शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०२२

महाराष्ट्र स्टार्ट अप यात्रेच्या जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचा झाला शुभारंभ

• विजेत्या संकल्पनेचे होणार राज्यस्तरावर सादरीकरण • उद्या पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन बीड, दि. 14, (जि. मा. का.) : महाराष्ट्र् स्टार्ट अप यात्रे अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचा शुभारंभ आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीड येथे झाला. यातील विजेत्या संकल्पना सादर करणाऱ्यास राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त सुशील उचले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बीडचे प्राचार्य पंडीत मुने, उपप्राचार्य सुनील कुमावत, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्री. चिंचोलीकर, दिनदयाल उपाध्याय संस्थेचे गंगाधर देशमुख, स्पर्धक, नवउद्योजक, जिल्ह्यातील विविध आयटीआयचे प्राचार्य, अध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्तविक करताना सहाय्यक आयुक्त सुशील उचले म्हणाले, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाने यासाठी पोर्टलवर नोंदणी केलेल्या स्पर्धक व नव उद्योजकांच्या कल्पनांचे सादरीकरणातून जिल्हास्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाद्वारे निवड केली जाईल व त्यांना राज्यस्तरावर सादरींकरणाची संधी मिळेल राज्यस्तरावरील विविध 7 क्षेत्रातील 21 निवड झालेल्या संकल्पना सादर करणाऱ्या विजेत्यांना मा. राज्यपालांच्या हस्ते गौरवण्यात येईल. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अतुल केसकर यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. तसेच ग्रामउर्जा फाउंडेशनचे दादासाहेब गायकवाड व माजलगाव येथील स्टार्ट अप द्वारे व्यवसाय सुरु केलेले नवउद्योजक ताहेर शेख यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करुन शुभारंभ झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अमित मालेगावकर यांनी तर आभार प्रदर्शन महात्मा गांधी नॅशनल फेलोशिपधारक प्रतिक शहा यांनी केले. जिल्ह्यातील स्थानिक नवउद्योजकांना नोंदणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना सादरीकरण व ज्युरींच्या उपस्थितीमध्ये सादरीकरण करुन निवड करण्यासाठी प्रक्रिया सुरु झाली. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने दि. 14 व 15 ऑक्टोबर या कालावधीत महाराष्ट्र् स्टार्ट अप, रोजगार व उद्योजकता सप्ताहात आज महाराष्ट्र स्टार्ट अप शिबिर व सादरीकरण सत्र व उद्या 15 ऑक्टोबर रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा