शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

एमपीएससी परीक्षा केंद्र परिसरात 8 ऑक्टोबरला कलम 144 लागू

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त गट - ब ( पूर्व ) परीक्षा - २०२२ शनिवार, दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकूण (२१) उपकेंद्रांमधून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ६ हजार ६९२ उमेदवार बसलेले असून परीक्षा कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दिली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार या परीक्षार्थींना त्यांच्याकडील मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रीक वस्तु व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही. परीक्षेच्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत: चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हींग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतीही दोन ओळखपत्रे व त्यांची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षा उपकेंद्रावर सकाळी ८.३० वाजेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबी खाली प्रवेश देण्यात येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा