गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

लोकगीतांतून लोकशाहीचा जागर स्पर्धा, 31 ऑक्टोबरपर्यंत सहभाग नोंदवण्याचे आवाहन

बीड, दि, 29 (जि. मा. का.) : लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तिंनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांनी केले आहे. आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यास नाव वगळणे, विविध घटकांना (दिव्यांग, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक) दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, हे विषय केंद्रस्थानी ठेवून गीतरचना करता येईल. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयांवर गीतरचना करून लोकशाहीसंबंधी जागृती करता येईल. स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे - सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. एकल (सोलो) आणि समूह (ग्रुप) दोन्ही प्रकारची लोकगीते पाठवता येतील. स्पर्धेचा अर्ज पुढीलप्रमाणे भरावा. यात समूह गीते पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरावा. लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी या विषयांशी संबंधित लोकगीत गाऊन त्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवावी. गीतासोबत नाच असला तरी चालेल. एका स्पर्धकाने किंवा समूहाने एकच गीत पाठवावे. आपल्या गीताची ध्वनिचित्रफीत पाठवताना, ती कमीत-कमी दोन मिनिटांची आणि जास्तीत-जास्त पाच मिनिटांची पाठवावी. ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त ५०० एमबी असावी आणि ती एमपी 4 फॉरमॅटमध्ये असावी. ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडताना, त्यावर व्यक्तिचे किंवा मंडळाचे नाव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी या विषयांवर लोकगीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल. आपली ध्वनिचित्रफीत https://forms.gle/hRoUEKUEb6bT2x4g9 या गुगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावी. ज्या स्पर्धकांना ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर), ९९८७९७५५५३ (तुषार पवार) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे. दिनांक २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. लोकगीत बोलीभाषेतले असेल तर गुगल अर्जावर त्याचा मराठीत अनुवाद करून पाठवावा. बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल. समूह लोकगीतास प्रथम क्रमांक २१,०००/- रुपये, द्वितीय क्रमांक ११, ०००/- रुपये, तृतीय क्रमांक ५,०००/- रुपये आणि उत्तेजनार्थ १००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर एकल लोकगीतास प्रथम क्रमांक ७,०००/- रुपये, द्वितीय क्रमांक ५, ०००/- रुपये, तृतीय क्रमांक ३,०००/- रुपये आणि उत्तेजनार्थ ५०० रुपयांची एकूण दहा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. एकल लोकगीतासाठी २५ पेक्षा कमी प्रवेशिका आल्यास त्यांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन न करता समूह गटांतर्गत त्यांचे मूल्यमापन केले जाईल. सहभागी सर्व स्पर्धकांना (समूह गीतात सहभागी प्रत्येकाला) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. समूहामध्ये जास्तीत जास्त पंधरा व्यक्तिंचा समावेश असावा, त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा समावेश असल्यास अधिकच्या व्यक्तिंना प्रमाणपत्र दिले जाणार नाही. विजेत्यांना बक्षिसाची रक्कम, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. आलेल्या लोकगीतांमधून सर्वोत्तम गीते निवडण्याचा, तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल. निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी / अधिकारी सदर स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, मात्र त्यांच्या साहित्याचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा