शुक्रवार, ३१ मार्च, २०१७

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 31:- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          शनिवार दि.1 एप्रिल 2017 रोजी औरंगाबाद येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, बीड येथे सकाळी 10.30 वाजता आगमन व राखीव.  दुपारी 4 वाजता बीड येथून वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

गुरुवार, ३० मार्च, २०१७

तंबाखू व्यसनाच्या दुष्परिणामाची जनजागृती आवश्यक - हेमंत क्षीरसागर


                   
          बीड, दि. 30 :- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. अशा व्यसनांच्या दुष्परिणामांची जनजागृती होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन बीडचे उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता व आरोग्य सभापती हेमंत क्षीरसागर यांनी केले.  
          बीड शहरातील अन्वीता हॉटेलमध्ये जिल्हा रूग्णालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, डॉ.पाटील, डॉ.हरिदास, आदि मान्यवर उपस्थित होते.
          क्षीरसागर पुढे म्हणाले की, शाळा, महाविद्यालयस्तरावर व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत चर्चासत्र घेवुन चांगला बदल घडेल, सगळ्यांनी एकत्र येवुन व्यसनाधीनतेच्या विरोधात काम करणे गरजेचे आहे. नगर पालिकेच्या माध्यमातुन स्वच्छता, आरोग्य व मुलभुत प्रश्नांबरोबरच शहरातील युवकांना व्यसनापासुन दुर ठेवण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम राबवु असेही क्षीरसागर म्हणाले.
          प्रारंभी धन्वंतरी पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ.धबडगावकर यांनी प्रास्ताविक केले. दंत चिकित्सक संघटनेचे अध्यक्ष डॉ..अशोक उनवणे व हरणमारे यांनी सादरीकरणाव्दारे तंबाखू व्यसनाच्या दुष्परिणामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ.अमोल बनसोडे, डॉ.सुजाता नरवणे यांच्यासह नगरसेवक, सामाजीक संस्थांचे प्रतिनिधी व नागरीकांची उपस्थिती होती.

          हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.राजेंद्र दबडगावकर, सिमा पाटील, डॉ.अमोल बनसोडे, सुजाता नरवणे, श्रीकांत उजगरे, दामोदर सुरेश, कृष्णा शेंडगे, वाव्हुळ व जिल्हा रूग्णालयातील तंबाखु नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

कोषागार व स्टेट बँक ऑफ हैद्राबाद 31 मार्च रोजी 10 वाजेपर्यंत सुरु राहणार


                   
          बीड, दि. 30 :- जिल्ह्यातील सन 2016-17 या आर्थिक वर्षाचे शासकीय व्यवहार पुर्ण करण्यासाठी शुक्रवार दि.31 मार्च 2017 रोजी बीड कोषागार तसेच अधिनस्त  सर्व उपकोषागार कार्यालय व स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या शासकीय व्यवहार करणाऱ्या सर्व शाखा रात्री 10 वाजेपर्यंत चालु ठेवण्याबाबत बीडचे जिल्हाधिकारी यांनी आदेश दिले आहेत.

          जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी अचुक देयके कार्यालयीन वेळेत सादर करुन शुक्रवार दि.31 मार्च 2017 रोजी रात्री 10 वाजेपर्यंत धनादेश ईएफटी प्राप्त करुन घ्यावी. त्यानंतर सन 2016-17 चे आर्थिक व्यवहार बंद करुन नवीन आर्थिक वर्ष 2017-18 च्या वर्षाचे लेखे सुरु केले जातील याची सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी असे बीडचे कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.

बुधवार, २९ मार्च, २०१७

विधानसभा विरोधी पक्षनेते श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचा दौरा


                   
          बीड, दि. 29 :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. राधाकृष्ण विखे पाटील हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          शनिवार दि.1 एप्रिल 2017 रोजी औरंगाबाद येथून शासकीय विश्रामगृह, केज येथे सायंकाळी 5.45 वाजता आगमन व राखीव. सायंकाळी 6.30 वाजता जाहीर सभा-संघर्ष यात्रा. रात्री 8.30 वाजता बीड येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण करतील.

तंबाखु नियंत्रणाविषयी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन


                   
          बीड, दि. 29 :- राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमातर्गंत तंबाखु नियंत्रण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व तंबाखुच्या दुष्परिणामाबद्दल माहिती देण्यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन दि.30 व 31 मार्च 2017 रोजी बीड येथे जालना रोडवरील हॉटेल अन्वीता या ठिकाणी करण्यात आले आहे.

          कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ.भारतभुषण क्षीरसागर, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यशाळेस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, भारतीय दंत संघटनेचे अध्यक्ष डॉ.अशोक उणवने व दंत शल्य चिकित्सक डॉ. सत्येंद्र दबडगावकर मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेस जिल्हास्तरीय समन्वय समितीचे सर्व सदस्य, बीड नगर परिषदेचे सदस्य, खाजगी दंत व्यावसायिक, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक, शहरातील विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, पत्रकार व राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमातर्गंत कार्यरत असलेले सर्व वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत तंबाखुमुळे होणारे दुष्परिणाम,आजार, मृत्यू व तंबाखु नियंत्रण कायदा 2003 बाबत चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.

शुक्रवार, २४ मार्च, २०१७

राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिम एकही बालक पोलीओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



        बीड, दि. 24 :- जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय पल्स पोलीओ मोहिमेचे दुसरे सत्र दिनांक 2 एप्रिल 2017 रोजी राबविण्यात येणार आहे. शुन्य ते पाच वयोगटातील एकही बालक पोलीओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत या मोहिमेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला यावेळी ते बोलत होते.
            यावेळी पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेच्या लस साठा, सर्व्हेक्षण, वाहन व्यवस्था, प्रसिध्दी, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग इतर संबंधित  विभागाशी समन्वय, मनुष्यबळ आदींचा जिल्हाधिकारी राम यांनी सविस्तर आढावा घेऊन उपयुक्त सूचना केल्या.

            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी सर्व जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी कर्मचाऱ्यांना मोहिमेच्या पर्यवेक्षणासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी पल्स पोलीओ मोहिमेच्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या सुक्ष्म कृती नियोजनाची सविस्तर माहिती  दिली. या बैठकीस जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्यासह आरोग्य विभागाचे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन शौचालय बांधून नियमित वापर करावा


          बीड, दि. 24 :- सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचारी तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले असून त्यांनी 31 मार्च 2017 पर्यंत शौचालय बांधून त्यांचा नियमित वापर करावा. तसेच उघड्यावर शौच करतांना स्वत: किंवा कुटूंबातील सदस्य आढळल्यास मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील प्रकरण 7 कलम 115 मधील तरतूदीनूसार गुन्हा नोंद करण्यात येईल.

          शासनाचे सेवक या नात्याने महाराष्ट्र राज्याच्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शासनाच्या धोरणाशी प्रचलीत कायद्यातील व भारतीय राज्यघटनेतील तरतुदीशी सुसंगत वागणूक ठेवणे आवश्यक आहे. जर एखादा शासकीय अधिकारी-कर्मचारी प्रात: विधीसाठी उघड्यावर गेल्यास जनमानसात चुकीचा संदेश जावून स्वच्छता कार्यक्रमास खिळ बसेल. यामुळे महाराष्ट्र राजच्या प्रत्येक शासकीय, निमशासकीय व इतर अनुदानित संस्थाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शौचालयाचा नियमित वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या राहत्या घरी शौचालयाचा वापर करावा तसेच बाहेरगावी नौकरीस असल्यास आपल्या मुळ गावी कुटूंबातील सदस्यांना शौचालय सुविधा प्राप्त करुन देणे क्रमप्राप्त आहे. कर्मचाऱ्यांनी सामाजिक स्वच्छता व आरोग्य बिघडवण्यास कारणीभुत व विविध पर्यावरण संरक्षणाच्या मुलभूत कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमानूसार कार्यवाही करण्यात येईल. आदेशाचे पालन करण्यात कसून करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल. असे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कळविले आहे.

जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक संपन्न


         
          बीड, दि. 24 :- जिल्हा  एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक शुक्रवार दि.24 मार्च 2017 रोजी जिल्हाधिकारी यांच्या दालनात झाली. सुरुवातीस जिल्हा  एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्ष (डापकु) जिल्हा रुग्णालय, बीड अंतर्गत असणाऱ्या विविध एचआयव्ही तपासणी केंद्र अंतर्गत झालेल्या कामकाजाचा वार्षिक आढावा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांनी सादर केला.

          जिल्ह्यामध्ये आयईसी उपक्रमाअंतर्गत महत्वाच्या गावामधून लोककलेच्या माध्यमातून एचआयव्ही जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दि.15 ते 24 मार्च 2017 दरम्यान 20 गावामधून राबविण्यात आले आहे. तसेच गाव पातळीवर आरोग्याचे महत्वपूर्ण कार्य करणाऱ्या आशा कार्यकर्ती यांचे एचआयव्ही प्रशिक्षण दि.28 फेब्रुवारी 2017 रोजी अंबाजोगाई येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महत्वाच्या लक्ष घटकांमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशी सुचना केली. या बैठकीत लग्नापूर्वी एचआयव्ही चाचणी करण्याचा ठराव ग्राम पातळीवर गटविकास अधिकारी यांच्या मदतीने घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, बाह्यसंपर्क निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.हरिदास, गटविकास अधिकारी डॉ.ज्ञानोबा मोकाटे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन छायाचित्र कलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जावा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम







         
          बीड, दि. 24 :- पारंपरिक छायाचित्रकलेच्या माध्यमातून समाजातील बऱ्या वाईट घटना टिपतांनाच हे प्रभावी माध्यम सामाजिक संदेश देण्यासाठी सुध्दा वापरले जावे असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
          माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या बीड येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात भरविण्यात आलेल्या 'महाराष्ट्र माझा' या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी राम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आणि जेष्ठ छायाचित्रकार विश्वनाथ माणूसमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'महाराष्ट्र माझा' या छायाचित्र प्रदर्शनाच्या उपक्रमाबद्दल कौतूक करुन जिल्हाधिकारी राम म्हणाले की, मोबाईल मधून सेल्फी किंवा फोटो घेणे म्हणजे फोटोग्राफी नसून त्यासाठी उत्तमोत्तम फोटो कॅमेरा, साधने आणि घटनेकडे पाहण्याचा नेमका दृष्टीकोन असणे गरजेचे आहे. उत्तम छायाचित्रे ही लाख मोलाचा संदेश देणारी ठरु शकतात त्यासाठी छायाचित्र कला जोपासण्याबरोबरच कलेची उत्तम जाण असली पाहिजे. प्रदर्शनात मांडलेली उत्तमोत्तम आणि दर्जेदार छायाचित्रे ही अत्यंत बोलकी असून सामाजिक संदेश देणारी आहेत. असेही ते म्हणाले.
          शासनाच्या विविध योजनांच्या विकासकामांची काही छायाचित्रे प्रदर्शनात समाविष्ट असून त्याबद्दल बोलतांना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची छायाचित्रे ही त्याचे महत्व अधोरेखीत करणारी आहेत. जलयुक्त शिवार, स्वच्छ महाराष्ट्र, यासारख्या लोकाभिमूख योजनांची राज्यातील प्रगती अत्यंत समाधानकारक आहे. त्याचेही प्रतिबिंब या प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आले आहे. याबरोबरच पुरोगामी महाराष्ट्राच्या विविध कला, संस्कृती, परंपरा, धार्मिक वास्तु तसेच सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे म्हणजे रसिकांसाठी पर्वणी असल्याचेही जिल्हाधिकारी राम म्हणाले.
          जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे म्हणाले की, समाजाला दिशा देण्याचे काम छायाचित्रे करु शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'महाराष्ट्र माझा' छायाचित्र प्रदर्शन आहे. सामाजिक विकासासाठी शासन राबवित असलेल्या जलयुक्त शिवार अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान तसेच हागणदारी मुक्तीच्या योजनांची बोलकी छायाचित्रे या दिशेने होत असलेल्या कामाचे प्रतिबिंब निर्माण करतात. सामाजिक प्रगतीच्या या योजनांमध्ये लोकसहभाग अत्यंत  महत्वाचा असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात हागणदारी मुक्तीचे अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण लोकसहभागाची गरज असल्याचेही ते म्हणाले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात नागरिकांनी हिरिरीने पुढाकार घ्यावा असे आवाहनही यावेळी ननावरे यांनी केले.
          जेष्ठ छायाचित्रकार विश्वनाथ माणूसमारे यांनी 1972 च्या बीड जिल्ह्यातील दुष्काळाच्या प्रसंगीची छायाचित्रे काढल्याची आठवण सांगत जुन्या काळातील कृष्णधवल छायाचित्रिकरणाच्या आपल्या आठवणी सांगितल्या. जुन्या काळात अपुऱ्या साधन सामुग्रीच्या आधारे अचूक फोटोग्राफी करण्याचे आव्हान आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात फारसे राहिले नाही असे सांगत त्यांनी छायाचित्रण कलेच्या क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व प्रगतीची माहिती सांगितली. व छायाचित्रांचे महत्व विशद केले.
          प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र माझा' या छायाचित्र स्पर्धेत राज्यभरातून 3800 छायाचित्रे सहभागी झाली होती. यातून उत्कृष्ट छायाचित्रांना मुंबई येथे पारितोषिके देण्यात आली. उच्चस्तरीय छायाचित्रकारांच्या समितीने प्रदर्शनासाठी निवडलेली तब्बल 190 छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली असून महाराष्ट्राची कला-संस्कृती टिपलेल्या या छायाचित्रांना पाहण्याची संधी बीड जिल्ह्यातील जनतेला उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 2 एप्रिल पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजे दरम्यान सर्वांसाठी खुले राहणार असून याचा छायाचित्रप्रेमी जनतेनी लाभ घ्यावा असे आवाहनही आलुरकर यांनी केले.

          प्रारंभी जिल्हाधिकारी राम यांच्या हस्ते फित कापून उदघाटन झाले. त्यांनी प्रदर्शनातील छायाचित्रांची पाहणी केली. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, ना.गो.पुठेवाड आणि राजेश लाबडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन अमोल मुळे यांनी केले तर राजेश लाबडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास छायाचित्रप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे शिवाजी गमे, मिलिंद तुपसमिंद्रे, शेख रईस, भगवान ढाकरे, छगन कांडेकर, श्रीमती लता कारंडे आदिनी परिश्रम घेतले.

गुरुवार, २३ मार्च, २०१७

शहिद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन


         
          बीड, दि. 23 :- जिल्हाधिकारी कार्यालयात शहिद दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शहिद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

 यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, कोषागार अधिकारी डी.डी. माडे, नायब तहसीलदार शारदा दळवी, सय्यद कलिम यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहिद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

बुधवार, २२ मार्च, २०१७

धारुर येथे बालकामगार केंद्रात विद्यार्थ्यांना विद्यावेतन वाटप



बीड, दि. 22 :- राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प बीड अंतर्गत कार्यरत धारुर बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्रातील 30 विद्यार्थ्यांना तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या हस्ते विद्यावेतन वाटप करण्यात आले. यावेळी बालकामगार प्रकल्पाचे प्रकल्प संचालक ओमप्रकाश गिरी यांची उपस्थिती होती.

भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाद्वारे धारुर येथील राष्ट्रीय बालकामगार विशेष प्रशिक्षण केंद्रात बालकामगार, अनाथ व गरीब कुटूंबातील मुले-मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना उत्तम शिक्षण देण्याचे काम बालकामगार पुनर्वसन केंद्रातर्फे केले जाते.  यामध्ये शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्यात येते याचे वाटप तहसीलदार राजाभाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शिक्षण हे चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक असून बालकामगार मुलांनी शिक्षण घेऊन मोठ्या पदावर जावे तसेच कौशल्य शिक्षण घेऊन स्वत: मधील कौशल्याचा विकास करावा असे मत व्यक्त केले. कार्यक्रमास बालकामगार प्रकल्पाचे कार्यक्रम व्यवस्थापक शेख अफसर, अनिल महाजन, नागनाथ सोनटक्के, प्रदिन भांगे आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एस.एस.भांगे, एस.आर.मैंद, ए.आय.मुंडे, के.जी.तिडके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रदर्शनाचे शुक्रवारी उदघाटन बीड येथे जिल्हा माहिती कार्यालयातर्फे "महाराष्ट्र माझा" छायाचित्र प्रदर्शन



बीड, दि. 22 :- प्राचीन भारतीय कला-संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेल्या महाराष्ट्र माझा या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीडच्या सभागृहात  दिनांक 24 मार्च ते 2 एप्रिल 2017 या कालावधीत बीड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते दिनांक 24 मार्च 2017 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड  येथील सभागृहात होणार असून या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, ज्येष्ठ छायाचित्रकार श्री. विश्वनाथ माणूसमारे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने "महाराष्ट्र माझा" ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी राज्यभरातून 3800 छायाचित्रे सहभागी झाली होती. यापैकी उत्कृष्ट तीन छायाचित्रांना प्रथम, द्वितिय आणि तृतीय क्रमांक तसेच 5 छायाचित्रांना उत्तेजनार्थ पारितोषीक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे बीड जिल्ह्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड  येथील सभागृहामध्ये हे प्रदर्शन दिनांक 24 मार्च 2017 पासून आयोजित करण्यात येत असून हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनास विद्यार्थी, नागरिक व छायाचित्रप्रेमी यांनी मोठया संख्येने भेट देऊन लाभ घ्यावा असे आवाहन बीडचे जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी केले आहे.

मंगळवार, २१ मार्च, २०१७

बीड जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदी सविता गोल्हार तर उपाध्यक्षपदी जयश्री मस्केंची निवड










        बीड, दि. 21 :- बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी श्रीमती सविता विजयकुमार गोल्हार (भाजप) यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती जयश्री राजेंद्र मस्के (भारतीय संग्राम परिषद) यांची बहुमताने निवड झाली.
          बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीसाठी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
          अध्यक्ष पदासाठी श्रीमती सविता विजयकुमार गोल्हार आणि श्रीमती मंगल प्रकाशराव सोळंके यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी श्रीमती जयश्री राजेंद्र मस्के आणि श्रीमती शिवकन्या शिवाजी सिरसाट यांनी पिठासीन अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्रे सादर केली. ती छाननीअंती वैध ठरली.
          जिल्हा परिषदेच्या 60 गटांमध्ये निवडून आलेल्या 60 सदस्यापैकी 59 सदस्य निवडणूक प्रक्रीयेच्या विशेष सभेसाठी उपस्थित होते. या 59 सदस्यांनी मतदान केले. अध्यक्षपदासाठी श्रीमती सविता विजयकुमार गोल्हार (भाजप) यांना 34 मते पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी श्रीमती मंगल प्रकाशराव सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 25 मते मिळाली.   तसेच उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीत श्रीमती जयश्री राजेंद्र मस्के (भारतीय संग्राम परिषद) यांना 34 मते पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी श्रीमती शिवकन्या शिवाजी सिरसाट (राष्ट्रवादी कॉग्रेस)यांना 25 मते मिळाली.
          नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड घोषित केल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनीही पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

          निवडणूक प्रक्रीया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राम यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, तहसीलदार आशिषकुमार बिरादार, उपकोषागार अधिकारी लहू गळगुंडे आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांपैकी 8 पंचायत समित्यांचे सभापतीही यावेळी उपस्थित होते.

सोमवार, २० मार्च, २०१७

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी 21 मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन



        बीड, दि. 20 :-  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी मंगळवार दि.21 मार्च 2017 रोजी बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

          सभेसाठी जिल्हा परिषदेचे 60 नवनिर्वाचित सदस्य व 11 पंचायत समित्यांच्या सभापतींना सभेस उपस्थित राहण्यासाठी नोटीसा पाठविण्यात आलेल्या आहेत. तरी जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्यांनी व पंचायत समितीच्या सभापतींनी सभेस उपस्थित रहावे. सभेस येताना निवडणूकीत निवडून आल्याचे प्रमाणपत्र व फोटो ओळखपत्र सोबत ठेवावे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

20 ते 27 मार्च कालावधीत मौखिक आरोग्यविषयक जनजागृती



        बीड, दि. 20 :- जिल्हा रुग्णालयातील दंत विभागामार्फत दि.20 ते 27 मार्च 2017 कालावधीत मौखिक आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भारतीय दंत संघटना बीडचे अध्यक्ष डॉ.अशोक उनवणे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ करण्यात आला.

          बीड शहरातील मुख्य रस्त्यावरुन रॅली मार्गस्थ करण्यात आली यामध्ये शिवाजी चौक-तहसील कार्यालय मार्गे माने कॉम्पलेक्स येथून रुग्णालय परिसरात रॅलीचा समारोप करण्यात आला. सुंदर असावे आपले दात, एक घास बत्तीस वेळा चावावा, शरीररुपी किल्याचे दात हे किल्लेदार, दाताची काळजी घ्या ते तुमची काळजी घेतील इत्यादी घोषणा रॅलीत देण्यात आल्या. रॅलीचे आयोजन राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अधिकारी डॉ.सत्येंद दबडगांवकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली केले. रॅली यशस्वी करण्यासाठी भारतीय दंत संघटनेचे डॉ.पायगुडे, डॉ.खामकर, डॉ.विश्वेकर, डॉ.अमेर, रुग्णालयातील परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्या श्रीमती बेदरे, श्रीमती मोहिते, श्रीमती सिमा पाटील, श्रीमती नखाते, श्री.उजगरे, समन्वयक श्री.हरणमारे आदिनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्याथींनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला. 

शनिवार, १८ मार्च, २०१७

शासकीय / निमशासकीय कर्मचाऱ्यांना आवाहन उघड्यावर शौच करणाऱ्या विरुध्द कायद्यानुसार गुन्हा नोंद करणार - मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे



       बीड, दि. 18 :-  जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी तसेच नागरिकांनी दिनांक 31 मार्च 2017 पर्यंत शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करावा. त्यानंतर शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी किंवा त्यांचे कुटूंबिय तसेच नागरिक उघड्यावर शौच करताना आढळल्यास त्यांच्यावर  मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील प्रकरण सात कलम 115 मधील तरतुदीनुसार गुन्हा नोंद करण्यात येईल असे बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी स्पष्ट केले आहे.
आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी प्रसिध्दीपत्रक जारी केले असून त्यामध्ये कडक शब्दात इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीने रस्त्यात किंवा रस्त्याजवळ मलमुत्र विसर्जन करुन इतरांना उप्रदव करणार नाही अशी तरतूद मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील प्रकरण सात कलम 115 केली आहे. तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणुक) नियम 1979 मधील नियम 3 मधील तरतुदीनुसार भारतीय राज्य घटनेच्या अनुच्छेद 51 नुसार पर्यावरण स्वच्छ ठेवण्याची प्रत्येक नागरिकाची मुलभूत गरज आहे. शासनाचे सेवक या नात्याने महाराष्ट्र राज्याच्या शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी शासनाच्या धोरणाशी प्रचलित कायद्यातील व भारतीय राज्य घटनेतील तरतुदीशी सुसंगत वागणुक ठेवणे आवश्यक आहे. जर एखादा शासकीय अधिकारी / कर्मचारी प्रात:विधीसाठी उघड्यावर जात असेल तर त्याचे अतिशय चुकीचे संदेश जनमानसात जातात व त्याचा विपरित परिणाम स्वच्छता कार्यक्रमावर होऊ शकतो. यासाठी प्रत्येक शासकीय, निमशासकीय व इतर अनुदानित संस्थांचे अधिकारी कर्मचारी यांनी शौचालयाचा नियमित वापर करणे अनिवार्य करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वमालकीच्या किंवा भाड्याच्या राहत्या घरी शौचालयाचा नियमित वापर सुरु करावा. जल कर्मचारी बाहेरगावी नोकरीस असेल तर मुळ गावी आई, वडील,भाऊ आदी कुटूंबियांनाही शौचालय उपलब्ध करुन देणे क्रमप्राप्त आहे. जे अधिकारी कर्मचारी शौचालयाचा वापर करणार नाहीत त्यांच्यावर सामाजिक स्वच्छता व आरोग्य बिघडण्यास कारणीभूत ठरवून व विविध  पर्यावरण संरक्षणाच्या मुलभूत कर्तव्यात कसूर केल्याबद्दल महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणुक) नियम 1979 मधील नियम 3 नुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच या आदेशाचे पालन करण्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही केली जाईल.  याबाबतची तरतुद दिनांक 8 जून 2006  च्या शासन निर्णयान्वये केली असून  या तरतुदीनुसार शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिनांक 1 एप्रिल 2007 पासून शौचालय बांधून त्याचा नियमित वापर करणे अनिवार्य केले आहे. असे असुनही बऱ्याच शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांकडे तसेच त्यांच्या मुळ गावी आई, वडील, भाऊ यांच्याकडे शौचालय नसल्याचे निदर्शनास आहे असून ही गंभीर बाब असेही प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-

माजलगाव तालुक्यातील नुकसानीची जिल्हाधिकारी राम यांनी केली पाहणी




       बीड, दि. 18 :- बीड जिल्ह्यातील काही भागात बुधवारी झालेल्या गारपीट आणि पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शुक्रवारी माजलगाव तालुक्यातील  गोविंदवाडी, खाडेवाडी, दिंद्रुड या गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली.
          माजलगाव तालुक्यातील जवळपास सात गावातील पिकांना अवकाळी पावसाचा  तडाखा बसला आहे. जिल्हाधिकारी राम यांनी माजलगाव तालुक्यातील  नुकसानीचा संबंधित महसुल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला व लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी गोविंदवाडी, खाडेवाडी तसेच दिंद्रुड येथील ग्रामस्थ शेतकऱ्यांशी चर्चा करताना काळजी न करण्याचे आवाहन केले. संपुर्ण पंचनामे झाल्यानंतर लागलीच शासनाकडे अहवाल पाठविण्यात येईल व शासन निर्णयानुसार सर्व नुकसानग्रस्तांना मदत दिली जाईल असेही ते म्हणाले.
          यावेळी उपविभागीय अधिकार महेंद्रकुमार कांबळे, तहसीलदार एन.जी. झंपलवाड, तालुका कृषी अधिकारी देशमाने यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक आदि अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी,ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-

शुक्रवार, १७ मार्च, २०१७

गारपिटग्रस्त भागाची केली पाहणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत करण्याची शासनाची भूमिका - पालकमंत्री पंकजा मुंडे








           
            बीड, दि. 17 :- बीड जिल्हयातील काही भागात गारपिट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश देत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन सर्वोतोपरी मदत करण्याची नि:संदिग्ध्‍ा ग्वाही दिली.
            परळी आणि केज तालुक्यातील गारपिट आणि अवकाळी पावसामुळे बाधित भागाचा दौरा करुन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेवून नुकसानीची आज पाहणी केली. परळी तालुक्यातील हिवरा, गोवर्धन, खारी तांडा, पिंपरी ब्रु, आदि गावांना बुधवारी झालेल्या गारपिटीचा व वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले शाळा इमारत, विजेचे खांब आणि झाडे तसेच काही घरांचे मोठे नुकसान झाले आहे. आज पालकमंत्री मुंडे यांनी या भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले. घराची पत्रे उडाल्याने बेघर झालेल्या कुटूंबाला खावटीतून तात्काळ मदत देण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
            काही शाळाच्या इमारतीचे नुकसान झाल्याची बाब लक्षात आणून देत पालकमंत्री मुंडे यांनी शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ तयार करुन शासनास पाठविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांना दिले. महावितरणने विजेची व्यवस्था खंडीत झाली असल्यास तात्काळ दुरुस्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले.
            नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाने सुरु केले असले तरी ते अधिक वेगाने पुर्ण करुन अहवाल शासनाकडे पाठविण्याची सुचना करुन पालकमंत्री मुंडे यांनी विशेषत: कापसाच्या नुकसानीचे स्वतंत्र पंचनामे करुन अहवाल करण्याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाकडून यावेळी जिल्हयातील नुकसानीची प्राथमिक माहिती घेवून पालकमंत्री मुंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला पावसामुळे नादुरुस्त पुल व रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.
कुटूंबियांना आर्थिक मदत
बुधवारी विज पडून मृत्यू पावलेल्या परळी तालुक्यातील शेतकरी आश्रोबा किसन गायकवाड आणि शेतमजूर सुशीलाबाई तुळशीराम कुंभार यांच्या घरी जाऊन पालकमंत्री मुंडे यांनी त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले. यावेळी शासनाच्या वतीने त्यांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचे धनादेश देवून कुटूंबियांना दिलासा दिला तसेच गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभ देण्याचे सुचना केली.
            नेहमी विज पडण्याच्या घटना होत असल्यामुळे अशा गावांच्या परिसरात विज प्रतिबंधक यंत्राणा स्थापित करण्याचे निर्देश देत यासाठी जिल्हा नियोजन आराखड्यातून तरतूद उपलब्ध करुन देण्यात येईल अशी घोषणा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.
            केज तालुक्यातील येवता येथील शुभम सटवा निर्मळ (वय 15 वर्षे) यांचेही विज पडल्यामुळे बुधवारी निधन झाले होते. त्याच्या घरी जावून पालकमंत्री मुंडे यांनी 2 लाख रुपयांचा धनादेश त्याच्या कुटूंबियाकडे सुर्पूद केला.

            या दौऱ्यात पालकमंत्री मुंडे यांच्यासमवेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, सहायक जिल्हाधिकारी अजित कुंभार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी आदि विभागप्रमुख तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

गुरुवार, १६ मार्च, २०१७

नैसर्गिक संकटातही शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी - राज्यमंत्री खोत




         
            बीड, दि. 16 :-  नैसर्गिक संकटाच्या काळातही शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीविषयी शासन गंभीर असल्याचे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.
          बीड जिल्ह्यातील काही भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे बुधवारी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या पार्श्वभूमीवर राज्यमंत्री खोत यांनी परळी आणि केज तालुक्याचा दौरा करुन नुकसानीची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
          परळी तालुक्यातील कौठळी येथील विज पडून मृत्यू पावलेल्या आश्रोबा किसन गायकवाड आणि सुशीलाबाई तुळशीराम कुंभार यांच्या घरी जाऊन राज्यमंत्री खोत यांनी त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले.
          कौठळी येथील नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करुन राज्यमंत्री खोत यांनी राज्य शासनाने सर्व यंत्रणांना सखोल पंचनामे करुन अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले असल्याचे सांगून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन दिलासा देईल असे स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी केज तालुक्यातील तलवाडा येथेही भेट दिली.

          यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, तहसीलदार विद्याचरण कडवकर तसेच पदाधिकारी व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

अवेळी पाऊस होण्याचे संकेत असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन


         
            बीड, दि. 16 :-  मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मेघ गर्जना, वादळी वाऱ्यांसह अवेळी पाऊस होण्याचे संकेत कुलाबा वेधशाळेकडून दिले आहेत.

          तरी नागरिकांनी विजांचा कडकडाट सुरु असताना बाहेर जाण्याचे टाळावे. शेतकऱ्यांनी दुपारी 3 ते 7 या वेळेत शेतीची व इतर कामे करु नये कारण या कालावधीमध्ये विजा पडण्याची शक्यता जास्त असते. दुभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत. ज्या धान्याची कापणी झाली आहे ते धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावीत. पावसानंतर, गारपिटीनंतर तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. पाऊस सुरु असताना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते त्यामुळे त्यापासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची प्रलंबित प्रकरणासाठी विशेष मोहीम


         
            बीड, दि. 16 :- बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे बुधवार दि.15 मार्च 2017 अखेर प्राप्त झालेल्या जाती पडताळणी अर्जांची छाननी करण्यात आली आहे.  छाननी करताना अपूर्ण कागदपत्रे असलेल्या प्रकरणात समितीने त्रुटी नोंदविल्या असून अशी एकूण अंदाजित 1 हजार 400 शैक्षणिक प्रकरणे पुराव्याअभावी प्रलंबित आहेत.  प्रकरणांचा कालबध्द पध्दतीने व जलद निपटारा व्हावा म्हणून समितीद्वारे त्रुटी पूर्ततेसाठी दि.17 ते 19 मार्च 2017 कालावधीत विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

           अर्जातील त्रुटीची पुर्तता करण्यासाठी अर्जदारांना दि.17 ते 19 मार्च कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजता मुलाखतीसाठी बोलविण्यात आले असून त्यांना एसएमएसव्दारे कळविण्यात आले आहे.  एसएमएस प्राप्त होईल अशाच अर्जदारांनी समिती कार्यालयाकडे मूळ कागदपत्रांसह संपर्क साधावा. अनुसूचित जातीसाठी सन 1950, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी 1961 व विशेष मागास प्रवर्गा व इतर मागास प्रवर्गासाठी सन 1967 पूर्वीचे महाराष्ट्र राज्यातील कायम वास्तव्य व जातीचे पुरावे सोबत आणावेत. अर्जदार यांनी मुख्यत्वे रक्तनातेसंबंधातील व्यक्तींचे उदा- वडील,आजोबा,सख्खे चुलते, आत्या यांचा शाळा सोडल्याचे दाखला, प्रवेश निर्गम उतारा, गांव नमुना नं.14 तसेच ज्या शासकीय कागदपत्रांमध्ये जातीची नोंद दर्शविण्यात आली आहे असे महसुली पुरावे प्रमाणित प्रतीसह सोबत घेऊन यावेत. अर्जदारांना एसएमएसव्दारे लॉट व टेबल क्रमांक कळविण्यात आला असून  संबंधितांनी त्या टेबलवर जाऊन संबंधित कर्मचारी  यांना कागदपत्रे दाखवून प्रकरण तपासून घ्यावे. छाननीअंती परिपूर्ण अर्जावर समितीकडून निर्णय घेण्यात येईल. जे अर्जदार हे यापूर्वी मुलाखतीसाठी येवून गेले आहेत त्यांनी यापूर्वी दिलेल्या सूचनांप्रमाणे कागदपत्रे घेऊन सुनावणीसाठी उपस्थित रहावे. ज्यांची प्रकरणे पोलीस दक्षता पथकाकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आलेली आहेत तसेच ज्यांच्या प्रकरणात सुनावणी प्रक्रीया सुरु आहे अशा अर्जदारांनी मुलाखतीसाठी येण्याची आवश्यकता नाही. सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे बीड जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी कळविले आहे.

लोककलेच्या माध्यमातून एचआयव्ही जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ


            बीड, दि. 16 :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या सुचनेनूसार बुधवार दि.15 मार्च 2017 रोजी लोककलेद्वारे एचआयव्ही, एड्सविषयी जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
          यावेळी बोलताना डॉ.चव्हाण यांनी एचआयव्ही, एड्स कशामुळे होतो.? त्याची लक्षणे काय आणि त्याचा प्रतिबंध कसा करावा तसेच आयसीटीसी, पीपीटीसीटी, एआरटी कलंक व भेदभाव हे कलापथकांच्या माध्यमातून गावपातळीवर सादर करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात एचआयव्ही एड्स विषयी मनोरंजनातून जनजागृती करण्याकरीता कलापथकांची भूमिका कशी महत्वाची आहे याबाबत मार्गदर्शन केले.

          एचआयव्ही, एड्स जनजागृतीकरीता इतर माध्यमांच्या तुलनेत कलापथकांचे स्थान उच्च आहे. लोकांच्या बोलीभाषेत त्यांना परिचित असा पोवाडा, भारुड, शाहिरी, गोंधळ, लावणी, लोकनाट्य, बतावणी इत्यादी कलापथकामार्फत एचआयव्ही, एड्सविषयी जनजागृती करण्याकरीता प्राधान्य देण्यात येत आहे. कलापथकाचे सादरीकरण मुख्यत: एचआयव्ही, एड्स बाबतीत अतिसंवेदनशील क्षेत्रात केंद्रीत केले जातील. तसेच विद्यापीठातील युवकांमध्ये एचआयव्ही, एड्सविषयी योग्य माहिती लोककलेच्या माध्यमातून पोहचविता येईल. लोककला हे ग्रामीण भागातील जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम  असून ग्रामीण व शहरी भागात एचआयव्ही, एड्स विषयी समता कलापथक बीड यांच्यामार्फत जिल्ह्यातील 20 गावात दि.15 ते 25 मार्च 2017 दरम्यान जनजागृती करण्यात येणार असून ग्रामस्थांना माहिती दिली जाणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता कलापथक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, आयसीटी विभाग, लिंक वर्कर योजना, लक्षगट, हस्तक्षेप संस्था आदिनी परिश्रम घेतले. असे बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी कळविले आहे.

नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी गारपिट व पावसामुळे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत - जिल्हाधिकारी नवल किशोर राम







         
            बीड, दि. 16 :- बीड जिल्ह्यातील काही भागात बुधवारी गारपिट  आणि वादळी वाऱ्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचे यंत्रणांनी तात्काळ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.

          बुधवारी जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या तसेच काही भागात गारपिट झाली.या पार्श्वभूमीवर संबंधित नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी परळी तालुक्याचा दौरा केला. त्यांनी गोवर्धन हिवरा येथील शेतकऱ्यांच्या शेतातील झालेल्या ज्वारी पिकाच्या नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर खारी तांडा येथील पिकांच्या नुकसानीची तसेच पडझड झालेल्या घरांची  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची तसेच इमारतींची पाहणी केली. यावेळी सर्व नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांनी दिलासा दिला व सर्व नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल व नियमानूसार सर्व नूकसानग्रस्तांना मदत केली जाईल असे सांगितले. कृषी व महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी यावेळी सर्व पंचनामे करण्याबरोबरच गारपिट व वादळी वाऱ्यामुळे दुर्घटना होऊन मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून मदत देण्यात यावी असे निर्देश दिले. यावेळी त्यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार विद्याचरण कडवकर तसेच विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.

मंगळवार, १४ मार्च, २०१७

अंबाजोगाई उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची लायसन्स संदर्भातील सेवा ऑनलाईन


         
            बीड, दि. 14 :- अंबाजोगाई येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवार दि.14 मार्च 2017 पासून लायसन्स संदर्भातील सेवा ऑनलाईन करण्यात आली आहे. अर्जदारास अर्ज करावयाचा असल्यास संगणकावर नेटद्वारे परिवहन सेवा या पोर्टलद्वारे सारथी 4.0 मधील ऑनलाईन सर्व्हिसेस हा ऑप्शन सिलेक्ट करुन शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स),  पक्के लायसन्स, नुतनीकरण, दुय्यम प्रत व लायसन्सवरील पत्ता बदलणे इत्यादी प्रकारच्या कामासाठी ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक झाले आहे.

        ज्या अर्जदाराकडे संगणक व नेट उपलब्ध नसेल त्यांनी तालुक्यातील सीएससी केंद्रात जाऊन तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने ऑनलाईन अर्ज करु शकतील. सीएससी कर्मचारी अशी सेवा देण्याकरीता 20 रुपये शुल्क आकारतील व त्याची अर्जदारास पावती देतील. ऑनलाईन अर्ज दाखल करणे, कागदपत्रे अपलोड करणे, चाचणीची किंवा सेवेसाठी दिनांकासह वेळ घेणे, ऑनलाईन फी भरणे व दाखल केलेल्या अर्जाचा अर्ज क्रमांक घेणे हे ऑनलाईन करणे आवश्यक आहे. जे अर्जदार फीसचे ऑनलाईन ई-पेमेंट करु शकणार नाहीत ते सीएससी केंद्रातील सीएससी व्होलेटमधून शुल्क भरु शकतात. अपॉईटमेंट दिवशी उमेदवारांनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील स्क्रुटीनी खिडकीवर ऑनलाईन अपलोड केलेली मुळ कागदपत्रे तपासणीत सादर करावेत. ऑनलाईन अर्ज दाखल न करता व विना अपॉईटमेंट लायसन्सबाबतची कोणतीही सेवा या कार्यालयास देणे शक्य होणार नाही. ऑनलाईन सेवेचा लाभ जनतेने घेवून सहकार्य करावे. असे अंबाजोगाई उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

रविवार, १२ मार्च, २०१७

स्व. यशवंतराव चव्हाण यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन



         
            बीड, दि. 12 :- जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन  जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन केले.

          यावेळी  बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी  स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

शुक्रवार, १० मार्च, २०१७

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना परीक्षेचा निकाल संकेतस्थळावर जाहीर



          बीड, दि. 10 :- महाराष्ट्र राज्य परीक्षा   परिषद, पुणे मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) इयत्ता 8 वी साठी दि.20 नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या परीक्षेतील उमेदवारांची निवड यादी दि.7 मार्च 2017 रोजी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

          बीड जिल्ह्यातील इयत्ता 8 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील 3 हजार 827 विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून ही परीक्षा दिली होती. यातून जिल्ह्यातील 332 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेमध्ये सहभाग नोंदविलेल्या शाळांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर आपल्या शाळेचा शिष्यवृत्ती कोड नोंदवून शाळेची निवड यादी तात्काळ प्राप्त करुन घ्यावी व  निवड यादीची एक प्रत शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, बीड कार्यालयात सादर करावी. असे बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (मा) यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



          बीड, दि. 10 :- जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती  व धुलीवंदन कार्यक्रमानिमित्त दि.13 व 15 मार्च 2017 रोजी जिल्हयात कायदा  व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व अबकारी विभागाच्या सर्व देशी दारु, विदेशी दारु, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, सीएल-2 सीएल-3, बियर शॉपी, ताडी आदी अनुज्ञप्ती दि.13 मार्च रोजी धुलीवंदन व 15 मार्च रोजी शिवजयंती निमित्त संपुर्णत: बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनुज्ञप्ती धारकाने वरील दिनांकास अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे. 

पोलीस उपनिरीक्षक (पुर्व) परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी



बीड, दि. 10 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक (पुर्व) परीक्षा 2016 ही दि. 12 मार्च 2017 रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकूण 11 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.

बीड शहरातील परीक्षा केंद्रे याप्रमाणे चंपावती माध्यमिक विद्यालय नगर रोड, भगवान विद्यालय धानोरा रोड, संस्कार माध्यमिक व्रिद्यालय भाजी मंडई, मिल्लीया मुलांचे माध्यमिक विद्यालय व वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालय किल्ला मैदान, गुरुकुल इंग्लिश स्कुल जालना रोड, शिवाजी विद्यालय कॅनॉल रोड पिंगळे नगर, द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय विप्र नगर,बलभीम कला वाणिज्य व विज्ञान विद्यालय, सौ.केएसके महाविद्यालय शिवाजी नगर, आदर्श माध्यमिक विद्यालय कॅनॉल रोड, बंकटस्वामी महाविद्यालय जालना रोड, या परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत याकरीता बीडचे उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांची फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च कलम 144 मधील शक्तीचा वापर करुन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक (पुर्व) परीक्षा 2016 ही दि.12 मार्च 2017 रोजी जिल्हा केंद्रावर एकुण 11 उपकेंद्रातून होणार असल्याने केंद्रपरिसरात परीक्षा  सुरु होण्याच्या एक तास अगोदर पासून ते परीक्षा संपेपर्यत 100 मिटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. परिसरात फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण व संदेश कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेससेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, कॅम्प्युटर बाळगण्यास तसेच झेरॉक्स, एसटीडी मशीन चालू ठेवण्यास व ध्वनीक्षेपक वाजवण्यास प्रतीबंध करण्यात येत आहे. असे उपविभागीय अधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.

गुरुवार, ९ मार्च, २०१७

जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस मुख्यालयात विविध स्पर्धा संपन्न







बीड, दि. 9 :- जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियाकरीता जागतिक महिला दिनानिमित्त पोलीस अधिक्षक जी.श्रीधर व त्यांच्या पत्नी श्रीमती लावण्या जी.श्रीधर यांच्या संकल्पनेतून पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात चित्रकला, रांगोळी, वेशभूषा, संगीत खुर्ची, सामुहिक नृत्य आदि स्पर्धा घेण्यात आल्या.
सर्वप्रथम पोलीस अधिक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम, सहाय्यक पोलीस अधिक्षक नुरुल हसन व श्रीमती लावण्या जी.श्रीधर, राज्य उत्पादन शुल्काच्या अधिक्षक श्रीमती संध्याराणी देशमुख, श्रीमती पानसरे, श्रीमती प्रियंका दिक्षीतकुमार गेडाम, श्रीमती प्रगती वैभव कलुबर्मे, श्रीमती सुवर्णा गणेश गावडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

जागतिक महिला दिनानिमित्त सत्कारमुर्ती म्हणून निवडण्यात आलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती विशाखा धुळे, श्रीमती बारगजे, श्रीमती अरुधंती पाटील, श्रीमती प्रिती गर्जे, ललीता साळवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.सपर्धेमधील विजेत्यांचा कार्यक्रम संपताचा भेट वस्तु व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी पोलीस उपअधिक्षक (गृह) श्रीमती अंजुम शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे, पोलीस उपनिरीक्षक दिपाली गित्ते, पोलीस निरीक्षक आर.आर.रोडगे, शिवाजी राठोड, संतोष जायभाये आदिनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती संगीता सपकाळ यांनी केले तर आभार श्रीमती लावण्या जी.श्रीधर यांनी मानले. असे पोलीस अधिक्षक, बीड यांनी कळविले आहे.

माता मृत्यू आणि रक्तक्षयरोगाला आळा बसविण्यासाठी सकस आहार, स्वच्छतेबरोबरच शौचालयाची आवश्यकता - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे





माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्यावतीने पिंपळनेर येथे प्रजनन,माता-बालसंगोपन व किशोरवयीन मुलांचे आरोग्य जनजागृती अभियान संपन्न
माता मृत्यू आणि रक्तक्षयरोगाला आळा बसविण्यासाठी
सकस आहार, स्वच्छतेबरोबरच शौचालयाची आवश्यकता
                                                                           - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे

बीड, दि. 9:- जिल्ह्यातील माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदरपणात काळजी, वेळेवर मातेला सकस आहार आणि उपचाराबरोबरच स्वच्छता महत्वाची असल्याने घरात शौचालय असणे आवश्यक आहे. तसेच जिल्ह्यात निम्याहून अधिक महिलांना रक्तक्षय रोगाने ग्रासलेल्या आहे त्यांना सकस आहाराबरोबरच वेळेवर तपासणी करुन उपचार करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी केले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय व राज्य सरकारच्यावतीने बीड जिल्ह्यातल्या बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे दोन दिवसीय (दि.8 व 9 मार्च 2017) प्रजनन,माता-बाळ आरोग्य आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्यजनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, मा.जिल्हा परिषद सदस्य  मनोज पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी पुरुषोत्तम पिंगळे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.मिथून पवार, राष्ट्रीय किशोरी आरोग्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक डॉ.संतोष हरणमारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नरेश कासट, वैद्यकिय अधिकारी डॉ.मिर्झा बेग, डॉ.दशरथ चौरे, गावच्या महिला सरपंच चंद्रभागा गणगे, जिल्हा परिषद कन्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.कानडे, जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.तौर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, आरोग्य  तसेच महिला बाल विकास विभागाचे कर्मचारी, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या  आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी श्री.सांगळे म्हणाले की, जिल्ह्यात गरोदरपणा व बाळंतपणातील आजारामुळे दरवर्षी जवळपास 20 मातांचा मृत्यू होतो हा मृत्यू टाळण्यासाठी तीन आठवड्याच्या आत गरोदर मातेची नोंदणी करुन वेळेवर तपासण्या, निदान आणि उपचार करुन वेळेवर सकस आहार दिल्यास त्यानंतर प्रसुती रुग्णालयातच केल्यास मातेचा मृत्यू टाळता येतो असे ते म्हणाले. जिल्ह्यातील 56 ते 60 टक्के मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण असून यासाठी लोहयुक्त गोळ्या घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांनी  वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत लसीकरण करुन घेणे आणि सर्वांनी स्वच्छता बाळगल्यास साथीच्या रोगापासून आळा बसण्यास निश्चीतच मदत होईल असे ते म्हणाले. निम्म्याहून अधिक आजार अच्छतेमुळे होतात असेही ते म्हणाले. डॉ.हरणमारे यांनी किशोरवयीन मुलां-मुलींच्या आरोग्याविषयी माहिती दिली तर माजी जिल्हा परिषद सदस्य संदिप पाटील यांनी सर्वांना आरोग्याची माहिती असणे गरजेचे असून रुग्णालयामध्ये जाण्याची वेळ येवू नये यासाठी स्वच्छतेबरोबरच दैनंदिन सवयीतही सुधारणा करण्याचे आवाहन त्यांनी गावकऱ्यांना केले.
यावेळी सकस आहार, रांगोळी आणि सुदृढ बालक स्पर्धा तसेच प्रश्न मंजूषा घेऊन विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आज सकाळी पिंपळनेर गावातून जनजागरण रॅली काढून आरोग्याचा संदेश देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद कन्या शाळा आणि जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या  तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कायर्क्रमाचे प्रस्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देवून या कार्यक्रमाचा उद्देश विशद केला, कार्यक्रमाची सर्व जबाबदारी क्षेत्रीय प्रचार सहायक सदाशिव मलखेडकर यांनी सांभाळली. 

-*-*-*-*-