बुधवार, ३१ ऑगस्ट, २०१६

महाअवयवदान अभियानानिमित्त 1 सप्टेंबर रोजी वाकॅथॉन रॅलीचे आयोजन



माजलगाव तालुक्यातील गोदावरी पात्रात वाळू उपसा व वाहतूकीस प्रतिबंध




बीड, दि. 31 :- वर्ष 2015-16 साठी माजलगाव तालुक्यातील आडोळा, आंबेगाव, गंगामसला, सुरुमगाव, सोन्नाथडी, खतगव्हाण, छत्रबोरगाव, मोगरा, सरवर पिंपळगाव, पुरुषोत्तमपूरी, जायकोवाडी, सादोळा, हिवरा बु, डुब्बाथडी, गव्हाणथडी, कौडगाथडी, रिधोरी, राजेवाडी सांडस चिंचोली, मंजरथ, शु.ति.लिमगाव, शेलगावथडी ता.माजलगाव या रेती घाटाचे लिलाव झालेले नसून येथील रेती स्थळामधून अनाधिकृत वाळू उपसा होत असल्याचे तहसीलदार यांनी निदर्शनास आणून दिले आहे. या वाळू घाटातून अवैध वाळू उपसा होऊ नये, शासनाच्या महसूलाची हानी होऊ नये यासाठी रेतीचे उत्खनन व वाहतूक करण्यास प्रतिबंधित करणे आवश्यक असल्याने उपविभागीय अधिकारी माजलगाव यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 प्रमाण माजलगाव तालुक्याच्या हद्दीकडील रेतीघाटाच्या सर्व ग.नं./स.नं. हद्दीपावेतो, संपूर्ण शिवारामधील क्षेत्रामध्ये दि.24 ऑगस्ट ते दि.23 ऑक्टोबर 2016 सायंकाळी 6 ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी 6 या कालावधीत वाळूचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्यास प्रतिबंधित करणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील महसूल अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच विशेषरीत्या प्राधिकृत अधिकारी व कर्मचारी यांना लागू राहणार नाही. असेही आदेशात नमुद केले आहे.

ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 31 :- राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.2 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता शासकीय वाहनाने मालेगांव जि.नाशिक येथून परळी वैजनाथ येथील शासकीय विश्रामगृहात आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता परळी विधानसभा मतदार संघातील विविध गावांचा दुष्काळ पाहणी दौरा. सोईनूसार शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, बीडकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

शनिवार दि.3 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 9 ते 10 वेळेत शिवसेना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या भेटीसाठी राखीव. सकाळी 10 ते 10.45 वाजता शासकीय अधिकारी समवेत चर्चा (स्थळ-शासकीय विश्रामगृह,बीड). सकाळी 10.50 वाजता शासकीय विश्रामगृह येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता बीड जिल्हा दुष्काळ निवारणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठकीस उपस्थिती. सोईनूसार बीड येथून शासकीय वाहनाने औरंगाबाद-नांदगाव मार्गे मालेगांव जि.नाशिककडे प्रयाण करतील. 

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम ‘महाराष्ट्र माझा’ संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा


Ø  निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन
Ø  पंधरा, दहा व पाच हजार रुपयांची पारितोषिके
Ø  एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे

बीड, दि. 31:- महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे दि. 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 15 हजार रूपये, 10 हजार रूपये, 5 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी छायाचित्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
            महाराष्ट्र माझा या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, भाग्यश्री योजना, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालय आणि मुंबईतील छायाचित्रकारांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय येथे हाय रिझॉल्युशन(एचडी) छायाचित्रे dgiprnews01@gmail.comया ई मेल पत्यावर दिनांक 10 सप्टेंबर 2016 पर्यंत पाठवावीत.
राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी 5 तज्ज्ञांची समिती गठित केली असून समितीत ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठी समन्वयक वरिष्ठ  सहायक  संचालक  अजय  जाधव  (9702973946), (dloajayjadhav2012@gmail.com), सहायक संचालक सागरकुमार कांबळे (8605312555), (ksagar1983@gmail.com) यांच्याशी संपर्क साधावा.


बीड जिल्ह्यात 9.8 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



          बीड, दि.31:- बीड जिल्ह्यात 31 ऑगस्ट 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 9.8 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे.
बीड-10.4 (269.3) पाटोदा- 23.5 (367.5), आष्टी- 2.9 (307.7), गेवराई-6.8 (335.0), शिरुरकासार- 15 (298.7), वडवणी-6 (440.8), अंबाजोगाई- 7.4 (398.0), माजलगाव-7.7 (481.2), केज- 7.1 (355.1), धारुर- 16.3 (286.0) तर परळी वैजनाथ-4.4 (298.4) पावसाची नोंद झाली असून 348.9 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 52.36 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०१६

आरसेटीकडून बेरोजगारांसाठी विविध प्रशिक्षणाचे आयोजन


            बीड, दि. 30 :- ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, बीड (आरसेटी) यांच्यावतीने दि. 25 ते 30 सप्टेंबर 2016 या कालावधीत शेळी पालन प्रशिक्षण, दि. 9 ते 20 सप्टेंबर 2016 या कालावधीत चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, दि. 19 ते 24 सप्टेंबर 2016 या कालावधीत  उद्योजकता विकास प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात असून प्रशिक्षणासाठी अर्ज दि. 3 सप्टेंबर 2016 पर्यंत सादर करावेत. 

            प्रशिक्षणा दरम्यान उमेदवाराला प्रशिक्षणा सोबत योग प्रशिक्षण, व्यक्तिमत्व विकास तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरु करण्यासाठी दोन वर्ष मार्गदर्शन व पाठपुरावा करण्यात येईल. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी सुशिक्षित बेरोजगार असावा.  त्याचे शिक्षण सुरु नसावे. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे दारिद्रय रेषेखालील यादीमध्ये नाव असावे व ग्रामीण भागातील रहिवाशी असावा.  उमेदवाराचे वय 18 ते 45 दरम्यान असावे. प्रशिक्षणार्थ्यास व्यवसाय करण्याची आवड असावी  तसेच या प्रशिक्षणासाठी कमाल 35 उमेदवारांची उपस्थिती आवश्यक असून या प्रशिक्षणाचे अर्ज विस्तार अधिकारी, तालुका पंचायत समिती तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, एस.पी. ऑफीस समोर, स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखेच्यावर, बार्शी रोड,  बीड येथे उपलब्ध असून भरलेले अर्ज दि. 3 सप्टेंबर पर्यंत सादर करावेत. असे आरसेटीचे संचालक एम.पी. वाघमारे यांनी कळविले आहे. 

बीड जिल्ह्यात 11.6 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



          बीड, दि.30 :- बीड जिल्ह्यात 30 ऑगस्ट 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 11.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाची आहे.

बीड-26.4 (258.9), पाटोदा- 0.5 (344.0), आष्टी- 1 (304.8), गेवराई-32.3 (328.2), शिरुरकासार- 2 (283.7), वडवणी-14 (434.8), अंबाजोगाई- 4.6 (390.6), माजलगाव-19.3 (473.5), केज- 17.4 (348.0), धारुर- 8.7 (269.7) तर परळी वैजनाथ-1 (294.0) पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 339.1 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 423.4 मि.मी. सरासरी  पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 50.89 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

शासकीय दुध योजनेत आयटीआय उत्तीर्ण शिकाऊ उमेदवारीसाठी भरती



          बीड, दि.29 :- शासकीय दुध योजना, बीड येथे आय.टी.आय. उत्तीर्ण (बी.टी.आर.आय.नोंदणीकृत) शिकाऊ उमेदवारांची भरती 2015-16 या वर्षासाठी बुधवार दि.31 ऑगस्ट 2016 सकाळी 11 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर रोड, बीड येथे शिकाऊ उमेदवार भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दि.31 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 वाजता इच्छुकांनी  शिकाऊ उमेदवारीसाठी मुळ शैक्षणिक कागदपत्रे आणि त्याची एक छायांकित प्रतीसह औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर रोड, बीड येथे मुलाखतीस उपस्थित रहावे. कार्यालय प्रणाली प्रशासन (कोपा)- 1 जागा, प्रशितक व वातानुकुलीकरण-2 जागा, जोडारी-1 जागा,  विजतंत्री-2 जागा,   डिझेल मॅकेनिक-1 जागा याप्रमाणे आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवारांनी दि.31 ऑगस्ट 2016 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर रोड, बीड येथे मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखती द्वारे निवड झालेल्या उमेदवारांची निवड सुची त्याच दिवशी शासकीय दुध योजना, बीड येथील नोटिस बोर्डावर लावण्यात येईल. असे बीड शासकीय दुध योजनेचे उपदुग्धशाळा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

30 ऑगस्ट रोजीची वाहतुक नियंत्रण अधिसुचना




          बीड, दि.29 :- मंगळवार दि.30 ऑगस्ट 2016 रोजी बीड शहरात मराठा क्रांती मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून मोर्चाचा मार्ग सुभाष रोड- माळीवेस ते बलभिम चौक-कारंजा ते बशीरगंज चौक मार्गे शिवाजी चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालय असा असून सुरक्षीततेच्या दृष्टीने शहरातील मार्गावरील वाहतूक सुरक्षीत व सुरळीत रहावी व नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी मोटार वाहन कायदा कलम 115,116 (1)(अ)(ब) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करुन पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी पुढीलप्रमाणे वाहतूक नियंत्रण अधिसुचना जारी केली आहे. ही अधिसुचना दि.30 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत अंमलात राहील.
            सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग क्र.211 वरील मांजरसुंबा ते गढी जाण्या-येण्याचा मार्ग जड, अवजड वाहनासाठी बंद करण्यात आला असून उस्मानाबाद कडून येणारी अवजड वाहने ही मांजरसुंबावरुन नेकनूर- केज- धारुर- तेलगाव- माजलगाव-गढी मार्गे इच्छित स्थळी जातील. तर औरंगाबादडून येणारी अवजर वाहने जालना, गेवराईकडून गढी मार्गे माजलगाव- तेलगाव- धारुर-केज-नेकनूर-मांजरसुंबामार्गे इच्छित स्थळी जातील.
            बीड शहरातील महामार्गावरील जय भवानी चौक ते शिवाजी पुतळा हा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद व नो पार्कींग करण्यात आला असून वाहने जयभवानी चौक-नवगण कॉलेज-लोकसेवा मंगल कार्यालयाजवळून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह-नगर नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
            बीड शहरातील महामार्गावरील मोंढा टी पाँईंट ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाचे वाहतूकीसाठी बंद व नो पार्कींग करण्यात आला असून रिलायन्स पेट्रोलपंप-अंबिका चौक-राजीव गांधी चौक-नगर नाका मार्गे वाहने इच्छित स्थळी जातील. तसेच टी पॉईंट-जिजामाता चौक-सावता माळी चौक-मोंढा-आंबेडकर चौक मार्गे वाहने इच्छित स्थळी जातील.
            बीड शहरातील आंबेडकर चौक ते साठे चौक हा सुभाष रोड मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाच्या वाहतुकीसाठी बंद व नो पार्कींग करण्यात आला असून आंबेडकर चौक ते चांदणी चौक-नगर नाका मार्गे वाहने इच्छित स्थळी जातील. तसेच आंबेडकर चौक-मोंढा मार्गे वाहने इच्छित स्थळी जातील.
            बीड शहरातील चांदणी चौक ते बलभिम चौक ते शिवाजी चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद व नो पार्कींग करण्यात आला असून चांदणी चौक-मोमीनपूरा-बार्शी नाका मार्गे वाहने इच्छित स्थळी जातील. तसेच चांदणी चौक-आंबेडकर चौक-मोंढा मार्गे वाहने इच्छित स्थळी जातील.
            बीड शहरातील शिवाजी चौक ते नगर नाका पर्यंत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाच्या वाहतूकीसाठी बंद व नो पार्कीग करण्यात आला असून नगर नाका-राजीव गांधी चौक-अंबिका चौक-रिलायन्स पेट्रोल पंप मार्गे वाहने इच्छित स्थळी जातील तसेच नगर नाका-यशवंतराव चव्हाण नाट्यगृह-लोकसेवा मंगल कार्यालयाजवळून नवगण कॉलेज-जयभवानी चौक मार्गे वाहने इच्छित स्थळी जातील.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससाठी मार्ग
            जालना रोडकडून बार्शी रोडकडे जाणाऱ्या बसेस बसस्थानकात येऊन परत रिलायन्स पेट्रोल पंप येथून अंबिका चौक-राजीव गांधी चौक-नगर नाका-यशवंतराव चव्हाण नाट्यगृह-लोकसेवा मंगल कार्यालय-नवगण कॉलेज-जयभवानी चौक मार्गे वाहने इच्छित स्थळी जातील. बार्शी रोडकडून जालनाकडे जाणाऱ्या बसेस जयभवानी चौक-नवगण कॉलेज-लोकसेवा मंगल कार्यालय चौक-यशवंतराव चव्हाण नाट्यगृह -नगर नाका-राजीव गांधी चौक-अंबिका चौक-रिलायंन्स पेट्रोलपंप मार्गे बसस्थानकात येऊन परत जालना रोडने जातील. नगर रोडने येणाऱ्या बसेस नगर नाका-राजीव गांधी चौक-अंबिका चौक-रिलायन्स पेट्रोलपंप मार्गे बसस्थानक येथे व नगर रोडने जाणाऱ्या बसेस बसस्थानक येथून रिलायन्स पेट्रोलपंप-अंबिका चौक-राजीव गांधी चौक-नगर नाका येथून नगर रोडने जातील.

            ही अधिसुचना फायर ब्रिगेड, रुग्णवाहीका, पोलीस वाहने (कार्यक्रमानिमित्त येणाऱ्या महत्वाच्या व अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या) व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही. असे बीडचे पोलीस अधिक्षक अनिल पारसकर यांनी कळविले आहे.

बीड जिल्ह्यात 8.9 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



          बीड, दि.29 :- बीड जिल्ह्यात 29 ऑगस्ट 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 8.9 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाची आहे.

बीड-14.6 (232.6), पाटोदा- निरंक (343.5), आष्टी- 29 (303.8), गेवराई-15.3 (295.9), शिरुरकासार- 9 (281.7), वडवणी-10.5 (420.8), अंबाजोगाई- 3.8 (386.0), माजलगाव-9.7 (454.2), केज- निरंक (330.6), धारुर- 2.3 (261.0) तर परळी वैजनाथ-3.2 (293.0) पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 327.5 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 419 मि.मी. सरासरी  पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 49.15 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०१६

महाराष्ट्र केसरी सईद अली चाऊस यांच्या उपस्थितीत बीड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ






बीड, दि. 26 :- बीड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा-2016 चा शुभारंभ बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राउंडवर महाराष्ट्र केसरी सईद अली चाऊस यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन झाला.   यावेळी  जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
          यावेळी बोलताना महाराष्ट्र केसरी पै. सईद चाऊस म्हणाले की, युवकांनी खेळामध्ये करियर करावे परंतु नोकरी लागल्यास खेळणे सोडून न देता कामाबरोबरच खेळालाही तितकेच महत्व द्यावे. पोलीस दलातील खेळाडूंनी कामाबरोबरच खेळाचा नियमित सराव करुन विभागाअंतर्गत होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्या जिल्ह्याचे नांव उंच करावे असे सांगून या स्पर्धेतील खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर म्हणाले की, पोलीस विभागावर दैनंदिन कामाचा कायम ताण असतो. हा ताण दूर करण्यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी खेळ खेळल्यास त्यांचा ताण कमी होऊन  कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. खिलाडूवृत्तीने वागल्यास कर्तव्य बजावतानाही  खेळांचा कामामध्ये फायदा होतो. खेळाडू अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे व औरंगाबाद येथे होणाऱ्या महाराष्ट्र पोलीस विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये बीड जिल्हयाचे नांव चमकवावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
          प्रारंभी बीड पोलीस मुख्यालय, बीड पोलीस उपविभाग, अंबाजोगाई उपविभाग आणि आष्टी उपविभागाच्या संघांनी संचलन करुन मान्यवरांना मानवंदना दिली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वीलीत करण्यात आली व राखीव पोलीस निरीक्षक संजय पाचपोळ यांनी खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनिल शेळके यांनी केले तर आभार अपर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे यांनी मानले.  ही स्पर्धा तीन दिवस चालणार असून रविवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा समारोप बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राउंडवर बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

या स्पर्धांच्या सुरुवातीला बीड व अंबाजोगाई विभागाच्या संघांमध्ये व्हॉलीबॉलचा दर्शनी सामना झाला. पाहुण्यांनी नाणेफेक रुन संघसदस्यांचा परिचय करुन घेतला व त्यांना शुभेच्छा दिल्या.                   या कार्यक्रमास पोलीस विभाग व इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, क्रीडाप्रेमी नागरि‍क उपस्थित होते.

बीड जिल्हाधिकारी कार्यालयात भुसंपादन प्रकरणातील आक्षेप अर्जदारांची सोमवारी सुनावणी



            बीड, दि. 26 :-  राष्ट्रीय राजमार्ग क्र.211 च्या भूसंपादनाकरीता बीड तालुक्यातील संपादीत जमिनीचे मंजूर मावेजा वाटपावर आक्षेप अर्ज कार्यालयात सादर केलेल्या प्रकरणाच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भुसंपादन जायकवाडी प्रकल्प, बीड यांच्या कार्यालयात वादी व प्रतिवादी यांचे म्हणने एैकून घेण्यासाठी वेगवेगळ्या तारखांना सुनावण्या आयोजित केल्या आहेत.

            सुनावणीचा निर्णय प्रलंबित असलेल्या बीड तालुक्यातील संपादित जमिनीच्या प्रकरणातील आक्षेप अर्जदार व इतर हितसंबंधित व्यक्ती (वादी/प्रतीवादी) यांच्या सुनावणीच्या अनुषंगाने म्हणने बीडचे जिल्हाधिकारी  हे एैकुन घेणार असल्यामुळे अशा प्रकरणातील संबंधितांनी आपली बाजु मांडण्यासाठी कागदोपत्री पुराव्यासह सोमवार दि.29 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात उपस्थित रहावे. असे सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भुसंपादन जायकवाडी प्रकल्प, बीड यांनी कळविले आहे.

कर सहाय्यक परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू



            बीड, दि. 26 :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या कर सहाय्यक परीक्षा 2016 ही दि. 28 ऑगस्ट 2016 रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकूण 5 उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 2 हजार 88 उमेदवार बसलेले असून परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात  फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश जारी केला आहे.

            बीड शहरातील परीक्षा केंद्रे याप्रमाणे भगवान विद्यालय, धानोरा रोड, बीड. संस्कार माध्यमिक विद्यालय नवीन इमारत भाजी मंडई, बीड. शिवाजी विद्यालय, कॅनॉल रोड, बीड. गुरुकुल इंग्लिश स्कुल, जालना रोड, बीड या परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्य होऊ नयेत याकरीता बीडचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विकास सुर्यवंशी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील शक्तीचा वापर करुन परीक्षा केंद्राच्या परिसरात परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदरपासून ते परीक्षा संपेपर्यंत 100 मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, परीक्षार्थी यांच्या वयतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध केला आहे. तसचे परीक्षा केंद्रापासून 100 मीटर अंतराच्या परिसरात फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, इतर दळणवळण व संदेश कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेससेट, कॅल्कूलेटर, लॅपटॉप, कॉम्प्युटर बाळगण्यास तसेच झेरॉक्स, एसटीडी मशीन चालू ठेवण्यास व ध्वनीक्षेपक वाजविण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. वेळेअभावी  प्रत्येक इसमास नोटीस देणे शक्य नसल्यामुळे हा आदेश एकतर्फी लागु करण्यात येत आहे. असे बीडचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विकास सुर्यवंशी यांनी आदेशात नमुद केले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या विविध पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत


                  
          बीड, दि. 26 :- सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय कल्याण क्षेत्रात लक्षणीय व वैशिष्टपूर्ण काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना दरवर्षी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात येते. यामध्ये सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, शाहू फुले आंबेडकर पारितोषीक, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कारासाठी समाज कल्याण कार्यालय, बीड येथे दि.10 सप्टेंबर 2016 पर्यंत अर्ज सादर करावेत.

            पुरस्कारासाठी सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात म्हणजेच मागावसर्गीय, पददलित, दिव्यांग, वृध्द, व्यसनमुक्ती, अंधश्रध्दा निर्मूलन इत्यादी क्षेत्रात वैशिष्टपूर्ण काम करणाऱ्या संस्थाकडून दरवर्षी प्रस्ताव मागविण्यात येतात. प्राप्त प्रस्तावाची राज्यस्तरीय समितीमार्फत छाननी करुन पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. सन 2016-17 या वर्षात शाहु फुले आंबेडकर पारितोषिक, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे, पद्मश्री कर्मवारी दादासाहेब गायकवाड, संत रविदास पुरस्कारासाठी इच्छुक व्यक्ती, संस्था यांनी विहीत नमुन्यातील अर्ज भरुन त्यासोबत कार्य केल्याचे पुरावे इत्यादी तीन प्रतीत प्रस्ताव दि.10 सप्टेंबर 2016 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, तिसरा मजला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड येथे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावेत. विहीत मुदतीनंतर आलेल्या व विहीत नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी समाज कल्याण कार्यालय, बीड येथे संपर्क साधावा. असे बीड समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त वाय.व्ही.गायकवाड यांनी कळविले आहे.

30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत महाअवयवदान अभियानानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन


                  
          बीड, दि. 26 :- जनतेतून अवयव दानाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाने मंगळवार दि.30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2016 या कालावधीत महाअवयवदान अभियान हाती घेतले आहे. यानिमित्त जिल्ह्यात बीड शहर व तालुकास्तरावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

            मंगळवार दि.30 ऑगस्ट 2016 रोजी बीड शहरात व तालुकास्तरावर वॉकॅथॉन रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. 31 ऑगस्ट 2016 रोजी महाविद्यालयामध्ये निबंध व रांगोळी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तर गुरुवार दि.1 सप्टेंबर 2016 रोजी ज्या दात्यांनी अवयव दान व किडणी दान केले आहे अशा अवयवदान दात्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी किडणीदान करणाऱ्या व्यक्तींनी जिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधावा तसेच ज्या व्यक्तींना आपल्या मृत्युनंतर अवयवदान करावयाचे आहे त्यांनी जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांशी संपर्क साधून आवश्यक तो फॉर्म भरुन द्यावा. अवयवदानाचा अर्ज  www.dmer.org  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांनी कळविले आहे.

जीवनावश्यक वस्तुच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय दक्षता समिती गठीत


          बीड, दि. 26 :- सार्वजनिक वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तुवर देखरेख ठेवण्यासाठी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दि. 8 जुलै 2016 नूसार नामनिर्देशित केलेल्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हास्तरीय दक्षता समिती प्रवर्गनिहाय पुढीलप्रमाणे अशासकीय सदस्यांची चारित्र्य पडताळणीच्या अधिन राहून नियुक्ती केली आहे.
            बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली असून उपाध्यक्ष जिल्हाधिकारी नवल किशोर राम, विधानसभा सदस्य आमदार संगीता ठोंबरे व आमदार लक्ष्मण पवार, विधान परिषद सदस्य आमदार विनायक मेटे, सदस्य म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, अपर जिल्हाधिकारी, जिल्हा उपनिबंधक, जिल्हा प्रसिध्दी अधिकारी तर महिला प्रतिनिधी ॲड संगीता धसे, विरोधी पक्ष सदस्य संगीता चव्हाण व धम्मानंद मुंडे, अनुसूचित जाती प्रतिनिधी सदस्य अजय सवाई, स्वस्त धान्य दुकानदार संघटना प्रतिनिधी राजाभाऊ दहिवाळ, ग्राहक चळवळ सदस्य शिवाजीराव मुंडे आणि सदस्य सचिव म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी याप्रमाणे निवड करण्यात आली आहे. दक्षता समितीच्या अशासकीय सदस्यांचा कार्यकाल नियुक्तीच्या दिनांकापासून 3 वर्ष अथवा त्यांच्या जागी नवीन अशासकीय सदस्याची नियुक्ती होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत राहिल. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.
-*-*-*-*-

अवयवदान : एक सामाजिक कार्य


          
       अवयवदानाला चालना मिळावी याकरीता राज्यस्तरावर कार्यक्रम हाती घेऊन जनजागृतीसाठी महाअवयवदान अभियान सन 2016 दिनांक 30 ऑगस्ट, 2016 ते 1 सप्टेबर, 2016 दरम्यान साजरे करण्यात येणार आहे. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवू या ! असा जर विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील, अवयवदानाचा अर्ज भरतील. याचाच एक भाग म्हणून अवयवदानाचे महत्व स्पष्ट करण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे...

        अवयवदान प्रत्यारोपणाबाबत नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.एखाद्या चांगल्या व्यक्तीने जवळच्या नातेवाईकांस किडनी, यकृत दिले तर त्याच्या शरिरावर काही परिणाम होईल का?अवयव पुन्हा निर्माण होऊ शकतो का?असे काही प्रश्न आहेत. खरे तर वैद्यकीय शास्त्राने मोठी प्रगती केली असून प्रत्यारोपण प्रक्रिया अतिशय काळजीपूर्वक केली जाते.किडनी, हृदय, फुफ्फुस, यकृत, डोळे आदी अवयवांचे यशस्वीपणे प्रत्यारोपण झाल्याचे आपण माध्यमातून वाचतो. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती  बाळगण्याचे कारण नाही.
           रुग्ण दवाखान्यात भरती झाला म्हणजे त्याचे अवयव काढून घेणे, अनाथ मुले, व्यक्ती, भिकारी यांना पकडून अवयव काढून घेणे, पैशाचे आमिष दाखवून अवयव काढणे अशा प्रकारच्या घटनांमध्ये काही डॉक्टर्स व अवयवांची तस्करी करणारी माणसे सहभागी होती. त्यामुळे माणसे अपंग व्हायची, मरायची. अशा अवयव प्रत्यारोपणामध्ये गरजूंना फायदा व्हावा, त्या प्रक्रियेतील धोका कमी होऊन सुरक्षित प्रत्यारोपण होण्यासाठी मानवी उपचाराकरिता व अवयवांची व्यावयायिक विक्री थांबावी म्हणून केंद्र सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा-1994 लागू केला. मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 मध्ये अंमलात आल्यानंतर आजपर्यंत 11364 किडनी, 468 लिव्हर, 19 हृदय, 3 फुफ्फुसांचे आणि 479 डोळ्यांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना नवे जीवन देण्यात आले आहे. आताच्या स्थितीत संपूर्ण देशामध्ये सुमारे 5 लाख मुत्रपिंड, 50 हजार यकृत व 2000 हून अधिक हृदय विकारांनी ग्रस्त रुग्ण असून ते अवयव दात्याच्या प्रतिक्षेत आहेत. प्रत्यक्षात ही आकडेवारी अधिक असून त्यात रोजच्या रोज वाढच होत आहे. 
             या प्रत्यारोपण कायद्यानुसार कोणत्याही नोंदणीकृत संबंधित डॉक्टरला कुठल्याही व्यक्तीचे अवयव काढणे, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यापुर्वी त्याचे परिणाम, धोके याची माहिती रुग्णास व त्याच्या नातेवाईकास दिली पाहिजे. या कायद्यांतर्गत नोंदणी केलेल्या रुग्णालयातच शस्त्रक्रिया केल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर पीडित रुग्णासाठी अवयव देणारी व घेणारी व्यक्ती जवळचे नातेवाईक असणे गरजेचे असते. जर असे नातेवाईक नसतील तर प्रत्यारोपण समितीची परवानगी घेणे आवश्यक असते.या समितीतील सदस्यांकडून सखोल तपासणी केल्यानंतरच प्रत्यारोपणाचा मार्ग मोकळा होतो. त्याचबरोबर ज्या रुग्णावर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करायची व तो जेथे दाखल आहे त्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी प्रत्यारोपण प्राधिकरण समितीला संपूर्ण माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच संपूर्ण राज्यातील अवयवदान समन्वय करण्यासाठी मुंबई येथे झोनल ट्रान्सप्लांट कॉ-ऑर्डिनेशन सेंटर उभे करण्यात आले आहे. या सेंटरच्या औरंगाबाद पुणे, नागपूर येथे शाखा सुरू करण्यात आल्या असून अवयवदान प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचे काम केले जाते.मोठ्या शहरातील कोणत्या रुग्णालयात किती गरजू रुग्णांना अवयवाची गरज आहे. दाते कोण आहेत, याची संपूर्ण माहिती या शाखांमध्ये उपलब्ध आहे.
            प्रत्येक अवयवाच्या प्रत्यारोपणासाठी काही नियम केलेले आहेत. उदा.किडनी अवयवदानाबाबत नियम आहे की, किडनी दात्याला महिनाभर डायलिसिसवर ठेवावे लागते. पती-पत्नी किंवा रक्ताचे नातेवाईक एकमेकांना किडनी देऊ शकतात. तसेच किडनी दात्याला हा अवयव किती महत्त्वाचा आहे व तो काढल्याने शरिरावर काय काय परिणाम होतात याची संपूर्ण लेखी माहिती द्यावी लागते. 
             प्रत्यारोपण करण्यापूर्वी रुग्ण व अवयवदाता यांचे ओळखपत्र, आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधावाटप पत्रिका आदी कागदपत्रे तपासली जातात. तसेच रक्ताचे नाते ओळखण्यासाठी जन्माचा दाखला, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, रेशनकार्ड आदी पुराव्याची शहानिशा करावी लागते. ज्या रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे तेथील समन्वयक ही सर्व कागदपत्रे तपासतो.त्यानंतर प्रत्यारोपण प्राधिकरण समितीपुढे सादर करतो व त्यानंतरच प्रत्यारोपणाची परवानगी मिळते.
            अवयवदान प्रत्यारोपण प्रक्रिया अतिशय पारदर्शी ठेवावी असा नियम आहे. उदा.प्रत्यारोपण प्राधिकरण समितीकडे विविध रुग्णांची यादी असते.किती रुग्णांना कोणत्या अवयवांची गरज आहे हे नमूद असते.त्यासाठी प्रतिक्षा यादीतीलच रुग्णांना अवयवदान केले जाते. या प्रत्यारोपण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टर्स आणि त्या रुग्णालयाला लाखो रुपयांचा दंड आकारल्या जाऊ शकतो.तसेच गुन्हा सिद्ध झाल्यास डॉक्टरांनाही तुरुंगाची हवा खावी लागते.
            सध्या मुंबई शहरात जवळपास 35 रुग्णालयांनी अवयवदान प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली आहे.त्यात महानगरपालिका, सरकारी रुग्णालये, तसेच काही खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. जगामध्ये स्पेन हा देश अवयवदानात पहिल्या क्रमांकावर असून इंग्लंड, अमेरिका, हाँगकाँग, जपान आदी देशात एक लाख मृत्यूच्या मागे 50 जण अवयवदान करतात. त्या प्रमाणात भारतात हे प्रमाण खूपच कमी आहे.
            अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून रुग्णांना चांगल्या सोयी सुविधा मिळत आहेत. समाजामध्ये देखील नवनवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया, नवे उपचार याबाबत उत्सुकता असते. कुठल्याही आजारावर मात करण्याची किमया वैद्यकीय क्षेत्राने केली आहे.आजार कितीही गंभीर असो, नवे संशोधन, नव्या उपचार पद्धतीमुळे तो बरा होण्याची शक्यता ९५ टक्क्यापर्यंत गेली आहे.वैद्यकीय शास्त्राचे हे मोठे यश म्हणावे लागेल.
            पूर्वी रक्तदान, नेत्रदान करण्यास सहजासहजी कुणी व्यक्ती पुढे येत नव्हती. आता एवढी जनजागृती झाली की अनेक ठिकाणी रक्तदान शिबीरे होताना दिसतात. नेत्रदानासाठीही लोकांचा सहभाग वाढलेला आहे. तशाच प्रकारे जगभर अवयव दानाचे महत्त्व वाढताना दिसत आहे.काहीजण देहदान करून समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना पाहतो.अवयवदान म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते, किंवा ज्या व्यक्तींचा मेंदू डेड होतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या शरिरातील किडनी, हृदय, यकृत, डोळे, फुफुसे, स्वादुपिंड व त्वचा हे अवयव देणे होय. एखादी आजारी व्यक्ती आपल्या नातेवाईकांना सांगून ठेवते की, माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर दवाखान्यात द्या, देहदान करा किंवा शरिरातील किडनी, यकृत डोळे, त्वचा गरजू रुग्णांना द्या. तेव्हा गरजू रुग्णांवर डॉक्टर्स या अवयवाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करतात. त्यामुळे कुणाला किडणी मिळते तर कुणाला डोळे! किडनी, लिवरमुळे जीवनदान मिळते. मरणाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा चांगले आयुष्य जगू शकतात. हे मोठे सामाजिक कार्य म्हणावे लागेल.
            धडधाकट माणसे अपघातात मृत्यू पावतात. कुणाला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होतो. कुणाला स्मृतीभ्रंश होतो, अशावेळी त्यांच्या शरिरातील अवयव गरजूंना देणे याच्याशिवाय मोठे कार्य नाही. माणसे मरतात तेव्हा आपण एकतर त्यांना जमिनीत पुरतो नाहीतर जाळतो. तेव्हा शरिरातील चांगले अवयव नष्ट होतात. त्यापेक्षा त्यांच्या अवयव दानामुळे गरजू रुग्ण जर मरणाच्या दारातून परत येणार असेल व तो पुढे चांगले आयुष्य जगणार असेल तर अवयवदानासारखे महान काम नाही.
             सध्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी अवयव प्रत्यारोपणाद्वारे विविध गंभीर आजारावर उपचार होतात. अवयवदानाद्वारे लाईव्ह ऑर्गन डोनेशनद्वारे किडनी, लिव्हर, प्रत्यारोपण करण्यात येते. सध्या राज्यभरात जवळपास बारा हजारापेक्षा नोंदणीकृत रूग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत असून ही संख्या वाढतच आहे. शरिरातील अवयवांना कुठलाही धर्म, जात नसते. एका धर्माची व्यक्ती दुसऱ्या जाती धर्माच्या व्यक्तीला अवयव दान करू शकते. अशी अनेक उदाहरणे समाजासमोर आहेत. कुणाला किडनीची गरज होती, कुणाला यकृताची तर कुणाला डोळ्यांची ! एकमेकांना अवयवदान करताना त्यांनी फक्त माणुसकी पाहिली! अशी हजारो उदाहरणे आहेत. अवयव प्रत्यारोपण करून ते आपले पुढील आयुष्य सुखा-समाधानाने जगत आहेत.

डबेवाल्यांचा अवयवदानाचा संकल्प
            अवयवदानाचे महत्त्व नागरिकांना कळावे म्हणून मुंबईच्या डबेवाल्यांनी पुढाकार घेतला आहे.अलीकडेच सुमारे शंभर डबेवाल्यांनी अवयवदान करण्याचा निर्णय जाहिर करून अर्ज भरला. एखाद्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केल्यावर त्याच्या शरिरातील महत्वाचे अवयव नष्ट होतात, परंतु अंत्यसंस्कारापूर्वी त्या मृत झालेल्या व्यक्तीचे अवयवदान केल्यास अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. म्हणून अशावेळी वारसांनी पुढे येऊन अवयवदान केले पाहिजे, असे आवाहन डबेवाल्यांनी केले आहे.

            अवयवदान एक चळवळ म्हणून उभी राहत आहे. लोकांना या दानाचे महत्त्व कळू लागले आहे. आपले बदलते जीवन चक्र पाहता, त्याचबरोबर निसर्ग पर्यावरणातील बदल, आहारातील चटपटीत, तेलकट, खाद्य पदार्थाचा समावेश, व्यायामाचा अभाव, जंक फूडचे आकर्षण यामुळे शरीरामध्ये अनेक व्याधी निर्माण होत आहेत. तरूण वयात अनेक अवयव निकामी होत आहेत. मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, किडनी आजार, यकृतात बिघाड अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. काही आजार असे आहेत की, त्याचे उशीरा निदान होते. जेथे लवकर उपचार करायला हवे तेथे खूप उशीर झालेला असतो. बऱ्याचदा उपचाराची माहिती नसणे, डॉक्टरांची सोय नसणे, आर्थिक अडचण यामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता असते. म्हणूनच वेळीच निदान झाले तर अवयव प्रत्यारोपण करून आपले आयुष्य आपण सुखाने, आनंदाने अधिक काळ जगू शकतो!
            अवयवदान कुणीही करू शकते. आपल्याकडे अनेक उदाहरणे आहेत. मुलाने वडिलांना किडनी दिली.बहिणीने भावाला दिली.मुलाने वडिलांना यकृत दिले.तर फ्राँन्सिसच्या हृदयामुळे हरिप्रसादला जीवनदान मिळाल्याचे ऐकतो.कुठे ऋषिकेशच्या किडनीमुळे इब्राहिमचे आयुष्य फुलले अशा बातम्या वाचतो. अवयवदानाला ना जात आडवी येते ना धर्म! म्हणूनच अवयवदान हे जात-धर्मापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे.
            अवयवदानाची  प्रक्रिया सोपी आहे. अवयवदानाचा फॉर्म भरला असेल तर, एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यास, किंवा एखादा ब्रेनडेड झाल्यास नातेवाईकांच्या इच्छेनुसार सहा तासाच्या आत अवयवदान करता येते.किमान तीन वर्षे ते अधिक वयाच्या व्यक्तीचे अवयवदान केले जाऊ शकते. म्हणूनच आपल्या मृत्यूनंतर दुसऱ्यांसाठी अवयवदान करुन त्यांचे जीवन समृद्ध करूया. अवयवदानाचा फॉर्म भरुया!
            ही अवयवदानाची प्रक्रिया आता कायद्यामुळे अधिक सुरक्षित झाली आहे. मानवी उपचाराकरिता तसेच मानवी अवयवांची व्यावसायिक विक्री होऊ नये म्हणून मानवी अवयव काढणे, जतन करणे, प्रत्यारोपण करणे यासाठी केंद्र सरकारने मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994 लागू केला आहे. मृत्यूनंतर कुणाचे तरी जीवन फुलवू या ! असा जर विचार मनात आणला तर समाजातील हजारो नागरिक या अवयवदान अभियानात स्वत:हून सहभागी होतील. अवयव दानाचा अर्ज भरतील यात शंका वाटत नाही.

                                                     -  जिल्हा माहिती कार्यालय,बीड

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

शिकाऊ उमेदवारीसाठी जिल्हास्तरीय भरती मेळाव्याचे आयोजन



          बीड, दि.25 :-जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा कोणताही व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण, ॲपीयर प्रशिक्षणार्थी व अप्रशिक्षीत उमेदवारांसाठी ऑगस्ट सत्रामध्ये शिकाऊ उमेदवारांची भरती करु इच्छिणाऱ्या सर्व आस्थापनांचा भरती मेळावा दि.30 व 31 ऑगस्ट 2016 रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड येथे आयोजित करण्यात आला आहे.

            अप्रशिक्षीत उमेदवारांसाठी मंगळवार दि.30 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 ते 5वाजेपर्यंत आणि  प्रशिक्षीत, आयटीआय उत्तीर्ण व ॲपीयर उमेदवारांसाठी बुधवार दि.31 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगर रोड, बीड येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी मेळाव्याचा लाभ घ्यावा. असे मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र बीडचे अंशकालीन प्राचार्य यांनी कळविले आहे.

वन रँक वन पेन्शनबाबत माजी सैनिकांसाठी पुण्याला बैठक




          बीड, दि.25 :- सोमवार दि.29 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 वाजता सर्दन स्टार ऑडीटोरियम पुणे येथे न्यायाधीश श्री.एल नरसिम्मा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली वन रँक वन पेन्शनबाबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांच्या संघटनांना बैठकीस उपस्थित राहण्याबाबत जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी आवाहन केले आहे. बैठकीस उपस्थित राहणाऱ्या माजी सैनिकांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था माजी सैनिक विश्रामगृह घोरपडी, पुणे येथे मोफत करण्यात आलेली असून बैठकीस उपस्थित राहणाऱ्या माजी सैनिक संघटनांना येण्या-जाण्याचा खर्च सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्यामार्फत देण्यात येईल. असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

सप्टेंबरसाठी बीड जिल्ह्याला 8 हजार 18 क्विंटल साखर मंजूर



          बीड, दि.25 :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एनसीडीईएक्स-ई मार्केट्स लिमिटेड मार्फत ई-लिलावाद्वारे बीड जिल्ह्यासाठी माहे सप्टेंबर 2016 साठी 8 हजार 18 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर केलेले असून साखर वाहतूक पुरवठादार म्हणून मे राज ट्रेडर्स, चौसाळा जि.बीड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            मे राज ट्रेडर्स चौसाळा जि.बीड यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणाचे शासकीय धान्य गोदामात साखर  पुरवठा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने माहे सप्टेंबर 2016 साठी 8 हजार 18 क्विंटल मंजूर असलेले साखन नियतन जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पुढीलप्रमाण मंजूर करण्यात येत आहे. बीड 1 हजार 542, गेवराई 1 हजार 260, माजलगाव 396, वडवणी(चिंचवण) 324, धारुर 483, अंबाजोगाई 581, केज 981, परळी वैजनाथ 809, पाटोदा 440, आष्टी 703, शिरुर कासार 499 क्विंटल याप्रमाणे तालुक्यांना साखर नियतन पोहोचविण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी,बीड यांनी कळविले आहे.

राष्ट्रीय निवृत्ती वेतनाबाबत बीड येथे प्रशिक्षण कार्यशाळा



     बीड, दि. 25 :- जिल्हा कोषागार कार्यालयाच्यावतीने बीड जिल्ह्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांसाठी एनपीएस म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये येणाऱ्या अडीअडचणी  निवारणासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद मिळाला.
बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये या प्रशिक्षणाचा शुभारंभ भूसंपादन उपजिल्हाधिकारी कल्याण बोडके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) राजेंद्र वाघ, पाटोद्याचे उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, अपर कोषागार अधिकारी लहु गळगुंडे, अपर कोषागार अधिकारी (एनपीएस) एस.पी. कंटक, क्रक्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस हैद्राबादचे प्रतिनिधी किरण अंगडी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
या प्रशिक्षणाच्या प्रथम सत्रामध्ये क्रक्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस हैद्राबादचे प्रतिनिधी किरण अंगडी   यांनी एनपीएस म्हणजे राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या शंका व अडी अडचणींचे निराकरण केले.  

या प्रशिक्षणाअंतर्गत दुपारच्या सत्रात अंबाजोगाई, परळी, वडवणी, व शिरुर (का) या तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण झाले. यावेळी या तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रशिक्षणाच्या दुसऱ्या सत्रात  सकाळी बीड आणि  माजलगाव तालुक्यातील तर दुपारच्या सत्रात धारुर, केज, आष्टी, पाटोदा, गेवराई तालुक्यातील आहरण व संवितरण अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण  होत आहे. 

अन्नातून विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात कडक उपाययोजना - जिल्हाधिकारी नवल किशोर राम


          बीड, दि.25 :- सार्वजनिक समारंभात होणाऱ्या अन्नातून विषबाधेच्या घटना बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अशा घटना रोखण्यासाठी तालुका व गावपातळीवर कडक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले.
            जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपमुख्य अधिकारी, तहसीलदार तसेच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
            अलिकडच्या काळात अन्नातून विषबाधा होण्याच्या घटना जास्त प्रमाणात घडत असून त्यामध्ये भोजन समारंभाच्या आयोजकाकडून अक्षम्य दूर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामधून भोजनाचा आस्वाद घेणाऱ्या अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे सर्वसाधारण चित्र दिसून येत आहे. असे सांगून जिल्हाधिकारी राम यांनी अशा घटना होऊ नयेत यासाठी जनजागृतीबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे सांगितले. कायद्यानूसार अशा भोजन समारंभाच्या आयोजक संस्था अथवा व्यक्तींनी अन्न व औषध प्रशासनाकडून आवश्यक ती तपासणी करुन परवानगी घेणे आवश्यक आहे. भोजनाच्या नियोजित ठिकाणी आवश्यक ती स्वच्छता आणि व्यवस्था चोख ठेवणे गरजेचे असून भारतीय दंड विधानाच्या कलम 272 व 273 नूसार अशा विषबाधेच्या घटना घडू नयेत यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात यावी. म्हणजे भविष्यात अशा घटना घडणार नाहीत असेही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सुचित केले.
            अशा घटना घडू नयेत यासाठी जिल्हास्तरावरुन मार्गदर्शक सुचना निर्गमित करण्यात येतील. त्यानूसार उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी इतर अधिकाऱ्यांसमवेत प्रत्येक गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी व ग्रामसेवक यांची बैठक घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करुन जनजागृती करावी अशी महत्वपूर्ण सुचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी अशा घटना रोखण्यासाठी गावपातळीवर सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात यावी अशी सुचना केली.
तंबाखु नियंत्रण करा

तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन आरोग्यास हितकारक नसून या व्यसनापासून शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी दूर रहावे असे आवाहन करुन जिल्हाधिकारी राम यांनी या बैठकीत सर्व शासकीय कार्यालये व शाळांना अचानक भेटी देवून तपासणी करण्याचे निर्देश सर्व अधिकाऱ्यांना दिले. कायद्यामध्ये व्यसन करणाऱ्या नागरिकास दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार सर्व अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानूसार कायद्याची कडक अंमलबजावणी करावी असेही निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी दिले.

बीड जिल्ह्यात 2.7 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



         
बीड, दि.25 :- बीड जिल्ह्यात 25 ऑगस्ट 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 2.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाची आहे.

बीड- निरंक (218.0), पाटोदा- निरंक (339.0), आष्टी- निरंक (273.4), गेवराई-1.9 (278.3), शिरुरकासार- निरंक (272.7), वडवणी- निरंक (407.8), अंबाजोगाई- 9.2 (357.2), माजलगाव-1.3 (429.9), केज- निरंक (317.6), धारुर- 0.7 (245.0) तर परळी वैजनाथ-16.2 (277.8) पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 310.6 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 401.0 मि.मी. सरासरी  पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 46.61 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 
CYBERLAB'S  INAUGURATION BY H"BL PALAKMANTRI SMT PANKAJA MUNDE

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री.धनंजय मुंडे यांचा दौरा


                  
          बीड, दि. 24 :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार दि.26 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता पुणे येथून शासकीय मोटारीने धारुर शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 11 वाजता राष्ट्रसंत भगवानबाबा जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12 वाजता धारुर जि.बीड येथून शासकीय मोटारीने पैठण जि.औरंगाबादकडे प्रयाण करतील.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयासह विविध पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत


                  
          बीड, दि. 24 :- राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा तसेच त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी                    ' डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार ' आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवकांनी अधिक चांगल्या सेवेसाठी प्रवृत्त व्हावे तसेच त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 'डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता' व 'सेवक ग्रंथमित्र पुरस्कार ' देण्यात येत असून यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, बीड यांच्याकडे दि.10 सप्टेंबर 2016 पर्यत अर्ज सादर करावेत.

          राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील अ, ब, क आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार, 30 हजार, 20 हजार आणि 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभाग स्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 15 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येते. सन 2016-17 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहीत नमुन्यातील अर्ज दि.10 सप्टेंबर 2016 पर्यंत द्विप्रतीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बीडकडे सादर करावेत असे बीडचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी कळविले आहे.

क्रीडा दिन व क्रीडा सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन


                  
बीड, दि. 24 :-जिल्ह्यातील शाळा, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, क्रीडा मंडळ, महिला मंडळ, विविध क्रीडा संस्थानी दि.12 ते 18 डिसेंबर क्रीडा सप्ताह व 29 ऑगस्ट 2016 रोजी मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगार) यांचा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने चर्चासत्रे, उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार, मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन असल्यामुळे त्यांच्या जीवनावर व्याख्यान आणि क्रीडा वातावरण निर्मितीसाठी अनुषंगीक उपक्रम आदि कार्यक्रमाचे आयोजन करुन साजरा करावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे सोमवार दि.29 ऑगस्ट 2016 रोजी क्रीडा दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकूल येथे सकाळी 11 वाजता मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर आधारीत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.  तसेच 2015-16 वर्षात शालेय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभागी झालेल्या खेळाडूचा सत्कार करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील अशा सर्व खेळाडूंनी आपल्या वैयक्तीक अर्जासोबत सहभाग व प्राविण्य मिळविलेल्या प्रमाणपत्राची प्रत क्रीडा अधिकारी कार्यालयात दि. 27 ऑगस्ट 2016 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील क्रीडा संस्कृतीची जोपासना व जनतेमध्ये क्रीडा वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दरवर्षी क्रीडा सप्ताह व मेजर ध्यानचंद (हॉकीचे जादूगार) यांचा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास क्रीडा विभागाने सन 1997 पासून मान्यता दिली असून दि. 29 ऑगस्ट हा क्रीडा दिन आणि दि. 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत क्रीडा सप्ताहानिमित्त शाळा, महाविद्यालयांनी आयोजन करावे.           जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा, विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, क्रीडा मंडळे, युवक मंडळे, विविध संस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करुन अहवाल जिल्हा क्रीडा कार्यालयास सादर करावा. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे बीडचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी कळविले आहे. 

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा सुधारीत दौरा कार्यक्रम



बीड, दि. 24 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.25 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 3.30 वाजता परळी येथील निवासस्थानी आगमन व राखीव.

शुक्रवार दि.26 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 8.30 वाजता परळी निवासस्थान येथून धारुरकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता आगमन व संत भगवानबाबा यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थिती(स्थळ-सोमवार चौक, धारुर).सकाळी 10.15 वाजता बुवाजी पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे उदघाटन(स्थळ-कोर्ट रोड, धारुर). सकाळी 10.30 वाजता केज जिल्हा बीडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता रमाकांत मुंडे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थिती            (स्थळ-वि.दा.कराड हायस्कुल प्रांगण,केज). दुपारी 12 वाजता शासकीय वाहनाने                केज-येरमाळा-बार्शी-टेंभूर्णी मार्गे अकलूजकडे प्रयाण करतील.

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 24 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 
गुरुवार दि.25 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 3.30 वाजता परळी येथील निवासस्थानी आगमन व राखीव.
शुक्रवार दि.26 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10 वाजता केज जिल्हा बीडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता रमाकांत मुंडे यांच्या मुलीच्या साखरपुडा कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-वि.दा.कराड हायस्कुल प्रांगण,केज). दुपारी 12 वाजता शासकीय वाहनाने  केज-येरमाळा-बार्शी-टेंभूर्णी मार्गे अकलूजकडे प्रयाण करतील.

मंगळवार, २३ ऑगस्ट, २०१६

माजी सैनिकांच्या पाल्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत


                  
          बीड, दि. 23 :- जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी व पदवी परीक्षेत 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नींच्या पाल्यांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून गुणानूक्रमे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार असून या साठी            गुरुवार दि.1 ऑक्टोबर 2016 पर्यंत अर्ज सादर करावेत.
          शिष्यवृत्ती मिळण्यासाठी जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी त्यांचे पाल्य ज्या वर्गात उत्तीर्ण झाले आहेत. त्या वर्गाच्या गुणपत्रीकेची सत्यप्रत, पुढील वर्षात प्रवेश घेण्यात आल्याचे व शिक्षण घेत असल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र. माजी सैनिक,  विधवा ओळखपत्राची सत्यप्रत, माहितीसह विहीत नमुन्यातील अर्ज, डिस्चार्ज पुस्तकाचे पहिले पान व मुलांची नावे असलेल्या पानाची छायांकित प्रत किंवा भाग दोन आदेशाची छायांकित प्रत अथवा शिधापत्रिकेची छायांकित प्रत तसेच शिष्यवृत्ती मुलीसाठी हवी असल्यास व तीचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असल्यास अविवाहीत असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे तसेच या प्रस्तावासोबत स्वत:चा पत्ता लिहीलेला 5 रुपयाचे पोस्टाचे तिकिट लावलेले पाकीटासह जिल्हा सैनिक कार्यालय, बीड येथे दि.1 ऑक्टोबर 2016 पुर्वी सादर करावेत. अर्ज सादर करतांना माजी सेनिकांनी सैन्य सेवेच्या डिस्चार्ज पुस्तकाची कार्यालयात पडताळणी करुन घेणे आवश्यक आहे. या शिष्यवृत्ती, विद्यावेतनाचा लाभ घेण्यासाठी माजी सैनिकांचे पाल्य चौथे अपत्य नसावे कारण ही योजना तीन पाल्यांनाच लागू आहे.

          मागास प्रवर्गातील पाल्यांना समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती योजना लागू असल्याने त्यांनी समाज कल्याण कार्यालय किंवा शैक्षणिक संस्थेमधून शिष्यवृत्ती घेत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. एखाद्या विशेष शैक्षणिक कोर्ससाठी मागास प्रवर्गातील पाल्यांना समाज कल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती लागू नसल्यास तशा आशयाचे संबंधित संस्थेकडून प्रमाणपत्र घेवून मागास प्रवर्गातील माजी सैनिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. तरी जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा पत्नी यांनी पहिल्या तीन पाल्यांचे अर्ज दि.1 ऑक्टोबर पुर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बीड येथे सादर करावेत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे बीडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या क्षेत्रात मतदानासाठी सुट्टी जाहीर


                  
          बीड, दि. 23 :- जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व रिक्त पदांच्या निवडणूकांसाठी बुधवार दि.24 ऑगस्ट 2016 रोजी मतदान होणार असल्याने मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याकरीता या दिवशी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

          जिल्ह्यातील बीड, आष्टी, शिरुर(का), गेवराई, धारुर, केज, माजलगाव, परळी वै, अंबाजोगाई या ग्रामीण क्षेत्रातील ग्रामपंचायत मधील प्रभागातील क्षेत्रात ग्रामपंचायतीची गेवराई तालुक्यातील सिरसमार्ग, अंबाजोगाई तालुक्यातील दगडवाडी, श्रीपतरायवाडी, चनई, लोखंडी सावरगाव या  5 सार्वत्रिक व बीड तालुक्यातील चौसाळा, माजलगाव तालुक्यातील भाटवडगाव, परळी वैजनाथ तालुक्यातील तांडा(प) आणि भोपळा या 4 पोटनिवडणूका  होणार आहेत. येथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता  दि.24 ऑगस्ट रोजी स्थानिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. सर्व आस्थापना व बँक, ज्यांना जिल्हाधिकारी यांनी दिलेली स्थानिक सुट्टी लागू होत नाही त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारी यांना मतदानासाठी कामाच्या तासामधून दोन तासाची सवलत देण्यात येत आहे. असे बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कळविले आहे.

जिल्ह्यातील शस्त्र धारकांना माहिती सादर करण्याचे आवाहन


                  
          बीड, दि. 23 :- बीड जिल्ह्यातील सर्व आत्मसंरक्षण शस्त्र परवानाधारकांनी महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या गृह विभागाच्या सुचनेनूसार शस्त्र अधिनियम 1959 व नियम 1962 नूसार परवाना देण्यात आलेल्या सर्व शस्त्र परवानाधारकांची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरुपात भरावयाची असल्याने दि.31 ऑगस्ट 2016 पर्यंत माहिती सादर करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
           शस्त्र परवानाधारकांनी नाव, पूर्ण पत्ता, जन्म दिनांक, जन्मस्थळ जिल्हा, व्यवसाय, परवाना क्रमांक, शस्त्र प्रकार व क्रमांक, पोलीस स्टेशन, मुळ परवाना प्राधिकरण, फोन नंबर, मोबाईल, ईमेल(असल्यास) आणि परवान्याची प्रत आठ दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयातील गृह शाखेत सादर करावी. माहिती सादर न केल्यास परवान्याचे पुढील कालवधीसाठी नुतनीकरण करण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी. असे अपर जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा सुधारीत दौरा कार्यक्रम



बीड, दि.20 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवार दि.21 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10.45 वाजता परळी येथील निवाससस्थानावरुन टर्निंग पॉईंट कार्यक्रम स्थळाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता टर्निंग पॉईंट कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ-हलगे गार्डन, परळी). दुपारी 1 वाजता हलगे गार्डन येथून परळी निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता परळी निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता वैद्यनाथ सह.साखर कारखाना येथील हेलिपॅडकडे रवाना. दुपारी 3 वाजता व्हीटी-व्हीसीए ग्रँड अगस्ता या हेलिकॉप्टरने पुणे विमानतळाकडे प्रयाण करतील.

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन


 
     बीड, दि. 20 :- बीड कोषागार कार्यालयातंर्गत येणाऱ्या सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी डीसीपीएस, एनपीएस राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेच्या सर्व अडीअडचणी निवारणासाठी दि.25 ते 26 ऑगस्ट 2016 या दोन दिवशीय सत्रामध्ये क्रक्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस हैद्राबाद या नामांकित कंपनीमार्फत प्रशिक्षणाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहामध्ये करण्यात आले आहे.

गुरुवार दि.25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत बीड येथील डीडीओ क्र.3301000131 ते 33010034444 मधील सर्व डिडिओ व दुपारच्या सत्रात 2 ते 5 या वेळेत अंबाजोगाई, परळी, वडवणी, व शिरुर (का) या तालुक्यातील सर्व डीडीओ यांच्यासाठी तर शुक्रवार दि.26 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत बीड येथील डीडीओ क्र.3301003998 ते 3301923421 मधील सर्व डीडीओ यांच्यासह माजलगाव तालुक्यातील सर्व डीडीओ तर दुपारच्या सत्रात 2 ते 5 या वेळेत धारुर, केज, आष्टी, पाटोदा, गेवराई तालुक्यातील सर्व डीडीओ यांनी हजर रहावे. या प्रशिक्षणात प्राण किटचा उपयोग व एनपीएस ऑनलाईनबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याने सर्व डीडीओनी प्रशिक्षणास न चुकता उपस्थित रहावे. असे बीडचे कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे चेअरमन यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि.20 :- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे चेअरमन श्री.एम.एम.शेख हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि.22 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता औरंगाबाद येथून मोटारीने गेवराई येथे आगमन. त्यानंतर मातोरी येथे सकाळी 11.30 वाजता त्यांचे आगमन होईल. तसेच सायंकाळी 4.45 वाजता गेवराई येथे आगमन आणि पाचोड मार्गे औरंगाबादकडे प्रयाण करतील.

राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी अर्ज करावेत


     बीड, दि. 20 :- राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी विहीत अर्ज नमुने जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद बीड येथे उपलब्ध असून संबंधित व्यक्ती, संस्थांनी त्यांचे परीपूर्ण अर्ज प्रस्ताव सोमवार 22 ऑगस्ट 2016 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलीक कार्य करणाऱ्या राज्यातील कार्यकर्त्यांचा, संस्थांचा गौरव करण्यात यावा तसेच व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करत असलेल्या कार्यकर्ते व संस्थांच्या कार्याला दाद द्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी. जेणेकरुन व्यसनमुक्ती कार्याच्या उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत व व्यसनमुक्ती प्रचार कार्याचा दर्जा वाढविताना सर्व समावेशकता निर्माण करणे , त्या योग्य पात्र व्यक्ती व संस्था यांच्या कार्याची दखल घेवून राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. पुरस्काराचे स्वरुप पुढील प्रमाणे राहील. व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीला 15 हजार रुपये तर संस्थेला 30 हजार रुपये तसेच सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल किंवा साडी, खण आणि श्रीफळ देण्यात येते. तर या पुरस्काराची संख्या पुढीलप्रमाणे आहे. व्यसनमुक्ती कार्यकर्त्यांसाठी- लेखक, कवि, पत्रकार, संपादक व साहित्यीक (प्रत्येकी एक) 5 पुरस्कार. सामाजिक कार्यकर्ते 10 पुरस्कार. किर्तनकार, प्रवचनकार 4 पुरस्कार. पारंपारिक लोक कलावंत उदा. शाहीर, गोंधळी, भारुडकार, पोतराज, वासूदेव, लोकनाट्यकार (प्रत्येकी एक) सहा पुरस्कार. शासकीय अधिकारी, कर्मचारी, निमशासकीय अधिकारी , कर्मचारी तीन पुरस्कार. सामाजिक सेवाभावी संस्थांसाठी तीन पुरस्कार, युवक मंडळे, महिला मंडळे, भजनी मंडळे, बचत गट व क्रिडा मंडळे तीन पुरस्कार. शाळा व महाविद्यालयांसाठी (प्रत्येकी एक) तीन पुरस्कार. मिडीयासाठी वृत्तपत्रे (हिंदी, इंग्रजी व मराठी ) प्रत्येकी एक तीन पुरस्कार. इलेक्ट्रॉनिक मिडीया दोन पुरस्कार. उद्योग- कारखाने- तीन पुरस्कार, उद्योग व्यवस्थापन-तीन पुरस्कार, मजूर संघटना-तीन पुरस्कार असे एकुण 51 पुरस्कार देण्यात येतात. वरील विविध गटातून देण्यात येणाऱ्या 51 पुरस्कारांसाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात भरीव व मौलीक कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाकडून शिफारशी व कागदपत्रांसह अर्ज, प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

यासाठी पात्रता व निकष पुढीलप्रमाणे आहेत. व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलीक, भरीव कार्य करणारी व्यक्ती, संस्था असावी. या पुरस्कारासाठी वयाची अट बंधनकारक नाही. व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावी. पुरस्कारासाठी व्यक्ती राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर किमान 15 वर्ष व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य केलेले असावे, पुरस्कारासाठी एकापेक्षा अधिक वेळा पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही. व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणारे खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सभासद व इतर कोणतेही लोकप्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहतील. संस्था नोंदणी अधिनियम 1860 व 1950 प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. संस्था किमान 15 वर्षे जुनी असणे गरजेचे आहे व संस्थेने किमान 10 वर्षे व्यसनमुक्ती क्षेत्रात अधिक कार्य केलेले असावे व मागील 5 वर्षाचे लेखा अहवाल, वार्षिक अहवाल जोडणे आवश्यक आहे. असे बीड जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात सदभावना दिवस साजरा




बीड, दि. 20 :- सदभावना दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार यांनी उपस्थितांना सामुहिकपणे सदभावना दिवसाची प्रतिज्ञा दिली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी डॉ.विकास सुर्यवंशी, तहसिलदार अशोक नांदलगावकर, नायब तहसिलदार श्रीमती शारदा दळवी, श्री.मोराळे, श्री.नवगिरे, ए.एम.शेख यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोषागार कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०१६

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम



बीड, दि. 19 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.20 ऑगस्ट 2016 रोजी दुपारी 12.30 वाजता पुणे निवासस्थान येथून शासकीय वाहनाने परळी येथील निवासस्थानी आगमन व मुक्काम.

          रविवार दि.21 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10.45 वाजता परळी निवासस्थान येथून टर्निंग पॉईंट कार्यक्रमस्थळाकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता हलगे गार्डन, परळी वैजनाथ येथील टर्निंग पॉईंट कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1 वाजता परळी निवासस्थानी आगमन व राखीव. दुपारी 4.30 परळी निवासस्थान येथून शासकीय वाहनाने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

बलभिम चौक ते बिंदुसरा नदीच्या रस्त्यांची उच्च न्यायालयाच्या आदेशानूसार भूमी अभिलेख विभाग मोजणी करणार




            बीड, दि. 19:-  बीड नगर परिषद विकास योजनेअंतर्गत बलभिम चौक ते बिंदुसरा नदी 12 मिटर रुंद रस्त्यांची नगर परिषद बीड यांच्या प्रस्तावानूसार दि.4 ते 12 डिसेंबर 2014 या कालावधीत उप अधिक्षक भूमि अभिलेख बीड कार्यालयाकडून संयुक्त भूसंपादन मोजणी करण्यात आलेली आहे. या मोजणीच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यांच्याकडील दि.5 ऑगस्ट 2016 रोजी विकास योजनेअंतर्गत 12 मीटर रुंद रस्त्याकरीता बाधीत होणाऱ्या क्षेत्राच्या हद्दी, सिमांकन दाखविणेबाबतचे आदेश पारीत केले आहेत. मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे कामी उप अधिक्षक भूमि अभिलेख, बीड कार्यालयाचे परिरक्षण भूमापक व इतर कर्मचारी हे रस्त्यासाठी बाधीत क्षेत्राच्या हद्दी, सिमांकन दाखविणे कामी दि.22 व 23 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष जागेवर येणार आहेत. तरी हितसंबंधीत व्यक्तींनी वर नमुद दिनांकास व वेळेस आप-आपले मिळकतीच्या ठिकाणी आपणाकडे उपलब्ध असलेल्या आपल्या मिळकती संबंधीत सर्व पुराव्यानिशी न चुकता हजर रहावे व भूमि अभिलेख कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांना मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणेकामी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येते तसेच मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी त्यांच्याकडील दि.5 ऑगस्ट 2016 रोजीच्या आदेशात सदर काम हे सातदिवसाचे आत करावयाचे निर्देश दिल्याने इतक्या अल्पशा कालावधीत सर्व हितसंबंधितांना वैयक्तिक नोटीस पाठविणे शक्य नसल्याने या बातमीस नोटीस समजण्यात यावे. व सर्व हितसंबंधितांना आपल्या मिळकतीमध्ये हजर राहून मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. असे आवाहन प्रभारी उप अधिक्षक भूमि अभिलेख, बीड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.