गुरुवार, २० ऑक्टोबर, २०२२

नागरिकांना दर्जेदार मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

बीड शहरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम टप्पा क्र. 2 च्या 12 रस्ते कामांचा शुभारंभ बीड, दि. 20, (जि. मा. का.) : नागरिकांना दर्जेदार मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी कटिबद्ध असून, बीडचा कायापालट करण्यासाठी जी काही विकासकामे करता येतील ती तातडीने करण्यात येतील. शहरी विकास योजनांसाठी राज्य शासनाने पाठविलेल्या १२ हजार ९०० कोटींच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून नगरोत्थान योजनेंतर्गत बीडच्या विकासकामांसाठी भविष्यात निधीची कमतरता जाणवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम टप्पा दोनचा शुभारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमात मुंबईतून ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मंत्रालयातून मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, आमदार सुरेश धस, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते. तर यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथील कार्यक्रमस्थळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, बीड नगरपरिषद प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी बीड नामदेव टिळेकर, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. दीपा क्षीरसागर आदि उपस्थित होते. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत बीड शहरातील सिमेंट रस्ता व नाली बांधकाम टप्पा क्र. 2 अंतर्गत 15 प्रस्तावित रस्ते कामांसाठी 91.94 कोटी रुपये रक्कम प्रस्तावित करण्यात आली होती. पैकी 12 रस्ते कामांना नगर विकास विभाग, मुंबई यांच्याकडून प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासाठी रक्कम रुपये 69.85 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर कामांचा कार्यारंभ आदेश दि. 6 सप्टेंबर 2022 देण्यात आला असून मान्यवरांच्या हस्ते आज कामांचा शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, बीडसह एकंदरीतच संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी भरीव निधी राज्य शासनाकडून देण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान, अटल अमृत योजनांसाठी केंद्र शासनाकडून भरघोस निधी मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी १२ हजार ९०० कोटी रुपयांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. त्यातून शहरे, महानगरांच्या मुलभूत सोयी-सुविधांची कामे करण्यात येणार आहेत. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्यासाठी सिंचन प्रकल्पांना मान्यता देण्यात येत आहे. त्याचबरोबर पश्चिम वाहिन्यांमधील वाहून जाणारे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकास कामांसाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीचा प्रशासनाने सदुपयोग करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विकास कामांमुळे बीडचा कायापालट होणार- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, बीड शहरातील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियान योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील १६ रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर टप्पा २ अंतर्गत मंजूर कामांचा शुभारंभ आज झाला आहे. या सगळ्या विकास कामांमुळे बीड शहराचा कायापालट होणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या योजना व घरकुल योजना यामुळे शहराला आधुनिकता प्राप्त होईल. केंद्र शासनाकडून महाराष्ट्राला स्वच्छ भारत अभियान दुसरा टप्पा आणि अटल अमृत मिशन टप्पा दोन मध्ये भरघोस निधी दिला जात आहे. येत्या काळात राज्यात पिण्याचे पाणी, कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने वर्गीकरण व व्यवस्थापन महाराष्ट्रातील सर्वच शहरात होणार आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे साडेचार हजार कोटी रुपयांचे शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात दिले गेले आणि त्याचे वितरणही पूर्ण झाले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात बीड शहराचा झपाट्याने विस्तार होत असून नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील विविध विकासकामांसह बीड शहरात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करुन त्याचे काम लवकरात लवकर सुरु व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमास माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, नगरपालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. टप्पा क्र. 2 अंतर्गत नियोजित कामांमधील मुख्य रस्त्याचे नाव, रक्कम रू. अनुक्रमे पुढीलप्रमाणे – 1) अंबिका चौक ते अर्जुन नगर सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे 5.51 कोटी 2) राजीव गांधी चौक ते व्यंकटेश स्कूल (करपरा नदी पूल) सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे 7.31 कोटी 3) राधाकिसन नगर ते सरस्वती शाळा ते खोलवाट सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे. 4.72 कोटी 4) बार्शी रोड ते दीप हॉस्पिटल ते रिपोर्टर भवन 2.80 कोटी 5) कासट यांचे घर ते शहर पोलीस स्टेशन ते अश्विनी दवाखाना 3.90 कोटी 6) मसरत नगर ते नेत्रधाम ते सावरकर चौक सी. सी. रस्ता व ड्रेन काम करणे 5.41 कोटी 7) शीतल वस्त्र भंडार मोंढा रोड परिसरातील दोन्ही बाजूंचे रस्ते 4.63 कोटी 8) पेठ बीड पोलीस स्टेशन ईदगाह ते नाळवंडी सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे 4.05 कोटी 9) नाळवंडी नाका ते पाण्याची टाकी सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे 2.92 कोटी 10) बालाजी मंदिर ते काळा हनुमान ठाणा सी. सी. रस्ता व ड्रेन बांधकाम करणे 2.41 कोटी 11) बार्शी रोड मुक्ता लॉन्स ते तकिया मस्जिद ते फ्रुट मार्केट ते खासबाग देवी रोड नाला 7.40 कोटी 12) अंकुश नगर ते पाण्याची टाकी सी. सी. रस्ता व ड्रेन करणे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा