गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तालुका स्तरावर शीघ्र प्रतिसाद दल स्थापन करावे - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : पावसाळ्यात संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तहसीलदार यांच्या नेतृत्त्वाखाली तालुका स्तरावर एक शीघ्र प्रतिसाद दल स्थापन करावेत. त्यांना प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मान्सून आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड आदि व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, प्रत्येक तहसील स्तरावर प्रथम शीघ्र प्रतिसाद दल आणि जिल्हा स्तरावर द्वितीय शीघ्र प्रतिसाद दल स्थापन करावेत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, आर्थिक बळ आणि साधनसामुग्री याबाबतचा स्थानिक स्तरावर आढावा घेऊन योग्य ते नियोजन आतापासूनच करावे. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठविण्यात यावा. सदर प्रस्ताव तयार करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचा तंतोतंत अवलंब करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, मान्सून कालावधीत पाणी आणि वीज यांच्याशी संबंधित दुर्घटना घडतात. त्यामुळे संबंधितांना प्रशिक्षण देताना या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. माजलगावसारख्या मोठ्या प्रकल्पाच्या ठिकाणी 2 टीम तयार कराव्यात. एक टीम तालुका स्तरावरील असेल व दुसरी टीम स्थानिक स्तरावरील असेल. आपत्ती व्यवस्थापन ही एका विभागाची जबाबदारी नसून, याबाबत व्यापक विचार करावा. आपत्तीशी मुकाबला करताना सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले, गावातले पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्ती, साप पकडणाऱ्या व्यक्ती आदि आपत्तीशी संबंधित व्यक्तिंच्या संपर्क क्रमांकाची यादी गावनिहाय तयार ठेवावी. शीघ्र प्रतिसाद दलातील व्यक्तिंना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. वैद्यकीय पथक तयार ठेवावे. तसेच, आपत्तीशी लढण्यासाठी लागणारी साधन सामग्रीची मागणी करावी. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सदर शीघ्र प्रतिसाद दलामध्ये गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याबाबत सूचना केल्या. याशिवाय प्रत्येक गावस्तरावर एक पथक तयार करावे, त्यामुळे आपत्ती टाळण्यासाठी तात्काळ मदत होईल, असे ते म्हणाले. बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, अधीक्षक अभियंता तथा प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, मच्छिमार समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा