शनिवार, २८ ऑक्टोबर, २०१७

जिल्ह्यातील विविध ‍विकास कामांना गती देवून कामे वेळेत पुर्ण करावी - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे


जिल्ह्यातील विविध ‍विकास कामांना
गती देवून कामे वेळेत पुर्ण करावी
                   - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे

बीड दि.28:- जिल्ह्यातील विविध विकास कामांना गती देवून लवकरात लवकर कामे वेळेत पूर्ण करावीत अशी सुचना ग्राम‍विकास, महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केली.
          पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात आयोजित विविध विभागांच्या आढावा बैठकीत उपस्थित संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
          पुढे बोलतांना श्रीमती मुंडे म्हणाल्या की, अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींचा सहभाग घेवून प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करुन जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल होऊन जिल्ह्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर  पोहचेल यासाठी विशेष प्रयत्न करावेत आणि आपला बीड जिल्हा प्रगतीपथावर घेवून जाण्यासाठी प्रलंबित कामे तातडीने पुर्ण करावीत अशा सुचनाही त्यांनी यावेळी केली.
          यावेळी   जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, रि-एडिट कामाचा अहवाल, एडिट मोड्युल अंतर्गत कामाचा आढावा, शेतकरी आत्महत्याविषयीची माहिती, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण, पाटबंधारे प्रकल्पातील पिण्याचे पाणी, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ नवीन रेल्वेमार्ग भूसंपादन व प्राप्त निधीबाबत माहिती आदिबाबत संगणकीय सादरीकरणादवारे माहिती दिली.
          जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, खाण व खनिकर्म विभाग, जिल्हा नियोजन, महावितरण, ग्रामीण जीवनोन्नती अभियान, झिरो पेंडन्सी अॅण्ड डेली डिस्पोजल आदिचा आढावा संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांकडून पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी घेतला.
          या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी तसेच जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार व संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
-*-*-*-*-




गुरुवार, २६ ऑक्टोबर, २०१७

शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे



शासनाच्या विविध विकासात्मक योजनांची
जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी
                   - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे
पालकमंत्र्याच्या हस्ते वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ

बीड, दि. 26 :- जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाच्या विविध योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. त्याच बरोबर प्रत्येक गावाचा विकास झाला पाहिजे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकासाचा आराखडा तयार करण्यात येणार असून त्या ग्रामपंचायतींना भरपूर निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या अठराव्या गळीत हंगामाचे शुभारंभ पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार विनायक मेटे होते तर आमदार आर.टी.देशमुख, आमदार लक्ष्मण  पवार, आमदार संगिता ठोंबरे, जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, कारखाण्याच्या संचालक यशश्री मुंडे, कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, माजी आमदार केशवराव आंधळे, जि.प.सभापती युध्दजित पंडित, संतोष हंगे, फुलचंद कराड, रमेश आडसकर, रमेश पोकळे, यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्याच्या विकासासाठी विविध विकासाच्या योजना राबविण्यात येत असून येणाऱ्या काळात गावाचा विकास व्हावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्यात येणार असून त्या सर्व ग्रामपंचायतींना भरपूर निधी देण्यात येणार आहे. नव्याने निवडूण आलेल्या सर्व सरपंच व सदस्यांनी या निधीचा चांगला उपयोग करुन घेतला  पाहीजे व आपल्या गावाचा विकास केला पाहिजे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा बदल आला असून या कारखान्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना नेहमी प्रत्येक गोष्टीत अग्रेसर राहिला आहे. या कारखान्याने मागील काळात विक्रमी गाळप करुन उच्चांक गाठला होता. तसेच जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यापेक्षा शेतकऱ्यांच्या ऊसाला जादा भाव दिला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी समाधानी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी यावर्षी गाळपाचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यात यावर्षी चांगला पाऊस झाला असून पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. त्यामुळे कारखाना पुढील वर्षी चालू राहण्यास मदत होणार असल्याचे सांगून जिल्ह्यातून 8 राष्ट्रीय महामार्ग जात असून त्याची कामे प्रगती पथावर आहेत. परळी मतदार संघात शंभर कि.मी.चे रस्ते मंजूर झाले असून येणाऱ्या काळात रस्त्याचे कामे एकही शिल्लक राहणार नाहीत. तसेच विविध विकास कामाच्या माध्यमातून परळी मतदार संघासह जिल्ह्याचे नाव लौकीक वाढविण्यासाठी योगदान देणार आहे असेही पालकमंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात आमदार विनायक मेटे म्हणाले की, जिल्ह्यात सहकार चळवळ निर्माण करण्याचे काम स्व.गोपिनाथराव मुंडे यांनी केले आहे त्यांच्याच प्रयत्नातून पांगरी येथील साखर कारखान्याची उभारणी पूर्ण झाली आहे. या कारखान्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना चांगली मदत झाली आहे असे सांगून या कारखान्याने यावर्षीचे गाळपाचे उदिष्ट पूर्ण करणार असेही त्यांनी यावेळी सां‍गितले.
यावेळी आमदार संगिता ठोंबरे, आ.लक्ष्मण पवार, आ.आर.टी.देशमुख, कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, फुलचंद कराड, माजी आमदार केशवराव आंधळे, गणेश हके, रमेश पोकळे, रमेश आडसकर यांचीही समयोचित भाषणे झाली.
प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे व इतर मान्यवरांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अठराव्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव यांनी केले.
या कार्यक्रमास जिवराज ढाकणे, शिवाजीराव गुट्टे, राजाभाऊ मुंडे, श्रीहरी मुंडे, आदित्य सारडा, जुगलकिशोर लोहिया यांच्यासह पदाधिकारी, कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-*-*-*-*-


जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचे आवाहन शेतकऱ्यांनी हवामानावर आधारीत फळपिक विमा योजनेचा लाभ घ्यावा



बीड, दि. 26 :- प्रधानमंत्री फसल बीमा योजनेअंतर्गत राज्यात पुर्नरचित हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना आंबिया बहार 2017-18 बजाज अलायन्झ जनरल इन्शुरंस कंपनीमार्फत बीड जिल्ह्यात डाळींब, मोसंबी, पेरु, केळी, संत्रा, आंबा व लिंबु या फळपिकाकरीता राबविण्यात येत आहे. तरी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.
डाळींब, मोसंबी, पेरु व केळी या फळपिकांचा विमा हप्ता उरतविण्याची अंतिम तारीख दि.31 ऑक्टोबर 2017 आहे. लिंबु फळपिकासाठी दि.14 नोव्हेंबर 2017, संत्रा फळपिकासाठी दि.30 नोव्हेंबर तर आंबा फळपिकासाठी दि.31 डिसेंबर 2017 ही अंतिम तारीख आहे.
कमी अथवा जास्त  पाऊस, वारा, तापमान, अवेळी पाऊस, सापेक्ष आर्द्रता व गारपीट या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य देणे. फळपिक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधीत राखणे ही योजनेची वैशिष्टे आहेत. ही योजना बजाज अलायन्झ जनरल इन्सुरंन्स कंपनीमार्फत बीड जिल्ह्यात डाळींब, मोसंबी, पेरु, केळी, संत्रा, आंबा व लिंबु या फळपिकाकरीता राबविण्यात येत आहे. वित्तीय संस्थाकडे पिक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्याची अधिसुचित फळपिकासाठी पिक कर्ज मर्यादा मंजूर आहे अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना ऐच्छिक राहील. या योजनेत विमा संरक्षीत रक्कम व शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम फळपिक निहाय राहील. या योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बँकेशिवाय कॉमन सर्विस सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रामार्फतही विमा अर्ज व विमा हप्ता भरण्याची सुविधा दिलेली आहे. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आधार कार्ड किंवा आधार नोंदणी पावती अनिवार्य केली आहे. सर्व बँकांनी फळपिक विमा भरण्याकरीता आलेल्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता भरुन घ्यावा. अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-


विद्यार्थ्यांची निर्वाह भत्याची रक्कम
वैयक्तीक बॅंक खात्यामध्ये जमा

बीड, दि. 26 :- सन 2016-17 मधील भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क योजनेचे विजाभज प्रवर्गाचे 15 हजार 760 विद्यार्थ्यांचे अर्ज समाज कल्याण कार्यालयामार्फत निकाली काढण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची निर्वाह भत्याची रक्कम त्यांच्या वैयक्तीक बँक खात्यामध्ये ऑनलाईन जमा करण्यात आली आहे. तसेच इमाव प्रवर्गाच्या 2  हजार 275 विद्यार्थ्यांचे देयक काढण्यात आले असून देयके कोषागार कार्यालयात सादर करण्याची कार्यवाही सुरु असून पुढील 15 दिवसात इमाव प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्याची रक्कम त्यांच्या वैयक्तीक बँक खात्यामध्ये ऑनलाईन जमा करण्यात येईल. असे बीड समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-


सैनिकी शाळा सातारा प्रवेश परीक्षा; उमेदवारांनी अर्ज सादर करावेत



बीड, दि. 26 :- सैनिकी शाळा सातारा येथे इयत्ता 6 वी व 9 वी साठी वर्ष 2018-2019 सत्राच्या प्रवेश परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.
प्रवेश अर्ज शाळेच्या www.sainiksatara.org संकेतस्थळावर आणि सैनिक स्कुल सातारा येथे दि.30 नोव्हेंबर 2017 पर्यंत कार्यालयीन दिवसामध्ये उपलब्ध आहेत. प्रवेश अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख दि.5 डिसेंबर 2017 असून पोस्टाने किंवा स्वत: शाळेच्या कार्यालयात अर्ज जमा करता येतील. अधिक माहितीसाठी शाळेच्या 02162-235860, 238122 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. असे प्राचार्य, सैनिक स्कुल, सातारा यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

बुधवार, २५ ऑक्टोबर, २०१७

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे
यांचा सुधारीत बीड जिल्हा दौरा कार्यक्रम

          बीड, दि. 25 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          शनिवार दि.28 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता बांधकाम विभाग, एमएसआरएलएम, रेल्वे संदर्भात विविध शासकीय बैठकांना उपस्थिती (स्थळ-चेमरी विश्रामगृह, औष्णिक विज केंद्र, परळी). दुपारी 1 वाजता वाहनाने परळी निवासस्थानी प्रयाण. दुपारी 1.20 वाजता आगमन व परळी निवासस्थानी मुक्काम.
          रविवार दि.29 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10.30 वाहनाने बीडकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन व राखीव. दुपारी 12.15 वाजता वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.
-*-*-*-*-


अन्न व्यावसायिकांकडे नोंदणी, परवाना असणे बंधनकारक



बीड, दि. 25 :- महाराष्ट्र राज्यात दि.5 ऑगस्ट 2011 पासून लागू झालेल्या अन्न सुरक्षा व मानदे अधिनियमांतर्गत नोंदणी किंवा परवाना घेऊनच अन्न व्यावसायिकांनी व्यवसाय करणे बंधनकारक आहे. विना नोंदणी किंवा विना परवाना व्यवसाय करताना आढळून आल्यास संबंधिताविरुध्द नियमानूसार कारवाई करण्यात येईल.
अन्न सुरक्षा  प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या www.fssai.gov.in संकेतस्थळावर जाऊन नोंदणी किंवा परवान्यासाठी अर्ज करता येतो. विहित परवाना किंवा नोंदणी शुल्क भरलेले अर्ज प्रशासनास प्राप्त होताच ते तात्काळ मंजूर करुन डाक नोंद पोच देय माध्यमाने संबंधितांस पाठविले जातात. अन्न व औषध प्रशासनाच्या बीड कार्यालयामार्फत देण्यात येणाऱ्या नोंदणी किंवा परवान्यासाठी कायद्यात नमूद केलेल्या विहीत शुल्कापेक्षा जास्तीचे शुल्क आकारले जात नाही. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र.02442-229236, 222336, 222436 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे बीड अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

अंबाजोगाई येथे स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात स्पाईन सर्जरी शिबीराचे आयोजन



बीड, दि. 25 :- स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई येथील प्रसिध्द स्पाईन सर्जरी डॉ.शेखर भोजराज व वैद्यकीय महाविद्यालयाच्या अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने 5 व स्पाईन सर्जरी शिबीर शनिवार दि.28 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 9 ते दूपारी 1 या वेळेत ओपीडी क्र.4 मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या शिबीरात मणक्याचा आजार असणाऱ्या रुग्णांची तपासणी व उपचार हे मोफत करण्यात येणार आहेत. गरजुनी संपर्क लाभ घ्यावा. असे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा शुभारंभ कर्जमाफीपात्र शेतकरी कुटुंबांना मान्यवरांच्या प्रमाणपत्राचे वाटप



          बीड दि. 18:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा जिल्हाधिकारी कार्यालयात शुभारंभ व  कर्जमाफीस पात्र असलेल्या शेतकरी कुटुंबाना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार भिमराव धोंडे, आमदार आर.टी. देशमुख, आमदार संगिता ठोबरे, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह,यांच्यास इतर मान्यवरांच्या हस्ते जिल्हयातील पंधरा पात्र शेतकरी कुटुंबांना प्रातिनिधीक स्वरुपात कर्जमाफी प्रमाणपत्र व भेटवस्तू देवून  सत्कार करण्यात आला.
            या कार्यक्रमास बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, औरंगाबाद विभागाचे सहनिबंधक जी.पी. परतूरकर, जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण, बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विकास देशमुख यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 अंतर्गत जिल्हयातील एकूण 2 लाख 93 हजार 76 कर्जमाफीस शेतकरी कुटुंब पात्र असून त्यापैकी राष्ट्रीयकृत बँकेचे 1 लाख 76 हजार 622 तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 1 लाख 16 हजार 454 शेतकरी कुटुंब आहेत.
            यावेळी जिल्हयाती  पात्र शेतकरी सुर्यभान भाऊराव नरवडे, सौ. लताबाई दिलीप शिनगारे, राजाभाऊ गिन्यानदेव जाधव, सौ. रुक्मिण राजाभाऊ गवारे, बालासाहेब हरिभाऊ सोळंके, आंशीराम निवृत्ती अबुज, विष्णु पांडुरंग यादव, ज्ञानोबा एकोबा हिरापल्ली, श्रीमती शांताबाई नरहरी पवळ, महेबुबखाँ दाऊदखाँ पठाण, नवनाथ विलास आघाव, भास्कर यादव जायभय, शरद अनुरथ चव्हाण, श्री शंभु जनार्धन शेळके या शेतकरी कुटुंबाचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपनिबंधक शिवाजी बडे यांनी केले तर आभार अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्हयातील पात्र शेतकरी, संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-

प्रवाशांच्या सोयीसाठी जिल्हयातील खाजगी बसेस व वाहने अधिग्रहित करण्याचे आदेश


          बीड दि.18:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या बेमुदत संपामुळे प्रवाशी मार्गावर मानव निर्मित आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने प्रवाशांना अपेक्षित ठिकाणी वेळेत व सुरक्षित प्रवास करण्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदी अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त झालेल्या अधिकारानुसार प्रवाशी वाहतुकीमधील मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी व सक्षम प्रतिसादासाठी वरील अधिनियमातील कलम 65 (सी) नुसार पुढील अटी व शर्तीवर खाजगी बसेस व वाहने अधिग्रहीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम.डी. सिंह यांनी दिले आहेत.
            या आदेशप्रमाणे संबंधित तहसिलदार प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड, अंबाजोगाई व विभाग नियंत्रक महराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, बीड यांना वाहतूक व्यवस्था करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जिल्हयातील सर्व बस स्थानकांमधून प्रवाशी वाहतुकीसाठी खाजगी वाहनधारकांना संप मिटेपर्यंत प्रवाशी वाहतुक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

            राज्य परिवहन महामंडळाच्या दरानुसार प्रवाशांकडून दर आकारणी करण्याचे खाजगी बसधारकांना परवानगी देण्यात आली आहे.  महामंडळाच्या निश्चित दरांपेक्षा अतिरिक्त शुल्क आकारण्यास मनाई करण्यात आली असून वाहन चालकाचे मानधन, इंधन व इतर खर्च खाजगी वाहनधारकाने स्वत: करावयाचे आहे.  शासनाकडून कोणतेही अनुदान, निधी उपलब्ध करुन देण्यात येणार नाही.  खाजगी वाहनधारकांनी  प्रवाशाच्या सुरक्षेसाठी नियम पाळणे बंधनकारक राहील. अधिग्रहीत खाजगी वाहनावर दगडफेक करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करणा-या व्यक्ती विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 56 अन्वये कारवाई करण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड, अंबाजोगाई व विभाग नियंत्रक राज्य परिवहन महामंडळ, बीड यांना देण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक , बीड यांनी राज्य  परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांवर आवश्यक तो पोलीस बंदोबस्त पुरविण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. डी. सिंह यांनी  दिले आहेत.                                 -*-*-*-*-

सोमवार, १६ ऑक्टोबर, २०१७

जवाहर नवोदय विद्यालयाची प्रवेश परीक्षा जाहीर



          बीड दि.16:- भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे चालवण्यात येणाऱ्या निवासासह शिक्षणाची मोफत सोय असणाऱ्या जवाहर नवोदय गढी येथे इयत्ता सहावी वर्गात प्रवेशाकरिता दि.10 फेब्रुवारी 2018 रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.
          परीक्षेसाठी विद्यार्थी, विद्यार्थींनी बीड जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत सत्र 2017-18 मध्ये इयत्ता पाचवी वर्गात शिकत असला पाहिजे, उमेदवार हा इयत्ता तिसरी, चौथी पूर्ण शैक्षणिक सत्र सलगपणे सरकार मान्य शाळेतूनच उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवाराचा जन्म 1 मे 2005 ते 30 एप्रिल 2009 या कालावधीत झालेला असावा. उमेदवारांचा ग्रामीण भागासाठी आरक्षित 75 टक्के जागांकरिता पात्र  उमेदवार हा इयत्ता तिसरी, चौथी व पाचवी सलगपणे फक्त ग्रामीण विभागातील सरकारमान्य शाळेतूनच शिकलेला असावा. एक दिवस जरी तो शहरी विभागातील शाळेत अध्ययन केलेला असल्यास त्यास शहरी समजण्यात येईल. प्रवेश अर्ज सेतू केंद्रातून दि.25 नोव्हेंबर 2017 पुर्वी भरण्यात यावेत. अधिक माहितीसाठी www.nvshq.org] www.jnvbeed.org या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा 02447-259607, 259491 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, गढी ता.गेवराई जि.बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

त्रैमासिक विवरणपत्रे ऑनलाईन भरुन सादर करण्याबाबत आवाहन




बीड, दि. 16:- बीड जिल्ह्यातील सर्व केंद्र शासन, राज्य शासन, निमशासकीय कार्यालये, शासकीय अंगीकृत उपक्रम, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व खाजगी आस्थापनांनी माहे सप्टेंबर 2017 अखेरचे त्रैमासिक विवरणपत्र ई.आर-1 दि. 31 ऑक्टोबर 2017 पुर्वी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन भरुन रिसिप्टची प्रिंट जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र जायकवाडी वसाहत, जुने विश्रामगृह,नगर रोड, बीड येथे सादर करावी. तसेच ज्या खाजगी आस्थापनांनी त्यांचे माहे सप्टेबर-2017 अखेरचे त्रैमासीक विवरणपत्र ई.आर.1 भरलेले नाही. अशा आस्थापनांनी त्यांचे दि.31 ऑक्टोबर 2017 पर्यंत विवरणपत्र ईआर-1 भरुन विवरणाची प्रिंट कार्यालयास सादर करावी. विवरणपत्र भरुन प्रिट सादर न करणाऱ्या आस्थापना विरुध्द अधिनियम 1959 नियम कलम 1960 व कलम 6 अन्वये दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. असे सहायक संचालक, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-


रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन


          बीड दि.15:- जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी नायब तहसिलदार श्री.नवगिरे, सय्यद कलिम यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

-*-*-*-*-

शुक्रवार, १३ ऑक्टोबर, २०१७

प्रशासनाला पदाधिकाऱ्यांचा सहभाग मिळाल्यास निश्चितच विकासाच्या कामाला गती मिळेल - विभागीय आयुक्त डॉ.भापकर



          बीड दि.12:- जिल्ह्याच्या विकासाच्या कामांना गती देण्यासाठी प्रशासनाला पदाधिकाऱ्यांचा सहभाग मिळाल्यास निश्चितच विकासाच्या कामाला गती मिळेल असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयावरील आयोजित बैठकात उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
          या बैठकीस जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा  जयश्री मस्के, अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, श्रीमती वर्षा ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, उपायुक्त प्रल्हाद कचरे,  श्री.बोथरा, श्री.कुंभार, सहाय्यक आयुक्त श्रीमती सुत्रावे, श्रीमती रिता मेत्रेवार, मनोज चौधर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जि.प.सभापती युध्दजित पंडित, संतोष हांगे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलताना विभागीय आयुक्त म्हणाले की, शासनस्तरावरुन विविध योजना राबविल्या जात  असून त्या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासाची कामे झाली पाहिजेत यासाठी विकासाच्या कामामध्ये अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांचा सहभाग असल्यास तो जिल्हा विकासामध्ये अग्रेसर राहण्यास निश्चितच मदत होईल. जिल्हृयाचे महसूली वसूलीचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांनी या कामांना प्राधान्य देण्याची गरज असून दिलेले उद्दिष्ट जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावेत. तसेच जिल्ह्यातील वाळू लिलावाबाबत आवश्यक ती कार्यवाही करुन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या विरुध्द दंडात्मक कार्यवाही करावी. जिल्ह्यात अवैधरित्या वाळू वाहतूकीस प्रतिबंध करण्यासाठी अधिकाऱ्यांनी पथकाच्या माध्यमातून अचानक प्रत्यक्ष भेटी देऊन कारवाई करावी. जिल्ह्यातील एनएलआरएमपीचे काम कमी असल्यामुळे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.  असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          जिल्ह्यात एमजीनरेगाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या  कामाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व कार्यवाही पूर्णकरावी तसेच विहिरी व शेततळ्यांच्या कामांना प्राधान्य द्यावे जास्तीत जास्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणेने विशेष प्रयत्न करुन लवकरात लवकर जिल्हा हागणदारीमुक्त करावा. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या मुलांना शिक्षकांनी चांगले शिक्षण दिले पाहिजे चांगली सुविधा, उपक्रम तसेच गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच शाळा डिजिटलायझेशनच्या कामाला प्राधान्य दिले पाहिजे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महसूल आयुक्तांनी महाराजस्व अभियान आढावा, राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, कळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, वक्फ जमिनीच्या नोंदी,  शेतकरी आत्महत्या, शासकीयवसूली, अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकीस दंडात्मक कार्यवाहीचा आढावा, महसूली जमा व शासकीय भरणा प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे, एमजीनरेगाच्या कामांचा आढावा, जलयुक्त शिवार कामाचा आढावा, जीओ टॅगींग, पुरवठा विभागाचा आढावा, कायदा व सुव्यवस्था, कर्मचारी कल्याण अभियान यासारख्या विविध विषयावर महसूल आयुक्त डॉ.भापकर यांनी आढावा घेवून योग्य त्या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील प्रलंबितअसलेल्याविकासाची कामेआणि देण्यात आलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या करण्यात आलेल्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. या बैठकीस महसूल अधिकारी व सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

-*-*-*-*-

बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

सिंदफणा व गोदावरी नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा



          बीड दि.11 :- माजलगाव धरणाची पूर्ण साठा क्षमता 454 द.ल.घ.मी. असून पूर्ण संचय पातळी 431.80 द.ल.घ.मी. आहे. दि.10 ऑक्टोबरपर्यंत माजलगाव धरणामध्ये 80 टक्के पाणी साठा निर्माण झाला असून पाणीपातळी 430.90 मीटर आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास व धरणामधील पाण्याची आवक वाढल्यास कोणत्याही क्षणी सिंदफणा नदीच्या पात्रात पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. यामुळे पाणी नदी पात्रात सोडण्यात आल्यास नागरिकांनी नदीपात्राजवळ जाण्याचे टाळावे. असे माजलगाव पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करावेत



          बीड दि.11 :- संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित बीड यांच्यामार्फत सन 2017-18 मध्ये राबविल्या जाणाऱ्या विशेष घटक योजना व बीज भांडवल योजनेसाठी 30 ऑक्टोबर 2017  पर्यंत अर्ज सादर करावेत.
            योजनेच्या लाभासाठी अर्जदार हा चांभार, मोची, ढोर व होलार समाजातील असावा. तसेच त्याने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. उमेदवाराने अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, मतदान किंवा आधारकार्ड, 3 पासपोर्ट फोटो, दरपत्रक, आवश्यकतेनूसार प्रकल्प अहवाल, जागेच्या पुराव्यासाठी लाईट बिल, कर पावती, महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्जासह जिल्हा कार्यालय, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळमजला, नगर रोड, बीड-431122 या ठिकाणी सादर करावेत. कर्ज प्रस्ताव प्रत्यक्ष अर्जदाराकडूनच स्विकारले जातील. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र.02442-223567 या क्रमांकावर संपर्क करावा. असे जिल्हा व्यवस्थापक, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

तीन महिन्याचे रॉकेल नियतन मंजूर


            बीड, दि. 11 :- माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर 2017 या तीन महिन्यासाठीचे जिल्ह्यातील पात्र घाऊक, अर्धघाऊक व तालुकानिहाय वाटप करण्यासाठी  1308 के.एल. रॉकेलचे नियतन बीड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. रॉकेलच्या घाऊक विक्रेत्यांनी महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत 30 टक्के, 11 ते 17 तारखेपर्यंत 35 टक्के तर 18 ते 25 तारखेपर्यंत 35 टक्के रॉकेलची उचल करावी.  तालुकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या रॉकेलचे नियतन याप्रमाणे.  आष्टी-141 के.एल, पाटोदा-66, शिरुर-57, बीड-204, गेवराई-165, माजलगाव-135, वडवणी-78, धारुर-90, केज-108, अंबाजोगाई-141 तर परळी तालुक्यासाठी 123 के.एल. रॉकेलचे मासिक नियतन मंजूर करण्यात आले आहे.  सर्व विक्रेत्यांनी रॉकेल पुरवठा झाल्याचे दर्शनी भागात सूचना फलकावर ग्राहकांच्या माहितीसाठी लावावी.   त्याचबरोबर घाऊक अथवा अर्धघाऊक रॉकेल डिलर्स यांच्याकडून वितरण व्यवस्थेसंदर्भात गंभीर स्वरुपाचे दोष आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये कारवाई करावी.  त्याचबरोबर तहसिलच्या पुरवठा विभागाने दुकानांना अचानक भेटी देऊन रॉकेल पुरवठ्याबाबत खात्री करावी. तसेच दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.

-*-*-*-*-

मंगळवार, १० ऑक्टोबर, २०१७

विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम

विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम
                                       - मिलिंद तुपसमिंद्रे
                                       जिल्हा माहिती कार्यालय, बीड
                            
      विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये बीड जिल्हा एक आहे. बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. 7 ऑक्टोबरपासून पुढील चार महिन्यापर्यंत मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत 0 ते 2 वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये व नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी ही माहिती...

       विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील 9 जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असून त्यामध्ये बीड जिल्हा एक आहे. बालकामधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, अर्धवट लसीकरण झालेली व लसीकरण न केलेली बालके ही पूर्ण लसीकरण केलेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात. यासाठी केंद्र शासनाने माहे ऑक्टोबर 2017 मध्ये 187 जिल्ह्यात विशेष मिशन इंद्रधनुष्य (आयएमआय) कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेत लसीकरणापासून पूर्णपणे वंचित राहिलेल्या किंवा अपूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या अहवालानूसार जिल्ह्यात पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांचे प्रमाण 65 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असल्याने ही  मोहीम निवड केलेल्या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. यामध्ये ऑक्टोबर 2017 ते जानेवारी 2018 या कालावधीत 4 मोहिमेअंतर्गत नियोजन करण्यात आले आहे.
विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची उद्दिष्टे
          नियमित लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत पूर्ण संरक्षित बालकांचे प्रमाण डिसेंबर 2018 पर्यंत विशेष मिशन इंद्रधनुष्य  मोहिमेसाठी निवडलेल्या जिल्ह्यामध्ये 90 टक्के झाले पाहिजे. प्रत्येक बालक पूर्ण संरक्षित होण्यासाठी राजकीय, प्रशासकीय, आर्थिक विभाग व इतर विभागांचा सक्रीय सहभाग घेण्यात येणार आहे. वय वर्षे 0 ते 2 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला ड्युलिस्टप्रमाणे लसीकरण केले गेले पाहीजे. अशी या विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेची उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.
विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम राबविण्याबाबत धोरण
          विशेष लसीकरण सत्र हे निवडण्यात आलेल्या 9 जिल्ह्यात व 13 महापालिका क्षेत्रात 7 दिवस कार्यालयीन कामाकाजाच्या दिवशी राबविण्यात येणार आहे. यामध्ये बीड जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. विशेष लसीकरण सत्राच्या ठिकाणी लाभार्थ्यांना लसीकरण करण्यासाठी बालकांना बोलावण्यासाठी मोबिलायझरची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवी घटक व इतर विभागांची मदत सुध्दा या कामी घेण्यात आली आहे.
विशेष मिशन इंद्रधनुष्य कार्यक्रमाचे नियोजन
          जोखीमग्रस्त भागांची निवड करण्यात येऊन त्या भागात लसीकरण सर्वेक्षण करण्यात आले आहे व ज्या ठिकाणी खरोखरच विशेष मिशन इंद्रधनुष्य राबविण्याची गरज आहे अशा जोखीमग्रस्त भागांची निवड करुन तेथे  आरोग्य सेवा सत्राचे नियोजन करण्यात आले आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये मोबाईल टिमचे आयोजन करण्यात येणार आहे.
जोखीमग्रस्त भागांची निवड
          लसीकरणाचे कमी काम असणारा भाग,  घटसर्प व गोवर आणि धर्नुवाताचा उद्रेक झालेला जोखीमग्रस्त भाग, अति दुर्गम भाग, डोंगराळ भाग तसेच अशी गावे आणि विभाग जेथे सलग तीन सत्रे रद्द झाली आहेत. एएनएमची पदे रिक्त असलेल्या उपकेंद्रांची गावे, शहरी भागातील झोपडपट्टी, पल्स पोलिओ कार्यक्रमात जोखीमग्रस्त असलेला भाग. विटभट्टी, बांधकामे, स्थलांतरीत वस्त्या, उस तोडणी वस्त्या आणि इतर पेरीअर्बन एरिया या निकषानूसार जोखीमग्रस्त भागांची निवड करण्यात येणार आहे. निवड केलेल्या जोखीमग्रस्त भागातील 0 ते 2 वर्षे वयोगटातील असंरक्षित बालकांची व असंरक्षित गरोदर मातांची नोंद करण्यात येऊन त्यानूसार यादी तयार करण्यात आले आहे.        
विशेष इंद्रधनुष्य मोहिमेचे नियोजन व पूर्व तयारी
          जिल्हास्तरीय जिल्हा समन्वय समिती सभा दि.16 ऑगस्ट 2017 रोजी घेण्यात आली आहे. जिल्हास्तरीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक,  वैद्यकीय अधिकारी यांची कार्यशाळा दि.19 ऑगस्ट रोजी घेण्यात आली असून जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. व्दितीय वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, सहाय्यिका, गटप्रवर्तक यांची दि.21 ऑगस्ट रोजी कार्यशाळा घेण्यात आली आहे. जिल्हास्तरीय अधिकारी व जिल्हास्तरीय पर्यवेक्षकांची दि.24 ऑगस्ट रोजी कार्यशाळा संपन्न झाली. तालुकास्तरावर दि.22 ते 30 ऑगस्ट या कालावधीत कार्यशाळा घेण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर दि. 22 ते 30 ऑगस्ट या कालावधीत प्रशिक्षण देण्यात आले. निवड करण्यात आलेल्या अति जोखमीच्या गावांचे दि.4 ते 15 सप्टेंबर 2017 या कालावधीत प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्यात आले. निवडलेली अति जोखमीची गावे 221 ग्रामीण तर 74 शहरी असे एकुण 295 गावांची निवड करण्यात आली आहे. लाभार्थ्यांची यादी व सत्राचे नियोजन दि.18 सप्टेंबर 2017 पर्यंत पूर्ण करण्यात आले.विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत ब्रीज प्रशिक्षण कार्यशाळा दि.13 सप्टेंबर 2017 रोजी घेण्यात आली तसेच विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेअंतर्गत तालुकास्तरीय ब्रीज प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रमाणे मोहिमेचे नियोजन व पूर्वतयारी करण्यात आली आहे.
          बीड जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मागील 3 इंद्रधनुष्य मोहिमेमध्ये प्रत्येकी 4 प्रती टप्प्याप्रमाणे एकुण 12 फेऱ्या घेण्यात आल्या असून त्यामध्ये एकुण 3 हजार 11 लसीकरण सत्र आयोजित करण्यात आली होती. यामध्ये  20 हजार 420 बालकांना व 3 हजार 132 गरोदर मातांना लसीकरण करण्यात आले होते. मिशन इंद्रधनुष्य मोहीम ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या चार टप्प्यात प्रभावीपणे राबविण्यासाठी  आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

-*-*-*-*-
राज्यपाल मा. श्री. चे. विद्यासागर राव यांची
वैद्यनाथ देवस्थानाला भेट

          बीड दि.8 :- महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मा. श्री. चे. विद्यासागर राव यांनी आज परळी येथील
श्री. वैद्यनाथ देवस्थानाला भेट दिली. यावेळी मा. राज्यपाल यांनी श्री. वैद्यनाथाची विधीवत पुजा करुन दर्शन घेतले.
          यावेळी त्यांच्या समवेत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, वैद्यनाथ मंदिर देवस्थानचे सचिव राजेश देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी मंदिर देवस्थानाकडून सचिव श्री. देशमुख यांनी  मा. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांचा श्री. वैद्यनाथाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
          तत्पुर्वी सकाळी  9.50 वाजता राज्यपाल  चे विद्यासागर राव यांचे गोपीनाथ गड हेलिपॅडवर आगमन झाले त्याच्या समावेत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे होत्या.  राज्यपाल यांचे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी हेलिपॅडवर जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार,  आमदार संगिता ठोंबरे, आमदार आर.टी.देशमुख आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आगमानानंतर राज्यपाल यांनी गोपीनाथ गडावरील स्व. गोपीनाथ मुंडे समाधी स्थळी भेट दिली. व समाधीस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
           
-*-*-*-


शुक्रवार, ६ ऑक्टोबर, २०१७

वृत्त क्र. 533

मतदान केंद्राच्या परिसरात 144 कलम जारी
            बीड, दि. 6  – जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान प्रिक्रिया होणार आहे. सदर प्रक्रिया निपक्षपाती व निर्भय वातावरणात पारपाडण्यासाठी  तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबधित राखण्यासाठी  जिल्हादंडधिकारी, बीड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2)  अन्वये मनाई आदेश जारी केला आहे. हा आदेश दि. 7 ऑक्टोबर 2017 रोजी  ग्रामपंचायत मतदान होणार असून मतदान केंद्राच्या क्षैत्रात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्य होऊ नयेत या करीता जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया लागू ठेवली आहे. या काळात  ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान होणाऱ्या मतदान केंद्रावरील कामकाजासाठी नियुक्त अधिकारी कर्मचारी व उमेदवार यांना लागू राहणार नाही, ग्रामपंचायत निवडणूकीच्या मतदान केंद्राच्यापरिसरात नियुक्त अधिकारी , कर्मचारी व उमेदवारांना वगळून दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान होणाऱ्या मतदान केंद्राच्या परिसरात ध्वनीक्षेपक वापरास, वादय वाजविणे, मिरवणूकी काढणे यावर प्रतिबंध करण्यात येत आहे, शासकीय वाहना व्यतिरीक्त इतर अनाधिकृत वाहनांना 200 मिटर परिसरात येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. हे आदेश कोणत्याही धार्मिक कार्यक्रम,मयताची अंत्ययात्रासाठी लागू राहणार नाहीत असे  जिल्हादंडधिकारी, बीड यांनी  कळविले आहे.
-*-*-*-*
          वृत्त क्र. 534

जवाहर नवोदय विद्यालय
निवड चाचणी परीक्षासाठी अर्ज करावे
            बीड, दि. 6 - भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालद्वारे चालवण्यात येणाऱ्या निवासासह शिक्षणाची मोफत सोय असणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय, गढी येथे 6 वर्गात प्रवेशाकरीता दि.10 फेब्रुवारी 2018 प्रवेश परिक्षा घेण्यात येणारआहे. या परिक्षेसाठी विद्यार्थी, विद्यार्थीनी बीड जिल्ह्यातील सरकारमान्य शाळेत सत्र 2017-18 मध्ये इयत्ता पाचवी वर्गात शिकत असला पाहिजे, उमेदवार इयत्ता तिसरी,चौथी  पूर्ण शैक्षणिक सत्र सलगपणे सरकार मान्य शाळेतूनच उत्तीर्ण झालेला असावा. उमेदवाराचा जन्म 1 मे 2005 ते 30 एप्रिल 2009 (दोन्ही दिवस धरुन) या कलावधीत झालेला असावा. ग्रामीण भागच्या विभागातील सरकारमान्य शाळेतूनच शिकलेला असावा, एकदिवस जरी तो शहरी  विभागातील शाळेत अध्ययन केलेला असल्यास त्यास शहरी समजण्यात येईल.

          नवोदय विद्यालय समिती संकेतस्थळ www.nvshq.org / www.jnvbeed.org वर उपलबध माहिती पुस्तकाचे वाचन करावे व जोडलेले प्रमाणपत्र पालक व विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या मुख्याधापकांच्या सही शिक्यानिशी घेऊन ई प्रवेश अर्ज जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (csc) या महा-ई-सेवा केंद्र, आपले सरकार, सेतू केंद्रातून दि. 25 नोव्हेंबर 2017 पुर्वी भरण्यात यावे अधिक माहितीसाठी 02447- 259607 व 259491 यावरसंपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य पी.एस.साबळे जवाहर नवोदय विद्यालय, गढी यांनी कळविले आहे.-*-*-*-

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

वृत्त क्र. 531
 ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी
स्थानिक सुट्टी जाहिर

          बीड 5:- निवडणूक आयोगाने नोव्हेंबर-डिसेंबर 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या कार्यक्रमानुसार बीड जिल्ह्यातील 690 ग्रामपंचायतीसाठी शनिवार दि. 7 ऑक्टोंबर,2017 रोजी मतदान होणार आहे. तेथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा या करिता  11 तालुकयातील ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानाच्या दिवशी  शनिवार दि.7 ऑक्टोबर 2017 रोजी  स्थानिक सुट्टी जाहिर  करण्यात आली आहे.   तसेच इतर सर्व आस्थापना व बँक (ज्यांना जिल्हाधिकारी यांनी दिलेली स्थानिक सुट्टी लागू होत नाही) त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना मतदान करता येणे शक्य व्हावे याकरीता कामाच्या तासामधून दोन तासाची सवलत देण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी कळविलेआहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात
महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन

          बीड, दि. 5 :- महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात अपर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
          यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

वृत्त क्र. 528
जय भवानी माध्यमिक विद्यालय, गढी येथे
तंबाखुच्यादुष्परीणामा विषयीचा कार्यक्रम संपन्न

          बीड, दि. 3 :- राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय बीडच्यावतीने तंबाखू गुटख्यामुळे मानवी शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती केली जात असून त्या अंतर्गत दि .27 सप्टेबर 2017 रोजी जय भवानी माध्यमिक विद्यालय, गढी येथे कार्यक्रम घेण्यात आला.
          तंबाखुची सवय मुलत: किशोर वयीन वयातच लागत असल्यामुळे व त्यानंतर त्या संदर्भात होणाऱ्या दुष्परिणामाला ते बळी पडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा व्यवनापासून दूर राहवे व भविष्यात कुठलेही व्यसन विद्यार्थ्यांना लागु नये याकरीता उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तंबाखूचे सेवन केल्यामुळे तोंडाच्या, आतड्याच्या व हदयाया एकंदरीत पुर्ण मानवी शरीराच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो असे सांगून विविध उदाहरणे देऊन उपस्थित विद्यार्थ्यांना तंबाखूच्या विपरीत दुष्परिणाम विषयी मार्गदर्शन, दंत शल्यचिकीत्सक डॉ. सुजाता नरवणे यांनी केले.
          शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी देखील तंबाखूच्या व्यवनापासून दूर राहण्यासाठी शाळेमधीलतंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोटेकोर पालन करणे आवश्यक आहे. शाळेपासून 100 मीटर परिसरात तंबाखु विक्री व सेवणास बंदी घालण्यात आलेली आहे तसे आढळल्यास जागेवर कारवाई करण्यात येत आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते दामोधर सुरेश यांनी दिली.
          यावेळी कार्यक्रमास विद्यालयाचे निवासी विद्यार्थी, विद्यार्थींनी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. जय भवानी माध्यमिक विद्यालय, गढीचे मुख्यधापक श्री. पटेलव पर्यवेक्षक श्री. गायकवाड यांचे सहकार्य लाभले.असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-

वृत्त क्र. 529
जिल्हा रुग्णालयात दंत आरोग्य तज्ञ
गंगाधर वाहुळ यांचा सेवानविृत्ती कार्यक्रम संपन्न

          बीड, दि. 3 :- जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी गंगाधर वाहुळ हे दंत आरोग्य तज्ञ या पदावरुन सेवानिवृत्त झाले त्यांनी आपल्या पदाची कर्तव्ये त्यांच्या 33 वर्षाच्या सेवाकार्यकाळामध्ये चांगल्यारितीने पार पाडली.
          या निमित्ताने जिल्हा रुग्णालयातर्फे जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. अशोक थोरात यांनी गंगाधर वाहुळ यांचा सपत्नीक सेवापुर्ती सत्कार केला आणि त्यांच्या  कार्याचे रुगणालय प्रशासना मार्फत कौतुक करण्यात आले.
          यावेळी जिल्हा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिष हरीदास, राष्ट्रीय मौखीक आरोग्य तथा तंबाखु नियंत्रण जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. सत्येंद्र दवडगावकर, डॉ. सबा सय्यद, डॉ. सुजाता नरवणे, श्रीमती सिमा पाटील, श्रीमती सुशिला नखाते, श्रीमती राजश्री ठोंबरे, श्रीमती बजगुडे, डॉ.अमोल बन्सोडे, ऋषिकेश शेळके, श्रीकांत उजगरे, कृष्णा शेडगे, सुरेश दामोधर तसेच जिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.
-*-*-*-*-*-*