बुधवार, १२ ऑक्टोबर, २०२२

शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा -जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर

बीड, दि. 12 (जि. मा. का.) : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना अंबिया बहार २०२१-२२ , २०२२-२३ व २०२३-२४ या ३ वर्षांकरिता बीड जिल्ह्यात द्राक्ष, मोसंबी, केळी, पपई, संत्रा, आंबा व डाळिंब या फळपिकांकरिता राबविण्यात येत आहे. तरी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी केले आहे. फळपीक व विमा हप्ता उतरविण्याची अंतिम तारीख पुढीलप्रमाणे - द्राक्ष १५ ऑक्टोबर २०२२, मोसंबी, केळी व पपई ३१ ऑक्टोबर २०२२. संत्रा ३० नोव्हेंबर २०२२, आंबा ३१ डिसेंबर २०२२ आणि डाळिंब १४ जानेवारी २०२३. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, या हेतूने एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि. मुंबई मार्फत ही योजना राबविण्यात येत आहे. पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी ही योजना ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्याने योजनेत सहभागी न होण्यासाठी कर्ज घेतलेल्या अधिसूचित फळपिकांकरिता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या ७ दिवस आधी पर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याबाबत कळविणे आवश्यक राहील ( सहपत्र -५ ). विहित मुदतीत सहभागी न होण्यासाठी बँकांना कळविणार नाहीत, असे शेतकरी योजनेत सहभागी आहेत, असे गृहित धरण्यात येईल व या शेतकऱ्यांचा हप्ता बँकेमार्फत विहित पध्दतीने कर्ज खात्यातून वजा करण्यात येईल. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल, अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमित व अतिरीक्त विमा हप्ता बँकेमार्फतच भरणे आवश्यक आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागांनाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना बँकेशिवाय नागरी सुविधा केंद्र / आपले सरकार सेवा केंद्रामार्फतही विमा अर्ज व विमा हप्ता भरण्याची सुविधा दिलेली आहे. तसेच सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आधार कार्ड किंवा आधार नोंद पावती , सातबारा उतारा व बँक पासबुकची प्रत सादर करून प्रत्यक्ष साक्षांकन करणे बंधनकारक आहे. मृग व अंबिया या दोन्ही बहारासाठी एकाच क्षेत्रावर विमा संरक्षणासाठी अर्ज भरण्यात येत असल्यामुळे त्या अनुषंगाने सहपत्र -4 च्या नमुन्यात सहभागी अर्जदार शेतकयांचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा