मंगळवार, २३ जुलै, २०१९


पाऊसमान कमी असल्याने
कृषी विद्यापीठाच्या शिफारशीप्रमाणे पीके घ्यावीत

बीड,दि, 23:- (जिमाका) सद्याचे पाऊसमान व पिक परिस्थितीबाबत जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला.  कृषी आयुक्त सुहास दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन पिक नियोजनाबाबत, कृषि संचालक, (विस्तार प्रशिक्षण) कृषि आयुक्तालय, पुणे येथे बैठक घेण्यात आली .
बैठकीमध्ये वरीष्ठ शास्त्रज्ञ के.व्ही.राव, डॉ. के. गोपीनाथ, प्रमुख शास्त्रज्ञ आयसीएआर हैद्राबाद, राज्यातील कृषि विद्यापिठांचे शास्त्रज्ञ डॉ.जाधव, डॉ.आसेवार, कृषि संचालक श्री विजय घावटे, कृषि संचालक (प्रक्रिया व नियोजन), श्री.अनिल बनसोडे, संचालक (आत्मा), विभागीय कृषि सह संचालक व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी हे उपस्थित होते. 
         दि.31 जुलै पर्यंत पेरणी करावयाची असल्यास संकरीत बाजरी, सुर्यफुल, सोयाबीन अधिक तुर, बाजरी अधिक तुर, एरंडी अधिक धने (मिश्रपिक) यासारखी पिके कृषि विद्यापिठांच्या शिफारशीप्रमाणे घेण्यात यावीत. दि.1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान एरंडी, तीळ, संकरीत बाजरी, रागी, सुर्यफुल, एरंडी अधिक धने (मिश्रपिक) ही पिके घ्यावीत.  दि.16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान पेरणी करावयाची असल्यास संकरीत बाजरी, सुर्यफुल, तुर एरंडी अधिक धने (मिश्रपिक), अशी पिके घेण्यात यावीत. तसेच यापुढील कालावधीत कापूस, ज्वारी, भुईमुग या पिकाची पेरणी करु  नये, असे  कृषि आयुक्तालय पुणे यांच्याकडून आलेल्या प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.
                                                               ********
वृत्त क्र. 340
तहसील कार्यालयात डी.बी.ए मार्फत
7/12 ची सुविधा उपलब्‍ध
बीड,दि,(जिमाका) पीक विमा भरण्यासाठी खातेदारांना 7/12 ची गरज भासत असल्याने तसेच शेतक-यांची वाढती मागणी लक्षात घेता जमावबंदी कार्यालय पुणे यांच्याकडून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार तथा डीबीए यांच्या लॉगीनमधून सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
 नायब तहसीलदार महसुल यांना त्यांची डीएससी वापरुन 7/12 खाते उतारा व फेरफार नोंदवहीच्या नकला प्रती नक्कल 15 पैसे रोख भरुन घेऊन नकला वितरीत करता येतील. सर्व शेतक-यांनी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार (महसुल) तथा डीबीए यांच्या लॉगीनमधून वरीलप्रमाणे शुल्क भरणा करुन 7/12 उतारा व फेरफार नोंदवहीच्या नकला घेऊ शकता असे आवाहन, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
                                                       *********

शुक्रवार, ५ जुलै, २०१९


                                           विशेष घटक व बीज भांडवल योजनेसाठी
                                         लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना

   बीड,दि,5:- (जिमाका)संत रोहीदास चर्मोद्योग व सर्मकार विकास महामंडळ मर्या जिल्हा कार्यालय बीड या कार्यालच्या वतीने  बॅकेमार्फत आर्थिक वर्ष 2019-20 साठी विशेष घटक योजना उदिष्टे 20 आणि बीज भांडवल योजना उदिष्टे 11 साठी लाभार्थ्यांनी कर्जाचे प्रस्ताव सादर करावेत.अटी व शर्थी पुढीलप्रमाणे आहेत.
 महामंडळाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील (चांभार,मोची,ढोर व होलार) असावा. त्याने यापूर्वी महामंडळाच्या व इतर कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. लाभ घेऊ इच्छिणा-या लाभार्थ्याने आवश्यकतेनुसार कागदाची पूर्ण पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव प्रत्येकी तीन प्रतीमध्ये टंकलिखीत किंवा छापील स्वरुपात स्वत: अर्जदाराने मूळ कागदपत्रासह दि. 10 जुलै 2019 पासून ते 31 जुलै 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 10.30 ते 5.30 पर्यंत जिल्हा कार्यालय,संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर,सामाजिक न्याय भवन,तळमजला,नगर रोड, बीड येथे सादर करावेत.
  विशेष घटक व बीजभांडवल योजनेसाठी यापूर्वी दाखल केलेले जुने कर्ज प्रस्ताव रद्द समजण्यात येतील याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्र. 02442-223567 यावर संपर्क साधावा, असे संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापक यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.                                     
                                                                *******
वृत्त क्र. 291
जात पडताळणी वैधता प्रमाणपत्राच्या त्रुटीची
पूर्तता करणे व प्रमाणपत्रे प्राप्त करुन घेण्याच्या सूचना

                बीड,दि,5:- (जिमाका)  जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या समितीकडे सन 20118- 19 या वर्षातील शैक्षणिक कारणासाठी जात पडताळणी वैधता प्रमाणपत्र  सर्व विद्यार्थ्याना प्राप्त करुन घेण्यासाठी मॅसेजव्दारे कळविण्यात आले आहे. छाननीमध्ये अपूर्ण कागदपत्रे असलेल्या प्रकरणात समितीने त्रुटी नोंदविल्या असून काही प्रकरणे त्रुटी पुर्ततेअभावी प्रलंबित आहेत. कांही प्रकरणे त्रुटीपुर्ततेसाठी अर्जदाराच्या घरच्या पत्यावर पोस्टाव्दारे परत करण्यात आलेली असून सर्व संबधितांनी त्रुटीची पूर्तता करण्याबाबत मॅसेजव्दारे कळविण्यात आले आहे.
              व्यवसायिक अभ्यासक्रमाकरिता राखीव प्रवर्गातून आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी उमेदवारास अर्ज करतेवेळी जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थी राखीव प्रवर्गात नोंदणी करु शकणार नाही. ज्या विद्यार्थ्यानी अर्ज करुन देखील अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळालेले नाही त्यांनी तात्काळ जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीड येथे संपर्क साधून अर्जाची सद्यास्थिती जाणून घ्यावी व त्रुटीची पूर्तता करावी. तसेच पडताळणी झालेले जात वैधता प्रमाणपत्रे प्राप्त करुन घ्यावीत,अशा सूचना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपआयुक्त तथा सदस्या यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केल्या आहेत.
                                               ***********