बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्मान कार्डसाठी विशेष मोहीम आरोग्य मित्र, आपले सरकार सेवा केंद्रांशी संपर्काचे आवाहन

बीड, दि. 12 (जि. मा. का.) : आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड असणे आवश्यक आहे. अधिकाधिक लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड मोफत प्राप्त करता यावे, यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अजित पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी संयुक्तरीत्या केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेविषयीच्या आढावा बैठकीत त्यांनी हे संयुक्त आवाहन केले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीस उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. ज्ञानोबा मोकाटे, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख, तालुका आरोग्य अधिकारी, गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत, नागरी सुविधा केंद्र जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा समन्वयक प्रधानमंत्री जन आरोग्य योजना डॉ. अशोक गायकवाड, अंमलबजावणी सहाय संस्थेचे डॉ. संदीप आगलावे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ अधिकाधिक लाभार्थींपर्यंत पोहोचविण्याकरिता व अधिकाधिक लाभार्थींना आयुष्मान कार्ड मोफत प्राप्त करता यावे, यासाठी जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी मूळ शिधापत्रिका/पीएम लेटर व आधार कार्ड अथवा अन्य कोणतेही शासनमान्य मूळ ओळखपत्र सोबत घेऊन संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी अथवा आपले सरकार सेवा केंद्र किंवा UTIITSL केंद्रांशी संपर्क साधावा. तसेच, काही समस्या असल्यास डॉ. अशोक गायकवाड, जिल्हा समन्वयक, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, जिल्हा रुग्णालय, बीड यांचेशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी हे सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ट निकषांनुसार निवडलेले ठराविक निवडक लाभार्थी कुटुंब असून या योजनेचा लाभ कमाल मर्यादा ५ लाख रुपये प्रति कुटुंब प्रती वर्ष घेता येणार आहे. यासाठी सामाजिक आर्थिक जातीय जनगणना २०११ आधारित विशिष्ट निकषांनुसार निवडलेल्या ठराविक निवडक लाभार्थी कुटुंबाच्या यादीत नाव असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे नाव यादीत आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी www.mera.pmjay.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा १४५५५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा किंवा संलग्नीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी संपर्क साधावा. अधिक सोयीकरिता गावनिहाय तसेच प्रभागनिहाय यादी पाहण्यासाठी www.aapkedwarayushman.pmjay.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थींना विविध गंभीर आजारांवर ३४ विशेष श्रेणीत उपचार असून त्यामध्ये १२०९ उपचार (१०३८ उपचार पद्धती या खाजगी रुग्णालयात तसेच १७९ उपचार हे शासकीय रुग्णालयांतर्गत) योजनेच्या नियमानुसार उपलब्ध तज्ञ सुविधांवर पूर्णपणे मोफत उपचाराचा लाभ मिळेल. प्रामुख्याने सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, लहान मुलांचे कर्करोग, तसेच मानसिक आजारावरील उपचार आहेत. या योजनेचा लाभ बीड जिल्ह्यातील जवळपास १ लाख ४२ हजार ३६३ कुटुंबांना होणार असून बीड जिल्ह्यातून आजपर्यंत ६५ हजार १७५ लाभार्थींनी उपचारासाठी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा