बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेअंतर्गत शुक्रवारी जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र

बीड, दि. 12 (जि. मा. का.) : महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा 2022 धोरणाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत शुक्रवार, दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर रोड, बीड येथे जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे संकेतस्थळ www.mahastartupyatra.in वर नोंदणी करून, अधिकाधिक नागरिकांनी शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुशील उचले यांनी केले आहे. प्रशिक्षण शिबिरात नाविन्यता तथा उद्योजकताबाबतचे माहिती सत्र, स्थानिक उद्योजकांची व्याख्याने, तज्ञ मार्गदर्शक व सल्लागारांची सत्रे, तसेच नोंदणी केलेल्या नवउद्योजकांचे संकल्पना सादरीकरण सत्र आदी कार्यक्रमात आयोजित करण्यात येणार आहे. सादरीकरण सत्रात नोंदणी केलेल्या नागरिकांना स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय व कृषि, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छता, ऊर्जा), प्रशासन, स्मार्ट पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे प्रत्येकी 10 मिनिटाचे सादरीकरण जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर करण्याची संधी देण्यात येणार असून, यामधून जिल्हास्तरावर अव्वल 3 पारितोषिक विजेते घोषित केले जातील. त्यामध्ये प्रथम पारितोषिक रुपये 25 हजार, व्दितीय पारितोषिक 15 हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये दिले जाणार आहे. तसेच या सर्वोत्तम तीन संकल्पना विजेत्यांना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील सादरीकरण सत्रातील सर्वोत्तम 3 संकल्पनांमधून राज्यस्तरीय निवड तज्ञ समितीसमोर अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येईल. यामधून विविध 7 क्षेत्रातील राज्यस्तरीय विजेत्यांना प्रथम पारितोषिक रुपये 1 लाख, व्दितीय पारितोषिक 75 हजार रुपये तसेच सर्वोत्कृष्ट महिला उद्योजकांना 1 लाख अशी 21 पारितोषिके दि. 17 ऑक्टोबर 2022 रोजी राजभवन, मुंबई येथे राज्यपाल यांच्या हस्ते विशेष समारंभात वितरित करण्यात येणार आहेत. तसेच सदर विजेत्यांना पेटंट सहाय्य, इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल, निधीसाठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्त्वाच्या संस्था व तज्ज्ञ व्यक्तिचे मार्गदर्शन, तसेच सॉफ्टवेअर क्रेडिट्स, क्लाऊड क्रेडिट्स इत्यादी सारखे इतर लाभही पुरविण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी बाळकृष्ण यादव, जिल्हा कौशल्य विकास समन्वयक, यांच्याशी 8208369890 या क्रमांकावर संपर्क साधावा. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा