मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

केंद्र सरकारच्यावतीने खालापुरी येथे प्रजनन,माता-बालसंगोपन व किशोरवयीन मुलांचे आरोग्य जनजागृती अभियान संपन्न अस्वच्छतेमुळे रोगांचे प्रमाण अधिक, संपुर्ण आरोग्यासाठी घराघरात शौचालय बांधून गाव हागणदारी मुक्त करा - मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे






बीड, दि. 28:- अस्वच्छता, उघड्यावर शौचाश जाणे, आजूबाजूचा परिसर साफ न करणे यामुळे भयंकर अशा आजाराचा सामना करावा लागत आहे, आणि यामुळेच महिलांमध्ये कर्करोगामुळे गर्भाच्या पिशव्या काढण्याचे  प्रमाण वाढत आहे तसेच मुलांच्या पोटातही जंतांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी दिली.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय व राज्य सरकारच्यावतीने बीड जिल्ह्यातल्या शिरुर तालुक्यातील खालापुरी येथे दोन दिवसीय (दिनांक27 2फेब्रुवारी) प्रजनन,माता-बाळ आरोग्य आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्यजनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी  खालापुरी गावच्या सरपंच श्रीमती द्रौपदीबाई मुंडे, उपसरपंच परजने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, महिला बाल कल्याण विभागाचे उप-मुख्यकार्यकारी अधिकारी उदय साळुंके, शिरुर तालुक्याचे गट विकास अधिकारी श्री.वाखाडे, जिल्हा साथरोग अधिकारी पुरुषोत्तम पिंगळे, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, वैद्यकीय अधिकारी डॉ. खाडे, डॉ.आठवले, डॉ.हरनमारे, महिला बाल विकास अधिकारी सखाराम बांगर,सामाजिक कार्यकर्त्या डॉ.जयश्री मुंडे, आरोग्य  तसेच महिला बाल विकास विभागाचे कर्मचारी, आशा , अंगणवाडी कार्यकर्त्या  आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी बोलताना ननावरे  पुढे म्हणाले की, कुटुंब वाचवण्यासाठी घरातील लहान- थोरांनी शौचालयाचा आग्रह धरला पाहिजे, येत्या पाडव्यापुर्वी शिरुर तालुका हगणदारीमुक्त करण्यासाठी जनतेनी लवकरात लवकर आपल्या घरात शौचालये बाधून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी बोलताना, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे  यांनी माता-बाल मृत्यूचे प्रणाण कमी करण्यासाठी, राष्ट्राच्या तसेच निरोगी समाजाच्या हितासाठी आई-बाळाच्या आरोग्याकडे बारकाईने लक्ष देऊन वेळीच निदान करणे, गरोदरपणात आईची काळजी घेऊन तीला नऊ महिने सकस आहार दिल्यानंतर रुग्णालयात प्रसुती करुन घ्यावी, बाळाच्या निकोप आरोग्यासाठी आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे तसेच बाळ जन्मल्यानंतर लगेचच आईचे स्तनपान करु द्यावे आणि वेळोवेळी बाळाचे लसीकरण करुन घ्यावे,आता सर्व लसी सरकारी दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहेत, मातांची तपासणी, प्रसुती आणि बाळांचे लसीकरण शासकीय रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केद्रांधून करुन घ्यावे असे आवाहन त्यानी केले .
महिला बाल विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी साळुंके यांनी मुला-मुलींमधिल रक्तातील क्षय रोग टाळण्यासाठी जंत नाशक आणि लोहयुक्त गोळ्यांचे नियमित सेवन करावे या सर्व गोळ्या शाळा महाविद्यालयातून उपलब्ध करूऩ देण्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी सकस आहार, रांगोळी आणि सुदृढ बालक स्पर्धा तसेच प्रश्न मंजूषा घेऊन विजेत्या स्पर्धकांना पारितोषिकांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करणात आले. सकाळी खालापुरी गावातून जनजागरण रॅली काढून आरोग्याचा संदेश देण्यात आला. यावेळी आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी तसेच जिल्हा परिषद हायस्कूलचे विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होते.
कायर्क्रमाचे प्रस्ताविक क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले यावेळी त्यांनी केंद्र सरकार राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देवून या कार्यक्रमाचा उद्देश विशद केला, आभार प्रदर्शन क्षेत्रीय प्रचार सहायक अलीम खान यानी केले. कार्यक्रमाची सर्व जबाबदारी क्षेत्रीय प्रचार सहायक सदाशिव मलखेडकर,श्री. सादीगळे आणि श्री.दूधे यांनी सांभाळली.


सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

भारतीय दूरसंचार प्राधिकरणातर्फे मंगळवारी ग्राहक जागृती कार्यक्रम



बीड, दि. 27 :-भारतीय दूरसंचार प्राधिकरणातर्फे मंगळवार, दि. 28 फेब्रवारी 2017 रोजी  हॉटेल यशराज, जालना रोड, बीड येथे ग्राहक जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सल्लागार, भारतीय दूरसंचार विनियामक हे उपस्थितांना मार्गदर्शन करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून ग्राहकांना त्यांच्या लँडलाईन,  मोबाईल, केबल टिव्ही इ. सेवा बाबतचे हक्क आणि अधिकार याबद्दल माहिती दिली जाणार आहे. महाराष्ट्रात एकूण 907.7  लाख भ्रमणध्वनी धारक असून 18.8 लाख लँडलाईन ग्राहक आहेत. महाराष्ट्रातील एकूण नऊ दूरसंचार सेवा देणारे कंपनी आहेत. बऱ्याच ग्राहकांना  TRAI ने ग्राहक हिताच्या दृष्टीने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांची माहिती नाही. ग्राहकांना उपरोक्त सेवा बद्दलच्या तक्रारी करण्यासाठी असल्यास ती कशी करावी, अपील कसे करावे, नंबर portability ची पध्दत कोणती. नको असलेल्या जाहिराती कशा प्रकारे बंद करतात. नको असलेले कॉल्स कसे बंद करावेत. मूल्यवर्धीत सेवाबाबतची नियमावली कोणती. सर्व ग्राहकांना डिजिटल सेट टॉप बॉक्स घेणे बंधनकारक आहे. त्याचे फायदे कोणते याबाबत हा कार्यक्रम आहे.

दक्षता समितीची बैठक संपन्न


बीड, दि. 27 :- माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 2017 करीता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे.  दक्षमा समितीची बैठक निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी, डॉ. विक्रम सारुक शिक्षणाधिकारी (मा) ,शशिकांत हिंगोणीकर शिक्षणाधिकारी (मा), जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांची उपस्थिती होती.
शिक्षणाधिकारी (मा) विक्रम सारुक यांनी इयत्ता 12 वी ची परीक्षा दिनांक 28 फेब्रुवारी 2017 ते 25 मार्च 2017 तसेच इयत्ता 10 ची परीक्षा दिनांक 7 मार्च 2017 ते 1 एप्रिल 2017 या कालावधीमध्ये होणार आहे. जिल्ह्यामध्ये इयत्ता 12 वी ची परीक्षार्थी संख्या 38265 व इयत्ता 10 ची परीक्षार्थी संख्या 43613 आहे. इयत्ता 12 वी ची परीक्षा केंद्र संख्या 89 व इयत्ता 10 वी ची परीक्षा केंद्र संख्या 143 आहे. अध्यक्ष, विभागीय मंडळ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार एकूण 6 भरारी पथकाची नियुक्ती केलेली आहे. जिल्हास्तरावर एक नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. जिल्ह्यातील इयत्ता 12 ची परीक्षा केंद्र संचालकांची बैठक दि.25फेब्रुवारी 2017 रोजी घेण्यात येणार आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी परीक्षा सुरळीत, शांततेत व भयमुक्त वातावरणात पार पाडाव्यात या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी, बीड यांच्या आदेशानुसार महसूल विभागातील व जिल्हा परिषदेतील वर्ग -1 व वर्ग-2 च्या अधिकाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. सदर पथके नियोजनाप्रमाणे परीक्षा केंद्रांना भेटी देतील व परीखा कॉपीमुक्त, भयमुक्त वातावरणात पार पडेल यांची दक्षता घेतील.
 केंद्र संचालक यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रवेश देण्यापूर्वी केंद्राच्या प्रवेशद्वारावर  त्यांची तपासणी करुनच विद्यार्थ्यांना वर्गामध्ये प्रवेश द्यावा. सदर विद्यार्थ्यांकडे कसलेही आक्षेपार्ह साहित्य असणार नाही याची खबरदारी घ्यावी. आवश्यक सूचना देऊनही परीक्षा दालनात कॉपी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित पर्यवेक्षक व केंद्र संचालक / सह केंद्र संचालक यांचेवर जबाबदारी निश्चित करुन कडक कार्यवाही करण्यात येईल.
कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांमुळे हुशार व गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना अवाजवी त्रास कुठलाही त्रास होणार नाही याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी.

जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्र संचालक, पर्यवेक्षक यांनी परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त, शांततेच्या वातावरणात पार पाडावी असे आवाहन करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन



बीड, दि.27 :- सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खाजगी क्षेत्रातील आस्थापनेत रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध असल्याने मंगळवार दि.28 फेब्रुवारी 2017 रोजी बीड येथील अमृत मंगल कार्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नवभारत फर्टिलायझर लिमिटेड औरंगाबाद यांच्याकडील विक्री प्रतिनिधी व कृषी अधिकारी 60 जागाकरीता एसएससी, एचएससी, पदविकाधारक, बीएस्सी ॲग्री पास वय 19 ते 35 वर्ष असणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी जागा तसेच नवकिसान बायो लिमिटेड जळगाव यांच्याकडे विक्री प्रतिनिधी पदाच्या 50 जागा असून एसएससी व पदवीधर पास वय 19 ते 35 असणाऱ्या उमेदवारांसाठी जागा आहेत. एमपीटीए एज्युकेशन एलटीडी पुणे यांच्याकडे ट्रेनी पदाच्या 100 जागा एसएचसी, आयटीआय, डिप्लोमा पात्रताधारक वय 18 ते 30 वर्ष असणाऱ्या उमेदवारांसाठी आहेत.  व्हिडीओकॉन इंडस्ट्रिज लिमिटेड औरंगाबाद येथे ट्रेनी पदासाठी एकुण 100 जागा वय 18 ते 30 दरम्यान असणाऱ्या उमेदवारासाठी आणि रुबिकॉन फॉरम्युलेशन प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद येथे 50 जागा वय 18 ते 30 वर्षे, धुत ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद येथे ट्रेनी पदासाठी एकुण 100 जागा वय 18 ते 30 वर्षे, सॉफटेक सॉफ्टवेअर बीड येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी एकुण 10 जागा वय 18 ते 30 वर्षे असणाऱ्या उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन दि.28 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विकास मार्गदर्शन केंद्र व नगर परिषद बीड यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

कंपनीचे अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित राहून पात्र इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेणार आहेत. इच्छुकांनी www.maharojgar.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन इंन्ट्रीपास घेवून मेळाव्यासाठी नाव नोंदणी केलेले ओळखपत्र व इंट्री पास, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या मुळ व झेरॉक्स प्रतिसह स्वखर्चाने मंगळवार दि.28 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अमृत मंगल कार्यालय, सुभाष रोड,बीड येथे उपस्थित रहावे. असे बीडचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक यांनी कळविले आहे.

गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०१७

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम जारी



               बीड, दि.23:- जिल्ह्यात माध्यमिक व  उच्च माध्यमिक परीक्षा माहे फेब्रुवारी व मार्च, 2017 मध्ये होत असून परीक्षेमध्ये गैरप्रकार टाळण्यासाठी, परीक्षा कॉपीमुक्त करण्याकरिता तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता तसेच कायदा व  सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बीडचे  जिल्हादंडाधिकारी  नवल किशोर राम यांनी  फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये केंद्र व त्याच्या 200 मीटर परिसरात दि. 28 फेब्रुवारी ते 25 मार्च 2017 पर्यंत इयत्ता बारावी व दि.7 मार्च ते 1 एप्रिल 2017 या कालावधीत इयत्ता दहावीच्या परीक्षा असल्याने बीड जिल्ह्यातील विविध परीक्षा केंद्रावर परीक्षा संपेपर्यंतच्या कालावधीत मनाई आदेश जारी केला आहे.

          परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी केला असून परीक्षा केंद्राच्या परिसरात 200 मीटर  अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास, फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण, संदेश वहन साधने तसेच कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेस सेट, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप, संगणक बाळगण्यास, एस.टी.डी,आय.एस.डी मशिन, ध्वनीक्षेपक वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा आदेश बीड जिल्ह्याच्या हद्दीतील परीक्षा केंद्रावर दि.28 फेब्रुवारी ते 1 एप्रिल 2017 या कालावधीत त्या-त्या दिवशीच्या परीक्षेच्या वेळेच्या एक तास अगोदर ते परीक्षेचा पेपर संपेपर्यतच्या कालावधीसाठी व परीक्षा साहित्य ठेवलेल्या ठिकाणी कायम लागू राहतील. असे जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.

केंद्र सरकारचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्यावतीने बीड जिल्ह्यात माता-बाल आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन




बीड, दि.23 :- केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व महिला बालकल्याण विभागाच्या वतीने बीड जिल्ह्यातील खालापुरी, नाळवंडी व पिंपळनेर या गावांमध्ये प्रत्यकी दोन दिवशीय माता-बाल आणि  किशोरवयीन मुलांचे आरोग्याविषयी  राष्ट्रीय जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातील  जनतेला आरोग्याची तसेच सरकारच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती व्हावी यासाठी प्रजनन, माता, नवजात शिशू, बाळ आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्याविषयी शिरुर तालुक्यातील खालापुरी येथे दि.27 व 28 फेब्रुवारी 2017, बीड तालुक्यातील नाळवंडी येथे दि.3 व 4 मार्च 2017 तर बीड तालुक्यातील पिंपळनेर येथे दि.8 व 9 मार्च 2017 रोजी या राष्ट्रीय आरोग्य  जनजागृती  अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे
तीनही गावांमध्ये पहिल्या दिवशी आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग तसेच शाळा महाविद्यालयाच्या वतीने रांगोळी स्पर्धा, सकस आहार स्पर्धा तसेच सुद्दढ बालक स्पर्धा घेण्यात येईल.
दुसऱ्या दिवशी सकाळी गावात आरोग्य जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत पदधिकारी, अधिकारी तसेच ग्रामस्थ, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी मुख्य कार्यक्रमाद्वारे  आई-बाळाचे आरोग्य, किशोरवयीन मुलांचे आरोग्य, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, स्वच्छ भारत अभियान या विषयांवर विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा  मान्यवरांच्या हस्ते  पारितोषिके देऊन सत्कार करण्यात येणार आहे. या दोन दिवशीय कार्यक्रमात विविध विभांगाचे स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. तसेच मनोरंजनाच्या माध्यमातूनही आरोग्याची माहिती देण्यात येणार आहे. सायंकाळी विविध जनजागृतीचे लघु चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत. अशी माहिती भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी दिली.

मुख्य कार्यक्रमास बीड  तालुक्याचे आमदार जयदत्त क्षीरसागर, गेवराई तालुक्याचे आमदार लक्ष्मण पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, खालापुरी गावच्या सरपंच द्रोपदाबाई मुंडे, नाळवंडींच्या सरपंच अर्चना जाधव तर पिंपऴनेरच्या चद्रभागाबाई गणगे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा साथ रोग अधिकारी डॉ. पुरुषोत्तम पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम वासनिक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कासट, डॉ.राजेश तांदळे,  जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. विकास आठवले, डॉ. बेग व डॉ.चौरे,  महिला व बाल विकास अधिकारी वैभव जाधव आणि बांगर, मुख्याध्यापक सोनसळे, यादव तसेच मुख्याध्यापक प्रकाश राठोड, महिला बालकल्याण विभागाच्या प्रवेक्षिका, अंगणवाडी आणि आरोग्य विभागाच्या आशा कार्यकर्ता आदी उपस्थित राहणार आहेत. असे माहिती भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी कळविले आहे.

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या कामकाजाचा जिल्हाधिकारी राम यांच्याकडून आढावा



बीड, दि. 22 :- स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी बाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली व उपसंचालक तथा समन्वय अधिकारी श्रीमती स्मिता झगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे दि आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस बीड जिल्हयातील नगर परिषदा तसेच नगरपंचायतीचे सर्व मुख्याधिकारी हजर होते.
या बैठकित जिल्हाधिकारी राम यांनी स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अंमलबजावणीबाबत नगरपरिषद तसेच पंचायत निहाय आढावा घेतला. गेवराई नगर परिषद सर्वसाधारण सभेने दिनांक 18 फेब्रुवारी 2017 रोजी ठराव घेउन गेवराई शहर हगणदारीमुक्त झाल्याचे जाहीर केलेले आहे. त्याबद्दल जिल्हाधिकारी राम यांनी गेवराई नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांचे अभिनंदन केले. धारुर नगर परिषदेने शहर हगणदारीमुक्त जाहीर करणेसाठी दिनांक 28 फेब्रुवारी 2017 रोजी सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. त्याअनुषंगाने मुख्याधिकारी नगर परिषद धारुर यांनी त्यादृष्टीकोनातुन दैनंदिन आरखडा तयार करुन कामकाज करणे तसेच योजनेसाठीचे पूर्ण आवश्यक प्रमाणपत्र ई. हस्तगत करणे,शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती करुन तेथे पाण्याची व्यवस्था करुन ते नागरीकांसाठी उपलब्ध करुन देउन शहर हगणदारीमुक्त करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
यापुढे शहर हगणदारीमुक्त झाल्याशिवाय कुठल्याही प्रशासकिय मान्यता देण्यात येणार नाहीत त्यामुळे सर्वांनी त्यांना ठरवुन दिलेल्या कालमर्यादेत म्हणजे 31 मार्च 2017 अखेर कुठल्याही परिस्थितीत शहर हगणदारीमुक्त करणे अनिवार्य असल्याचे निर्देश दिले. तसेच शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी प्रत्येक ओ.डी.स्पॉटनिहाय गुडमॉर्निंग पथकाची नेमनुक करावी सोबत पोलास बंदोबस्त ठेवण्यात यावा व याठिकाणी येणाऱ्या नागरिकांची नोंद ठेऊन त्यांचे घरांचे सर्व्हेक्षण करुन आवश्यक असणाऱ्यांना शौचालयाचा या योजनेतुन लाभ देण्यात यावा. या कामात जे मुख्याधिकारी निष्काळजीपणा करतील त्यांचेविरुध्द प्रशासकिय कार्यवाही प्रस्तावीत करुन त्यांच्या गोपनिय अहवालात त्याची नोंद घेण्यात येईल असे कडक निर्देशही यावेळी देण्यात आले.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी शहरातील एन.जी.ओ.,सेवाभावी संस्था,महिला बचत गट यांना यात समाविष्ट करुन नागरिकांचे प्रबोधन करावे. ज्या नागरिकांनी या योजनेतुन प्रथम हप्ता घेउन अद्यापही शौचालयाचे बांधकाम सुरु केलेले नाही त्यांचेविरुध्द गुन्हे नोंद करावेत. तसेच उघडयावर शौचास जाणाऱ्या नागरिकांविरुध्द मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फौजदारी व दंडात्मक स्वरुपाची कार्यवाही करावी असे निर्देश दिले. यासोबत शहरातील नागरिकांनी या शासनाच्या महत्वपुर्ण योजनेत आपला सहभाग नोंदवुन शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम व उपसंचालक तथा समन्वय अधिकारी श्रीमती स्मिता झगडे यांनी केले आहे.                    

दुर्बल व वंचित घटकांसाठीच्या 25 टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रीयेस मुदतवाढ



               बीड, दि.22 :- सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी दुर्बल व वंचित घटकांसाठीच्या 25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रीयेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रीया सद्या जिल्ह्यात सुरु असून जिल्ह्यातील 172 निकषपात्र शाळांनी आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे. बीड जिल्ह्यातील निकष पात्र शाळांतील 25 टक्के प्रवेश पात्र विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता 2  हजार 194 असून पालकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी शनिवार दि.25 फेब्रुवारी 2017 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

           कालावधी अत्यल्प असल्याने व जिल्ह्यात झालेल्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या अहवालावरुन               दि. 21 फेब्रुवारी 2017 पर्यंत फक्त पालकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेले आहे. एकुण प्रवेश पात्र क्षमतेच्या       2  हजार 194  पैकी रजिस्ट्रेशन केलेल्या 983 विद्यार्थी वगळून  1 हजार 311 जागा रिक्त आहेत.    25 टक्के मोफत प्रवेश प्रक्रीयेस ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी दि.25 फेब्रुवारी 2017 पर्यंत https://student.maharashtra.gov.in/adm portal/Users/rteindex संकेतस्थळावर मुदतवाढ मिळाली असून दुर्बल व वंचित घटकातील 25 टक्के मोफत प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संधीचा लाभ घेऊन विहीत मुदतीत ऑनलाईन रजिस्ट्रेशनची प्रक्रीया पुर्ण करावी. असे बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा) यांनी कळविले आहे.

लोकसंचलित साधन केंद्रातील लेखापाल पदासाठी अर्ज करावेत


               बीड, दि.22 :- तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत लोकसंचलित साधन केंद्र, बीड कार्यालयात 11 महिन्याच्या करार तत्वावर लेखापाल पदावर नियुक्त करण्यात येणार असून इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

          लेखापाल पदासाठी पात्रता उमेदवार हा बी.कॉम पदवीधर असावा. इंग्रजी टायपिंग व टॅली आणि संगणकाचे ज्ञान असावे. लेखापाल पदासाठी 6 हजार रुपये मानधन देण्यात येईल. स्थानिक उमेदवारांना प्राधान्य राहील. तरी पात्र उमेदवारांनी लोकसंचलित साधन केंद्र, मळेकर इमारत, छत्रपती कॉलनी, तहसिलच्या मागे, बीड-431122 या पत्यावर दि.4 मार्च 2017 पर्यंत अर्ज सादर करावे. असे व्यवस्थापक, लोकसंचलित साधन केंद्र, बीड यांनी कळविले आहे.

25 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय क्रीडा नैपुण्य चाचणीचे आयोजन



               बीड, दि.22 :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाद्वारे 11 जिल्ह्यामध्ये क्रीडा प्रबोधिनी कार्यरत असून  क्रीडा प्रबोधिनीमधील प्रवेशाकरीता प्रवेशपूर्व जिल्हास्तरीय क्रीडा  नैपुण्य चाचणीचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाद्वारे शनिवार दि.25 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 9.30 वाजता बीड येथील जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले आहे.

          जिल्ह्यातील 8 ते 14 वर्षे वयोगटातील व 1 जुलै 2003 तदनंतरची ते दि.31 जुलै 2010 पर्यंत जन्मतारीख असलेले इच्छुक शालेय, शाळाबाह्य विद्यार्थी मुले व मुली यांनी या क्रीडा नैपुण्य चाचण्यांकरीता जन्मतारखेच्या अधिकृत पुराव्यासह क्रीडा पोशाखामध्ये उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी क्रीडा कार्यालयास संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

कल्याणकारी संस्था व वसतिगृह योजनेंतर्गत फेब्रुवारी, मार्च महिन्याचे धान्य नियतन मंजूर


               बीड, दि.22:- माहे फेब्रुवारी व मार्च-2017 या महिन्यासाठीचे  कल्याणकारी संस्था व वसतिगृह योजनेंतर्गत  तांदुळ धान्य दुकानामार्फत जिल्ह्यातील पात्र कार्ड धारकांना वितरित करण्यासाठी नियतन मंजूर झाले आहे. हे नियतन एकूण 22 गोदामामार्फत स्वस्त धान्य दुकानांना वितरीत करण्यात येणार आहे.

          पीपीपी केसोना परळी वैजनाथ येथून फेब्रुवारीसाठी तांदुळ 199.280 मे.टन, मार्चसाठी तांदुळ 199.280 मे.टन,  अन्न महामंडळ अहमदनगर येथून फेब्रुवारीसाठी तांदुळ 28.720 मे.टन, मार्चसाठी तांदुळ 28.720 मे. टनाचा पुरवठा होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड यांनी कळविले आहे. 

प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेंतर्गत मार्च महिन्याचे धान्य नियतन मंजूर



               बीड, दि.22:- माहे मार्च-2017 या महिन्यासाठीचे प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेंतर्गत गहू, तांदुळ धान्य दुकानामार्फत जिल्ह्यातील पात्र कार्ड धारकांना वितरित करण्यासाठी नियतन मंजूर झाले आहे. हे नियतन एकूण 22 गोदामामार्फत स्वस्त धान्य दुकानांना वितरीत करण्यात येणार आहे.

          यामध्ये वखार महामंडळ, परळी वैजनाथ येथून  एनएसएफए प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत गहु 2000 मे.टन, तांदुळ 500 मे.टन,  अत्योंदय  गहू 665.819 मे.टनाचा पुरवठा होणार आहे. पीपीपी परळीवैजनाथ केसोना येथून एनएसएफए प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत गहु 1370.537 मे.टन, तांदुळ 1747.058मे.टन, अत्योंदय तांदुळ 435.546 मे.टनाचा पुरवठा होणार आहे. तसेच अन्न महामंडळ अहमदनगर/नागापूर पीईजी येथून एनएसएफए प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत गहु 1085.384 मे.टन, तांदुळ 695.256 मे.टन, अत्योंदय गहु 180.610 मे.टन, तांदुळ 151.606 मे.टनाचा पुरवठा होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड यांनी कळविले आहे. 

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

जि.प.पं.स.निवडणूक -2017 मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज




               बीड, दि.21:-  जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी  दि. 16 फेब्रुवारी 2017 रोजी मतदान झालेले असून दि. 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10 वाजेपासून संबंधित तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी सुरु होणार आहे. प्रत्यक्ष  मतमोजणीसाठी एकूण 176 टेबल वर  449 कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. याशिवाय 10 टक्के राखीव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. टपाली मतपत्रिका छाननीसाठी स्वतंत्र पथक नेमण्यात आलेले आहे. स्ट्रॉग रुममधून मतदान यंत्रे काढून मतमोजणीच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी रो ऑफीसर ची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आलेली असून त्यांचे हाताखाली वर्ग 4 चे कर्मचारी  देण्यात आलेले आहेत. मतमोजणीच्या आकडेवाडीची माहिती पत्रकार तसेच माध्यम प्रतिनिधींना देण्यासाठी वेगळा कक्ष स्थापन केलेला आहे. मतमोजणीच्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी,  निवडणूकीचे विशिष्ट अधिकारी वगळता अन्य कोणासही भ्रमणध्वनी वापरता येणार नाही  याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी,बीड यांनी कळविले आहे.

रविवार, १९ फेब्रुवारी, २०१७

छत्रपती शिवाजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



               बीड दि.19 : जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          याप्रसंगी बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने, नायब तहसीलदार श्रीमती शारदा दळवी, सय्यद कलिम यांच्यासह उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक सुलभ मतमोजणी प्रक्रीयेसाठी यंत्रणांनी सज्ज रहावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



बीड, दि. 18 :- बीड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीची मतमोजणी 11 तालुक्याच्या ठिकाणी होणार असूल सुलभ मतमोजणी प्रक्रीयेसाठी सर्व यंत्रणांनी सज्ज रहावे असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
निवडणूक मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची बैठक जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षामध्ये घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक तालुक्यातील मतमोजणीच्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेताना जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की,  निवडणूक प्रक्रीयेचा मतदानाचा महत्वाचा भाग अत्यंत शांततेत आणि समाधानकारक पार पाडल्या गेला आहे. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे मतमोजणीची प्रक्रीया आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्र आणि सुरक्षा कक्षाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त राहिल याची दक्षता घ्यावी. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी राबविण्यात येणारी मतमोजणीची कार्यपध्दती आवश्यक टेबल व मनुष्यबळाची व्यवस्था, मतमोजणी कक्षाची रचना इत्यादी बाबींविषयी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जबाबदारीने नियोजन करावे. शक्यतो मतमोजणीचे निकाल लागण्यास उशीर होणार नाही अशा निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यपध्दतीचा अवलंब करावा. प्रत्यक्ष मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षण देण्यात यावे. कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी प्रतिनिधींकडून गैरवर्तन होणार नाही यासाठी बंदोबस्त ठेवावा. मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधी, पत्रकारांना प्रवेशपत्र देऊन त्यांना माहिती वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रसारमाध्यम कक्ष आवश्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांसह स्थापन करण्यात यावा. वृत्तसंकलनासाठी त्यांना सहकार्य करावे असेही निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
बीड जिल्हा परिषदेच्या 60 गटासाठी आणि 11 पंचायत समितीच्या 120 गणासाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान  झाले असून त्याची मतमोजणी त्या-त्या तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी केंद्रात गुरुवार, दिनांक 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे. या अनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीची माहिती संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.

-*-*-*-

मिलिटरी हॉस्पिटल अहमदनगर, उस्मानाबाद येथील वैद्यकीय पदासाठी अर्ज करावेत




बीड, दि. 18 :- इसीएचएस या माजी सैनिकांच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अहमदनगर येथे मेडिकल स्पेशालिस्टची एक जागा व उस्मानाबाद दवाखान्यात मेडिकल व डेंटल ऑफीसर पदाची प्रत्येकी एक जागा कंत्राटी पध्दतीने भरावण्याच्या आहेत. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी www.echs.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. अर्ज दि.27 फेब्रुवारी 2017 पर्यंत ओआयसी ईसीएचएस सेल, स्टेशन एचक्यू, जामखेड रोड, अहमदनगर-414002 या पत्यावर पाठवावेत. असे बीडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

7 ते 22 एप्रिल कालावधीत अहमदनगर येथे आर्मी भरतीचे आयोजन




बीड, दि. 18 :- रिक्रुटमेंट ऑॅफीस पुणे यांनी पोलीस परेड मैदान, अहमदनगर येथे दि.7 ते 22 एप्रिल 2017 या कालावधीत आर्मी भरती आयोजित केली आहे. पुणे, अहमदनगर, बीड, लातूर आणि उस्मानाबाद या पाच जिल्ह्यासाठी होणार आहे. रॅलीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन दि.6 ते 22 मार्च 2017 या कालावधीत www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर चालु राहील. या रॅलीमध्ये सोल्जर जीडी, सोल्जर टेक्नीकल, सोल्जर क्लार्क आणि सोल्जर ट्रेडमन या पदासाठी भरती केली जाणार आहे. असे भरती संचालक कर्नल प्रशांत राव यांनी कळविले आहे.

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७

बीड- जिल्हाधिकारी नवल किशाेर राम यांनी मतदान केंद्रांना अचानक भेटी देवून मतदान प्रक्रियेची पाहणी केली.



बीड- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी महिला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...


बीड -जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी शांततेत मतदान. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..



जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी आज सकाळी बीड जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर शांततेत मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मतदान केंद्रावरील मतदारांची तसेव काही मतदान केंद्रांना भेटी देऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली तेथील छायाचित्रे . . . . .








जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी आज सकाळी बीड जिल्ह्यात विविध मतदान केंद्रावर शांततेत मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मतदान केंद्रावरील मतदारांची तसेव काही मतदान केंद्रांना भेटी देऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पाहणी केली तेथील छायाचित्रे . . . . .

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक मतदारांना मतदानाच्या वेळी ओळख पटविणे आवश्यक


बीड, दि. 15 :- बीड तालूक्यातील सर्व मतदाराना निवडणूक विभाग तहसिल कार्यालय बीड यांच्या वतीने जाहिर आवाहन करण्यात येते की,  राज्य निवडणुक आयोगाने जिल्हा परिषद व पंचायत समिती  सार्वत्रिक निवडणूक 2017 साठी निवडणूक कार्यक्रम जाहिर केलेला आहे. बीड तालूक्यात  जिल्हा परिषद विभागाचे  एकूण 08 (आठ) गट व पंचायत समिती निर्वाचक गण 16 (सोळा) गटाची व गणाची  निवडणूक  दिनांक 16 /2/2017 रोजी  सकाळी 7-30 ते सांयकाळी 5-30 वाजेपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. तरी सर्व मतदारानी  निर्भय पणे ,मुक्त वातावरणात मतदान करावे. ज्याची नांवे मतदार यादीत दूबार आहेत अशा मतदारानी  एकाच ठिकाणी मतदान हक्क बाजावण्यात यावा . ज्या मतदाराचे दोन ठिकाणी नांव आहे अशा मतदारानी दोन ठिकाणी  मतदान करण्याचा प्रयत्न केल्यास  किंवा कार्यालयास तक्रारी प्राप्त झाल्यास संबधिताविरुध्द  मतदार नोंदणी अधिनियमान्वये  कठोर कार्यवाही करण्यात येईल याची सर्व मतदारानी नोंद घ्यावी.
            तसेच मतदानाचे दिवशी  मतदारानी  आपल्या कडील मतदान ओळखपत्र  व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ. ) यांनी दिलेली   मतदान चिठठी ( पोलचिट) मतदानाचे वेळस पोलचिटवर  देण्यात आलेल्या मतदान केंद्रावर घेऊन जावे.  जर  वरील दोनही पूरावे मतदाराकडे उपलब्द नसल्यास त्यानी  मतदाराकडील 1. पासपोर्ट,2. वाहन चालविण्याचा परवाना.3. आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र,4. केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी  आपल्या कर्मचा-याना फोटो सहित दिलेले ओळखपत्र.5. राष्ट्रीयकृत बँका  अथवा पोष्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबूक  6. स्वातंत्रय सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र  7. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याच्या आदीच्या तारखेपर्यंत सक्षम प्राधिका-याने अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासवर्ग /विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागासप्रर्वग  इत्यादीना फोटो सहित दिलेले प्रमाणपत्र .8 राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याच्या आदिच्या तारखेपर्यत सक्षम प्राधिका-याने दिलेला फोटो सहित अंपगत्वाचा दाखला. 9. मालमत्तेबाबतची कागदपत्रे तसेच नोंदणीखत इत्यादी ( फोटोसहित) 10 . राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याच्या आदीच्या तारखेपर्यंत फोटोसहित देण्यात आलेला शस्त्राचा परवाना .11. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याच्या आदिच्या तारखेपर्यंत दिलेले राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली फोटो असलेले ओळखपत्र  12. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याच्या आदिच्या तारखेपर्यंत दिलेले निवृत्त कर्मचा-याचे फोटो असलेले पासबूक. 13. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम  जाहिर केल्याच्या आदिच्या तारखेपर्यंत दिलेले निवृत्त कर्मचा-याच्या विधवा / अवलंबित व्यक्ती यांचे फोटा असलेले प्रमाणपत्र .14  राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याच्या आदिच्या तारखेपर्यंत दिलेले वयस्कर निवृत्ती वेतन धारक अथवा त्यांच्या विधवा यांचे फोटो असलेले प्रमाणपत्र 15. केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटो सहित कार्ड  16 . राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहिर केल्याच्या आदिच्या तारखेपर्यत दिलेली शिधा पत्रिका ( कुटूंबातील सर्व मतदारानी मतदान करण्यासाठी एकत्र येणे आवश्यक असेल .तसेच जर शिधा पत्रीकेवर एकाच व्यक्तीचे नांव असल्यास त्याने स्वत:च्या वास्तव्याचा अन्य पूरावा जसे वीज वापराचे देयक, दूरध्वनी वापराचे देयक ,प्रॉपर्टी कार्ड , किंवा घरपटटी भरल्याची पावती सोबत आणणे बंधनकारक राहिल ) 17. आधार ओळखपत्र.  असे वरील पैकी एक पुरावा म्हणून मतदारानी मतदान करतेवेळी सोबत घेऊन यावे व आपला मतदानाचा हक्क बजावण्यात यावा असे बीड जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक  2017 , निवडणूक  निर्णय अधिकारी  विकास माने  व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  श्रीमती छाया पवार यांनी आवाहन केले आहे.
-*-*-*-




जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अंबाजोगाई व केज तालुक्यातील निवडणूकीचा घेतला आढावा


बीड, दि. 15 :- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई व केज तालुक्यांना भेटी देऊन जिल्हाधिकारी  नवल किशोर राम यांनी निवडणूकीच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला.
अंबाजोगाई तालुक्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालयातील  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांनी ही बैठक घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शरद झाडके, पोलीस निरीक्षक गंदम, गीते, विसपुते तसेच क्षेत्रीय अधिकारी व पथक प्रमुख उपस्थित होते.
मतदान प्रक्रीया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी केंद्राध्यक्ष महत्वाचा घटक असून त्यांनी मतदान केंद्राच्या कामात सक्षमपणे लक्ष द्यावे असे सांगून जिल्हाधिकारी राम पुढे म्हणाले की, क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्राशी संपर्क ठेऊन माहिती द्यावी. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई  मोठया प्रमाणात करण्यात येत आहे. मात्र मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलीस विभागाने कडक बंदोबस्त ठेवावा. मतदानानंतर मतदान यंत्र सुरक्षीत ठेवण्यासाठी सुरक्षा कक्ष सज्ज करण्यात यावा व त्या ठिकाणी सीसीटीव्ही व व्हिडीओ यंत्रणा प्रस्थापित करण्यात यावी असे सांगून त्यांनी सखोल मार्गदर्शन केले.
केजला घेतला आढावा
जिल्हाधिकारी राम यांनी केज येथील तहसील कार्यालयात केज तालुक्यातील निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा  घेतला. यावेळी त्यांनी निवडणूक विषयक कामकाजाच्या प्रत्येक बाबींच्या कार्यवाहीची माहिती घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक दिक्षीतकुमार गेडाम, निवडणूक निर्णय अधिकारी तथा लातूरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) डॉ. संजय तुबाकले, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अविनाश कांबळे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
-*-*-*-


जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी प्रशासन सज्ज


बीड, दि. 15 :- बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूकीसाठी गुरुवार, दिनांक 16 फेब्रुवारी 2017 रोजी बीड जिल्ह्यात मतदान प्रक्रीया होत असून यासाठी राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या जिल्हा प्रशासनाच्या सर्व 11 तालुक्यातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाने बीड जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या एकूण 60 गटांसाठी आणि पंचायत समितीच्या 120 गणांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 11 तालुक्यांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील निवडणूकीच्या कामकाजाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. या निवडणूकीसाठी जिल्ह्यामध्ये एकूण 1 हजार 866 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून 15 लाख 1 हजार 551 मतदारांची संख्या आहे. सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था पोलीस विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांच्या ठिकाणी अधिकचे मनुष्यबळ आणि सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. अशा मतदान केंद्रांच्या ठिकाणी सीसीटीव्ही आणि व्हिडीओ कॅमेरांच्या माध्यमातून कडक नजर ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील 1 हजार 866 मतदान केंद्रांच्या ठिकाणी 197 क्षेत्रीय अधिकारी, 2007 मतदान केंद्राध्यक्ष,  7 हजार 820 मतदान अधिकारी, 2007 शिपाई याप्रमाणे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रांचे साहित्य संबंधित अधिकाऱ्यांना सुपुर्द करण्यात आले असून मतदान केंद्राच्या ठिकाणी पात्र मतदारांना सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंतच्या कालावधीत मतदान केंद्रावर मतदान करता येणार आहे. जि.प. व पं.स. निवडणूकीसाठी प्रत्येक मतदारास दोन मते द्यावी लागणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर पाणी, वीज, रँप आणि सुरक्षा ईत्यादी मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या दर्शनी भागात उमेदवाराची माहिती प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यासोबतच मतदान प्रक्रीयेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेसाठी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. शस्त्रबंदी,हद्दपारी व स्थानबध्दतेचीही कारवाई मोठ्या प्रमाणात करून शांतता प्रस्थापित करण्यात आली आहे असेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.
मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रीयेवर देखरेख ठेवण्यासाठी निर्भय, मुक्त व पारदर्शक निवडणूकीसाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था करण्यात आल्या असून आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी, खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग व मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी विविध यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय राज्य निवडणूक आयोगाने नियुक्त केलेल्या मुख्य निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निरीक्षक हे सुध्दा मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून राहणार आहेत. सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क नक्की बजावावा असे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.
मतदान प्रक्रीया संपल्यानंतर सर्व मतदान यंत्रे सुरक्षीत ठेवण्यासाठी तालुकापातळीवर सुरक्षा कक्ष स्थापन करण्यात आले असून त्याठिकाणी कडक बंदोबस्तात मतदान यंत्रे ठेवण्यात येणार आहेत. निवडणूकीची मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी गुरुवार, दिनांक 23 फेब्रुवारी 2017 रोजी सकाळी 10 वाजेपासून होणार आहे.
                                                                                 -*-*-*-


मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

परळी तालुक्याचा घेतला आढावा संवेदनाशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही यंत्रणा ठेवावी - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



            बीड, दि. 14 :-  बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील निवडणूक तयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून कडक नजर ठेवावी असे निर्देश दिले.
            जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2017 च्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली परळी वैजनाथ तहसील कार्यालयात सर्व संबंधित व पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन घेण्यात आली. या बैठकीस पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, निवडणूक निर्णय अधिकारी अमर शिंदे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विद्याचरण कडवकर, अतिरिक्त पोलीस अधिकारी दिक्षीतकुमार गेडाम, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल आनंद, पोलीस निरीक्षक चाटे, त्रिभुवन आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी राम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी यांना त्यांच्या झोनमधील सर्व मतदान केंद्रांची तपासणी करुन निवडणूक पारदर्शक व नि:पक्ष वातावरणात पार पाडण्याच्या सूचना केल्या. तालुक्यातील संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर आवश्यक प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. सर्व क्षेत्रीय अधिकारी यांच्यासमवेत एक व्हिडीओ पथक देण्यात येणार असून प्रत्येक मतदान  केंद्रावर पोलीस यंत्रणेची करडी नजर ठेवण्याच्याही सूचना दिल्या. तसेच संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर गोंधळ घालणाऱ्या व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. मतदानाच्या पुर्वी पोल चिट वाटप करण्याचे काम पूर्ण करण्याबाबत, मतदान केंद्रावर उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रामध्ये दिलेल्या शपथपत्रातील मालमत्तेचे बोर्ड लावण्याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही याचीही दक्षता घ्यावी असेही सूचित केले. तसेच जिल्हा परिषद  पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व मतदान प्रक्रीया शांततेत पार पडेल यादृष्टीने कार्यवाही करावी असे सांगितले.
-*-*-*-


माजलगाव तालुक्याची निवडणूक मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सज्ज रहावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



            बीड, दि. 14 :- बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या समवेत माजलगाव येथे घेतला. यावेळी त्यांनी मतदान प्रक्रीया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेऊन दक्ष राहण्याच्या सूचना केल्या.
             माजलगाव येथील तहसील कार्यालयात त्यांनी ही आढावा बैठक घेतली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, निवडणूक निर्णय अधिकारी राजेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. हरी बालाजी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नरसिंग झंपलवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
            तहसील कार्यालयातील मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची व मतमोजणी केंद्राची  प्रत्यक्ष पाहणी करुन  जिल्हाधिकारी राम यांनी कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. ते म्हणाले की, माजलगाव तालुक्यातील 179 मतदान केंद्रावर कडक बंदोबस्त ठेवावा. त्यापैकी 34 संवेदनशील केंद्रांना अधिक सुरक्षा व्यवस्था करावी. सीसीटीव्ही व व्हिडीओ पथकाची व्यवस्था अपरिहार्य आहे. मतदान यंत्रणांनी अधिक दक्ष राहून प्रक्रीया पार पाडायची आहे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावयाची आहे. आवश्यक मनुष्यबळ, वाहने, मतदान साहित्य आदिबाबतही अधिक काळजीपूर्वक कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            वाहतुक व्यवस्थेसाठी 20 बसेस, 10 टेम्पो आणि 36 जीपचा ताफा उपलब्ध करुन देण्यात  येत आहे. 20 झोनल अधिकारी सर्व मतदान केंद्राच्या संपर्कात राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले आहेत. जवळपास 1150 कर्मचारी या मतदान कामकाजासाठी नियुक्त झाले असल्याचेही यावेळी सांगितले. संपूर्ण  तयारी झाली असून मतदान कर्मचारी  पथके वेळेवर मतदान केंद्राला साहित्यासह पोहचणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी सर्व निवडणूकीशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी राम व पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी माजलगाव तालुक्यातील पाथरुड येथील आठ मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली व तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला.
-*-*-*-





सोमवार, १३ फेब्रुवारी, २०१७

जि.प.पं.स.सार्वत्रिक निवडणूक-2017 जिल्ह्यातील अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


            बीड, दि.13  :- जिल्ह्यात ज्या ठिकाणी नगर परिषद व नगर पंचायत आहे त्या ठिकाणीची हद्द वगळून जिल्ह्यातील इतर सर्व ठिकाणचे ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद व पंचायत  समिती निवडणूक -2017 ची मतदान प्रक्रीया होणार आहे. त्या ठिकाणच्या ग्रामपंचायत हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व मतदान प्रक्रीया खुल्या वातावरणात व शांततेत पार पाडण्याकरीता त्या ठिकाणच्या सर्व अनुज्ञप्त्या जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) प्रमाणे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व अबकारी विभागाच्या सर्व देशी दारु, विदेशी दारु, एफएल-1, एफएल-2, एफएल-3, सीएल-2 सीएल-3, बियर शॉपी, ताडी आदी अनुज्ञप्ती दि. 15फेब्रुवारी 2017 मतदानाच्या पूर्वीचा दिवस, दि. 16 फेब्रुवारी मतदानाचा दिवस मतदानाची प्रक्रीया संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अनुज्ञप्ती धारकाने वरील दिनांकास अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकाविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.

-*-*-*-*-

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेसंदर्भात बीडला कोषागाराची कार्यशाळा संपन्न



            बीड, दि. 13 :- राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या परिणामकारक अंमलबजवणीसाठी व राष्ट्रीय निवृत्ती वेतनधारकांच्या जागृती आणि सुविधेकरीता दिनांक 1 ते 15 फेब्रुवारी 2017 या कालावधीमध्ये बीड जिल्हा कोषागार कार्यालयात राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सेवा पंधरवाडा आयोजित करण्यात आलेला आहे. या सेवा पंधरवाड्यात आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष भेट देऊन आपल्या शंकांचे निरसन केले जात आहे.
या सेवा पंधरवाड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी  जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी डी.डी. माडे, अपर कोषागार अधिकारी सुरेश कंठक, उपकोषागार अधिकारी श्रीकांत कुलकर्णी विशेष उपस्थिती होती.
या कार्यशाळेमध्ये जिल्हा कोषागार कार्यालयातील सचिन इंगळे, अंकुश दवाडे आणि दीपक जाधव यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे राष्ट्रीय निवृत्तीवेन योजनेबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तर श्रीकांत कुलकर्णी यांनी वर्ग -4 कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी लेख्याचे सेवार्थ प्रणालीत संगणकीकरण तसेच कर्मचाऱ्यांचे लोन अँड ॲडव्हांसेस याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस जिल्हयातील आहरण व संवितरण अधिकारी, कर्मचारी  यांच्यासह कोषागार कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-


पाटोदा तालुक्यात निवडणूक तयारी मतदान व मतमोजणी केद्रात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



            बीड, दि. 13 :- बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तयारीचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या समवेत घेऊन मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्र परिसरात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश दिले.
            पाटोदा येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उस्मानाबादचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अजिंक्य पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मुकेश कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी, पथकांचे प्रमुख उपस्थित होते.
            पाटोदा तालुक्यात 3 गट आणि 6 गण असून यासाठी 103 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यापैकी 33 केंद्र संवेदनशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मतदान यंत्राच्या साहित्याची संपूर्ण तयारी झाली असून मतदान प्रक्रीया सुरळीत पार पाडण्यासाठी 565 कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. यासाठी 12 क्षेत्रीय अधिकारी 12 विभागावर संपर्क ठेवणार असून वेळोवेळी त्यांच्याकडून माहिती नियंत्रण केंद्राकडे येणारआहे. सर्व मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले असून सर्व मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त राहणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
            जिल्हाधिकारी राम यांनी संपूर्ण निवडणूक कामकाजाचा सविस्तर आढावा घेऊन मतदान केंद्राच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्याची तसेच व्हिडीओ चित्रीकरण व सीसीटीव्ही पथकाची नेमणुक करण्याची सूचना केली. मतदान सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षाविषयक बाबी तपासून पूर्ण कराव्यात. कोणत्याही परिस्थितीत अप्रिय घटना घडणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी. निवडणूकीची तयारी चांगली झाली असून आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी  सर्व निवडणूक यंत्रणांनी व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडाव्यात अशी सुचना करुन त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
            जिल्हाधिकारी राम व पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पाटोदा तालुक्यातील तांबाराजूरी या गावातील दोन आदर्श मतदान केंद्राला भेटी देवून पाहणी केली. तसेच त्यांनी संवेदनशील असलेल्या रोहतवाडी येथील दोन मतदान केंद्रांनाही भेटी देऊन तेथील मुलभूत सुविधांची पाहणी केली. मतदान केंद्र परिसरात करावयाच्या जादा पोलीस बंदोबस्ताविषयीही त्यांनी यावेळी चर्चा केली.

-*-*-*-

आष्टी तालुक्याची निवडणूक तयारी 222 मतदान केद्रांच्या ठिकाणी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवावा - जिल्हाधिकारी




            बीड, दि. 13 :- बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूकीची तयारी पूर्ण झाली असून तालुक्यातील संपुर्ण 222 मतदान केंद्रांच्या ठिकाणी प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवावा अशी सुचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
            आष्टी येथील तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी राम यांनी बैठक घेऊन निवडणूक कामाकाजाचा आढावा घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा  बीडचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) व्ही.पी. सोळंके, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित पाटील यांच्यासह सर्व क्षेत्रीय अधिकारी व विविध पथकांचे प्रमुख उपस्थित होते.
            आष्टी तालुक्यातील 7 गट आणि 14 गणांसाठी निवडणूक होत असून यासाठी 222 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. यापैकी 31 केंद्र संवेदनशील तर 11 केंद्र अतिसंवेदनशील आहेत. या मतदान केंद्राच्या ठिकाणी वाढीव पोलीस बंदोबस्त लावण्याबरोबरच तेथे सीसीटीव्ही आणि व्हिडीओ कॅमेरा पथक नेमण्यात येवून नियंत्रण ठेवावे अशी सुचना करुन जिल्हाधिकारी राम म्हणाले की, मतदान केंद्रावर साहित्यासह कर्मचारी पोहचण्यासाठी वाहतुक व वाहन व्यवस्था ठेवावी. त्यासाठी निश्चित असा आराखडा तयार करुन त्याप्रमाणे वेळेवर मतदान यंत्र व कर्मचारी पोहचतील याची व्यवस्था करावी. त्यासाठीचे वाहतूक मार्ग निश्चित करावेत. तालुक्यात 14 विभाग करण्यात आले असून त्यासाठी 222 मतदान कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली आहेत. त्यांना आतापर्यंत  प्रशिक्षण देण्यात आले आहे. आणखी एक प्रशिक्षण उद्या देण्यात येणार आहे. सर्व मतदान यंत्राची सिलिंगचे काम पूर्ण झाले असून मतदान पथक सज्ज झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
            जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी तहसील कार्यालयातील मतदान यंत्राच्या सुरक्षा कक्षाला  भेट देवून पाहणी केली. यावेळी मुर्शदपूर क्षेत्राच्या पंचायत समिती सभागृहातील मतदान केंद्राचीही पाहणी करण्यात आली.

-*-*-*-

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

गेवराई-शिरुर तालुक्याचा आढावा मतदान केंद्र व मतमोजणी केंद्र परिसर सीसीटिव्हीच्या नियंत्रणाखाली ठेवा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम





            बीड, दि. 12 :- बीड जिल्ह्यातील गेवराई व शिरुर कासार तालुक्यातील निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी आज आढावा घेतांना मतदान केंद्र आणि मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी सीसीटिव्ही व व्हिडीओ पथके नेमून नियंत्रण ठेवावे असे निर्देश दिले.
            गेवराई येथील नगरपरिषदेच्या इमारतीमध्ये स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूक तयारीचा सविस्तर आढावा घेतला. गेवराई तालुक्यातील जि.प.गट 9 आणि पं.स. गण 18 आहेत यासाठी 252 मतदान केंद्र संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले. अशा केंद्राच्या ठिकाणी अधिक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश देत जिल्हाधिकारी राम म्हणाले की, तालुक्यातील सर्व झोनल अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदान केंद्राची  पाहणी करुन त्या ठिकाणी सर्व मुलभूत सुविधा असल्याची खात्री करावी. नसल्यास त्या भौतिक सुविधा पूर्ण करुन घ्याव्यात. मतदान यंत्राचे सिलिंग मतदानानंतर यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठीच्या कक्षाची पाहणी करुन जिल्हाधिकारी राम यांनी मतमोजणी केंद्राच्या  सुरक्षिततेबाबत विशेष लक्ष देण्याच्या सुचना केल्या.  मतमोजणीसाठी अट्टल महाविद्यालयाच्या इमारतीची पाहणी करुन त्यांनी निवडणूक विषयक सुचना दिल्या. बैठकीनंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांनी गेवराई तालुक्यातील गढी, पाडळसिंगी आणि मादळमोही येथील मतदान केंद्रांना भेटी देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाउपनिबंधक मंगेश सुरवसे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आशिष बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार चाफेकर यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
शिरुर तालुक्याचा आढावा
            जिल्हाधिकारी राम आणि पोलीस अधिक्षक जी.श्रीधर यांनी गेवराई नंतर शिरुर कासार तालुक्यातील तिंतरवणी, मातोरी आणि वारणी येथील मतदान केंद्रांना भेटी देवून तेथील व्यवस्थेची पाहणी केली व अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या. त्यानंतर त्यांनी शिरुर कासार येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उस्मानाबाद जि.प.चे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) डॉ.आर.एच.चव्हाण आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आबासाहेब चौरे यांच्यासह सर्व झोनल अधिकाऱ्यांच्याकडून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.
            शिरुर तालुक्यातील 4 गट व 8 गणासाठी निवडणूक होत असून यासाठी 121 मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी 36 केंद्र संवेदनशील आहेत. या सर्व ठिकाणी वाढीव बंदोबस्त आणि व्हिडीओ व सीसीटिव्हीची व्यवस्था ठेवून नियंत्रण करावे. झोनल अधिकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्राना सतत भेटी देवून मतदानाची व प्रक्रीयेविषयीची माहिती तात्काळ देण्याची गरज आहे त्यादृष्टीने नेटवर्क उपलब्ध असलेल्या मोबाईल कंपनीचे सिमकार्ड उपलब्ध करावेत अशी सुचना करुन जिल्हाधिकारी राम म्हणाले की, प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी सर्व सुविधा असल्या पाहिजेत. विशेषत: दिव्यांगासाठी मतदानाला सहकार्य होईल यासाठी रॅम्पची व्यवस्था ठेवावी. विद्युत व पाणी व्यवस्था असली पाहिजे. वाहने व मनुष्यबळाची व्यवस्था चोख ठेवावी असे सांगून त्यांनी यावेळी सुरक्षा बंदोबस्ताचाही आढावा घेतला.

            यावेळी मतदान यंत्राच्या पूर्व तयारीच्या कामकाजाची त्यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यंत्राच्या सिलिंगचे काम सुरु असून त्यांनी मतदान यंत्राच्या सुरक्षा कक्षाचीही पाहणी करुन सुचना दिल्या. यावेळी निवडणूकीशी संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

वडवणी तालुक्याचा घेतला आढावा मतदान आणि मतमोजणीसाठी कडक बंदोबस्त ठेवावा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



            बीड, दि. 10 :- वडवणी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी मतदान केंद्राच्या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले.
            वडवणी येथील तहसील कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी तथा उस्मानाबादच्या उपजिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सतिष थेटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            वडवणी तालुक्यातील  2 गट आणि 4 गणासाठी निवडणूक होत असून यासाठी स्थापन करण्यात आलेल्या 79 मतदान केंद्रांच्या ठिकाणी मुलभूत सुविधेची संयुक्त पथकाने पाहणी केली आहे. तेथील त्रुटी दूर करण्यासाठी सर्व संबंधित गट विकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांना सूचना  करुन जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूकीच्या पूर्वतयारीचा संपूर्ण आढावा घेतला.
            मतदान व मतमोजणी केंद्राच्या व्यवस्थेचा आढावा घेताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, तहसील कार्यालय परिसरातील मतमोजणी केंद्राला पाऊस आल्यामुळे अडचण निर्माण झाल्यास यासाठी लागणारी पर्यायी जागा निश्चित करुन ठेवण्यात यावी. स्ट्राँगरुमची व्यवस्था चोख ठेवावी. संपूर्ण तहसील परिसर टिव्ही व व्हिडीओ पथकाच्या नियंत्रणाखाली ठेऊन बंदोबस्त करावा. मतदान यंत्र व त्यांच्या सुव्यवस्थेबाबत आढावा घेऊन ते म्हणाले की, पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक वाहनांचा पुरवठा करावा. त्यांना दुर्गम भागातील संपर्कासाठी मतदानाच्या दिवशी वायरलेस सेट आणि भ्रमणध्वनी व्यवस्था करण्यात यावी. यासाठी झोनल अधिकाऱ्यांनाही वेळेत संपर्क साधण्यासाठी प्रभावी व्यवस्था करण्यात यावी असेही ते म्हणाले.
            पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पोलीस विभागाच्या कार्यवाहीबाबत आढावा घेऊन तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

            या बैठकीस निवडणूकीशी संबंधित अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.