करावे. प्रोफाईल मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करुन रोजगार मेळाव्यासाठी बीड जिल्हा निवडून Filter बटनावर क्लिक करावे. आपल्याला बीड-स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा- ३ दिसु लागेल. त्यातील action या पर्यायाखालील दोन बटनापैकी पहिल्या बटनावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल तर दुसऱ्या बटनावर क्लिक केल्यास मेळाव्यात रिक्त पदे दिसतील. दुसऱ्या बटनावर क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. सदर संदेश काळजीपूर्वक वाचा व | agree बटनावर क्लिक करावे. आपल्याला शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आवश्यक कौशल्य व अनुभव या नुसार पदाची निवड करावी लागेल व apply बटनावर क्लिक करावे. आपल्याला एक संदेश दिसेल सदर संदेश काळजीपूर्वक वाचा व ओके बटनावर क्लिक करावे. आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदवला जाईल. बीड जिल्हयाि तील जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करावे व त्याचबरोबर दि. १९ ऑक्टोबर २०२२ रोजी शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर रोड, बीड येथे प्रत्यक्ष येऊन मुलाखत घ्यावी व रोजगार मेळाव्यास येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी. याबाबत काही अडचणी असल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्र.०२४४२ २९९११६ आणि श्री. इंगोले यांना ९८२२७८१८७६ या क्रमांकावर, श्री. शाह यांना ७०२०९ ९१४६७ या क्रमांकावर आणि श्री. यादव यांना ८२०८३ ६९८९० या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच Beed Skill या फेसबुक पेजला फॉलो व लाईक करावे असेही सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बीड यांनी कळविले आहे -*-*-*-*-

12 नोव्हेंबर रोजी लोकन्यायालयाचे आयोजन

बीड, दि.17 (जि.मा.का.) :- बीड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व सर्व तालुका विधी सेवा समिती यांचेमार्फत जिल्ह्यात लोकन्यायालयाचे शनिवार दि. 12 नोव्हेंबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या लोकन्यायालमध्ये आपले प्रकरण तडजोडीसाठी ठेवून प्रकरण तडजोड करून घ्यावे व आपला वेळ, श्रम व पैसा वाचवावा. लोकन्यायालयामध्ये न्यायालयातील सर्व प्रलंबीत दिवाणी दावे, मोटार अपघाताची प्रकरणे 138 एन. आय. अॅक्टची प्रकरणे, भूसंपादनाची प्रकरणे, तडजोडजन्य फौजदारी प्रकरणे व बँका, पतसंस्था, बीएसएनएल इ. दाखलपूर्व प्रकरणे यांचा समावेश आहे. तरी सदरील लोकन्यायालयामध्ये ज्यांची प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत आहेत. त्यांनी 12 नोव्हेंबर रोजीच्या लोकन्यायालयात आपले प्रकरण तडजोडीने निकाली काढावेत, असे आवाहन अध्यक्ष , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड यांनी केले आहे. -*-*-*-*-

शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

जिल्हा उद्योग केंद्राच्या पुरस्कारासाठी लघू उद्योग घटकांनी अर्ज करावेत

बीड, दि. 14, (जि. मा. का.) : जिल्हास्तरावर लघु उद्योग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लघु उद्योग घटकांना सन २०२२-२३ चे जिल्हा पातळीवरील प्रथम व द्वितीय जिल्हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी जिल्ह्यातील पात्र सुक्ष्म, लघू उद्योग घटकांकडून अर्ज मागविण्यात आले असून जिल्ह्यातील लघू उद्योग घटकांनी महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, बीड यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मंगळवार दि.15 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करावेत. असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. निवड केलेल्या उद्योग घटकास स्मृती चिन्ह व प्रथम पुरस्कारासाठी रु.१५,०००/- आणि द्वितीय पुरस्कारासाठी रु .१०,०००/- रोख रक्कम पालकमंत्री यांचे हस्ते उत्तेजनार्थ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. उद्योग घटक मागील दोन वर्षापासून नियमित उत्पादनात असणे आवश्यक आहे, लघू उद्योग घटकाने पाच वर्षापूर्वी स्थायी लघु उद्योग नोंदणी केलेली असावी, मागील दोन वर्षामध्ये घटकास सातत्याने नफा ( Profit ) झालेला असावा व रोजगार निर्मिती मध्ये वाढ होणे आपेक्षीत आहे, उद्योग घटक कोणत्याही वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा, लघू उद्योग घटकास या पूर्वी कोणताही राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला नसावा, उत्पादनासाठी नविन तंत्रज्ञान अवलंबिलेल्या घटकास प्राधान्य राहील अशा पात्रतेच्या अटी आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, बशिरगंज, बीड दुरध्वनी क्र. ०२४४२-२२२२८५ ई मेल आयडी didic.beed@maharashtra.gov.in यावर संपर्क साधावा. -*-*-*-*-

महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचा झाला शुभारंभ

• विजेत्या संकल्पनेचे होणार राज्यस्तरावर सादरीकरण • उद्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन बीड, दि. 14, (जि. मा. का.) : महाराष्ट्र् स्टार्ट अप यात्रे अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचा शुभारंभ आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथे झाला. यातील विजेत्या संकल्पना सादर करणाऱ्यास राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुशील उचले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीडचे प्राचार्य पंडीत मुने, उपप्राचार्य सुनील कुमावत, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. चिंचोलीकर, दिनदयाल उपाध्याय संस्थेचे गंगाधर देशमुख, स्पर्धक, नवउद्योजक, जिल्ह्यातील विविध आयटीआयचे प्राचार्य, अध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्तविक करताना सहाय्यक आयुक्त सुशील उचले म्हणाले, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने यासाठी पोर्टलवर नोंदणी केलेल्या स्पर्धक व नव उद्योजकांच्या कल्पनांचे सादरीकरणातून जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाद्वारे निवड केली जाईल व त्यांना राज्यस्तरावर सादरींकरणाची संधी मिळेल राज्यस्तरावरील विविध 7 क्षेत्रातील 21 निवड झालेल्या संकल्पना सादर करणाऱ्या विजेत्यांना मा. राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात येईल. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल केसकर यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. तसेच ग्रामउर्जा फाउंडेशनचे दादासाहेब गायकवाड व माजलगाव येथील स्टार्ट अप द्वारे व्यवसाय सुरु केलेले नवउद्योजक ताहेर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करुन शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अमित मालेगावकर यांनी तर आभार प्रदर्शन महात्मा गांधी नॅशनल फेलोशिपधारक प्रतिक शहा यांनी केले. जिल्ह्यातील स्थानिक नवउद्योजकांना नोंदणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सादरीकरण व ज्युरींच्या उपस्थितीमध्ये सादरीकरण करुन निवड करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने दि. 14 व 15 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र् स्टार्ट अप, रोजगार व उद्योजकता सप्ताहात आज महाराष्ट्र स्टार्ट अप शिबिर व सादरीकरण सत्र व उद्या 15 ऑक्टोबर रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 00000

एचआयव्हीबाबत जनजागृतीसाठी उपक्रम रेड रिबन क्लबअंतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा, विविध महाविद्यालयांच्या विजेत्या संघांचा गौरव

बीड, दि. 14, (जि. मा. का.) :- जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी रेड रिबन क्लब अंतर्गत जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये विजेत्या प्रथम क्रमांक बलभीम महाविद्यालय बीड यांनी तर द्वितीय क्रमांक स्वा. सावरकर महाविद्यालय बीड यांनी मिळवला व तृतीय क्रमांक मिल्लीया वरिष्ठ महाविद्यालय बीड यांनी मिळवला. सदर महाविद्यालयीन संघांना अनुक्रमे प्रथम तीन हजार रुपये, द्वितीय दोन हजार रुपये, तृतीय तीन हजार रुपये बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच सहभागी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. बीड जिल्हास्तरीय जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण रुग्णालय बीडच्या वतीने व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मिल्लीया वरिष्ठ महाविद्यालय बीड येथे गुरुवार 13 ऑक्टोबर 2022 रोजी आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील रेड रिबन क्लब अंतर्गत विविध महाविद्यालयांनी या स्पर्धेमध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. प्रश्नमंजुषा स्पर्धा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी कार्यक्रमाच्या मिल्लीया वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शेख हनीफ प्रमुख अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी डॉ. अरुण राऊत वैद्यकिय अधिकारी एआरटी सेंटर जिल्हा रुग्णालय बीड, सुहास कुलकर्णी, जनार्धन माचपल्ले व डॉ. रफिश शेख हे परिक्षक म्हणून उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थित रेड रिबन क्लब नुसार या एचआयव्ही / एड्स प्रश्न मंजुषेसाठी तोंडी प्रश्नोत्तरे घेण्यात आली व गुणानुक्रमे विशेष प्राविण्य मिळवलेल्या महाविद्यालयातील संघांना लेखी परिक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले. लेखी परिक्षेमधील पात्र महाविद्यालयीन संघापैकी एकुण 3 महाविद्यालयाची निवड अंतिम एकूण गुणानुसार केली. या प्रश्नमंजुषेच्या माध्यमातुन एचआयव्ही / एड्स, गुप्तरोग, टीबी इत्यादी आजाराबाबत मुलभुत व विस्तृत स्वरुपात माहिती विद्यार्थ्याना प्राप्त झाली व रेड रिबन क्लब अंतर्गत कार्य करणाऱ्यांना महाविद्यालयीन युवक युवतींना रेड रिबन क्लब चे उद्देश, भुमीका व कार्याबाबत माहिती प्राप्त होऊन पुढील कार्यासाठी प्रोत्साहन मिळाले. उपप्राचार्य डॉ. हनीफ शेख यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना निरनिराळ्या महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी नेहमी सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुहास कुलकर्णी यांनी केले. सुत्रसंचालन जनार्धन माचपल्ले यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार फारोकी एफ.आर. यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिल्लीया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इलीयास फाजील, रेड रिबन क्लब प्रमुख डॉ. रफिक शेख, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय बीड येथील डॉ. अरुण राऊत, समुपदेशक अमोल घोडके, फारोकी एफ. आर., नवनाथ चव्हाण, अमोल घोडके, जनार्धन माचपल्ले, इनामदार एफ. आर., महादेव इंगळे तसेच अशासकिय संस्थांचे प्रतिनिधी श्रीमती सुवर्णमाला अदमाने तसेच महाविद्यालयीन कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले. -*-*-*-*-

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०२२

जलयुक्त शिवार दोषींना काळ्या यादीत टाकणार 20 ऑक्टोबर पर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन

बीड, दि. 13, (जि. मा. का.) :- जलयुक्त शिवार परळी गैरव्यवहार प्रकरणातील दोषी ठेकेदार, मजूर संस्थांना त्यांचा काळ्या यादीत टाकण्याची एकतर्फी कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. संबंधितांनी अद्ययावत पत्ते जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बिंदुसरा नर्सरी, धानोरा रोड, बीड 431122 या कार्यालयात 20 ऑक्टोबर 2022 पर्यंत उपलब्ध करुन द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. गैरव्यवहार प्रकरणातील दोषी ठेकेदार यांचे विरुध्द काळ्या यादीत समावेश करण्याची कार्यवाही चालु असून या ठेकेदारांना, मजूर संस्थांना त्यांचा काळ्या यादीत का समावेश करण्यात येवू नये याबाबत खुलासा सादर करणेबाबत नोटीसा निर्गमित करण्यात आल्या होत्या परंतू परिपूर्ण पत्त्यांच्या अभावी सदर नोटीसा या परत आलेल्या आहेत. तरी सदरील ठेकेदारांना, मजूर संस्थांनी आपली बाजू मांडण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, बीड यांच्या कार्यालयात गुरुवार दि.20 ऑक्टोबर 2022 रोजीपर्यंत संपुर्ण पत्ते उपलब्ध करुन द्यावेत या उपरही अद्यावत व परिपुर्ण पत्ते उपलब्ध करुन दिले नाही तर काहीही म्हणणे नाही असे समजुन पाणलोट समिती सेलू प.जि.बीड, प्रकाश विठ्ठल गिते ता.परभणी जि.बीड, श्री हनुमान मजूर सहकारी संस्था अंबाजोगाई जि.बीड, श्री ठाकुर भगतसिंग बलबीर ता.परळी जि.बीड, श्री लाड सुनिल रा.परळी जि.बीड, श्री.नेहरकर रंगनाथ सुधाकर रा.पिसेगाव ता.केज जि.बीड, रुपा मजूर सहकारी संस्था सोनी जवळा ता.केज जि.बीड अशी परिपूर्ण व अद्यावत पत्ते प्राप्त नसल्यामुळे नोटीस प्राप्त न झालेल्या ठेकेदार व मजूर संस्थांची नावे आहेत असे जाहीर प्रगटनाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव

बीड, दि. 12, (जि. मा. का.) :- महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभाग अधिसूचना शुक्रवार दि. 30 सप्टेंबर 2022 अन्वये राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार बीड जिल्हाज परिषदेचे अध्यक्ष पद हे अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता राखीव करण्यात आले आहे. उपरोक्त अधिसूचनेनुसार जिल्हा परिषदांकरिता त्यांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या कालावधीच्या समाप्तीच्या दिवसाच्या लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी हे आरक्षण असणार आहे. या अधिसूचनेत दिल्यानुसार आरक्षण राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या पुढीलप्रमाणे – अनुसूचित जाती अ) अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 2, ब) अनुसूचित जाती (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 2, अनुसूचित जमाती अ) अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 3, ब) अनुसूचित जमाती (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 2, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग - अ) नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 4, ब) नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्ग (महिला) यांच्यासाठी (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 3, सर्वसाधारण अ) सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 9 ब) सर्वसाधारण प्रवर्गातील (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 9. 00000

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत शुक्रवारी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र

बीड, दि. 12 (जि. मा. का.) : महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा 2022 धोरणाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत शुक्रवार, दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर रोड, बीड येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ www.mahastartupyatra.in वर नोंदणी करून, अधिकाधिक नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे. प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उद्योजकताबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आदी कार्यक्रमात आयोजित करण्यात येणार आहे. सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषि, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, ऊर्जा), प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे प्रत्येकी 10 मिनिटाचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात येणार असून, यामधून जिल्हास्तरावर अव्वल 3 पारितोषिक विजेते घोषित केले जातील. त्यामध्ये प्रथम पारितोषिक रुपये 25 हजार, व्दितीय पारितोषिक 15 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये दिले जाणार आहे. तसेच या सर्वोत्तम तीन संकल्पना विजेत्यांना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील सर्वोत्तम 3 संकल्पनांमधून राज्यस्तरीय निवड तज्ञ समितीसमोर अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येईल. यामधून विविध 7 क्षेत्रातील राज्यस्तरीय विजेत्यांना प्रथम पारितोषिक रुपये 1 लाख, व्दितीय पारितोषिक 75 हजार रुपये तसेच सर्वोत्कृष्ट महिला उद्योजकांना 1 लाख अशी 21 पारितोषिके दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी राजभवन, मुंबई येथे राज्यपाल यांच्या हस्ते विशेष समारंभात वितरित करण्यात येणार आहेत. तसेच सदर विजेत्यांना पेटंट सहाय्य, इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल, निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्त्वाच्या संस्था व तज्ज्ञ व्यक्तिचे मार्गदर्शन, तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स इत्यादी सारखे इतर लाभही पुरविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी बाळकृष्ण यादव, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, यांच्याशी 8208369890 या क्रमांकावर संपर्क साधावा. 00000

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्मान कार्डसाठी विशेष मोहीम आरोग्य मित्र, आपले सरकार सेवा केंद्रांशी संपर्काचे आवाहन

बीड, दि. 12 (जि. मा. का.) : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. अधिकाधिक लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड मोफत प्राप्त करता यावे, यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अजित पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी संयुक्तरीत्या केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे संयुक्त आवाहन केले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. ज्ञानोबा मोकाटे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, नागरी सुविधा केंद्र जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री जन आरोग्य योजना डॉ. अशोक गायकवाड, अंमलबजावणी सहाय संस्थेचे डॉ. संदीप आगलावे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याकरिता व अधिकाधिक लाभार्थींना आयुष्मान कार्ड मोफत प्राप्त करता यावे, यासाठी जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी मूळ शिधापत्रिका/पीएम लेटर व आधार कार्ड अथवा अन्य कोणतेही शासनमान्य मूळ ओळखपत्र सोबत घेऊन संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी अथवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा UTIITSL केंद्रांशी संपर्क साधावा. तसेच, काही समस्या असल्यास डॉ. अशोक गायकवाड, जिल्हा समन्वयक, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जिल्हा रुग्णालय, बीड यांचेशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी हे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ट निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब असून या योजनेचा लाभ कमाल मर्यादा ५ लाख रुपये प्रति कुटुंब प्रती वर्ष घेता येणार आहे. यासाठी सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ट निकषांनुसार निवडलेल्या ठराविक निवडक लाभार्थी कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी www.mera.pmjay.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा १४५५५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा. अधिक सोयीकरिता गावनिहाय तसेच प्रभागनिहाय यादी पाहण्यासाठी www.aapkedwarayushman.pmjay.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थींना विविध गंभीर आजारांवर ३४ विशेष श्रेणीत उपचार असून त्यामध्ये १२०९ उपचार (१०३८ उपचार पद्धती या खाजगी रुग्णालयात तसेच १७९ उपचार हे शासकीय रुग्णालयांतर्गत) योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ञ सुविधांवर पूर्णपणे मोफत उपचाराचा लाभ मिळेल. प्रामुख्याने सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांचे कर्करोग, तसेच मानसिक आजारावरील उपचार आहेत. या योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४२ हजार ३६३ कुटुंबांना होणार असून बीड जिल्ह्यातून आजपर्यंत ६५ हजार १७५ लाभार्थींनी उपचारासाठी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. 00000

ई-श्रम पोर्टलवर नोंदणीसाठी 22 ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम - सरकारी कामगार अधिकारी श्री. गुं. मुंडे

बीड, दि. 12, (जि. मा. का.) : असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरविण्याच्या उद्देशाने त्यांचा राष्ट्रीय डेटाबेस ( NDUW ) तयार करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्या अनुषंगाने असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी ई-श्रम पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यावर नोंदणी करण्याकरिता दि. १० ते दि. २२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विशेष नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील विविध असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांनी जवळच्या नागरी सुविधा केंद्रात जाऊन ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी श्री. गुं. मुंडे यांनी केले आहे. असंघटित क्षेत्रात ऊसतोड कामगार, शेतीकाम करणारी व्यक्ती, आशा सेविका व अंगणवाडी सेविका, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, पेंटर / इलेक्ट्रिशियन / प्लंबर, पशुपालन करणारे कामगार, मनरेगा, मजूर, सुतारकाम करणारी व्यक्ती, घरकाम करणारी महिला, न्हावी, कामगार, ब्युटीपार्लर कामगार महिला, रस्त्यावरील विक्रेते, लहान शेतकरी, माथाडी कामगार आदि विविध क्षेत्रातील ३०० कामगार / व्यक्तिंचा समावेश होतो. नोंदणीकरिता संबंधिताचे वय वर्षे १७ ते ५९ दरम्यान असावे. तो आयकर भरणारा नसावा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सदस्य नसावा. शासनाने निश्चित केलेल्या ३०० उद्योगातील असणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक ( राष्ट्रीयकृत बँक अथवा IFSC कोड असलेली इतर कोणतेही बँक), सक्रिय मोबाईल नंबर ही कागदपत्रे आवश्यक असून स्वयंनोंदणी करण्यासाठी कामगारांचा सक्रिय मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. नागरी सुविधा केंद्रासह, कामगार सुविधा केंद्र, esharm portal url : eshram.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. चौकशीसाठी राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर १४४३४, टोल फ्री नंबर १८००१३७४150 00000

शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा -जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर

बीड, दि. 12 (जि. मा. का.) : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार २०२१-२२ , २०२२-२३ व २०२३-२४ या ३ वर्षांकरिता बीड जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, केळी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या फळपिकांकरिता राबविण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी केले आहे. फळपीक व विमा हप्ता उतरविण्याची अंतिम तारीख पुढीलप्रमाणे - द्राक्ष १५ ऑक्टोबर २०२२, मोसंबी, केळी व पपई ३१ ऑक्टोबर २०२२. संत्रा ३० नोव्हेंबर २०२२, आंबा ३१ डिसेंबर २०२२ आणि डाळिंब १४ जानेवारी २०२३. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, या हेतूने एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. मुंबई मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्याने योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत कळविणे आवश्यक राहील ( सहपत्र -५ ). विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा हप्ता बँकेमार्फत विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल, अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमित व अतिरीक्त विमा हप्ता बँकेमार्फतच भरणे आवश्यक आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बँकेशिवाय नागरी सुविधा केंद्र / आपले सरकार सेवा केंद्रामार्फतही विमा अर्ज व विमा हप्ता भरण्याची सुविधा दिलेली आहे. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आधार कार्ड किंवा आधार नोंद पावती , सातबारा उतारा व बँक पासबुकची प्रत सादर करून प्रत्यक्ष साक्षांकन करणे बंधनकारक आहे. मृग व अंबिया या दोन्ही बहारासाठी एकाच क्षेत्रावर विमा संरक्षणासाठी अर्ज भरण्यात येत असल्यामुळे त्या अनुषंगाने सहपत्र -4 च्या नमुन्यात सहभागी अर्जदार शेतकयांचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. 00000

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०२२

मान्यताप्राप्त संस्थांनी 11 ऑक्टोबरपर्यंत दरपत्रके सादर करण्याचे आवाहन

बीड, दि. 6, (जि. मा. का.) : सहाय्यक संचालक, नगर रचना बीड या कार्यालयातील वर्ग - 4 शिपाई या पदाच्या उमेदवाराची सेवा बाह्ययंत्रणेव्दारे मान्यताप्राप्त संस्था / कंपनी यांच्याकडून कंत्राटी तत्त्वावर उपलब्ध करुन घेण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. त्यास अनुसरून मान्यताप्राप्त संस्था/कंपनी यांनी दरपत्रक सीलबंद पाकिटात दि. 11 ऑक्टोबर 2022 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक, नगर रचना फु. वि. नांदे यांनी केले आहे. मान्यता प्राप्त संस्था / कंपनी यांच्याकडून या कार्यालयास एक वर्ग -4 शिपाई पदासाठी (किमान चौथी पास असणे आवश्यक आहे) उमेदवाराची सेवा निव्वळ तात्पुरत्या कंत्राटी स्वरुपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन देणेकामी दरपत्रक मागविण्यात आले आहेत. दरपत्रके सीलबंद पाकिटात दि. 11 ऑक्टोबर 2022 रोजी 5 वाजेपर्यंत सहाय्यक संचालक, नगर रचना, जूनी नगर परिषद इमारत, बशीरगंज रोड, बीड या कार्यालयाकडे पोहोचतील अशा बेताने पाठविण्यात यावे. तसेच अटी व शर्ती सहाय्यक संचालक, नगर रचना, या कार्यालयाच्या सूचना फलकावर पहावयास मिळतील. असे यासंदर्भात प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. 00000

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

बीड, दि. 06, (जि. मा. का.) : राज्य निवडणूक आयोगाने माहे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात यावयाचा मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक 13 ऑक्टोबर 2022 असून हरकती व सूचना दाखल करण्याचा अंतिम दिनांक 18 ऑक्टोबर 2022 आहे. ही माहिती जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिली. मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करण्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक 31 मे 2022, प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक गुरूवार, दि. 13 ऑक्टोबर 2022, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी गुरूवार दि. 13 ऑक्टोबर 2022 ते मंगळवार दि. 18 ऑक्टोबर 2022 पर्यंत (शनिवार दि. 15 ऑक्टोबर 2022 रोजी हरकती स्वीकारण्यात येतील), प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करण्याची तारीख शुक्रवार, दि. 21 ऑक्टोबर 2022 आहे. 00000

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

भूमि अभिलेख विभागांतर्गत 7 ऑक्टोबरला पेन्शन अदालत

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : भूमि अभिलेख विभागातून बीड जिल्ह्यातील मागील दहा वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी -कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती विषयक लाभ देणे बाबतची कार्यवाही प्रलंबित आहे, अशा अधिकारी-कर्मचारी यांची पेन्शन अदालत दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख बीड, चांदमारी शासकीय वसाहत, पालवन चौका जवळ, धानोरा रोड, बीड ४३११२२ या कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे. तरी संबंधित अधिकारी - कर्मचारी यांनी आवश्यक कागदपत्रासह पेन्शन अदालतीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 00000

नवरात्रोत्सवासाठी आज ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सूट

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : जिल्ह्यात ध्वनि प्रदूषण नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे तसेच ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम 2000 मधील अटी व शर्तीस अधीन राहून शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्याकडून नवरात्रोत्सवासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादिच्या वापराबाबत सूट जाहीर करण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केले आहे. त्याअनुषंगाने शासन आदेशानुसार नवरात्रोत्सवासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6.00 वाजेपासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीची मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादिच्या वापराबाबत सूट जाहीर करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निर्गमित केले आहेत. 00000

एमपीएससी परीक्षा केंद्र परिसरात 8 ऑक्टोबरला कलम 144 लागू

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त गट - ब ( पूर्व ) परीक्षा - २०२२ शनिवार, दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकूण (२१) उपकेंद्रांमधून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ६ हजार ६९२ उमेदवार बसलेले असून परीक्षा कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दिली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार या परीक्षार्थींना त्यांच्याकडील मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रीक वस्तु व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही. परीक्षेच्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत: चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हींग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतीही दोन ओळखपत्रे व त्यांची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षा उपकेंद्रावर सकाळी ८.३० वाजेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबी खाली प्रवेश देण्यात येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे. 00000

बीडमध्ये 10 ऑक्टोबरला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : बीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पीएम राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे सोमवार दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक प्रशिक्षणार्थींनी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यासाठी वेळेवर हजर रहावे, असे आवाहन बीड मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य यांनी केले आहे. 00000

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आजपासून मतदारनोंदणी

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : मा. भारत निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्यासाठी कार्यक्रम दिनांक 14 जुलै 2022 रोजी जाहीर केला असून, दिनांक 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरु होणार आहे. दि. 01 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदार संघासाठी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी होणार आहे. या पार्श्वभूमिवर बीड जिल्ह्यातील दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकास विहित निकषानुसार पात्र मतदारांनी त्यांचे अर्ज नमुना क्र. 19 मध्ये भरुन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. दर सहा वर्षांनी होणाऱ्या विधान परिषद सदस्यत्वासाठीच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी संपूर्ण नव्याने मतदार यादी तयार करण्यात येते. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची पहिली पायरी म्हणून मतदार यादीचे काम हाती घेण्यात येते. त्यासाठी मुदत संपणाऱ्या मतदारसंघाच्या मतदार यादीच्या नोंदणीचा कार्यक्रम आयोगाने 1 ऑक्टोबर 2022 ला कार्यक्रमाची सूचना प्रसिध्द होईल. याच दिवसापासून औरंगाबाद विभागाच्या मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरु होणार आहे. दिनांक 07 नोव्हेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. 23 नोव्हेंबर 2022 ला प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर, त्या यादीवर दि. 23 नोव्हेंबर ते दि. 9 डिसेंबर 2022 या काळात दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. दि. 25 डिसेंबर 2022 ला दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करून त्यानंतर दि. 30 डिसेंबर 2022 ला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. सदर मतदार यादीमध्ये अर्ज नमुना क्र. 19 व्दारे नावनोंदणी करावयाची आहे. 00000

जिल्हा लोकशाही दिन सोमवारी

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा लोकशाही दिन दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी कळविले आहे. लोकशाही दिनाकरिता मुदत पूर्व प्राप्त अर्ज संबंधित विभाग प्रमुख यांना पाठवून जिल्हा लोकशाही दिन बैठकीत त्यांनी सदर अर्जावर कार्यवाहीच्या अहवालासह उपस्थित राहणे आवश्यक आहे. 00000

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक संपन्न

कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने मृत पालकांची बालके मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा बीड, दि, 29 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने पालक गमावलेल्या बालकांना त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी, या दृष्टीकोनातून मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यामुळे ती बालके शिक्षणाने सक्षम होवून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास भरीव मदत होईल. तरी जिल्ह्यातील कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने मृत पालकांची बालके शासनाच्या अर्थसहाय्याच्या मदतीपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय कृती दलाच्या (टास्क फोर्स) बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एन. गोडबोले, सहा.पोलिस निरीक्षक सुरेखा धस, बाल कल्याण समितीचे संतोष वारे, चाईल्ड लाईनचे अतुल कुलकर्णी व रामहरी जाधव, परिविक्षाधिन अधिकारी मंगेश जाधव, संरक्षण अधिकारी ए. एच. कदम यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, राज्य शासनाकडून कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने पालक गमावलेल्या बालकांना जे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे, त्यामध्ये एक पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी 5 हजार रुपये तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 10 हजार रुपये मंजूर करुन लाभ देण्यात यावा. यासंदर्भात अद्यापही अर्ज सादर न केलेल्या बालकांनी अर्ज सादर करण्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. जिल्ह्यातील बालकांसाठी काळजी व संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) समिती गठीत करण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहत असतात. बीड जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यातील कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे एक पालक आणि दोन पालक गमावलेल्या बालकांचे एकूण 425 अर्ज प्राप्त झाले आहेत. हे अर्ज जिल्ह्यातील तालुका संरक्षण अधिकारी यांच्याकडून छाननी करुन गुगल फॉर्मवर अद्ययावत करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी यावेळी दिली. 00000

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची कार्यशाळा संपन्न

बीड, दि, 29 (जि. मा. का.) सेवा पंधरवडाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुहास कुलकर्णी यांची उपस्थित होते. यावेळी सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांनी तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळण्याकरिता अवलंबवयाची कार्यपद्धती सांगून तृतीयपंथीयांच्या विविध प्रकाराच्या समस्याचे निराकरण केले. तसेच यावेळी ऑनलाईन आवेदन केलेल्या चार तृतीयपंथीय व्यक्तिंना ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ . सुहास कुलकर्णी यांचे तृतीयपंथीयांना आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास ग्रामीण विकास मंडळ बनसारोळाचे प्रकल्प व्यवस्थापक सय्यद फारुक हुसेन, समुपदेशक बापु लुंगेकर, एफ. आर. फारुकी, (डी. ए .एम अॅन्ड ई.), एल. डब्लू. एस प्रकल्प व्यवस्थापक वाघमारे रामेश्वर व टी. जी. वर्कर कल्पना बांगर आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एन. हांगे यांनी केले. 00000

लोकगीतांतून लोकशाहीचा जागर स्पर्धा, 31 ऑक्टोबरपर्यंत सहभाग नोंदवण्याचे आवाहन

बीड, दि, 29 (जि. मा. का.) : लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तिंनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांनी केले आहे. आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यास नाव वगळणे, विविध घटकांना (दिव्यांग, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक) दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, हे विषय केंद्रस्थानी ठेवून गीतरचना करता येईल. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयांवर गीतरचना करून लोकशाहीसंबंधी जागृती करता येईल. स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे - सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. एकल (सोलो) आणि समूह (ग्रुप) दोन्ही प्रकारची लोकगीते पाठवता येतील. स्पर्धेचा अर्ज पुढीलप्रमाणे भरावा. यात समूह गीते पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरावा. लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी या विषयांशी संबंधित लोकगीत गाऊन त्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवावी. गीतासोबत नाच असला तरी चालेल. एका स्पर्धकाने किंवा समूहाने एकच गीत पाठवावे. आपल्या गीताची ध्वनिचित्रफीत पाठवताना, ती कमीत-कमी दोन मिनिटांची आणि जास्तीत-जास्त पाच मिनिटांची पाठवावी. ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त ५०० एमबी असावी आणि ती एमपी 4 फॉरमॅटमध्ये असावी. ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडताना, त्यावर व्यक्तिचे किंवा मंडळाचे नाव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी या विषयांवर लोकगीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल. आपली ध्वनिचित्रफीत https://forms.gle/hRoUEKUEb6bT2x4g9 या गुगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावी. ज्या स्पर्धकांना ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर), ९९८७९७५५५३ (तुषार पवार) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे. दिनांक २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. लोकगीत बोलीभाषेतले असेल तर गुगल अर्जावर त्याचा मराठीत अनुवाद करून पाठवावा. बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल. समूह लोकगीतास प्रथम क्रमांक २१,०००/- रुपये, द्वितीय क्रमांक ११, ०००/- रुपये, तृतीय क्रमांक ५,०००/- रुपये आणि उत्तेजनार्थ १००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर एकल लोकगीतास प्रथम क्रमांक ७,०००/- रुपये, द्वितीय क्रमांक ५, ०००/- रुपये, तृतीय क्रमांक ३,०००/- रुपये आणि उत्तेजनार्थ ५०० रुपयांची एकूण दहा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. एकल लोकगीतासाठी २५ पेक्षा कमी प्रवेशिका आल्यास त्यांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन न करता समूह गटांतर्गत त्यांचे मूल्यमापन केले जाईल. सहभागी सर्व स्पर्धकांना (समूह गीतात सहभागी प्रत्येकाला) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. समूहामध्ये जास्तीत जास्त पंधरा व्यक्तिंचा समावेश असावा, त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा समावेश असल्यास अधिकच्या व्यक्तिंना प्रमाणपत्र दिले जाणार नाही. विजेत्यांना बक्षिसाची रक्कम, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. आलेल्या लोकगीतांमधून सर्वोत्तम गीते निवडण्याचा, तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल. निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी / अधिकारी सदर स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, मात्र त्यांच्या साहित्याचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही. 00000

गळीत हंगामासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन

बीड, दि, 28 (जि. मा. का.) : जिल्ह्यात यावर्षी म्हणजे 2022-23 मध्ये मागील वर्षापेक्षा ऊस लागवड क्षेत्र जास्त प्रमाणावर आहे. त्यामुळे भविष्यात गाळपाअभावी अतिरीक्त ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीकोनातुन आवश्यक ती खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन योग्य ते नियोजन करत आहे. जिल्हाधिकारी यांनी साखर आयुक्त, पुणे यांना जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र अधिक असल्याने जिल्ह्यातील व नजीकच्या भागातील साखर कारखाने लवकरात लवकर चालू करण्यात यावेत म्हणून विनंती केली आहे. जिल्ह्याचा गळीत हंगाम 2021-2022 मध्ये बीड जिल्ह्यात 89193 हेक्टर क्षेत्र ऊस या पिकाखाली लागवडीस होते. या क्षेत्रापैकी कृषि विभागाने अंदाज केलेले क्षेत्र 69864 हेक्टर क्षेत्रावर 59.07 लाख मेट्रिक टन ऊस संभाव्य गाळपास उपलब्ध असल्याबाबत निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने सन 2021-2022 या साली अतिरीक्त ऊस शिल्लक राहू नये या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते. 00000

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्यअंतर्गत गोदाम बांधकामासाठी अर्ज स्वीकार प्रक्रियेस प्रारंभ

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - पौष्टिक तृणधान्य सन २०२२-२३ या वर्षात निविष्ठा साठवणुकीसाठी २५० मे. टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेस 27 सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. तरी गोदाम बांधकामासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांची कंपनी ज्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आहे, त्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे दि. २७ सप्टेंबर ते दि. ७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क करून गोदाम बांधकामासाठी अर्ज करावेत. गोदाम बांधकामाची क्षमता २५० मे. टन असून, अनुदान जास्तीत जास्त १२.५० लाख किंवा गोदाम बांधकामास आलेल्या खर्चाच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल ते देय आहे. तसेच ते राष्ट्रीयकृत बँकेचे कर्जाशी निगडित आहे. अर्जासोबत शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, ज्या जागेवर गोदाम उभारणी करण्याचे नियोजन आहे, त्या जागेचा सातबारा व ८-अ जोडण्यात यावा. जिल्हास्तरावर कार्यपद्धतीनुसार लक्षांकाएवढे अर्ज निवड प्रक्रिया करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीस आवश्यक छाननीनंतर पूर्वसंमती देण्यात येईल. गोदाम बांधकाम २५० मे. टन क्षमतेचे असून राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझाइन्स, स्पेसीफिकेशन, गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक आहे. पूर्व संमती भेटल्यावर बँक कर्ज व सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी घेतल्यानंतरच गोदाम बांधकामास कार्यारंभ आदेश देण्यात येईल. तसेच निवड ते पूर्वसंमतीने काम पूर्णत्वासाठी विशिष्ट कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. 00000

शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी प्रणाली दि. 22 सप्टेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी व अर्जाची पडताळणी करुन समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर पाठविण्याबाबत संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांनी कार्यवाही करण्याबाबत सर्व महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. तरी जिल्ह्यातील पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज नोंदणी करावी. ऑनलाईन प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जावर महाविद्यालयांनी विहित वेळेत कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांनी केले आहे. 00000

पोकरा योजनेत अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत फळबाग व बांबू लागवडीकरिता अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत शुक्रवार, दि. 30 सप्टेंबर 2022 असून, ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप अर्ज केले नसतील, त्यांनी पुढील दोन दिवसात तात्काळ पोकरा योजनेअंतर्गत अर्ज सादर करावेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी केले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत फळबाग व बांबू लागवड अंतर्गत अंतिम मुदतीनंतर पोर्टलवरील फळबाग व बांबू लागवड घटक बंद होणार आहे. फळबाग व बांबू लागवड अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 30 सप्टेंबर 2022 असून लागवड पूर्ण करण्याची अंतिम मुदत दि. 30 नोव्हेंबर 2022 आहे. शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्राचे कृषि सहायक अथवा समूह सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तालुका स्तरावर शीघ्र प्रतिसाद दल स्थापन करावे - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : पावसाळ्यात संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तहसीलदार यांच्या नेतृत्त्वाखाली तालुका स्तरावर एक शीघ्र प्रतिसाद दल स्थापन करावेत. त्यांना प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मान्सून आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड आदि व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, प्रत्येक तहसील स्तरावर प्रथम शीघ्र प्रतिसाद दल आणि जिल्हा स्तरावर द्वितीय शीघ्र प्रतिसाद दल स्थापन करावेत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, आर्थिक बळ आणि साधनसामुग्री याबाबतचा स्थानिक स्तरावर आढावा घेऊन योग्य ते नियोजन आतापासूनच करावे. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठविण्यात यावा. सदर प्रस्ताव तयार करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचा तंतोतंत अवलंब करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, मान्सून कालावधीत पाणी आणि वीज यांच्याशी संबंधित दुर्घटना घडतात. त्यामुळे संबंधितांना प्रशिक्षण देताना या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. माजलगावसारख्या मोठ्या प्रकल्पाच्या ठिकाणी 2 टीम तयार कराव्यात. एक टीम तालुका स्तरावरील असेल व दुसरी टीम स्थानिक स्तरावरील असेल. आपत्ती व्यवस्थापन ही एका विभागाची जबाबदारी नसून, याबाबत व्यापक विचार करावा. आपत्तीशी मुकाबला करताना सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले, गावातले पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्ती, साप पकडणाऱ्या व्यक्ती आदि आपत्तीशी संबंधित व्यक्तिंच्या संपर्क क्रमांकाची यादी गावनिहाय तयार ठेवावी. शीघ्र प्रतिसाद दलातील व्यक्तिंना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. वैद्यकीय पथक तयार ठेवावे. तसेच, आपत्तीशी लढण्यासाठी लागणारी साधन सामग्रीची मागणी करावी. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सदर शीघ्र प्रतिसाद दलामध्ये गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याबाबत सूचना केल्या. याशिवाय प्रत्येक गावस्तरावर एक पथक तयार करावे, त्यामुळे आपत्ती टाळण्यासाठी तात्काळ मदत होईल, असे ते म्हणाले. बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, अधीक्षक अभियंता तथा प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, मच्छिमार समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 00000

भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांनी स्वतंत्र बैठक घ्यावी - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे संबंधित विभाग प्रमुखांनी स्वतंत्र बैठक घेऊन त्वरित निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह समितीचे शासकीय, अशासकीय सदस्य व तक्रारदार उपस्थित होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जिल्हा पुरवठा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषि विभाग, सहकार विभाग, पाटबंधारे विभाग, मृदा सर्वेक्षण विभाग आदि विभागाचे अधिकारी या समितीचे शासकीय व ॲड. अजित देशमुख, ॲड. सय्यद खाजा मिया हे अशासकीय सदस्य आहेत. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, 31 मे च्या बैठकीतील 7 आणि नवीन प्राप्त 8 प्रकरणे समितीपुढे आहेत. यापैकी 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, 11 प्रकरणे प्रलंबित आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी प्रशासन आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीपुढे प्रकरण सादर करण्यापूर्वी तक्रारदारांनी संबंधित विभाग प्रमुखांची भेट घेऊन समस्या मांडावी, जेणेकरून तक्रार निकाली निघण्यास मदत होईल. आजच्या बैठकीत प्राप्त प्रकरणे संबंधित विभागाकडे वर्ग करावीत. संबंधितानी पुढील बैठकीच्या आधी सदर प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 00000

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

केंद्रीय उपसचिव प्रियांक चतुर्वेदी यांनी घेतला जलशक्ती अभियानाचा आढावा

बीड, दि, 28 (जि. मा. का.) : केंद्रीय उपसचिव प्रियांक चतुर्वेदी यांनी जलशक्तीअभियानांतर्गत बीड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कामांचा आढावा आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जलशक्ती अभियान - कॅच द रेन ही एक कालबद्ध मोहीम आहे. दि. 29 मार्च 2022 ते 30 सप्टेंबर 2022 असा या अभियानाचा कालावधी आहे. हा केंद्र शासनाच्याविविध मंत्रालयांचा व राज्य शासनांचा एकत्रित उपक्रम आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती,रोजगार हमी योजना, कृषि, वन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,बांधकाम विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभाग, महिला वबालकल्याण विभाग, पाटबंधारे विभाग व जलसंधारण विभाग आदि विभाग या मोहिमेत सहभागी आहेत. या मोहिमेंतर्गत बीड जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत कामे हाती घेऊन पूर्ण करण्यातआली आहेत. या कामांची पाहणी करण्याकरिता केंद्र शासनामार्फत एक समिती नियुक्त करण्यातआली असून, या समितीमार्फत जिल्ह्यात पूर्ण झालेल्या कामांना भेटी देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय उपसचिव प्रियांक चतुर्वेदीयांनी आज या अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेतला तसेच विविध मौलिक सूचनाकेल्या. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्ह्यात या अभियानांतर्गतविविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले, जिल्हाधिकारीकार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयसीआयसीआय यांच्या माध्यमातून 100 गावांमध्येजलपुनर्भरणाची (रेनवॉटर हार्वेस्टिग) कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील शासकीय व वैयक्तिकइमारतींवरील छतांवर पडणारे पावसाचे पाणी नजीकच्या विहिरीत सोडण्यात येते. यामुळे विहिरीचापाणीसाठा व भूजलपातळी वाढण्यास मदत होत आहे. पुढील टप्प्यात 500 गावांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामे कार्यान्वित होणार आहेत. जिल्हा जलसंधारण अधिकारी अजित परांडे म्हणाले, पावसाच्यापाण्याचे पुनर्भरण करणे, नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करणे, पाणी बचत व पाण्याचा विवेकी वापर, जलसाठ्यांचे जिओ टॅगिंग करणे आदि जलशक्ती अभियानाची मुख्य उद्दिष्टे आहेत.जिल्ह्यात जलसंवर्धन व जलपुनर्भरणाची 385 कामे पूर्ण कऱण्यात आली असून, 356 कामे सुरू आहेत. पारंपरिक व अन्य जलसाठ्यांचे पुनरूज्जीवन अंतर्गत 143 कामे पूर्ण कऱण्यात आली असून, 43 कामे सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे दिली. -*-*-*-*-