शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

हवामान खात्याने दिली माहिती मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता




बीड, दि. 30 :- बीडसह मराठवाड्यातील जिल्ह्यामधील काही भागात 1 ऑक्टोंबर 2016 च्या सकाळपासून 48 तासात जोरदार पर्जन्यवृष्टी होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला असून बीड जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 30 :- राज्याचे उर्जा, नवीन व नवीकरणीय उर्जा, राज्य उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          सोमवार दि.3 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता जळकोट येथून वैद्यनाथ कारखाना परळी जि.बीड येथे आगमन व राखीव. सकाळी 11ते 12.30 वाजता परळी औष्णिक केंद्राची पाहणी व औष्णिक विद्युत संच सुरु करण्याचा कार्यक्रम. दुपारी 12.30 ते 1 वाजता पत्रकार परिषद. दुपारी 1 ते 2 वाजता संगम ता.परळीकडे मोटारीने रवाना संगम येथील 33 केव्ही उपकेंद्राचे उदघाटन व इंजेगाव व गोवर्धन येथील 33 केव्ही उपकेंद्र उदघाटनाची घोषणा. दुपारी 2 वाजता परळी येथून हेलिकॉप्टरने बीडकडे रवाना. दुपारी 2.30 वाजता बीड येथे आगमन व मांजरसुभा ता.बीडकडे मोटारीने रवाना. दुपारी 3 वाजता मांजरसुंभा येथे आगमन व 220 केव्ही उपकेंद्राचे उदघाटन. दुपारी 4 वाजता मांजरसुंभा येथून मोटारीने बीडकडे रवाना. दुपारी 4.30 वाजता बीड येथे आगमन व राखीव. दुपारी 4.45 वाजता बीडहून हेलिकॉप्टरने औरंगाबादकडे रवाना होतील.

जिल्हयातील विकास कामांना गती दयावी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचे निर्देश



बीड, दि.30 :- बीड जिल्ह्यातील विविध विभागांनी विकास कामांना अधिक गती दयावी असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
            पालकमंत्री पंकजा मुंडे यांना महत्वाच्या बैठकीसाठी अत्यंत तातडीने मुंबईला जावे लागल्याने त्यांच्या सुचनेनूसार पुर्वनियोजित बैठकीत बीड जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार भिमराव धोंडे, आमदार आर.टी.देशमुख, आमदार लक्ष्मण पवार, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान संचालक श्रीमती विमला, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
            निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी जिल्ह्यातील पर्जन्यवृष्टी आणि धरणातील पाणी साठ्याची तसेच पिक परिस्थिती व नुकसान भरपाई संबंधी माहितीचे सादरीकरण केले. पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे प्रतिनिधिकस्तरावर सर्वेक्षण सुरु आहे तसेच एनडीआरएफ नूसार नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. सर्वस्तरावरील अहवाल 3 ऑक्टोंबर पर्यंत प्राप्त होणार आहेत. असे सांगून सर्व बाधितांना नियमानूसार आवश्यक नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
            महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्यस्तरीय संचालक श्रीमती विमला यांनी अभियानाची सविस्तर माहिती सांगितली. दिनदयाळ ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम राबवून बचतगटांना कौशल्य प्राप्त करुन देण्यात येणार आहे. बचतगट आणि महिलांचे सक्षमीकरण करण्याचे मोठे काम या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. बचतगटांना सहाय्य करण्यासाठी ग्रामीण विकास विभाग शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचे एकत्रित लाभ देण्याचा प्रयत्न करीत आहे. शासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या अभियानात जास्तीत जास्त लाभार्थी सहभागी होतील व ग्रामीण विकास साधता येईल या दृष्टीने प्रयत्नशील राहावे. बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. विविध विभागही त्यांच्याकडील सेवावस्तू अशा बचतगटाकडून घेत आहेत असे सांगून महिला किसान, मुद्रा योजना आदि योजनांची माहिती श्रीमती विमला यांनी यावेळी दिली.
            स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत यावर्षी  1 लाख शौचालय बांधण्याचा निर्धार केला असून नाते जबाबदारीचे हा उपक्रम राबवून सर्वांना शौचालय बांधण्याचा आग्रह करण्यात येत आहे. 2 ऑक्टोबर रोजी सर्व गावात ग्रामसभा घेण्यात येणार असून या ग्रामसभेत स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असून सर्व गावात शौचालये बांधण्याचा निर्धार करण्याची अपेक्षा आहे. असे सांगून जिल्हाधिकारी राम यांनी स्वच्छता अभियानाचे महत्व स्पष्ट करुन जिल्ह्यात अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.

या बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील रस्ते-पुलांच्या दुरुस्ती, शाळा खोल्यांचे बांधकाम, महावितरणची प्रलंबित कामे, सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे तसेच बाधित क्षेत्रातील मदतीचे वाटप इत्यादी विषयी मुद्दे मांडले. याविषयी बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य ते निर्देश देण्यात आले. भारतीय सैन्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरूध्द केलेल्या कारवाईबदल यावेळी अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. 

जलसंचयाचे जतन - संवर्धन करुन जिल्ह्याचा विकास साधावा - पालकमंत्री पंकजा मुंडे






बीड, दि. 30 :- एखाद्या शासकीय योजनेला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभाला तर योजना किती चांगल्या पध्दतीने यशस्वी होते याचा परिचय जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून आपणा सर्वांना आला आहे. परतीच्या पावसाने जिल्ह्यातील सर्वत्र मुबलक पाणीसाठा निर्माण झाला असून आता याचे जतन आणि संवर्धन करुन जिल्ह्याचा सर्वांगिण विकास करणे हे आपले कर्तव्य आहे असे मत राज्याच्या ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
परळी तालुक्यातील धर्मापूरी येथे गावतलावाचे जलपुजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुलचंद कराड हे होते तर पंचायत समिती सभापती बिभीषण फड, शिवाजी गुट्टे, नामदेव आघाव, नेताजी देशमुख, ईश्वर क्षीरसागर आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जिल्ह्याला तीन वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागला. कायमस्वरुपी दुष्काळ निवारण करण्यासाठी आणि गावशिवारात पाणी उपलब्ध होण्यासाठी शासनाने राज्यात जलयुक्त शिवार ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना सुरु केली आणि या योजनेला राज्यासह जिल्ह्यातही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील नदी, नाले, तलाव आणि प्रकल्पातील गाळ काढणे, रुंदीकरण, नाला बांध बंदीस्ती करणे आदी कामे मोठ्या प्रमाणावर करण्यात आली. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि परतीच्या चांगल्या पावसाने या कामांमध्ये मुबलक जलसाठा निर्माण झाल्याने जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठा निर्माण झाला असून याचा फायदा जिल्ह्यातील शेती आणि उद्योग धंद्यांना व व्यापाऱ्यांना निश्चित होणार आहे असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
राज्य शासन ग्रामविकासासाठी विविध योजना राबवित असून यामध्ये रस्ते, शिक्षण, पाणी पुरवठा, आरोग्य आदी बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. योजना ग्रामीण भागामध्ये राबविण्यासाठी निधीची कोणत्याही प्रकारची कमतरता भासणार नाही यासाठी जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी दक्ष असून याबाबत पाठपुरावा करीत आहे. परंतु गाव पातळीवर होणारी ग्राम विकासाची कामे दर्जेदार आणि दीर्घ काळ टिकणारी होण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी दक्ष राहून समन्वयाने काम करावे असे आवाहनही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
धर्मापूरी गावतलावातील पाणीसाठ्यामुळे या परिसरातील गावांना फायदा होणार आहे असे सांगून धर्मापूरी येथील किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी धर्मापूरी गावतलावातील जलसंचयाचे विधीवत जलपुजन केले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार विद्याचरण कवडकर, गटविकास अधिकारी श्री. केंद्रे यांच्यासह, अधिकारी, पदाधिकारी, धर्मापूरीसह पंचक्रोशीतील नागरिक, महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन आर.बी. फड यांनी केले.

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रृती प्रकल्पातील जलसंचयामुळे शेती-उद्योगांना चालना मिळण्यास मदत- पालकमंत्री






            बीड, दि.29 :- परतीच्या दमदार पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंचय निर्माण झाला असून जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रृतीही सर्वांसमोर आली आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह, व्यापार व उद्योग धंद्यांना होऊन जिल्ह्याची विकासाकडे होणारी वाटचाल अधिक जोमाने होण्यास निश्चितच मदत होईल असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
            परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरण येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव, संचालक जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अशोक जैन, श्रीहरी मुंडे यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, सतत दुष्काळाचा सामना करण्याच्या बीड जिल्ह्याचा पाणीप्रश्न परतीच्या जोरदार पावसाने मिटला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडूंब भरले असून नदी-नाले खळखळून वाहत आहे. हे पाहून मला मनस्वी आनंद होत आहे. जिल्ह्यातील या मुबलक जलसंचयामुळे शेतकऱ्यांसह व्यापार व उद्योग धंद्यानाही नवसंजीवनी मिळणार आहे. या माध्यमातून जिल्ह्याची विकासाकडे होणारी वाटचाल अधिक जोमाने होईल यात शंकाच नाही अशी ग्वाही देऊन अशीच कृपादृष्टी जिल्ह्यावर राहू दे अशी प्रार्थना प्रभू वैद्यनाथांच्या चरणी केली.
            जलयुक्त शिवार योजनेला जनतेचा उर्त्फुत सहभाग लाभल्याने ही योजना खऱ्या अर्थाने शासनाची, प्रशासनाची आणि जनतेची करण्यामध्ये आमच्या सरकारला यश आले आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत मोठ्या प्रमाणावर कामे झाली असून यावर आतापर्यंत 65 कोटी रुपये खर्च झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानाला जनतेने दिलेल्या प्रतिसाद बद्दल पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जनतेचे आभार मानले आणि जिल्ह्यात ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या शासकीय, यंत्रणा व सेवाभावी संस्थांचे अभिनंदन केले.
            जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला असून आता शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी आणि पुढाकार घ्यावा असे आवाहनही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

            यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विधीवत जलपुजन करण्यात आले. या कार्यक्रमास जलसंपदा विभागाच्या अधिक्षक एस.एन. जगताप, माजलगाव पाटबंधारे विभाग परळीचे कार्यकारी अभियंता डी.एच. शिंदे, शाखा अभियंता टी.जे.फारुकी यांच्यासह वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सदस्य, नागरिक उपस्थित होते.

महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण अल्प असल्यामुळे स्त्रियांच्या आजारात वाढ - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे






            बीड - बीड जिल्ह्यातील महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण 7 ते 10 मि.ग्रॅमच्या आत असल्यामुळे स्त्रियांमधील वेगवेगळ्या आजारांमधील वाढ होत असून जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात महिला रक्ताच्या क्षय रोगाने पिडित असल्याची चिंता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यांनी आज व्यक्त केले.
            माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने शिरुर तालुक्यातील रायमोह येथे दोन दिवसीय प्रजनन, माता, नवजात शिशु आणि किशोरवयीन मुलांचे  आरोग्य या विषयी आयोजित विशेष जनजागृती अभियानात ते बोलत आहे. या कार्यक्रमाला शिरुर पंचायत समितीच्या सभापती मंदाताई केदार, उपसभापती जालिंदर सानप, रायमोहच्या सरपंच मेहरुनीसा शेख, रायमोहा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.हुबेकर, शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भारत धिवरे, तालुका आरोग्य अधिकारी राजेश तांदळे, ग्रामसेवक डी.एल.भवर, जालिंदर विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.खोले यांची प्रमुख उपस्थित होती.
            ते पुढे म्हणाले की, स्त्रियांनी शासकीय रुग्णालयातून आपली तपासणी करुन घ्यावी.त्यासाठी लागणारी औषधी सरकारी रुग्णालयात उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. माता आणि बालक मृत्युचे प्रमाण टाळण्यासाठी उपचाराबरोबरच गरोदर मातेची काळजी घेऊन तिला सकस आणि चौरस आहार दिला तर जन्माला येणारे बाळ सुदृढ जन्माला येईल असेही ते म्हणाले.
            अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजय कदम यांनी बाळाचे आणि किशोरवयीन मुलांच्या आरोग्याविषयी माहिती देताना किशोरवयीन अवस्थेतील मुलांनी व्यायामाबरोबरच भरपूर आहार घ्यावा आणि बाहेरचे तळलेले पदार्थ खाणे टाळावे तसेच आरोग्यमय जीवनासाठी स्वच्छता ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे ते म्हणाले.
            तत्पुर्वी आज सकाळी जालंदर उच्च माध्यमिक विद्यालयातून रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे गावातील जनतेला आरोग्य संपदेचा संदेश देण्यात आला. यावेळी महिला व बाल कल्याण विभाग, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने आपले स्टॉल उभारुन माहिती दिली. दोन दिवशीय कार्यक्रमात शाळा आणि महाविद्यालयीन‍ विद्यार्थ्यांना किशोर वयातील आरोग्य या विषयी तज्ञ डॉक्टरांकडून माहिती देण्यात आली. व  रांगोळी, सकस आहार, सुदृढ बालक आणि प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. यामधील 20 विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार संचालनालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी केले यावेळी बोलतांना त्यांनी केंद्र  सरकारच्या विविध योजनांची माहिती देवून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  रायमोह ग्रामपंचायतीचे श्री.नेमाने यांनी केले तर आभार सहाय्यक प्रचार अधिकारी सदाशिव मलखेडकर यांनी मानले.

            या कार्यक्रमाला महिला व बालकल्याण तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर विद्यार्थी आणि ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

बीड जिल्ह्यात 2.8 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



            बीड, दि.29 :- बीड जिल्ह्यात 29 सप्टेंबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 2.8 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे.  

          बीड-5.7 (644.0) पाटोदा- 6.3 (696.5), आष्टी- निरंक (521.7), गेवराई-0.4 (643.3), शिरुरकासार- निरंक (586.3), वडवणी- निरंक (970.3), अंबाजोगाई- निरंक (817.4), माजलगाव-3(954.5), केज- निरंक (761.7), धारुर- 9.3(678.6) तर परळी वैजनाथ-5.6 (742.2) पावसाची नोंद झाली असून 728.8 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 109.37 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

नगर परिषद राज्यस्तरीय संवर्गातील पदभरती; परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू



बीड, दि. 28 :- महाराष्ट्र नगर परिषद राज्यस्तरीय संवर्गातील (श्रेणी क) गट क संवर्गातील महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी (स्थापत्य/विद्युत) संवर्गाची लेखी परीक्षा दि.2 ऑक्टोबर 2016 रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकुण (6) उपकेंद्रामधून सकाळी 11 ते 1 या वेळेत घेण्यात येणार आहे.तसेच महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी (संगणक) श्रेणी क संवर्गाची लेखी परीक्षा दुपारी 2 ते 4 यावेळेत बीड जिल्हा केंद्रावर एकुण (3) उपकेंद्रामधून घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनूसार या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील मोबाईल,पेजर, कॅल्क्युलेटर वअभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही तसेच परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. काही उपकेंद्रावर बेंच नसल्याने, लहान बेंच असल्याने खाली बसण्याची  व्यवस्था केली असून उमेदवारांनी लिखाणाचा पुठ्ठा (रायटिंग पॅड) सोबत आणावेत. सकाळच्या परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजेपूर्वी तर दुपारच्या  सत्रातील परीक्षेसाठी दुपारी 1 वाजेपूर्वी उपस्थित रहावे. परीक्षासुरु झाल्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही. असे जिल्हाधिकारी,बीड यांनी  कळविले आहे.

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम


बीड, दि. 28 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          गुरुवार दि.29 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 2.35 वाजता भंडारवाडी  येथून हेलिकॉप्टरने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, पांगरी येथे आगमन व शासकीय वाहनाने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना स्थळाकडे प्रयाण. दुपारी 2.40 वाजता वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे आगमन व राखीव. दुपारी 3 वाजता वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना येथे वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थिती व मार्गदर्शन. दुपारी 4 वाजता वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना लिमिटेड, पांगरी येथून शासकीय वाहनाने नागापूर ता.परळीकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता नागापूर येथे आगमन व वान प्रकल्पातील पाण्याचे जलपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5.05 वाजता नागापूर येथून शासकीय वाहनाने परळीकडे प्रयाण. सायंकाळी 5.30 वाजता परळी निवासस्थानी आगमन व राखीव.

          शुक्रवार दि.30 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8.30 वाजता परळी निवासस्थानावरुन शासकीय वाहनाने धर्मापूरी ता.परळीकडे प्रयाण. सकाळी 9 वाजता धर्मापूरी येथे आगमन व गावतलावातील पाण्याचे जलपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 9.45 वाजता धर्मापूरी येथून शासकीय वाहनाने अंबाजोगाई केजमार्गे बीडकडे प्रयाण.सकाळी 12 वाजता बीड येथे आगमन व शासकीय योजनांच्या आढावा बैठकीस उपस्थिती (स्थळ-जिल्हाधिकारी कार्यालय, बीड). दुपारी 2.10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,बीड येथून पोलीस परेड ग्राऊंडकडे प्रयाण. दुपारी 2.20 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे आगमन व हेलिकॉप्टरने बावधन हेलीपॅड, पुणेकडे प्रयाण करतील.

जिल्हाधिकारी राम यांनी घेतला पुढाकार बीडच्या मिनी बायपासचा मार्ग मोकळा जमीन देण्यास शेतकरी तयार; काम सुरु





          बीड, दि.28 :- बीड शहराबाहेरुन जाणाऱ्या मिनी बायपासच्या प्रलंबित कामातील अडथळा आता दूर करण्यात आला असून पर्यायी जमिन घेऊन प्रस्तावित रस्त्यांचे काम येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करुन वाहतूकीसाठी रस्ता उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
          शहराबाहेरुन जाणाऱ्या मिनी बायपासच्या प्रस्तावित कामांपैकी बहुतांश काम पूर्ण झाले असतांना केवळ एका जमिन मालकाने 200 मीटरच्या रस्त्यांच्या कामासाठी जमिन न दिल्यामुळे रस्ता पूर्ण होऊ शकत नव्हता. मात्र जिल्हाधिकारी राम यांनी आनंदवाडी येथील त्या जमिनीला पर्याय म्हणून इतर जमिनधारक शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या संमतीने ह्या सुधारीत मार्गाने रस्त्याचे काम पूर्ण करुन मुख्य रस्त्याला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी राम यांनी प्रलंबित कामाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. संमती दर्शविलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या जमिनीची पाहणी करुन प्रस्तावित रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्याचे निर्देश दिले. या सुधारीत प्रस्तावामुळे बायपासच्या लांबीमध्ये अंदाजे 200 ते 300 मीटरची वाढ होईल. असा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नाईकवाडे यांनी यावेळी व्यक्त केला. हे काम 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करावयाचे नियोजन असल्याचे ही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले. भूसंपादनाची व इतर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश ही त्यांनी उपविभागीय अधिकारी विकास माने यांना दुरध्वनीवरुन दिले आहेत. यावेळी पंचक्रोशीतील सरपंच, शेतकरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी मिनी बायपासच्या झालेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. कुर्ला रोड ते एमआयडीसी या रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण प्रस्तावित करण्याची सुचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी शहराबाहेरील वळण रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची  अवस्था सुधारण्याची गरज प्रतिपादन केली. सध्या बिंदुसरा नदीच्या पूलावरील रस्ता वाहतूक जड वाहनांसाठी बंद करण्यात आली असल्याने मिनी बायपासचे काम जलदगतीने पूर्ण करणे गरजेचे आहे असेही ते यावेळी म्हणाले.

          बहिरवाडीचे सरपंच बाजीराव बोबडे, जिरेवाडीचे सरपंच सर्जेराव मोहिते, हनुमान क्षीरसागर, प्रकाश राका, गिरीष देशपांडे, बाळासाहेब देवकते, नितिन देवकते, श्याम सानप आदि शेतकरी, ग्रामस्थ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

पंतप्रधान पिक विमा योजनेनूसार नुकसानीचा पंचनामा कार्यपध्दती



          बीड, दि.27 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम सन 2016 करीता नुकसान पंचनामा कार्यपध्दती बाबत शासनाने सुचना दिलेल्या आहेत. त्यानूसार खरीप हंगाम सन 2016 या वर्षात ज्या शेतकऱ्यांनी विमा भरणा केला आहे त्या शेतकऱ्यांसाठी या योजनेअंतर्गत विमा संरक्षणाच्या बाबी जसे स्थानिक नैसर्गिक आपत्ती (पुराचे पाणी शेतात शिरुन पिकाचे झालेले नुकसान, गारपीट, भू-स्खलन) व काढणी पश्चात नुकसान (चक्रीवादळ व अवकाळी पाऊस) यामुळे नुकसान झाल्यास होणारे नुकसान निश्चित करण्याकरीता कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे.

          या योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 48 तासाच्या आत या बाबतची सुचना दिनांक, वेळ, नुकसानीचे कारण प्रकार व सर्वे नंबर सहित विमा कंपनी संबंधित बँक, कृषी, महसुल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाचा वापर करुन माहिती द्यावी. पिक विमा भरलेल्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी वैयक्तिकरित्या विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज (7/12 व पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरल्यास पुराव्यासह) विमा कंपनीकडे सादर करावा. बीड जिल्ह्यासाठी असलेल्या एच.डी.एफ.सी. इगो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा दुरध्वनी क्र.020-30862900 फॅक्स क्र.020-30862959, टोल फ्री क्र. 18002700700 आहे. अधिक माहितीसाठी तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन उपाध्यक्षा तथा सभापती (कृषी) जिल्हा परिषद बीड, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी तसेच बीड जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी यांनी केले आहे.

जिल्ह्यातील दोन मोठे, 11 मध्यम आणि 103 लघु सिंचन प्रकल्प पाण्याने भरले





पर्जन्य वृष्टीमुळे जलसमृध्दीचे चित्र
जिल्ह्यातील दोन मोठे, 11 मध्यम आणि
103 लघु सिंचन प्रकल्प पाण्याने भरले
- एकुण 144 पैकी 116 प्रकल्प फुल्ल !

          बीड, दि.27 :- अलिकडे झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील 144 सिंचन प्रकल्पापैकी दोन मोठे, 11 मध्यम आणि 103 लघु सिंचन प्रकल्प असे एकुण 116 सिंचन प्रकल्प शंभर टक्के पाण्याने भरले आहेत.
          बीड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून जिल्ह्याची पावसाची सरासरी 666.36 मि.मी. असतांना त्या तुलनेने आजपर्यंत 108 टक्के पाऊस झाला आहे. मागील एकाच आठवड्यात जवळपास 398 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बहुतांश सिंचन प्रकल्पात उपयुक्त पाणी साठा वाढत चालला आहे.
          जिल्ह्यात माजलगाव आणि मांजरा हे दोन मोठे सिंचन प्रकल्प आहेत. हे दोन्ही प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. माजलगावमध्ये 312 दलघमी तर मांजरामध्ये 176 दलघमी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात गोदावरी खोऱ्यातील 10 आणि कृष्णा खोऱ्यातील 6 असे एकुण 16 मध्यम प्रकल्प आहेत. त्यापैकी गोदावरी खोऱ्यातील 10 आणि कृष्णा खोऱ्यातील एक असे 11 मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. उर्वरीत 5 पैकी 1 प्रकल्प 50 ते 75 टक्के, 2 प्रकल्प 25 ते 50 टक्के आणि 1 प्रकल्प जोत्याच्या खाली पाण्याने भरला असून एक प्रकल्प पूर्णपणे कोरडा आहे.
          जिल्ह्यात एकुण 126 लघु सिंचन प्रकल्प असून त्यापैकी 103 लघु प्रकल्प पाण्याने शंभर टक्के भरले आहेत. 2 प्रकल्प 75 टक्के पेक्षा जास्त, 5 प्रकल्प 50 ते 75 टक्के, 3 प्रकल्प 25 ते 50 टक्के, 1 प्रकल्प 25 टक्के पेक्षा कमी आणि 8 प्रकल्प जोत्याच्या खाली पाण्याने भरले आहेत. या शिवाय लोणी, पिंपळा, पारगाव (जो) क्र.1 आणि क्र.2 हे चार लघु प्रकल्प कोरडे आहेत.

          144 मोठ्या-मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पात एकुण 839.45 दलघमी प्रत्यक्षात उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला असून प्रकल्पीय क्षमतेच्या तुलनेने याची टक्केवारी 94.45 टक्के आहे.

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती
- अनिल आलुरकर
                          जिल्हा माहिती अधिकारी, बीड  
       सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तीची संख्या 100 असून या योजनेविषयी ही माहिती...
     गोरगरीब मागास जनतेच्या प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासन सदैव विविध योजनेच्या माध्यमातून प्रयत्नशील असते. मागास मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष योजना राबवितांना त्यांच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्यात येते व त्यांना अन्य सुविधा देवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाते.
          महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे शैक्षणिक सत्रात देशांतर्गत विविध शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौध्द विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या राजर्षी शाहु महाराज शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
       अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी व अनुसूचित जाती, नवबौध्द असावेत. विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 4.50 लाख रुपये असावी. अर्जदार संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शिकत असावेत. विद्यार्थ्यांनी 10 वी व 12 वीची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ अथवा राज्यातील अन्य परीक्षा मंडळाकडून उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदार विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी 12 वी व सीईटी प्रवेश पात्रता परिक्षेत 55 टक्के तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत 50 टक्के गुण मिळविलेले असावेत.
शिष्यवृत्तीची संख्या व तपशिल
          या योजनेअंतर्गत पात्रताधारक विद्यार्थ्यांमधून 100 विद्यार्थ्यांची शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येऊन त्यांना पुढीलप्रमाणे फायदे उपलब्ध होतील. शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क, जिमखाना, ग्रंथालय व संगणक शुल्क. शैक्षणिक संस्थेतील वसतीगृह व भोजन शुल्क. संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहात जागेअभावी प्रवेश न मिळाल्यास संस्थेने आकारलेले वसतिगृह व भोजन शुल्क, शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके, शैक्षणिक साहित्य व इतर शैक्षणिक खर्चापोटी वार्षिक 10,000 रु. आदि‍ फायदे उपलब्ध करुन दिले जातात.

माहिती व तपशिलासाठी संपर्क
          योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र  शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभागाच्या www.maharashtra.gov.in/career,  http://mahaeschool.maharashtra.gov.in अथवा  www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी अथवा आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय- महाराष्ट्र राज्य 3, चर्च पथ, पुणे-411001 यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
          बीड जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या पात्रताधारक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह शिक्षण घेण्यासाठी या राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.



                                                      

बीड जिल्ह्यात 1.3 मि.मी. सरासरी पावसाची नोंद

बीड जिल्ह्यात 1.3 मि.मी.
                                         सरासरी पावसाची नोंद   

          बीड, दि.27 :- बीड जिल्ह्यात 27 सप्टेंबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 1.3 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे.

बीड-1 (632.9) पाटोदा-2.5 (690.3), आष्टी-4.9(521.7), गेवराई-निरंक (642.9), शिरुरकासार- निरंक (586.3), वडवणी- निरंक (962.8), अंबाजोगाई- निरंक (817.4), माजलगाव-1.5(950.7), केज- निरंक (761.7), धारुर- निरंक (669.3) तर परळी वैजनाथ-4.6 (736.6) पावसाची नोंद झाली असून 724.8 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 108.77 टक्के पावसाची नोंद झाली आहे.  

सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

रायमोह येथे 28 आणि 29 सप्टेंबरला माता-बाल आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्याविषयी जनजागृती कार्यक्रम


केंद्र सरकाचे क्षेत्रीय प्रचार संचालनालय आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्यावतीने
रायमोह येथे 28 आणि 29 सप्टेंबरला माता-बाल आणि
किशोरवयीन मुलांचे आरोग्याविषयी  जनजागृती कार्यक्रम

बीड, दि.26:- केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील क्षेत्रीय प्रचार संचालनालय तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने बीड जिल्ह्यातल्या शिरुर कासार  तालुक्यातील रायमोह येथे प्रजनन, माता, नवजात शिशू, बाळ आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्याविषयी  विशेष जन-जागृती  अभियानाचे आयोजन  येत्या दिनांक 28 व 29  सप्टेंबरला करण्यात आले आहे.
सामान्य जनतेला आई-बाळाच्या आरोग्याची तसेच सरकार राबवित असलेल्य़ा  विविध आरोग्य योजनांची माहिती मिळावी यासाठी दिनांक 28 सप्टेंबर 2016 रोजी रायमोह येथे महिला-बालकांसाठी रांगोळी स्पर्धा, सकस आहार स्पर्धा आणि सुद्दृढ बालक स्पर्धा घेण्यात येणार आहेत, आणि सांयकाळी किशोरवयीन मुलामुलींच्या आरोग्यविषयी तंज्ज्ञ डॉक्टर्स मार्गदर्शन करतील तसेत गावातील जनतेला आरोग्याची माहिती देण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी विविध जनजागृतीचे लघु चित्रपटही दाखविण्यात येणार आहेत.
          दिनांक 29  सप्टेंबर 2016 ला सकाळी 9 वाजता रायमोह गावात जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत पदधिकारी, अधिकारी तसेच ग्रामस्थ, शाळा महविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर या मुख्य कार्यक्रमास आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार भीमराव धोंडे, बीड जिल्हा  परिषदेचे अध्यक्ष विजयसिंह पंडीत, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बजरंग सोनवणे, शिरुर कासार  पंचायत समितीच्या सभापती मंदाताई केदार, उपसभापती जालिंदर सानप, जिल्हा परिषद सदस्य सौ. संगीता मदन जाधव, सरपंच मेहरुन्नीसा शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. अशोक बोल्डे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, बीड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंके, गट विकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश तांदळे, रायमोह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक हुबेकर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी एस.के. बांगर, प्रा. नागरगोजे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात आई-बाळाचे आरोग्य, मुलांचे आरोग्य, राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम, स्वच्छ भारत अभियान या विषयांवर विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमा दरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा  मान्यवरांच्या पारितोषिके देऊन सत्कार करण्यात येणार आहे.अशी माहिती भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी दिली.

सिंचन प्रकल्पांच्या सध्यस्थितीचा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला आढावा

वीजपुरवठा, रस्ते-पुल, तलावांची स्थिती
                            सिंचन प्रकल्पांच्या सध्यस्थितीचा
जिल्हाधिकारी राम यांनी घेतला आढावा
  - दुरुस्ती करण्याचे निर्देश
       - अफवांवर विश्वास ठेवू नका
        - सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

          बीड, दि.26:- बीड जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सिंचन, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, लघुसिंचन, जलसंधारण आदि विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन सर्व मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांच्या सध्यस्थितीचा आढावा घेतला. जनजीवन विस्कळीत होणार नाही यासाठी सर्व विभागांना दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
          जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे व काही ठिकाणी झालेल्या त्यापेक्षा अधिक पावसामुळे आपत्कालिन परिस्थिती उदभवली. मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पासह गावतलाव, साठवण तलाव आणि पाझर तलावांच्या सध्यस्थितीचा या बैठकीत तालुकानिहाय व विभाग निहाय आढावा घेण्यात आला. अशा सर्व सिंचन प्रकल्पाच्या ठिकाणी संबंधित विभागाची यंत्रणा सतत कार्यरत राहिल याची दक्षता घेण्याचे निर्देश देवून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीची कामे असल्यास तात्काळ करावीत. एखाद्या लघु प्रकल्पामुळे जिवित अथवा वित्त हानीची शक्यता असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या व स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून विभागांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही निर्देश त्यांनी दिले.
          जिल्ह्यातील वीजपुरवठ्याचा व नुकसानीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राम यांनी महावितरणने जिल्ह्यातील वीजपुरवठा अखंडीत राहिल याची दक्षता घ्यावी आणि वीजसंयत्र व सामुग्रीचे नुकसान झाले असल्यास दुरुस्तीची व पर्यायी व्यवस्थेची कारवाई करावी असे निर्देश दिले. महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनुले यांनी वीजेच्या 150 खांबांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी व्यक्त केला.
          जिल्ह्यातील रस्ते-पुलांच्या स्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राम यांनी सार्वजनिक बांधकाम व इतर विभागांना रस्त्यांच्या व पूलांच्या तात्काळ दुरुस्तींचे निर्देश दिले. याशिवाय रस्ता-पुलावरुन वेगाने पाणी वाहत असतांना नागरिकांनी वाहतूक करु नये याबाबत जनजागृती करण्यात यावी. अशा धोकादायक रस्ते-पुलांची वाहतूक बंद करणे हिताचे राहिल असाही मनोदय जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी व्यक्त केला. थोडी गैरसोय झाली तरी दुर्घटना टाळता येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे असे सांगून त्यांनी इतर सर्व विभागांच्या आपत्ती निवारणाच्या कामाचा आढावा घेतला. आज व 29 तारखेलाही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्ष रहावे कोणत्याही प्रकारची रजा उपभोगू नये तसेच मुख्यालय सोडू नये अशा सुचना देवून जिल्हाधिकारी राम यांनी आपत्कालिन परिस्थितीत जवळपास सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मात्र काही जण निष्काळजीपणा दाखवत असून त्यांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला. तलाव अथवा लघु प्रकल्पातील पाणी गावांमध्ये येऊन जिवित हानी होणार असल्याच्या अनेक अफवा मागील काही दिवसांपासून पसरविल्या जात आहेत. अशा अफवा कुणीही पसरवू नये व नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही बाबींची प्रशासनाशी संपर्क साधून खात्री करुन घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी पुन्हा केले आहे.

          या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह सिंचन, जलसंधारण, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, लघुसिंचन, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण आदि विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

बीड जिल्ह्यात 7.3 मि.मी. सरासरी पावसाची नोंद


          बीड, दि.26:- बीड जिल्ह्यात 26 सप्टेंबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 7.3 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे.

बीड-5.6 (626.4) पाटोदा-निरंक (687.8), आष्टी- निरंक (516.8), गेवराई-1.1 (642.9), शिरुरकासार- निरंक (586.3), वडवणी-4.5 (962.8), अंबाजोगाई- 17.8 (817.4), माजलगाव-7.5(949.2), केज- 9.9 (761.7), धारुर- 10.7 (669.3) तर परळी वैजनाथ-23 (732.0) पावसाची नोंद झाली असून 723.5 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 108.57 टक्के पावसाची नोंद झाली आहे.  

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

आपत्कालिन परिस्थितीवर नियंत्रण नागरिकांनी खबरदारी बाळगावी जिल्हाधिकारी राम यांचे आवाहन - प्रशासन सतर्कपणे सर्वत्र कार्यरत - एनडीआरएफची दोन पथके दाखल





बीड, दि. 25 :- बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाले, तलाव तसेच धरणे पाण्याने भरली. किंबहूना काही ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीला नागरिकांना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर तसेच प्रशासनाची संपूर्ण टिम सतर्कपणे कार्यरत असून येत्या सोमवार दि.26 सप्टेंबर रोजीच्या सकाळपासून 24 तासात मराठवाड्यातील काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता खबरदारी बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजीच्या पहाटेपर्यंत जिल्ह्यात 47.3 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 107 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. आणखी पाऊस होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व विभाग सज्ज असून जिल्हाधिकारी राम हे स्वत: याकडे लक्ष ठेवून मार्गदर्शन करीत आहेत. आज सकाळी जिल्हाधिकारी राम आणि पोलीस अधिक्षक पारस्कर यांनी जिल्ह्यातील सर्व धरणांच्या परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान माजलगाव धरणातून 84 हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून धरणातील शंभर टक्के पाणीसाठा कायम राहिल याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. या सोडलेल्या पाण्यामुळे माजलगाव जवळील सिंदफणा नदीवरील पुलाखालून जोराने पाणी वाहत असल्यामुळे धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन रस्ता वाहतूक बंद करण्यात आली आहे. गढी-गेवराईकडून येणारी वाहतूक केसापूरीजवळ आणि तेलगाव कडून येणारी वाहतूक परभणी चौक येथे बंद करण्यात आली आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर हा रस्ता वाहतूकीस खुला करण्यात येणार आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या पुलावरील जड वाहनाची वाहतूक कालपासून बंद करण्यात आली आहे. मांजरसुंबा आणि गढी येथून जडवाहतूक वळविण्यात आली आहे.
नुकसानीचे सर्वेक्षण
गेल्या तीन दिवसातील पर्जन्यवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण प्रशासनाने हाती घेतले असून संपूर्ण महसुल विभागाच्या अधिकारी -कर्मचाऱ्यांना घरे, पिक, जनावरे व खावटीचे झालेले नुकसानीचे दोन दिवसात सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. या शिवाय जिल्ह्यातील वीजपुरवठा अखंडित राहिल याची दक्षता घेऊन महावितरणने नादुरुस्त झालेल्या वीज संयत्रांची तात्काळ दुरुस्ती करावी. रस्ते आणि पुलांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन तातडीने ते दुरुस्त करण्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊलं उचलावी असे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील महसुल व पोलीस यंत्रणेने चांगला समन्वय ठेवून आपत्कालिन परिस्थिती चांगल्या पध्दतीने हाताळत असल्याबद्दल जिल्हाधिकारी राम यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून यापुढेही सतर्क राहून जनहिताच्या दृष्टीने कार्यरत राहण्याच्या सुचना दिल्या. याशिवाय पाटबंधारे विभागाच्या व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचेही त्यांनी कौतूक केले आहे. मात्र आपत्कालिन परिस्थितीचे गांभीर्य न घेता काही अधिकारी-कर्मचारी या काळात गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले असून अशा बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी भूमिका जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केली.
एनडीआरएफ कार्यरत
पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासनाच्या मदतीला एनडीआरएफची 48 जवानांची दोन पथके दाखल झाली असून 24 जवानांचे एक पथक नागझरी ता.बीड येथे पुरात वाहून गेलेल्या महिलेचा शोध घेत आहे. तर दुसरे 24 जवानांचे पथक रायमोहा ता.शिरुर येथे वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे.जिल्ह्यात पूरपरिस्थितीमूळे शनिवारी जिवित हानीच्या चार घटना घडल्या. रविवारी कन्हेरवाडी ता.परळी  येथे एका व्यक्तीचा अद्याप शोध लागला नाही.  एका व्यक्तीला जिवित बाहेर काढण्यात यश आले आहे. याशिवाय कोथरुड ता.माजलगाव येथील पुरात अडकलेल्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

येत्या काळात आणखी पर्जन्यवृष्टी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: खबरदारी घ्यावी व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

बीड जिल्ह्यात 47.3 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



          बीड, दि.25:- बीड जिल्ह्यात 25 सप्टेंबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 47.3 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे.

बीड-61.6 (626.4) पाटोदा- 27.3 (687.8), आष्टी- 25.3 (516.8), गेवराई-44.9 (641.8), शिरुरकासार- 36.7 (586.3), वडवणी-90 (958.3), अंबाजोगाई- 38 (799.6), माजलगाव-71 (941.7), केज- 67.3 (751.8), धारुर- 17.3 (658.6) तर परळी वैजनाथ-41.4 (667.6) पावसाची नोंद झाली असून 716.2 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 107.48 टक्के पावसाची नोंद झाली आहे.  

पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन



बीड, दि. 25 :- पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या हस्ते पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत, नायब तहसीलदार आर.जी. नवगिरे, ए.एम.शेख, सय्यद कलीम अहमद, एन.बी.जोगदंड यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय यांच्या यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

बीड येथील बिंदुसरा नदीचे छायाचित्रे


बीड येथील बिंदुसरा नदीचे छायाचित्रे

बीड येथील बिंदुसरा धरणाच्या चादरीवरुन पाणी वाहत असतानाचे छायाचित्रे



बीड येथील बिंदुसरा धरणाच्या चादरीवरुन पाणी वाहत असतानाचे छायाचित्रे

जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन माहिती, मदतीसाठी नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा



   बीड, दि. 24 :- जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे काही नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहे.  माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्गही सुरु होणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील नदीकाठच्या रहिवाश्यांनी सतर्क रहावे. सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी.  नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरुन न जाता अडचणींबाबत व मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  नवल किशोर राम  यांनी केले आहे.
संततधार पावसामुळे  जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होऊन काही  छोट्या-मोठ्या नदी, नाल्यांना पूर आला आहे. सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ता खचून जाणे, पूल वाहून जाणे, दरडी कोसळून अपघात होणे, रस्ता निसरडा झाल्याने वाहनांचे अपघात होणे, धबधबे आदी पाणीसाठ्यांच्या ठिकाणी बुडून अपघात होणे, असे प्रकार संभवतात. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक बाबींसाठीच  प्रवासाची  जोखीम  घ्यावी. त्यामध्येही सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. पूररेषेतील तसेच यापुर्वी सखल भागात पाणी शिरुन किंवा साचून बिकट परिस्थिती उद्भवणाऱ्या परिसरातील जोखीमीबाबत  नारिकांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी संबंधित यंत्रणांच्या सूचना, इशाऱ्यांचे पालन करावे.
अत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02442-222604, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, पोलीस नियंत्रण कक्ष- 02442 -222333 याशिवाय आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल, असेही  जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
बीड जिल्ह्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम हे बारकाईने सतत लक्ष ठेवून आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज असून अधिकारी कर्मचारी प्रसंगी कार्यरत आहेत. मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माजलगाव धरणात पाणीसाठा वाढत आहे. धरणातून पाणी सोडण्याचा प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे अवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. स्वतः ते थोड्याच वेळात माजलगावकडे रवाना होत आहेत. त्यानंतर अधिकार्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत नदीकाठच्या रहिवाशांना सावधगीरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने पुन्हा केले आहे. प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी माहिती देवून प्रशासनाला सहकार्य करीत असल्याबदलही जिल्हाधिकारी राम यांनी आभार मानले आहेत.

बीड जिल्ह्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सकाळी NDRF च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व परिस्थितीची संपूर्ण माहिती त्यांना दिली. आज रात्री NDRF ची टिम बीड येथे दाखल होईल अशी आशा आहे. यामुळे जिल्ह्यात होणा-या संभाव्य दुर्घटनांवर मात करणे अधिक शक्य होईल असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात 81.2 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



           बीड, दि.24:- बीड जिल्ह्यात 24 सप्टेंबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 81.2 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे.  
     बीड-79.6 (564.8) पाटोदा- 80.5 (660.5), आष्टी- 31 (491.6), गेवराई-72.4 (596.9), शिरुरकासार- 59.3 (549.7), वडवणी-114 (868.3), अंबाजोगाई- 90.6 (761.6), माजलगाव-114.3 (870.7), केज- 93 (684.5), धारुर- 84.3 (641.3) तर परळी वैजनाथ-73.8 (667.6) पावसाची नोंद झाली असून 668.9 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 100.38 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 


शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

विजा चमकत असताना घ्यावयाची काळजी



अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर का होईना पावसाने अलिकडे बीड जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली. अनेकांना काल रात्रीची झोप शांती व समाधानाची लागली असावी. शेतक-यांच्या जीवनातही कालचा पाउस प्रगतीची एक चाहुल देवून गेला. मुक्या जनावरांच्या तर भावना आपण व्यक्त करू शकत नाही परंतू तेही आनंदाच्या भरात असावीत कारण पिण्याच्या पाण्याबरोबरच हिरवाकंच चारा जो आता खायला मिळणारआहे.
मित्रांनो पावसाला चांगली सुरूवात झाली आहे. पावसाबरोबरच आकाशात विजा चमकण्याचे व विजा कोसळण्याचेही प्रमाण वाढत चालले आहे. रात्री पावसात हे आपणा सर्वांना जाणवले आहे. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट, वादळी वारे आणि जोडीला टपोऱ्या थेंबांची बरसात.. मान्सूनच्या आगमनाची अशी वाजतगाजत उशीरा वर्दी मिळते आणि उन्हाने तापलेल्या व निराश मनाला पावसाच्या आगमनाचा सुखद गारवा हवा-हवासा वाटत असतो आणि विजेचा लोळ पाहून पोटात भितीचा गोळाही उठत असतो. या वातावरणात सुरक्षिततेसाठी नेमकी काय दक्षता घ्यावी, याविषयी लोकांच्या मनात अनेक संभ्रम असतात. काही किरकोळ बाबींची काळजी घेतली तर, या विजांपासूनही आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. असेच काही उपाय पुढे देत आहोत.

घराबाहेर असाल तर..
-          एकाकी असलेल्या शेडखाली उभे राहू नका
-          मोकळ्या मैदानातील अथवा परिसरात केवळ एकमेव उंच असलेल्या झाडाखाली उभे राहू नका
-          धातूची कोणतीही वस्तू जवळ बाळगू नका
-          प्रवासात असल्यास पूर्णतः बंद असलेल्या वाहनात बसून राहा
-          मैदानात असाल तर वाकून अथवा केवळ गुडघ्यावर बसा. शरीराचा कमीत कमी भाग जमिनीला स्पर्श करेल, असे पाहा. जमिनीवर पूर्णपणे आडवे होऊ नका कारण ओली जमीन विजेची वाहक असते.
-          पाण्यात असाल तर झटकन बाहेर या, तसेच समुद्र किनाऱ्यावर असाल तर तेथूनही तात्काळ दूर व्हा
-          बोटीत बसला असाल तर बोटीच्या मध्यभागी वाकून बसा
-          कोणत्याही उंच ठिकाणी थांबू नका. वीज आकर्षून घेणाऱ्या उंच ठिकाणांपासून, इमारतींपासून दूर उभे राहा.

 घरात असाल तर..
-          घराबाहेर पडू नका.
-          लोखंडी पाइप, पाण्याचे नळ, स्टिलचे सिंक अशा वीजवाहक वस्तूंपासून दूर राहा
-          दारे खिडक्यांपासूनही दूर राहा.
-          दूरध्वनीचा वापर करू नका
-          कोणतेही विद्युत उपकरण (टीव्ही, मिक्सर, टोस्टर, ओव्हन आदी) वापरू नका.

दूरध्वनी अथवा मोबाइल वापराबाबत..
            विजा चमकत असताना मोबाइलवर संभाषण करावे की करु नये, याबाबत जनतेत संभ्रम असतो. याबाबतीत मोबाइल कंपन्या आणि संशोधक यांच्यातही मतमतांतरे आढळतात. पण विजा चमकत असताना कोणतीही धातूची वस्तू जवळ ठेवणे धोकादायक असल्याने साहजिकच मोबाइलही त्यामध्ये येतो. मानवी शरीर विजेचे वाहक असल्याने या धातूकडे वीज आकर्षित झाल्यास विजेचा धक्का बसू शकतो. त्यामुळे अशाप्रसंगी मोबाइलवरील अथवा दूरध्वनीवरील संभाषण टाळणे अधिक हितावह आणि सुरक्षित ठरेल.                           

                                                             -संकलन :  अनिल आलुरकर ,जिल्हा माहिती अधिकारी, बीड