शनिवार, २९ एप्रिल, २०१७

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 29 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          रविवार दि.30 एप्रिल 2017 रोजी औरंगाबाद येथून सायंकाळी 9 वाजता परळी निवासस्थानी  आगमन व मुक्काम.

          सोमवार दि. 1 मे 2017 रोजी सकाळी 6 वाजता वाहनाने बीडकडे प्रयाण. सकाळी 8 वाजता आगमन व महाराष्ट्र दिन ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.5 वाजता पंडित दिनदयाळ उपाध्याय महाराष्ट्र स्वस्थ अभियानाचा शुभारंभ उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता दैनिक बीड सिटीजन वर्धापन दिनानिमित्त बशीरगंज येथे कार्यालयास भेट. सकाळी 11 वाजता श्रीमती संगीता धसे यांच्या मुलाचा उपनयन संस्कार सोहळा. सकाळी 11.15 वाजता मुंबई मराठी पत्रकार संघ शाखा, बीड आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.15 वाजता डॉ.दिपक काकडे यांच्या दंत रुग्णालयाचे उदघाटन. दुपारी 12.45 वाजता वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.

10 व 11 मे रोजी पाणस्थळावर वन्य प्राण्याची गणना होणार



          बीड, दि.29 :- वन्यजीव विभाग औरंगाबाद अंतर्गत औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यात समाविष्ट असलेल्या गौताळा औट्रमघाट वन्यजीव अभयारण्य, पैठण तालुक्यातील जायकवाडी पक्षी अभयारण्य, बीड जिल्ह्यातील नायगाव मयूर अभयारण्य आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य क्षेत्रात दि.10 मे 2017 च्या दुपारपासून ते दि.11 मे च्या दुपारपर्यंत 24 तासाच्या कालावधीत पाणस्थळावर आधारीत वन्य प्राण्यांनी गणना करण्यात येणार आहे.

          याकरीता संरक्षित क्षेत्रनिहाय पाणवठ्याची संख्या निश्चित करण्यात आली असून त्यात वन्यप्राण्यांच्या वापरासाठी सातत्याने पाणी उपलब्ध राहील याचे वन कर्मचाऱ्यांमार्फत सनियंत्रण करुन खात्री करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून त्या क्षेत्राच्या वन्यजीव व्यवस्थापनेतून वन्य प्राण्यांच्या संख्येत बदल अथवा वाढ याबाबतचा निष्कर्ष काढण्यासाठीचा अंदाज प्राप्त होणार आहे. कार्यक्रमाच्या उदिष्टास अनुसरुन वन्यप्राण्यांना निर्धोक आणि बाधारहित वातारण उपलब्ध व्हावे. यासाठी अभयारण्य क्षेत्रातून होणाऱ्या वाहतूक आणि प्रवेशावर नियंत्रण आनणेसाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.पाणवठ्यावर प्रगणकाला बसण्यासाठी मचाणी तसेच लपणगृह पुरेशा आधी तयार करण्याची कार्यवाही सुरु असून संबंधीत वन कर्मचारी व निसर्गप्रेमी प्रगणक यांना यासाठीच्या कार्यपध्दतीसंबंधी विशेष प्रशिक्षण  देण्यात आले आहे. अशा जबाबदारीच्या आणि जंगलात वनयप्राण्यांना कोणतीही बाधा निर्माण न करता 24तास जागे राहून गणना करण्याच्या कामासाठी आवश्यक असणारी जबाबदारी  आणि चिकाटी लक्षात घेवून अशा गुणसंपन्न खाजगी निसर्गप्रेमींची निवड विभागामार्फत करण्यात येत असून त्यासाठी या क्षेत्रात सक्रिय असलेल्या अशासकीय निसर्गप्रेमी संस्थेचे सहकार्य घेण्यात आले आहे. अशा प्रगणकांचे कार्यपध्दती आणि अटी व शर्तीबाबतचे पुर्व प्रशिक्षणसुध्दा आयोजित करण्यात येत आहे. या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे उदिष्ट लक्षात घेवून त्याच्या आवश्यकतेनूसार योग्य त्या सर्व कायदेशीर उपाययोजना करुन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 व इतर कायद्यानूसार प्राप्त अधिकारांचा वापर करुन हा कार्यक्रम यशस्वी करण्याच्या सुचना  संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आल्या असून त्यादृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. असे औरंगाबादचे विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) यांनी कळविले आहे.

1 ते 27 मे कालावधीत पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते 1 मे रोजी उदघाटन


          बीड, दि.29 :- पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान 2017 चे उदघाटन सोमवार दि.1 मे 2017 रोजी पालकमंत्री श्रीमती पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते व जिल्हास्तरीय समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा रुग्णालय, बीड येथे सकाळी 9 वाजता होणार आहे.
          मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून स्वस्थ महाराष्ट्र अभियान महाराष्ट्रात राबविण्यात येत असून पथदर्शी प्रकल्पात मराठवाडा विभागातून बीड जिल्ह्याची निवड झाली आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील गरीब,गरजु रुग्णांना विनामुल्य आरोग्यसेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यात 20 प्रकारच्या आजारावर उपचार केले जाणार आहेत. या मोहिमेसाठी तज्ञ प्रशासकीय समिती तसेच विषय तज्ञ समिती राज्यस्तरावरस्थापन करण्यात आली आहे. मोहिमेत समन्वय ठेवण्यासाठी राज्य व जिल्हास्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून जिल्हास्तरीय समिती पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बीड जिल्ह्यात स्थापन करण्यात आली आहे.
          अभियानात वैद्यकिय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य विभाग स्वयंसेवी संस्था, खाजगी वैद्यकिय महाविद्यालयांचा सहभाग असणार आहे. दि.1 ते 27 मे 2017 या कालावधीत सर्व गरजू रुग्णांची विहीत नमुन्यात संगणकीय प्रणालीवर तपासणी कक्षामार्फत नोंदणी केली जाणार आहे. माहितीच्या आधारे जिल्ह्यातील विविध आजाराचे विश्लेषण केले जावून त्यानंतर रुग्णांना जिल्हास्तरावर शासनाच्या उपलब्ध योजनातंर्गत लाभ देण्यात येणार आहे. ज्या रुग्णांना सध्या अस्तित्वात असणाऱ्या योजनांचा लाभ मिळू शकणार नाही अशांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत तसेच सामाजिक संस्था, अशासकीयसंस्था, सामुदायिक सामाजिक दायित्व अंतर्गत लाभ दिला जाईल.

          बीड जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य व वैद्यकिय शिक्षण विभागाच्या सर्व संस्था, खाजगी वैद्यकिय महाविद्यालयातून अभियान राबविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण पूर्ण झाले असून प्रत्येक संस्थेत अभियानासाठी स्वतंत्र कक्ष स्थापण करण्यात येत  आहेत. असे बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कळविले आहे.

शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

महाराष्ट्र दिनानिमित्त बीड येथे 1 मे रोजी पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण


          बीड, दि.28 :-  महाराष्ट्र दिनाच्या 57 व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दि. 1 मे 2017 रोजी बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सकाळी 8 वाजता पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी दिली.

          जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन समारंभाच्या पूर्व तयारीबाबत बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी वाघ यांनी सर्व संबंधित विभागांना पूर्व तयारीबाबत सुचना देवून कामांचा आढावा घेतला. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ सकाळी 8 वाजता होणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांना मुख्य समारंभास उपस्थित राहता यावे यासाठी या दिवशी  सकाळी 7.15 ते 9 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावासा वाटल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 7.15 वाजण्यापूर्वी किंवा 9 वाजेनंतर करावा अशा सुचना शासनाने दिल्या आहेत. असे सांगून वाघ यांनी पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा, गृहरक्षक दल, नगर परिषद, शिक्षण इत्यादी विभागाच्या अधिकाऱ्यांना पूर्वतयारी कामांविषयी विविध सुचना केल्या. या बैठकीस  तहसिलदार श्रीमती छाया पवार यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी बीड जिल्ह्यात तालुक्याच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण


       

          बीड, दि. 28 :- दि.1 मे 2017 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन साजरा करण्याच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी 8 वाजता ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात येणार आहे. शिरुर कासार येथे आ.जयदत्त क्षीरसागर, आष्टी येथे आ.भिमराव धोंडे, माजलगाव येथे आ.आर.टी.देशमुख, गेवराई येथे आ.लक्ष्मण पवार, केज येथे आ.संगीता ठोंबरे, परळी वैजनाथ येथे धनंजय मुंडे, विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधान  परिषद, अंबाजोगाई येथे आ.विनायक मेटे, विधान परिषद सदस्य आणि पाटोदा येथे आ.अमरसिंह पंडीत, विधान परिषद सदस्य यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा समारंभ होणार आहे. तरी या समारंभास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन


          बीड, दि. 28 :- महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

          यावेळी अपर कोषागार अधिकारी लहू गळगुंडे, नायब तहसिलदार श्रीमती शारदा दळवी, आर.जी.नवगीरे, श्री.लिमकर, सय्यद कलिम यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

उष्माघाताच्या प्रतिबंधक उपाययोजना नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन



          बीड, दि. 28 :- बीड जिल्ह्यात सध्या तापमानात मोठी वाढ झाली असल्यामुळे उष्माघाताचे रुग्ण आढळून येण्याची शक्यता आहे. उष्माघात प्रतिबंधक उपाययोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन सुचना सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालयातर्फे सर्वत्र देण्यात येत आहेत. उष्माघातापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी विविध उपाययोजना हाती घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.
            सर्वसाधारणपणे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी एप्रिल, मे व जुन महिन्यामध्ये प्रादुर्भाव होत असतो. तसेच त्यामुळे मृत्युही होने संभवनिय असते. महाराष्ट्रात विदर्भ व मराठवाडा या विभागात उष्माघात प्रादुर्भाव आढळुन येतो त्या मानाने इतरत्र प्रमाण अगदी अल्प असते.  उष्माघाताने मृत्यु होऊ नये यासाठी आपण आतापासूनच जागरुक राहिले पाहिजे. रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळण्यासाठी अगोदरच तयारी करुन ठेवणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये तापमानात प्रथम हळूहळू अथवा एकदम यापैकी कोणत्याही प्रकारे वाढ होत असते. याचा अभ्यास करण्यासाठी वरील कालावधीमध्ये दररोजच्या तापमानाची (कमाल-किमान) नोंद ठेवण्यात येत आहे.
            उष्माघात होण्याची उन्हाळ्यामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करणे, कारखान्याच्या बॉयलर रुममध्ये काम करणे, काच कारखान्यातील कामे करणे, जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर करणे, अशा प्रत्यक्ष उष्णतेशी अथवा तापमानातील वाढत्या परिस्थितीशी सतत संबंध येण्याने उष्माघात होतो. ही याची कारणे आहेत.      उष्माघातामध्ये थकवा येणे, ताप येणे, त्वचा कोरडी पडणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरुत्साही होणे, डोके दुखणे, रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेन व अस्वस्थता, बेशुध्दावस्था ही उष्माघाताची लक्षणे आहेत.
            वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे, कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमानात करावीत, उष्णता शोषूण घेण्यारे कपडे (काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे) वापरु नयेत, सैल, पांढऱ्या रंगाचे कपडे वापरावेत, जलसंजीवनीचा वापर करावा, पाणी भरपूर प्यावे. सरबत प्यावे. उन्हामध्ये काम करताना मधून मधून सावलीत थोडीसी विश्रांती घ्यावी, उष्माघाताची लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब काम थांबवावे, उन्हात बाहेर जाताना गॉगल्स, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, उपरणे यांचा वापर करावा. हे प्रतिबंधात्मक उपाय करावेत.

            उष्माघात झालेल्या रुग्णास हवेशीर खोलीत ठेवावे, खोलीत पंखे, कुलर ठेवावेत किंवा वातानुकूलीत खोलीत ठेवावे, रुग्णाचे तापमान खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, रुग्णास थंड पाण्याने आंघोळ घालावी, रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, आईसपॅक लावावेत, आवश्यकतेनूसार शीरेवाटे सलाईन द्यावी हे उपचार करावेत. जनतेला उष्माघाताची कारणे व लक्षणे व प्राथमिक उपाययोजना त्याचप्रमाणे उष्माघात होऊ नये म्हणून काळजी घ्यावी. जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थातून उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बीड यांनी कळविले आहे.

गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

थेट लाभ हस्तांतरण योजना जिल्ह्यातील रासायनिक खत विक्रेत्यांना पॉस मशीनचे वाटप व प्रशिक्षण


        बीड, दि. 27 :- केंद्र  शासनाने थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) प्रकल्पाअंतर्गत खरीप हंगाम 2017-18 मध्ये रासायनिक खताची विक्री पॉस (Point of Sale) मशीनद्वारे करण्याचा निर्णय घेतला असून त्यांची अंमलबजावणी 1 जून 2017 पासून सुरु होणार आहे. त्याअनुषंगाने रोकडरहीत व्यवहारास प्रोत्साहन देण्यासाठी व रासायनिक खताची खरेदी विक्री व्यवहार पारदर्शी व सुरळीत होण्यासाठी जिल्ह्यातील बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा आणि शिरुर या तालुक्यातील खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देऊन पॉस मशिनचे वाटप  करण्यात आले. पॉस मशील आधार क्रमांकाशी  लिंक असून खत विक्रेत्याला Mobile Fertiliser Monitoring System (MFMS) मध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आय.डी. व पासवर्डद्वारे  सदरील पॉस मशीन कार्यान्वित होणार आहे. त्यासाठी विक्रेत्याकडे MFMS ID  असणे   आवश्यक आहे.
            रासायनिक खत खरेदी करताना आधार क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांचा अंगठ्याचा ठसा पॉस मशीनवर घेऊन त्याची पावती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्याशिवाय कोणत्याही कंपनीला अनुदान मिळणार नाही. शेतकऱ्यांच्या ताब्यात खताची गोणी गेल्याशिवाय कोणत्याही कंपनीला अनुदान मिळणार नाही. त्यामुळे विक्री केलेल्या प्रत्येक गोणीचा हिशोब मिळणार आहे. रासायनिक खताची उपलब्धता, पुरवठा आणि विक्री तसेच शिल्लक आदी बाबींची माहिती तसेच विकलेल्या खताची नोंद त्वरीत संबंधित कंपनी व शासनाच्या सर्व्हरला होईल. यासाठी प्रत्येक विक्रेत्याने आधार कार्ड संलग्न पॉस मशील घेणे आवश्य असून सदरील पॉस मशीन आर.सी.एफ. लि. या नोडल एजन्सीमार्फत विनामुल्य पुरवठा करण्यात येत आहे.  यासाठी  विक्रेत्याकडे  अधिकृत रासायनिक खत  विक्रीचा परवाना, आधार कार्ड, पॅन कार्ड, व मोबाईल MFMS ID असणे आवश्यक आहे.
            कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आधुनि‍क तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतकऱ्यांना सेवा द्यावी. कृषी निविष्ठांचे (बियाणे/रासायनिक खते/ किटकनाशके) विक्री  परवाने यापुर्वीच ऑनलाईन झाले आहेत. भविष्यात रासायनिक खतांचे सर्व खरेदी  आणि विक्रीचे व्यवहार ऑनलाईन होणार असून या बदलाचा सर्व विक्रेत्यांनी स्वीकार करुन त्याची अंमलबजावणी करावी असे आवाहन बीडचे कृषी विकास अधिकारी डी.बी. बिटके यांनी केले.  जे विक्रेते MFMS मशीनमध्ये रजिस्ट्रेशन करणार नाहीत व पॉस मशीनद्वारे व्यवहार  करणार  नाहीत त्यांचावर खत नियंत्रण आदेश 1985 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांनी रासायनिक खत खरेदी करताना आधार कार्ड नोंदणी करुनच खताची खरेदी करावी. त्याचबरोबर मालवाहतूक (गाडी वाला) करणाऱ्यांकडेही आधारकार्ड असणे  आवश्यक आहे.
पॉस मशीनवर आधारित खत वितरणाला जिल्ह्यातील सर्व विक्रेत्यांनी पाठींबा दिला आहे. पॉस मशीनमुळे रासायनिक खत विक्रीत पारदर्शकता येणार असून यामुळे शेतकऱ्यांचाही  फायदा होणार आहे असे मत कृषी निविष्ठा विक्रेते  भिमराव काळे यांनी व्यक्त केले.
यावेळी MFMS मध्ये नोंदणी असलेल्या बीड तालुक्यातील 96, गेवराई 98, पाटोदा 25, शिरुर 20 आणि आष्टी 18 अशा एकुण 257 विक्रेत्यांना पॉस मशीनचे वाटप करण्यात आले. तांत्रिक मार्गदर्शक नितीन कुमार यांनी पॉस मशीन वापरण्यासंदर्भात तसेच मशीनच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संदर्भात माहिती दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कृषी अधिकारी एन.एस. राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन कृषी अधिकारी संतोष राठोड यांनी केले. यावेळी मोहिम अधिकारी जे.बी. कुलकर्णी, कृषी अधिकारी उध्दव सानप, अनिरुध्द सानप, एस.एस. बांगर,    आर. सी. एफ. कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक सुधीर कुमार यांच्यासह झुआरी फर्टीलायझर्स, शिवा फर्टी, कोरोमंडल फर्टी आदी फर्टीलायझर्स  कंपनीचे प्रतिनिधी तसेच बीड, गेवराई, आष्टी, पाटोदा आणि शिरुर तालुक्यातील  कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बीड जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करावा - गगराणी





       बीड, दि. 27 :- तीन वर्षात राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा  शासनाचा महत्वकांक्षी कार्यक्रम असून बीड जिल्हयातील कार्यान्वयीन यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीच्या दिलेल्या उद्दिष्टाच्या पूढे जावून काम केले तरच वृक्ष लागवडीचा कार्यक्रम जिल्हयात यशस्वी होईल असे प्रतिपादन प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सन 2017 च्या पावसाळयामध्ये वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समिती सदस्य व कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
          पुढे बोलतांना प्रभारी जिल्हाधिकारी श्री. गगराणी म्हणाले की, शासनाने सन 2017 ते 2019 या वर्षामध्ये दरवर्षी जून-जुलै महिन्यात एकंदर 3 वर्षात 50 कोटी वृक्ष लागवडीचा महत्वकांक्षी कार्यक्रम हाती घेतला असून प्रत्येक जिल्हयाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दिलेले  उद्दिष्ट  वेळेत पार पाडण्यासाठी कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन केले पाहिजे. दिलेले उद्दिष्ट साध्य केले पाहिजे. तसेच जिल्हयातील सर्व स्तरातून या कामामध्ये  सहभाग नोंदविला पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
           जिल्हयातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, दवाखाने, ग्रामपंचायत, गायरान जमीन, मोकळया असलेल्या जमीनीवर संबंधित यंत्रणेनी वृक्ष लागवड केले पाहिजे यासाठी मे अखेरपर्यंत  झाडे लावण्यासाठी खड्डयाचे खोदकाम पुर्ण होणे आवश्यक आहे. झाडे लावण्यासाठी नरेगाच्यामाध्यमातून खड्डयाचे  व चर खोदकाम करावे असे सांगुन  या कामांना आता प्राधान्य दयावे. तसेच शाळा, कार्यालयास  झाडांची कंपाऊंड तयार करावे यासाठी कार्यालयाच्या सभोवताल चर खोदून त्याच्या दोन्ही बाजूस झाडे लावावे.  ग्रामीण भागात जास्ती-जास्त वृक्ष लागवड करण्यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे यासाठी संबंधितानी याकामी लक्ष देणे आवश्यक आहे. वृक्ष लागवड केल्यानंतर ते जगले पाहिजे यासाठी वृक्ष लागवड करतांना रोपाचे वय कमीत कमी एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे ते झाड जनावरांनी खावू नये अशा वृक्षाची निवड करावी. जिल्हयात मोठयाप्रमाणात एम जी नरेगाची व जल युक्त शिवाराची कामे करण्यात येत असून अशा कामाच्या ठिकाणी वृक्ष लागवड करण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी दिल्या. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी राम गगराणी यांनी  कार्यान्वयीन यंत्रणांचे अधिकाऱ्यांकडून त्यांना दिलेल्या उद्दिष्ट व त्यासाठी केलेल्या उपाययोजनाची माहिती जाणून घेवून योग्य त्या सूचनाही त्यांनी केल्या.

          या बैठकीस विभागीय वन अधिकारी अमोल सातपूते, सामाजिक वनीकरणाचे विभागीय वन अधिकारी  अनिल ढानापणे,  सी. वाय. पाटील, शरद राठोड, डी. पी. देशपांडे, व्ही. एस. जगदाळे, डी. जी. वाघ, व्ही.पी. कच्छवे गिरीष क्षीरसागर यांच्यासह  संबंधित यंत्रणेचे अधिकारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 

बुधवार, २६ एप्रिल, २०१७

शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकात सहभागासाठी प्रस्ताव सादर करावेत



            बीड, दि. 26 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाअंतर्गत उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिम राबविण्यासाठी आत्माअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांचे समुह, गट उत्पादक कंपनी यांच्यामार्फत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गटामधील जे शेतकरी शासनाने ठरवून दिलेल्या तंत्रज्ञानाप्रमाणे पीक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यास तयार असतील अशाच शेतकरी समुह, गटांनी पिकनिहाय प्रस्ताव मंडळ कृषि अधिकारी कार्यालयात सादर करावेत.

          जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने, आत्माचे प्रकल्प संचालक भास्कर कोळेकर, बीडचे उपविभागीय कृषी अधिकारी एच.बी.फड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड तालुक्यात तुर, मुग, उडीद, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस इत्यादी पिकांचे प्रात्यक्षिक राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून शासनामार्फत लक्षांक प्राप्त होताच प्रात्यक्षिक राबविण्यात येणार आहेत. शेतकरी समुह, गट, उत्पादक कंपन्यांनी गटाच्या मागणी अर्जासोबत शेतकरी यादी, सर्वांचे 7/12, 8अ, आधारकार्ड, बँक पासबुकची छायांकित प्रत आणि शेतकरी गटाच्या नोंदणी प्रमाणपत्राची प्रत स्वसाक्षांकित करुन प्रस्ताव कृषि सहाय्यकामार्फत मंडळ कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावेत. यामध्ये प्रती शेतकरी 1 एकरप्रमाणे प्रात्यक्षिक राबविण्यात येणार असून प्रात्यक्षिकांच्या संख्येपेक्षा अधिक गटाचे अर्ज प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येईल. तरी जास्तीत जास्त शेतकरी गटांनी प्रात्यक्षिकाचा लाभ घ्यावा. असे बीडचे तालुका कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.

सुशिक्षीत बेरोजगारांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन



            बीड, दि. 26 :- ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांसाठी भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, एस.पी. ऑफीस समोर, बार्शी रोड,  बीड यांच्यावतीने दि. 2 ते 31 मे 2017 या कालावधीत चारचाकी वाहन चालविणे, दि.8 ते 17 मे 2017 या कालावधीत दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण, दि.18 ते 30 मे 2017 या कालावधीत  उद्योजकता विकास प्रशिक्षण अशा विविध प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. 
          प्रशिक्षणार्थ्यांची निवड ही मुलाखतीद्वारे करण्यात येईल. प्रशिक्षण पुर्णवेळ मोफत व निवासी असून राहणे, चहा, नाष्टा आणि 2 वेळा जेवण दिले जाईल. प्रशिक्षणादरम्यान उमेदवाराला प्रशिक्षणासोबत योग्य प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण तज्ञाकडून मिळेल तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरु करण्यासाठी दोन वर्ष मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यात येईल.

प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी सुशिक्षित बेरोजगार असावा.  त्याचे शिक्षण सुरु नसावे. उमेदवार किमान 8 वी उत्तीर्ण असावा. दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असावे व ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.  उमेदवाराचे वय 18 ते 45 दरम्यान असावे. प्रशिक्षणार्थ्यास व्यवसाय करण्याची आवड असावी.  या प्रशिक्षणासाठी कमाल 35 उमेदवारांची उपस्थिती आवश्यक आहे. प्रशिक्षण वर्गाचे अर्ज तालुका पंचायत समिती तसेच बीड येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय आणि प्रशिक्षण संस्था, पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर, शिवाजीनगर शाखेच्यावर येथे विनामूल्य उपलब्ध आहेत. असे संचालक एम.पी.वाघमारे यांनी कळविले आहे. 

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

प.दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहिम बीड जिल्ह्यात यशस्वी करावी - खासदार डॉ.प्रितम मुंडे



            बीड, दि. 22 :- गोरगरीब, गरजू रुग्णांना विनामुल्य वैद्यकीय सेवा देवून स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत बीड जिल्ह्यात येत्या 1 मे पासून 27 मे पर्यंत पथदर्शी आरोग्यपूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यांनतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी व उपचार शासकीय योजनेतून मोफत केले जाणार आहेत. या मोहिमेचे  सुयोग्य नियोजन करुन बीड जिल्ह्यात हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी केले.
            पंडीत दीनदयाळ उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यातील बीडसह सहा जिल्ह्यात पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. यासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची बैठक खासदार डॉ.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस  जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार संगीता ठोंबरे, आमदार लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती  होती.
            अभियानाचे कोटकोट नियोजन करण्याच्या सुचना  देवून खा.डॉ.मुंडे पुढे म्हणाल्या की, सर्व  प्राथमिक आरोग्य केंद्र  पातळीपर्यंत आवश्यक प्रशिक्षण कार्यक्रम राबवून प्रत्येक रुग्णांची तपासणी करुन ऑनलाईन माहिती शासनाला पुरवावी म्हणजे त्याला आरोग्य तपासणी व औषधोपचाराचा लाभ देणे शक्य होईल. ही मोहिम खास करुन बीड जिल्ह्यात राबविण्यात येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेने खाजगी वैद्यकीय व्यावसायिकआणि स्वयंसेवी संस्थांची मोठ्या प्रमाणात मदत घेणे आवश्यक आहे. या मोहिमेत श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, हदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदुचे विकार, मुत्ररोग आदि वीस विषयातील आजारासंदर्भातील पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. या मोहिमेचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक रुग्‍णांनी घ्यावा असेही आवाहन खा.डॉ.मुंडे यांनी यावेळी केले.
            प्रारंभी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदिप सांगळे यांनी प्रास्ताविकाम सादरीकरणाद्वारे अभियानाची सविस्तर माहिती दिली.  जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, 3 उपजिल्हा रुग्णालये, 1 स्त्री रुग्णालय, 10 ग्रामीण रुग्णालये, 50 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 280 उपकेंद्राच्या माध्यमातून ही मोहिम राबविण्याचे नियोजन असून सर्वस्तरावर प्रशिक्षण आणि विशेष कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याची  माहिती यावेळी देण्यात आली. या अभियानाचे उदघाटन बीड येथे पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांच्या हस्ते 1 मे रोजी करण्यात येणार असल्याचे  सांगून ग्रामीण रुग्णालय स्तरावरही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

            या बैठकीत आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, आणि विविध विभागांचे अधिकारी तसेच स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

खरीप हंगामपूर्व आढावा बैठक शेती आणि शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा - खासदार डॉ.प्रितम मुंडे






            बीड, दि. 22 :- बीड जिल्ह्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठी खरीप हंगामाचे सुयोग्य नियोजन कृषी विभागाने केले असून यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वयातून कामकाज करावे अशी सुचना बीडच्या खासदार डॉ.प्रितम मुंडे यांनी केली.
            बीड जिल्ह्यातील खरीप हंगामपूर्व तयारीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ.मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्या बोलत होत्या बैठकीस जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार आर.टी.देशमुख, लक्ष्मण पवार, संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती घेतल्यानंतर खासदार डॉ.मुंडे म्हणाल्या की, खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या खत आणि बियाण्यांची मुबलक प्रमाणात मागणी करण्यात यावी. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना खतांचा आणि बियाण्यांचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी. बहुतांश वेळा शेतकरी  आपल्याकडील पारंपरिक बियाणे वापरत असतो. अशा बियाण्यांची गुणवत्ता तपासून कृषी विभागाने शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे. बाजारात विक्रीसाठी येणाऱ्या खते व बियाण्यांची गुणवत्ता तपासण्याची कार्यवाही कृषी विभागाने करावी. प्रामुख्याने यासाठी विशेष पथके कार्यान्वित करावीत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पिक कर्जाची मोठी आवश्यकता भासते. अशा वेळी बँकांनी प्रामुख्याने शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करुन दिले पाहिजे. पिक अनुदान वाटपाची कार्यवाही तात्काळ झाल्यास शेतकऱ्यांना त्याचा उपयोग खरीप हंगामात होईल असेही खा.डॉ.मुंडे म्हणाल्या.
            शेतकऱ्यांना शेती पंपासाठी विजपुरवठ्याची प्रकरणे महावितरणने तात्काळ निकाली काढावीत अशी सुचना करीत खा. डॉ.मुंडे म्हणाल्या की, सोलार पंप पुरवठ्याची शासनाची योजना बीड जिल्ह्यासाठी असून यासाठी 200 चे उद्दिष्ट आहे. उद्दीष्टपूर्तीसाठी महावितरणने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी जनजागृती करावी.याशिवाय अखंडीत वीजपुरवठ्यासाठी  महावितरणने आग्रही रहावे अशी अपेक्षाही खा.डॉ.मुंडे यांनी व्यक्त केली.
            प्रारंभी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रमेश भताने यांनी सादरीकरणाद्वारे खरीप हंगामपूर्व तयारीची सविस्तर माहिती दिली. खरीप हंगामात प्रामुख्याने बाजरी, सोयाबीन, तुर आणि कापुस या पिकाचे उत्पादन घेतले जाते.गेल्या तीन वर्षात 2016-17 हे वर्ष सोडले तर कमी पाऊसमानामुळे कायम उत्पादकता खालावली  होती. यावर्षी खरीप हंगामात सुधारणा अपेक्षित असून मागील दहा वर्षातील पिक क्षेत्रातील बदलाचा आढावा घेतलाअसता कापूस पिकामध्ये  यंदा दुप्पट वाढ दिसून येते. याशिवाय खरीप ज्वारीमध्ये 3पट आणि बाजरी पिकामध्ये 2 पट घट दिसून येत आहे. प्रामुख्याने  हलक्या जमीनीवर कापूस व सोयाबीन पेरणी वाढल्याने उत्पादनात घट दिसून येत असल्याचा  अंदाज आहे. यावर्षी खरीप हंगामासाठी 7 लाख 54 हजार 551 हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरी क्षेत्राच्या 115 टक्के क्षेत्रावर पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे. यासाठी महाबीज आणि खाजगी कंपन्यांकडून एकुण 70 हजार 399 क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. तसेच 2लाख44 हजार 834 मेट्रीक टन खताची मागणी  असून मागील वर्षीचा 31 हजार 40 मेट्रीक टन खताचा साठा शिल्लक असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.
            या बैठकीत कृषी निविष्ठा केंद्रामार्फत शेतकऱ्यांना कॅशलेस व्यवहाराची सुविधा देण्यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात 7  केंद्रचालकांना पीओएस मशिनचे वितरण खा.डॉ.मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अशा प्रकारे जिल्ह्यात 600 मशिनचे वितरण येत्या आठवडाभरात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी  यावेळी दिली.

            यावेळी बैठकीत लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सुचनांची नोंद घेऊन कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीस कृषी विभागासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शुक्रवार, २१ एप्रिल, २०१७

मे महिन्यासाठी बीड जिल्ह्याला 6 हजार 74 क्विंटल साखर मंजूर



          बीड, दि.21 :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एनसीडीईएक्स-ई मार्केटस् लिमिटेड मार्फत ई-लिलावाद्वारे बीड जिल्ह्यासाठी माहे मे 2017 साठी 6 हजार 74 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर केलेले असून साखर वाहतूक पुरवठादार म्हणून गुरु गणेश ट्रेडिंग कंपनी बीड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

          गुरु गणेश ट्रेडिंग कंपनी बीड यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणाचे शासकीय धान्य गोदामात साखर  पुरवठा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने माहे मे 2017 साठी 6 हजार 70 क्विंटल मंजूर असलेले साखर नियतन जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे. बीड 1 हजार 324, गेवराई 959, माजलगाव 295, वडवणी(चिंचवण) 249, धारुर 333, अंबाजोगाई 440, केज 688, परळी वैजनाथ 617, पाटोदा 321, आष्टी 470, शिरुर कासार 374 क्विंटल याप्रमाणे तालुक्यांना साखर नियतन पोहोचविण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी,बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.

जिल्ह्यात स्वाईन फ्लु रुग्णांसाठी स्वतंत्र कक्षाची स्थापना



            बीड, दि. 21 :- जिल्ह्यात आढळुन येत असलेल्या स्वाईन फ्लु रुग्णांसाठी बीड जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयासह 5 ठिकाणी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई आणि जिल्हा रुग्णालय,बीड तसेच अधिनस्त 13 उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, 28 प्राथमिक आरोग्य केंद्र असे एकुण 42 स्क्रिनिंग सेंटर आहेत. स्वाईन फ्लु रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयासह स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण वैद्यकिय महाविद्यालय व रुग्‍णालय अंबाजोगाई तसेच उपजिल्हा रुग्णालय परळी,केज आणि गेवराई या 5  ठिकाणी स्वतंत्र विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

            स्वाईन फ्लूबाबत जनतेस आरोग्य शिक्षण महत्वाचे असून सध्या आढळून येत असलेल्या स्वाईन फ्लूची प्रकरणे पाहता सर्वसामान्य जनतेसाठी वैयक्तिक पातळीवर स्वाईन फ्लू प्रतिबंधाच्या महत्वपूर्ण उपाययोजना नव्याने सांगणे आवश्यक आहे. विशेषत: खालील संदेश आपल्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचतील याची खबरदारी घ्यावी. स्वाईन फ्लू टाळण्यासाठी हे करा वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा, पोष्टिक आहार घ्या, लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यासारख्या आरोग्यदायी पदार्थाचा आहारात वापर करावा. पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या, तसेच  भरपूर पाणी प्यावे. याबरोबरच स्वाईन फ्लू टाळण्यासाठी हस्तांदोलन करुन नका, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका, डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषध घेऊ नका, आपल्याला फ्लू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, या मार्गदर्शक सुचनांचा सुयोग्य उपयोग करुन फ्लू प्रतिबंध व नियंत्रणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे बीड जिल्ह्यातील जनतेला करण्यात येत आहे.

गुरुवार, २० एप्रिल, २०१७

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राज्यभरातील सहा जिल्ह्यात 1 मे पासून पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम - गिरीष महाजन

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान
राज्यभरातील सहा जिल्ह्यात 1 मे पासून
                           पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम                                                                        - गिरीष महाजन
                        - मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी राज्य व जिल्हा स्तरावर समिती स्थापन
                        - नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यांचा समावेश
                        - विविध वीस आजारासंबंधीची तपासणी होणार
                        - तपासणीनंतर गरजूंना मोफत उपचार करण्यात येणार

            बीड, दि. 20 :- राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना विनामूल्य वैद्यकीय सेवा देऊन स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असून या अभियानाअंतर्गत राज्यातील सहा जिल्ह्यात येत्या 1 ते 27 मे 2017 दरम्यान पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित रुग्णांवर पुढील तपासणी शासकीय योजनेतून मोफत होणार आहे. या मोहिमेसाठी संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी नियोजन करावे, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिल्या.
            पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र अभियानांतर्गत नाशिक, पालघर, अकोला, बीड, चंद्रपूर व सांगली या सहा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. महाजन यांनी या जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून सूचना दिल्या. यावेळी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, आरोग्य विभागाचे संचालक सतीश पवार, आयुषचे संचालक श्री. कोहली, सर ज.जी. समूह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. महाजन म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतील स्वस्थ महाराष्ट्र घडविण्यासाठी पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिम राबविण्यात येत आहे. आरोग्य पूर्व तपासणीमुळे रुग्णांच्या आजाराची माहिती मिळाल्यानंतर शासनाच्या उपलब्ध योजनांमार्फत त्या रुग्णांना योग्य ते पुढील उपचार, शस्त्रक्रिया संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात येतील. यासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येक विभागातील एक असे सहा जिल्हे घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील मोहिमेनंतर पुढील कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.     
पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेंतर्गत श्वसनाचे विकार, पोटाचे विकार, हृदयरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, मेंदूचे विकार, मूत्ररोग आदी वीस  विषयांतील आजारांसंदर्भातील पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहिम राबविण्यासाठी राज्य स्तरावर वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये सार्वजनिक आरोग्यमंत्री सहअध्यक्ष आहेत. तर जिल्हास्तरावर पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्यामध्ये सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी यांचा समावेश आहे. या मोहिमेची सुरुवात महाराष्ट्र दिनी म्हणजे 1 मे रोजी संबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्री महोदयांच्या हस्ते करावी, असे यावेळी श्री. महाजन यांनी सांगितले.
श्री. महाजन म्हणाले की, या अभियानांतर्गत संबंधित जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सा, जिल्हा वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालये या मोहिमेत सहभागी होणार आहेत.  या मोहिमेत सहभागी रुग्णांची विषयक माहिती ऑनलाईन ठेवण्यात यावी. तसेच तपासणी केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र रुग्ण सहायता कक्ष स्थापन करण्यात यावे. तसेच गरजू रुग्णांना शासकीय योजनांमधून पुढील उपचार करण्यात येणार आहेत. ज्यांना सध्याच्या योजनांमधून लाभ मिळू शकणार नाही, त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून त्या जिल्ह्याच्या ठिकाणीच उपचारासाठी मदत मिळण्यासाठीही सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक संस्था, अशासकीय संस्था व सामुदायिक सामाजिक दायित्व यांची मदत घेण्यात येणार आहे.
आरोग्य पूर्व तपासणी मोहिमेतील रुग्णांच्या आजारासंबंधी संशोधन करून शासन स्तरावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचे नियोजन राज्यस्तरीय समिती करणार आहे. या मोहिमेच्या आधारावरच राज्यात पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र योजना राबविण्यात येणार असल्याचेही श्री. महाजन यांनी यावेळी सांगितले.
आदिवासी विकास मंत्री श्री. सवरा म्हणाले की, समाजातील तळागाळातील गरजू रुग्णांना या मोहिमेद्वारे आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न केल्यास नक्कीच अभियान यशस्वी होईल.
यावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील  यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा व वैद्यकीय शिक्षण विभागातील तज्ज्ञ मनुष्यबळाचा उपयोग करून ही मोहिम यशस्वी करावी, असे आवाहन केले.

००००

बुधवार, १९ एप्रिल, २०१७

ग्रामीण डाकसेवक पदासाठी ऑनलाईन अर्ज करावेत


                    
            बीड, दि. 19 :- ग्रामीण डाक सेवक व ग्रामीण डाक सेवक शाखा डाकपाल या पदासाठी पात्र उमेदवारांनी बीड विभागाकरीता शनिवार दि.6 मे 2017 पर्यंत विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज करावेत.

            उमेदवारांनी आपला अर्ज https://indiapost.gov.in व https://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करण्यासाठीच्या अटी व सुचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि.6 मे 2017 आहे. असे मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांनी कळविले आहे.

मंगळवार, १८ एप्रिल, २०१७

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 18 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          शुक्रवार दि.21 एप्रिल 2017 रोजी औरंगाबाद येथून दैठणा (घाट)  ता.परळी येथे सकाळी 11 वाजता आगमन व हनुमान मंदिराच्या कलशारोहण कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 12 वाजता वाहनाने अंबाजोगाईकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता अंबाजोगाई येथे आगमन व श्रीमती हाबूबाई काळम पाटील बर्दापूर यांच्या नातवाच्या विवाह सोहळ्यास उपस्थिती (स्थळ-सायली लॉन,अंबाजोगाई) दुपारी 12.30 वाजता वाहनाने परळीकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता परळी येथे आगमन, राखीव व मुक्काम.

          शनिवार दि.22 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजता वाहनाने बीडकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता खरीप हंगामपूर्व बैठकीस उपस्थिती.(स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय,बीड). दुपारी 4 वाजता वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण.

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत


                    
            बीड, दि. 18 :- सामाजिक न्याय विभागाकडून सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात म्हणजेच मागासवर्गीय, पददलित, दिव्यांग, वृध्द, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मुलन इत्यादी क्षेत्रात वैशिष्टपूर्ण काम करणाऱ्या संस्थाकडून दरवर्षी प्रस्ताव मागविण्यात येतात. प्राप्त प्रस्तावांची राज्यस्तरीय समितीमार्फत छाननी करुन पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. सन 2017-18 वर्षासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कारासाठी सामाजिक संस्था व समाज सेवकांनी रविवार दि.30 एप्रिल 2017 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत.
            सामाजिक न्याय विभागाअंतर्गत समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक यांना दरवर्षी विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. सामाजिक न्याय विभागामार्फत डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड संत रविदास इत्यादी सन्माननीय व्यक्तीच्या नावाने पुरस्कार देण्यात येतात.

            पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्था यांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बीड व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, बीड (राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार) यांच्याकडे रविवार दि.30 एप्रिल 2017 पर्यंत सर्व कागदपत्रासह दाखल करावेत. अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड यांच्या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. तसेच अर्जाचा नमुना https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्जासोबत कार्य केल्याचा पुराव्याची कागदपत्रे तीन प्रतीत जोडावीत.विहीत मुदतीनंतर व विहीत नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याचीसर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, बीड यांच्याशी संपर्क साधावा.

सोमवार, १७ एप्रिल, २०१७

18 एप्रिल रोजी उष्णतेची लाट; जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचना



               बीड, दि.17 :- मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात मंगळवार दि.18 एप्रिल 2017 रोजी तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट पसरण्याची शक्यता भारत मौसम विज्ञान विभाग, मुंबई यांनी दिली असून  उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करु नये याबाबतच्या मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या असून त्याचे पालन करावे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
          उन्हाळ्यात काय करावे- तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.  बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी,बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरिरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी,तोरणी,लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करण्यात यावा. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणार घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेशे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था  करण्यात यावी. सुर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात याव. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्याकडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत.जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. 

          उन्हाळ्यात काय करु नये- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीमध्ये स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

मतदार याद्यांचा शुध्दीकरण कार्यक्रम; मतदार यादी दुरुस्तीसाठी मतदारांना आवाहन


                    
            बीड, दि. 17 :- बीड तालुक्यातील सर्व मतदारांनी रविवार दि.30 एप्रिल 2017 पर्यंत आपआपल्या भागातील बुथ लेव्हल ऑफीसरकडे मतदार यादीतील नावाची दुरुस्ती अथवा वगळणी करावयाची असल्यास विहीत नमुन्यातील अर्ज दाखल करावेत. काही अडचण असल्यास तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागातील डी.आय.माने यांच्या संपर्क साधावा व आपल्या अडचणीची सोडवणूक करावी. असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा बीडचे मतदार नोंदणी अधिकारी विकास माने आणि बीड तहसीलदार तथा सहाय्यक नोंदणी अधिकारी श्रीमती छाया पवार यांनी केले आहे.

            भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार बीड तालुक्यातील मतदार याद्यांचा शुध्दीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानूसार 228 गेवराई, 230 बीड, 232 केज या मतदार संघातील मतदारांनी आपल्या मतदार याद्याच्या शुध्दीकरणामध्ये आपल्या नावाची दुरुस्ती करावयाची असल्यास नमुना नंबर 8 फॉर्म मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा बीड तहसिल कार्यालयातील निवडणूक विभागाकडे सादर करावेत.          स्थलांतर, मयत, दुबार नाव आदि कारणामुळे नमुना नंबर 7 मध्ये माहिती भरुन द्यावी. मतदाराच्या नाव, पत्यामध्ये दुरुस्ती किंवा नाव असून फोटो नसने या कारणासाठी नमुना नंबर 8 फॉर्म भरुन द्यावा.  एका भागातून दुसऱ्या भागाकडे स्थलांतर करावयाचे असल्यास त्या भागातील रहिवासी असल्याचा पुरावा जोडून 8 अ नंबरचा फॉर्म भरावा. ज्या मतदाराचे मतदार यादीमध्ये नाव आहे परंतू मतदार यादीत फोटो नाही अशा मतदारांनी नमुना नंबर 8 भरुन देण्यात यावा यापुर्वी बीएलओ यांनी आपआपल्या भागामध्ये वेळोवेळी सुचना देवून देखील मतदारांनी फोटो दिलेले नाहीत त्यामुळे मतदारांनी तात्काळ फोटो बीएलओकडे जमा करावे अन्यथा स्थलांतर झाले आहे असे समजून फोटो नसलेली नावे वगळण्यात येतील. मयत मतदारांच्या बाबतील बीएलओ यांना माहिती पुरविण्यासाठी मतदारानी व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे.       

पोलीस कर्मचाऱ्यांच्या तणावमुक्त जीवनासाठी प्रयत्न करु - पालकमंत्री





                    
            बीड, दि. 17 :- राज्यातील शांतता तसेच कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीसावर मोठी जबाबदारी असल्यामुळे  त्यांना तणावात जीवन जगावे  लागते. पोलीसांना तणावमुक्त जीवन जगता यावे यासाठी त्यांना  आवश्यक  असणाऱ्या सर्व सोई सुविधा शासनस्तरावरुन  मिळवून  देण्यासाठी प्रयत्न करु असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी केले.
            माजलगाव येथील 12 कोटी 26 लाख 60 हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन माजलगाव ग्रामीण आणि पोलीस वसाहतीच्या इमारतीचे फित कापून उदघाटन पालकमंत्री ना. मुंडे यांच्या हस्ते  करण्यात आले यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास आमदार आर.टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, नगराध्यक्ष सहाल चाऊस, उप नगराध्यक्षा सुमनताई मुंडे, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधिक्षक दिक्षीतकुमार गेडाम आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी बोलताना ना. मुंडे म्हणाल्या की, शासनाकडून विविध योजनेच्या माध्यमातून जिल्हयासाठी मोठयाप्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात येत असून या निधीतून होणारी कामे उत्कृष्ट व दर्जेदार झाली पाहिजेत. मागील वर्षी जिल्हयात पाणी टंचाई मोठया प्रमाणात होती. जिल्हयात जलयुक्त शिवार योजनेची कामे झाल्यामुळे  जमिनीतील पाण्याचा साठा वाढल्यामुळे दरवर्षीप्रमाणे  जिल्हयाला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा  प्रश्न कमी झाल्याचे दिसून येत आहे.  बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून या रस्ते विकासाच्या कामामुळे दळणवळणाची साधने समृध्द होणार आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाल्या की, जिल्हयात पोलीस विभागाची प्रलंबित असलेली विविध कामे सोडविण्यासाठी शासनस्तरावरुन निधी उपलब्ध करुन देण्यात आला असून त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. जिल्हयातील पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारत व पोलीस निवास्थानाची कामेही हाती घेण्यात आली असून ही कामे लवकरच पुर्ण होतील.  सध्या पोलीस कर्मचाऱ्यांना 1 बीएचके निवासस्थान मिळते  हे निवासस्थान त्यांच्या कुटुंबियासाठी  अपूरे पडत असल्यामुळे यामध्ये बदल होणे आवश्यक आहे. त्यांना 2 बीएचके निवासस्थान मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. पोलीसांचे फिटनेस चांगले राहिल्यास त्यांचा जनतेवर चांगला धाक राहण्यास मदत होते. यासाठी त्यांनी काम करत असलेल्या ठिकाणी व्यायामशाळेच्या सुविधा निर्माण कराव्यात. पोलीसांनी जनतेमध्ये त्यांच्या वर्दीचा आदर राहील यादृष्टीने कामे केली पाहिजेत. कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी नागरिकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे यासाठी पोलीस प्रशासनाचे नागरिकांशी संबंध चांगले असले  पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी बोलतांना औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था आबाधीत ठेवण्यासाठी पोलीसांची भूमिका फार म्हत्वाची आहे. कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी पोलीसांना नेहमी सतर्क राहून कामे करावी लागतात तसेच पोलीस दलाच्या मुलभूत सेवा-सुविधांच्या कामांची माहिती देत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या प्रश्नांविषयी लक्ष वेधून हा प्रश्न शासनस्तरावरुन मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
            यावेळी माजलगावचे आमदार आर.टी. देशमुख यांचेही समयोचित भाषण झाले. यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना निवासस्थानाच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.

            पोलीस अधिक्षक जी. श्रीधर यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील पोलीस दलाच्या नवीन प्रशासकीय इमारती, पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यासाठी उभारण्यात येणाऱ्या निवासस्थाने व इतर सोई सुविधाविषयी सविस्तर माहिती दिली.    कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पोलीस उप निरीक्षक प्रियंका फड यांनी केले तर आभार अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांनी मानले. या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधिक्षक डॉ.हरी बालाजी एन., उप विभागीय अधिकारी महेंद्र कांबळे,  तहसीलदार एन.जी झंपलवाड,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता  पाटील आदि मान्यवर पोलीस अधिकारी  कर्मचारी तसेच प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

रविवार, १६ एप्रिल, २०१७

विविध योजनांचा घेतला आढावा ग्रामविकासाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्याची गरज - पालकमंत्री पंकजा मुंडे


बीड, दि. 16 :- बीड जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या योजनांचा आढावा घेतांना  पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्याची गरज प्रतिपादन केली.
बीड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार विनायक मेटे, जयदत्त क्षीरसागर, संगीता ठोंबरे, भिमराव धोंडे, लक्ष्मण पवार, आर.टी.देशमुख, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार आदि मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामविकास विभाग विविध योजना राबवित असल्याचे सांगून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्हा परिषदेने शौचालय बांधकामात विभागात आघाडी घेतली असून विभागात प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल अभिनंदन केले. गतवर्षी 14 टक्के काम झाले होते आतापर्यंत जिल्ह्याने 52 टक्के शौचालय बांधकाम पूर्ण केले आहे. वडवणी तालुका हागणदारीमुक्त झाला असून आणखी तीन तालुके होण्याच्या मार्गावर आहेत. या कामांमध्ये जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबतच पदाधिकारी व ग्रामपंचायतीनेही पुढाकार घ्यावा असे आवाहन पालकमंत्री ना.मुंडे यांनी केले.
स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत 11 ग्रामपंचायती पुरस्कारास पात्र ठरली असून त्यांचा महाराष्ट्र दिनी सत्कार करण्यात येणार आहे. या शिवाय रमाई घरकुल योजना, राजीव गांधी निवारा योजना, इंदिरा आवास योजना आदि योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांना हक्काचे घरकुल देण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री मुंडे यांनी या बैठकीत ग्रामविास विभागाच्या विविध योजनांच्या सविस्तर आढावा घेतला.
रुनबन मिशनचा आढावा
केंद्र शासनाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन या अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला.

या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गावांच्या समुहाचा आर्थिक, सामाजिक आणि भौतिक विकास करण्याबरोबरच शहराप्रमाणे पायाभूत सुविधा पुरविणे तसेच कृषी व संलग्न क्षेत्रांचा विशेष प्राधान्याने विकास करणे अपेक्षित आहे. यासाठी राज्यात सात गावसमुहांची निवड करण्यात आली असून बीड जिल्ह्यातील सिरसाळा क्लस्टर आणि शेजारच्या 19 गावांच्या समुहाची निवड करण्यात आली आहे. या गावसमुहाच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या योजना एक केंद्राभिमुख पध्दतीने राबविण्यात येत असून त्याचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानूसार कार्यवाही करयात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा गावसमुहाची निवड शासनाने केली असल्याचेही पालकमंत्री मुंडे यांनी सांगितले.

श्रीक्षेत्र गहिनीनाथगड परिसराच्या विकासासाठी 25 कोटीचा आराखडा - पालकमंत्री पंकजा मुंडे




बीड, दि. 16 :- बीड जिल्ह्यातील चिंचोली ता.पाटोदा येथील श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाच्या परिसर विकासासाठी 25 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड परिसराच्या विकास प्रश्नासंबंधी पालकमंत्री मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जि.प.अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार विनायक मेटे, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार भिमराव धोंडे, आमदार संगीता ठोंबरे, आमदार आर.टी.देशमुख, आमदार लक्ष्मण पवार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे आदि मान्यवर उपस्थित होते.
तिर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाची निवड करण्यात आली असून या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्यानेया परिसराच्या विकास कामांचा जवळपास 25 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी बोलतांना ना.मुंडे म्हणाल्या की, गडाच्या परिसरात भाविकांच्या सोईसुविधांसाठी रस्ते, भक्त निवास, भोजनालय, पाण्याची व्यवस्था, शौचालय इत्यादी प्रकारच्या कामांचा समावेश आराखड्यात करण्यात यावा याशिवाय गडाला जोडणाऱ्या इतर रस्त्यांच्या बांधकामाचा स्वतंत्रपणे 9 कोटी रुपयांचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार करुन शासनाला पाठवावा. त्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल असेही त्या म्हणाल्या.

सध्या गहिनीनाथगड परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरु असलेल्या 2 कोटी 87 लाख रुपयांच्या कामांचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. आराखड्याशिवाय इतर विकास कामांचे प्रस्ताव इतर विभागांमार्फत करण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले. बैठकीत  श्रीक्षेत्र नारायणगड आणि श्रीक्षेत्र कपिलधारच्या विकासकामांविषयीही चर्चा करण्यात आली.

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून शेततळ्याचे जलपुजन व नदी खोलीकरण कामाची पाहणी



बीड, दि. 16 :- बीड तालुक्यातील शहाबाजपूर येथे जलयुक्त शिवार अभियानातर्गंत डोबरी नदीचे रुंदीकरण व खोलीकरणाचे काम करण्यात आले असून या कामाची पाहणी करुन शेततळ्याचे जलपूजन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

शासनाच्या यांत्रिक विभागाकडून डोबरी नदी खोलीकरणाचे काम करण्यात आले असून या नदीचे जवळपास दिड कि.मी. खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. शहाबाजपूर येथील शेतकरी अशोकराव गोरे, दिलीप गोरे यांच्या शेतीमध्ये 60×60 मीटर आकाराचे शेततळे तयार करण्यात आले असून या  शेततळ्यास शासनाकडून 5 लाख 39 हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. तयार करण्यात आलेल्या शेततळ्यामध्ये मोठा जलसाठा निर्माण झाला असून या शेततळ्याचे जलपूजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. डोबरी नदी खोलीकरण शेततळे जलपूजन कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार, आमदार जयदत्त क्षीरसागर, आमदार विनायक मेटे, माजी आमदार बदामराव पंडित, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा परिषदेचे सभापती संतोष हंगे, राजेसाहेब देशमुख, युध्दाजित पंडित, नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज, रमेश पोकळे, सर्जेराव तांदळे, राजेंद्र मस्के, संजय मुंडे, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार  श्रीमती छाया पवार, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, सुभाष गोरे यांच्यासह पदाधिकारी अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

उष्माघातापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचना



               बीड, दि.13 :- मागील वर्षीपेक्षा या वर्षी उन्हाळ्याची सुरुवात लवकर झाली आहे तसेच मागील 2-3 वर्षापासून जिल्ह्यात व मराठवाड्यामध्ये मार्च ते मे या महिन्यात वातावरणातील तापमानामध्ये प्रचंड वाढ होत असल्यामुळे उष्माघात होऊन जिवित हानी होऊ शकते. यामुळे उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करु नये याबाबतच्या मार्गदर्शक सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या असून त्याचे पालन करावे. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात यावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
          उन्हाळ्यात काय करावे- तहान लागलेली नसली तरीसुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.  बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी,बुट व चपलाचा वापर करण्यात यावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरिरातील पाण्याचा प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी,तोरणी,लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा नियमित वापर करण्यात यावा. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणार घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेशे पिण्याचे पाणी द्यावे. घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था  करण्यात यावी. सुर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात याव. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये घेऊन नियमित आराम करण्यात यावा. गरोदर कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्याकडेला उन्हापासून संरक्षणाकरीता शेड उभारावेत.जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी. 
          उन्हाळ्यात काय करु नये- लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे. उन्हाच्या कालावधीमध्ये स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावीत. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-