गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक संपन्न

कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने मृत पालकांची बालके मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा बीड, दि, 29 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने पालक गमावलेल्या बालकांना त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी, या दृष्टीकोनातून मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यामुळे ती बालके शिक्षणाने सक्षम होवून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास भरीव मदत होईल. तरी जिल्ह्यातील कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने मृत पालकांची बालके शासनाच्या अर्थसहाय्याच्या मदतीपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय कृती दलाच्या (टास्क फोर्स) बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एन. गोडबोले, सहा.पोलिस निरीक्षक सुरेखा धस, बाल कल्याण समितीचे संतोष वारे, चाईल्ड लाईनचे अतुल कुलकर्णी व रामहरी जाधव, परिविक्षाधिन अधिकारी मंगेश जाधव, संरक्षण अधिकारी ए. एच. कदम यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, राज्य शासनाकडून कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने पालक गमावलेल्या बालकांना जे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे, त्यामध्ये एक पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी 5 हजार रुपये तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 10 हजार रुपये मंजूर करुन लाभ देण्यात यावा. यासंदर्भात अद्यापही अर्ज सादर न केलेल्या बालकांनी अर्ज सादर करण्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. जिल्ह्यातील बालकांसाठी काळजी व संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) समिती गठीत करण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहत असतात. बीड जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यातील कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे एक पालक आणि दोन पालक गमावलेल्या बालकांचे एकूण 425 अर्ज प्राप्त झाले आहेत. हे अर्ज जिल्ह्यातील तालुका संरक्षण अधिकारी यांच्याकडून छाननी करुन गुगल फॉर्मवर अद्ययावत करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी यावेळी दिली. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा