शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाअंतर्गत बदल अर्ज निकाली काढण्यासाठी विशेष अभियानाचे आयोजन


            बीड, दि. 31 :-  सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बीड अंतर्गत प्रलंबित असलेले बदल अर्ज (Change Report) जलदगतीने निकाली काढण्यासाठी मा. धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे दिनांक 15 डिसेंबर 2016 रोजीच्या परिपत्रकान्वये दिनांक 1 ते 31 जानेवारी 2017 या कालावधीत विशेष अभियान आयोजित करण्यात आलेले आहे. या विशेष अभियानामध्ये सहाय्यक धर्मदाय आयुक्त -1 यांच्याकडे 340 व सहाय्यक धर्मदाय आयुक्त-2  यांच्याकडे 280 अशी एकूण 620 प्रकरणे विशेष अभियानामध्ये ठेवलेली आहेत. तरी सर्व संबंधित विश्वस्तांनी व विधीज्ञांनी सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून प्रकरणातील आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करुन त्यांचे बदल अर्ज निकाली काढण्यासाठी सहाकार्य करुन या विशेष अभियानास सहकार्य करावे.
            ज्या सार्वजनिक न्यासांनी / संस्थांनी त्यांच्या न्यासांची / संस्थांची हिशोबपत्रके व बदल अर्ज गेल्या 5 वर्षात किंवा त्यापुर्वी सादर केले नसतील तसेच त्या संस्था व न्यास अकार्यरत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्याविरुध्द त्या संस्थांची / न्यासांची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही या कालावधीत सुरु करण्यात येत आहे. तरी ज्या अकार्यरत असलेल्या विश्वस्त संस्थांना त्यांची नोंदणी रद्द करावयाची आहे अशा संस्थांनीही अर्ज सादर करावेत.
            बदल अर्जाच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन नवीन बदल अर्ज सादर केलेले तर ते 30 दिवसांत निकाली होऊ शकतील. तरी नवीन अर्ज परिपूर्ण बदल अर्ज सार्वजनिक न्यास नोंदणी, बीड या कार्यालयास सादर करावेत. तसेच या अभियानाबाबत बिगरवाद प्रकरणातील पक्षकार, विधीज्ञ व सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी तसेच या अभियानाचा लाभ घ्यावा असे बीडचे सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांनी कळविले आहे.

-*-*-*-

जि.प. व पं.स. सार्वत्रिक निवडणूक-2017 पंचायत समिती सभापती पदासाठी 7 जानेवारी रोजी आरक्षण सोडत


            बीड, दि. 31 :-  ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या दिनांक 16 जून 2016 रोजीची अधिसूचना क्रमांक 167 आणि अधिसूचना असाधारण क्रमांक 168 अन्वये बीड जिल्ह्यातील  पंचायत समित्यांच्याबाबतीत पुढील अडीच वर्षांच्या कालावधीकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग (विमुक्त जाती व भटक्या जातीसह) आणि महिला (अशा जाती, जमाती आणि प्रवर्ग यामधील महिलांसह) सर्व साधारण प्रवर्ग व या प्रवर्गातील महिलांसाठी पंचायत समिती सभापती पदांच्या आरक्षीत पदांच्या आरक्षीत पदांचे सोडत पध्दतीने पंचायत समिती निहाय वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी, बीड यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार, दिनांक 7 जानेवारी 2017 रोजी  दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सर्व राष्ट्रीय व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे पदाधिकारी तथा जिल्हा परिषद व पंचायत समितीचे पदाधिकारी यांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-

बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

माऊली हॉस्टेल कळंब येथून अंकुश पवार हरवला आहे



            बीड, दि. 28 :- अंकुश भुजंग पवार 14 वर्षे वयाचा मुलगा रा.पवारवाडी ह.मु. माऊली हॉस्टेल कळंब जि.उस्मानाबाद यास दि.29 जून 2013 रोजी अज्ञात व्यक्तीने माऊली हॉस्टेल कळंब येथून पळवून नेले आहे. मुलाचे वर्णन उंची 4.5 फुट, रंग सावळा, चेहरा गोल, केस काळे, नाक सरळ, भाषा मराठी, पोशाख काळी पॅन्ट व लाल शर्ट असे आहे. तरी या वर्णाचा मुलगा दिसून आल्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, बीड दुरध्वनी क्र.02442-231933 आणि पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दिपाली गित्ते (मो.नं.9763320191) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, बीड यांच्याशी संपर्क साधावा. असे  पोलीस उपनिरीक्षक श्रीमती दिपाली गित्ते यांनी कळविले आहे.

विकासाची गंगा सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री ना. पंकजा मुंडे








            बीड, दि.22 :-  जिल्हयाच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून विकासाची कामे हाती घेण्यात आली असून विविध विकासाची कामे विकासपर्वाच्या माध्यमातून परळी मतदारसंघात राबविण्यात येत आहेत. ही विकासाची गंगा सर्व सामान्य नागरिकापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी केले.
            पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अंबाजोगाई तालुक्यातील जोडवाडी, उजनी, पट्टीवडगाव,चंदनवाडी, हातोला, तळेगाव आदी ठिकाणीच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमीपूजन आणि शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
            यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गावांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे. ग्रामविकासामध्ये रस्त्याचे अनन्यसाधारण महत्व  आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्याबरोबरच बीड जिल्हयातही पक्क्या रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहेत.  मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत परळी मतदारसंघात विशेष बाब म्हणून जास्त लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत असे सांगुन  या रस्त्यामुळे दळणवळण सुलभ व जलदगतीने होणार असल्याने परळी मतदारसंघाच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. तसेच सन 2018 पर्यंत रस्त्याचे एकही काम प्रलंबित राहणार नाही असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
            जिल्हयातील रस्त्यांसह शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावरही भर देण्यात येत असून या सर्व योजनांच्या माध्यमातून ग्राम विकासाचा मार्ग सुकर होणार आहे.  जलयुक्त शिवार योजनेच्या यशस्वीतेमुळे शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे तसेच चालू वर्षात परळी मतदारसंघात मोठयाप्रमाणात  बंधाऱ्यास  मंजूरी देण्यात आली असल्यासने पाण्याचा प्रश्नही निकाली निघणार आहे.  शेतकऱ्यांना योग्य दाबाने आणि नियमित विद्युत पुरवठा करण्यासाठी नवीन विद्युत उपकेंद्रे, ट्रांसफार्मर आदी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. तसेच इंदिरा आवास योजना, संजय गांधी निराधार  योजना आदी विशेष सहाय्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देऊन त्यांचेही जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ना.मुंडे म्हणाल्या की, स्व.गोपीनाथराव मुंडे यांनी त्यांच्या हयातीत त्यांनी परळी मतदारसंघाच्या विकासासाठी विविध महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवून शेतकरी कष्टकरी जनतेला सुखी समाधानी करण्याचे त्यांचे स्वप्न्‍ा होते. ते अपूर्ण राहिलेले स्वप्न आपण पूर्ण करणार असून त्यादृष्टीने काम करीत असल्याचे सांगून त्यांनी सर्व गावांना व ग्रामस्थांना आपल्या कामात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी नेमाजी देशमुख, श्री.गिरी महाराज, गौतम नागरगोजे, गणेश कराड, बाबुराव वाकडे, गुणाजी लव्हारे, बिभीषण फड, विलास जगताप, बळी गर्जे, नारायण तारसे, दिलीप मुंडे, वसंत मुंडे, साहेबराव गायकवाड, श्रीमती उज्वला मुंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी.व्ही.निला, अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार शरद झाडके, गटविकास अधिकारी डी.बी. गिरी  यांच्यासह जोडवाडी, उजनी, पट्टीवडगाव परिसरातील पदाधिकारी, नागरिक यांची उपस्थिती होती.
                                                                   विकास कामांचा शुभारंभ

            पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या विकासपर्व दौऱ्यात जोडवाडी येथील गावांतर्गत 3 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता व नाली बांधकाम तसेच जोडवाडी मंदिरासमोर 3 लाख रुपये खर्चुन पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन तसेच प्रवासी निवाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले.           उजनी येथे 54.71 लाख खर्चाच्या निरपणा-उजनी रस्त्याची सुधारणा करणे  याकामाचे भूमीपुजन करण्यात आले, पट्टीवडगाव येथे 4 लाख रुपये खर्चून सामाजिक सभागृहाचे बांधकाम, 3 लाख रुपये खर्चाच्या मुस्लीम स्मशानभूमी बांधकाम, पट्टीवडगाव अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकाम खर्च रु. 3 लाख आणि वॉर्ड क्र. 1 मधील 3 लाख रुपये खर्चाच्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. यासोबतच चंदनवाडी, हातोला, तळेगाव येथील विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण करण्यात आले.

मंगळवार, २७ डिसेंबर, २०१६

सैन्य भरती मेळावा; इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज करावेत



            बीड, दि. 27 :- एसआरपीएफ सोरेगांव, सोलापूर येथील खेळाच्या मैदानावर दि.5 ते 20 फेब्रुवारी 2017 या कालावधीमध्ये सोल्जर नर्सिंग असिस्टंट व सोल्जर टेक्निकल ड्रेसर (आरव्हीसी) यांचा सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात आला असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावेत.

          ऑनलाईन अर्ज करण्यास दि.16 डिसेंबर 2016 पासून सुरुवात झालेली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळास भेट द्यावी. असे बीडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुभाष ढोरजकर (नि.) यांनी कळविले आहे.

जानेवारी महिन्याचे रॉकेल नियतन मंजूर



            बीड, दि. 27 :- माहे जानेवारी 2017 महिन्यासाठीचे जिल्ह्यातील पात्र घाऊक, अर्धघाऊक व तालुकानिहाय वाटप करण्यासाठी आगाऊ केरोसीन 504 के.एल. नियतन बीड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. तालुकानिहाय मंजूर करण्यात आलेल्या रॉकेलचे नियतन याप्रमाणे.

          आष्टी-51 के.एल, पाटोदा-21, शिरुर-24, बीड-102, गेवराई-60, माजलगाव-54, वडवणी-24, धारुर-33, केज-42, अंबाजोगाई-51 तर परळी तालुक्यासाठी 42 के.एल. रॉकेलचे मासिक नियतन मंजूर करण्यात आले आहे.  सर्व विक्रेत्यांनी रॉकेल पुरवठा झाल्याचे दर्शनी भागात सूचना फलकावर ग्राहकांच्या माहितीसाठी लावावी. त्याचबरोबर घाऊक अथवा अर्धघाऊक रॉकेल डिलर्स यांच्याकडून वितरण व्यवस्थेसंदर्भात गंभीर स्वरुपाचे दोष आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 च्या कलम 3 व 7 अन्वये कारवाई करावी.  त्याचबरोबर तहसिलच्या पुरवठा विभागाने दुकानांना अचानक भेटी देऊन रॉकेल पुरवठ्याबाबत खात्री करावी.  तसेच दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे. 

शासकीय निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे दाखले बायोमेट्रीक पध्दतीने सादर करावेत


                  
          बीड,दि.27:- बीड जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी हयातीचे दाखले शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या बायोमेट्रीक सुविधेचा वापर करुन कोषागार, उपकोषागार कार्यालयात दि.15 जानेवारी 2017 पुर्वी सादर करावेत.

            राज्य शासनामार्फत सर्व कोषागारे व उपकोषागारामध्ये बायोमेट्रीक पध्दतीने हयातीचे दाखले घेण्याची सुविधा उपलब्ध असून निवृत्तीवेतनधारकांनी जवळच्या कोषागार किंवा उपकोषागार कार्यालयात जाऊन सोबत अचुक पी.पी.ओ. क्रमांक, खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक व असल्यास ई-मेल आयडी इत्यादी माहिती सोबत ठेवावी. ही माहिती जीवन  प्रमाण या पोर्टलवर नोंदवून बोटाचे ठसे घेतल्यानंतर बायोमेट्रीक ऑथेन्टीकेशन पूर्ण होणार आहे म्हणजे व्यक्तीची खात्री होणार आहे. सर्व प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर त्या संदर्भात मोबाईलवर लघुसंदेश प्राप्त होईल. या प्रक्रीयेत पी.पी.ओ. क्रमांक अचुक भरणे अत्यंत महत्वाचे आहे. ही सुविधा सर्व कोषागार, उपकोषागार कार्यालये येथे उपलब्ध आहे. असे बीडचे जिल्हा कोषागार अधिकारी डी.डी. माडे यांनी कळविले आहे.

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील बचतगटांनी मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांसाठी अर्ज करावेत


                  
          बीड, दि. 27 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरविण्याच्या योजनेस शासनाने मान्यता दिली असून पात्र बचतगटांनी आपले अर्ज दि.17 जानेवारी 2016 पर्यंत समाज कल्याण कार्यालयात सादर करावेत.

            योजनेअंतर्गत मिनी ट्रॅक्टर युवराज 215, 1.5 टन नॉन टिपींग ट्रेलर व महिंद्रा ॲण्‍ड महिंद्रा कंपनीचे 0.8 मी. रोटाव्हेटर 3 लाख 50 हजार किंमतीचे 90 टक्के अनुदानावर देण्यात येते. या रक्कमेपैकी 10 टक्के रक्कम 35 हजार स्वहिस्सा बचत गटांनी भरणे आवश्यक आहे. समाज कल्याण आयुक्तांनी सन 201-17 या वर्षासाठी 45 उद्दीष्ट दिले असून देण्यात आलेल्या उद्दिष्टानूसार पात्र बचतगटांची निवड करण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह मागविण्यात आले आहेत. विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयीन वेळेत समाज कल्याण कार्यालयात विनामुल्य उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड,बीड येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा. असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त आर.एम.शिंदे यांनी कळविले आहे.

सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

राष्ट्रीय ग्राहक दिन उत्साहात साजरा फसव्या जाहिरातींना बळी न पडता ग्राहकांनी जागरुकता बाळगावी -निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी


        

बीड, दि. 26 :- ग्लोबलायझेशनमुळे सेवा आणि वस्तुच्या बाजारपेठेत मोठया प्रमाणात स्पर्धा निर्माण झालेली आहे. जाहिरातीच्या माध्यमातून वस्तू विक्रीचे प्रमाण वाढले असून त्यामुळे ग्राहकांची फसवणुकीचे प्रमाण वाढण्याची शक्यता  वाढली असल्याने ग्राहकांनी फसव्या जाहिरातींना बळी न पडता खरेदी विक्रीचे व्यवहार करताना जागरुक राहवे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            यावेळी बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष के.एन.तुंगार, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.आर.टी. गर्जे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत, तहसीलदार छाया पवार, श्री. चित्ते, शैलजा सेलमोहेकर, ॲड. नरेंद्र कुलकर्णी, जनार्दन मुंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी म्हणाले की, पुर्वी बारा बलुतेदारी पध्दतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असत. मागणी आणि पुरवठा यांच्यातील व्यस्त प्रमाणामुळे काही सेवा आणि वस्तुंचे वाढीव मुल्य द्यावे लागल्याने चलन निर्माण झाले. बदलत्या काळानुसार विविध प्रकारच्या सेवा आणि वस्तु उपलब्ध झाल्याने बाजारपेठेत स्पर्धा निर्माण झाली. ग्राहकाला पैशांच्या बदल्यात वस्तु व सेवा मिळण्यास सुरुवात झाली. मात्र यामध्ये फसवणुकीचे प्रकारही वाढले आणि यातुनच ग्राहक हक्क संरक्षणाची संकल्पना समोर आली असेही श्री. सुर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.
            ग्राहकाला त्याच्या पैशाच्या मोबदल्यात योग्य दराने आणि दर्जेदार सेवा किंवा वस्तु पुरविणे अपेक्षीत असते. परंतु असे न झाल्याने ग्राहकाच्या हक्कांची पायमल्ली होते. त्यामुळे ग्राहकांनी सजग राहून खरेदी करावी आणि फसव्या जाहिरातींना बळी पडु नये. ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ग्राहक न्यायालय आणि ग्राहक हक्क मंचांची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच शासन आणि प्रशासनही विविध माध्यमातून ग्राहक हक्क संरक्षणाचे काम करीत आहे. त्यामुळे फसवणुक झाल्याची लक्षात आल्यास ग्राहकांनी ग्राहक तक्रार मंचाकडे तक्रारी दाखल कराव्यात. तसेच ग्राहकांचे काय हक्क आहेत याबाबत व्यापक जनजागृती करावी असे आवाहनही श्री. सुर्यवंशी यांनी यावेळी केले.
            यावेळी बोलताना बीड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष के.एन.तुंगार म्हणाले की, जो सेवा देतो तो ग्राहक असतो. वस्तु आणि सेवा यांच्या फायद्या बाबत माहिती नसल्याने ग्राहकाची फसवणुक होते आणि त्यातून वाद निर्माण होतात. यासाठी ग्राहक हक्काची सर्वांना परिपुर्ण माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी या कायद्याची तळागाळापर्यंत जनजागृती करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्रुटीयुक्त किंवा सदोष सेवा मिळाल्यास ग्राहकांनी तक्रार करण्यासाठी पुढाकार घेतल्यास ग्राहक हक्क चळवळ अधिक गतीमान होण्यास मदत होईल असेही श्री. तुंगार यावेळी म्हणाले.
            यावेळी ॲड. नरेंद्र कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष प्रा. आर.टी. गर्जे, जनार्दन मुंडे आणि यशवंत काशिद यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलीत करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार छाया पवार यांनी त्यांच्या प्रास्ताविकात ग्राहक संरक्षण कायदा, ग्राहक न्यायालय अणि ग्राहक मंच याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी बिंदु माधव जोशी पुरस्कार प्राप्त नामदेव श्रीपतराव हेडे यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी ग्राहक जनजागृतीसाठी विविध माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा पुरवठा विभागाचे एम.व्ही. काळे यांनी केले तर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष राऊत यांनी आभार मानले. या कार्यक्रमास नायब तहसीलदार श्री.आव्हाड, श्री. ढाकणे, श्री. मंदे, श्रीमती परवीन पठाण, यांच्यासह जिल्हयातील विक्रेते, ग्राहक, जिल्हा पुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम


बीड, दि. 26 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          मंगळवार दि.27 डिसेंबर 2016 रोजी औरंगाबाद येथून वाहनाने मौजे जोडवाडी ता.अंबाजोगाई येथे दुपारी 4 वाजता आगमन व विविध विकास कामांचा शुभारंभ. सायंकाळी 5 वाजता मौजे उजनी ता.अंबाजोगाई येथे विविध विकास कामांचा शुभारंभ. सायंकाळी 6 वाजता मौजे पट्टीवडगाव ता.अंबाजोगाई येथे विविध विकास कामांचा शुभारंभ. सायंकाळी 7 वाजता चंदनवाडी ता.अंबाजोगाई येथे विविध विकास कामांचा शुभारंभ. रात्री 8 वाजता हातोला ता.अंबाजोगाई येथे विविध विकास कामांचा शुभारंभ. रात्री 9 वाजता तळेगाव ता.अंबाजोगाई येथे विविध विकास कामांचा शुभांरभ. रात्री 10 वाजता वाहनाने परळी जि.बीडकडे प्रयाण. रात्री 10.45 वाजता परळी निवासस्थानी आगमन व मुक्काम.

          बुधवार दि.28 डिसेंबर 2016 रोजी परळी वैजनाथ येथे राखीव. दुपारी 2 वाजता वाहनाने औरंगाबाद विमानतळाकडे प्रयाण करतील.

जयभवानी नगर औरंगाबाद येथून मुलगा भारत अन्नदाते हरवला आहे


           

            बीड, दि. 26 :- भारत विजय अन्नदाते 13 वर्षे वयाचा मुलगा रा.जयभवानी नगर गट नं.12 औरंगाबाद यास दि.30 मे 2014 रोजी अज्ञात व्यक्तीने पळवून नेले आहे. मुलाचे वर्णन उंची 4 फुट, रंग सावळा, चेहरा गोल, नाक सरळ, भाषा मुकबधीर, पोशाख बदामी रंगाचा हाफ शर्ट व निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट असे आहे. तरी या वर्णाचा मुलगा दिसून आल्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, पोलीस अधिक्षक कार्यालय, बीड दुरध्वनी क्र.02442-231933 आणि पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही.गित्ते एएचटीयु बीड यांच्याशी संपर्क साधावा. असे  पोलीस उपनिरीक्षक डी.व्ही.गित्ते यांनी कळविले आहे.

शनिवार, २४ डिसेंबर, २०१६

शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे मेट्रोचे काम गतीने पूर्ण होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी




            बीड  दि.24 :- पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत असतानाच भविष्याचा विचार करून 25 वर्षाचे नियोजन केले पाहिजे. पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक व औद्योगिक राजधानी म्हणून देशात ओळखले जाते. येथील वाढती लोकसंख्या पाहता मेट्रो कार्यान्वित होणे आवश्यक होते. आज पुणेकरांचे स्वप्न पूर्ण होत असून मेट्रो प्रकल्पाचे काम अधिक गतीने सुरु करून कालमर्यादेत त्याचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. शेती महाविद्यालयाजवळील मैदानावर हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
            पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, ‘पुणे शहराची गेल्या काही वर्षात खूप मोठी वाढ झाली आहे. औद्योगीकरण आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या विकासामुळे पुण्यात रोजगारासाठी देशभरातून लोक येतात. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा विकास होण्याची आवश्यकता आहे. पुणे मेट्रो हे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विकसीत करण्यासाठी उचलले महत्वाचे पाऊल आहे.
            पुणे मेट्रो प्रकल्प विविध कारणांमुळे रेंगाळला गेला पण केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सरकार असल्यामुळे पुणे मेट्रो प्रकल्पास मंजुरी देणे आणि आज या प्रकल्पाचे भूमिपूजन करणे शक्य झाले. मेट्रो  प्रकल्प गतीने पूर्ण करून पुण्याच्या विकासाला अधिक गती देऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशात नागरीकरणाचा वेग अतिशय झपाट्याने वाढला आहे. शहरावरील ताण कमी होण्यासाठी गावांचाही विकास होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी रुर्बन अभियान राबवले जात आहे. यामुळे ग्रामीण भागात शहरातील सुविधा, संधी उपलब्ध होतील. त्याच बरोबर रोजगारांची संधीही वाढतील. यामुळे गावांकडून शहरांकडे येणाऱ्या नागरिकांचा लोंढा कमी होईल. विकासाचा विचार करताना तात्कालिक फायद्यांचा विचार न करता दूरगामी विकासाचा विचार करायला हवा.
            पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, ‘देशातील केवळ शहरांचा विकास चाललेला नाही तर ग्रामीण भागांचाही विकास सुरु आहे. त्यासाठी देशातील अडीच लाख ग्रामपंचायती ऑप्टीकल फायबरने जोडल्या जाणार आहेत. आता विकासाच्या संकल्पना बदलत आहेत. त्यामुळे विकासाची परिमाणेही बदलण्याची आवश्यकता आहे.
निश्चलीकरण करण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात निधी जमा झाला आहे. त्यामुळे हा निर्णय योग्य ठरला असल्याचे सांगून  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील काळे धन,भ्रष्टाचार आणि दहशतवादाविरुद्धची ही लढाई आहे. यापुढेही याबाबत अधिक कठोर निर्णय घेतले जातील. या निर्णयामुळे त्रास जरूर झाला पण, भविष्यात त्रास होणार नाही. ज्यांनी अद्यापही काळे धन लपवून ठेवले आहे,त्यांनी नियमांचे पालन न केल्यास त्यांना कठोर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे.
            पुण्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे पुण्यात डिजिटल आणि कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशभरातील शहरांमध्ये पुणे आंतरराष्ट्रीय शहर आहे. जगभरातील उद्योजकांची गुंतवणुकीसाठी पुणे शहराला पहिली पसंती असते. पुणे शहर लवकरच स्टार्ट-अप कॅपिटल होणार आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी स्मार्ट सिटी सारख्या महत्वकांक्षी योजनेच्या अभियानाची सुरवात पुणे शहरापासून केली. पुणे शहराच्या औद्योगिक विकासासाठी पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येणार आहे,त्याच्या कामाला लवकरच सुरवात करण्यात येणार आहे. मेट्रोच्या माध्यमातून पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारणार आहे.
आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस असून आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजाच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले तर दुसरीकडे बऱ्याच वर्षापासून थांबलेले पुण्याच्या मेट्रोचे भूमिपूजनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे. येत्या मार्चपर्यंत शिवाजीनगर ते हिंजेवाडी मेट्रो मार्गालाही मंजुरी देऊन त्याचेही भूमिपूजन पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात येणार आहे. पुणे शहराच्या जीवनवाहिनी असणाऱ्या मुळा आणि मुठा नद्यांच्या संवर्धनासाठी सरकारने ९०० कोटी रुपये दिले आहेत. या माध्यमातून या नद्यांचे पुनर्जीवन होणार आहे. पुणे शहराच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असून उत्तम असणाऱ्या पुण्याला सर्वोत्तम करणार असल्याची ग्वाही श्री. फडणवीस यांनी दिली.
            केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू आपल्या भाषणात म्हणाले, ‘भारताच्या परिवर्तनाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली आहे. भ्रष्टाचार आणि काळे धन बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान विशेष प्रयत्न करत आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाने पंतप्रधानांच्या या निर्णयामागे ठामपणे उभे राहिले पाहिजे. देशातील सामान्य जनता, गरीब तरुण,शेतकरी, स्त्रिया यांच्या विकासाला सरकारचे प्राधान्य आहे. पंतप्रधानांनी सुरु केलेल्या स्वच्छ भारत योजनेला जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या अभियानाचे व्याप्ती वाढून तन-मन व धनाचीही स्वच्छताही सुरु आहे. प्रत्येक योजनेत सामान्यांचा सहभाग वाढवण्यावर  सरकारचा भर आहे. पुणे मेट्रोच्या माध्यमातून पुण्याची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होणार असून शहराच्या विकासाची ही सुरवात आहे.मुंबई नंतर पुणे हे राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या शहराच्या विकासासाठी केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करणार असल्याची श्री. नायडू यांनी सांगितले.
            प्रास्ताविकात पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, विद्येचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या पुण्याची ओळख आता विस्तारत आहे. औद्योगिक क्षेत्रातही पुणे अग्रक्रमावर आले आहे.पीएमआरडीएच्या माध्यमातून पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. मेट्रोमुळे शहरातील सार्वजनिक वाहतुक व्यवस्था अधिक गतिमान होऊन त्याचा शहराच्या विकासावर सकारात्मक परिणाम होणार आहे. पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानाला पुणे शहराने चांगला प्रतिसाद दिला असून या योजनेंतर्गत सर्वात जास्त शौचालय बांधण्याचा विक्रम झाला आहे. केंद्र सरकारच्या मदतीने विविध योजनांच्या माध्यमातून पुणे शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.
            यावेळी खासदार सर्वश्री संजय काकडे, वंदना चव्हाण, अमर साबळे, आमदार सर्वश्री विजय काळे, भीमराव तपकीर, मेधाताई कुलकर्णी, माधुरी मिसाळ, योगेश टिळेकर, विजय काळे, लक्ष्मण जगताप, महेश लांडगे,नीलमताई गोऱ्हे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार आदी पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
०००


पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, मेट्रो प्रकल्प, एमयुटीपी प्रकल्पांचे भूमिपूजन संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे भारताची जगाला नवी ओळख होईल - पंतप्रधान नरेंद्र मोदी



            बीड  दि.24 :- राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करणारे सरकार महाराष्ट्राला लाभले असून ते प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठत आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे राज्याचीच नव्हे तर देशाची जगाला नवी ओळख होईल. देशभरातील गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि दुरुस्ती करुन किल्ले पर्यटनाला चालना दिली जाईल याची सुरुवात महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपासून करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुशासनाची परंपरा पुढे नेली, त्याच धर्तीवर सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू मानून केंद्र व राज्य शासनातर्फे विकासाच्या योजना सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईमध्ये 1 लाख 6 हजार कोटी रुपयांचे विकास प्रकल्प हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
            अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन व जलपूजन, मेट्रो-2ब, मेट्रो-4, एमटीएचएल, कुर्ला-वाकोला उन्नत मार्ग, एमयुटीपी-3 व कलानगर जंक्शन उड्डानपुलाच्या कामांचे भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर झालेल्या जाहिर सभेत पंतप्रधान श्री. मोदी बोलत होते.
व्यासपीठावर महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगरविकास मंत्री एम. व्यंकय्या नायडू, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे, गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, उद्योग मंत्री सुभाष देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम) एकनाथ शिंदे, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार, स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आमदार विनायक मेटे, मुंबईच्या महापौर स्नेहल अंबेकर, ठाण्याचे महापौर संजय मोरे, खासदार सर्वश्री रावसाहेब दानवे, उदयनराजे भोसले, संभाजी राजे छत्रपती, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय आदी मान्यवर उपस्थित होते.
            छत्रपती शिवाजी महाराजांना मी मानाचा मुजरा करतो, अशी आपल्या भाषणाची मराठीत सुरुवात करुन पंतप्रधान यावेळी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. त्यांच्या अनेक पैलूंचा भारतीयांच्या जीवनावर प्रभाव दिसून येतो. संघर्षातून त्यांनी सुशासनाची उत्तम परंपरा पुढे नेली. ते पराक्रमी होते. उत्तम संघटन कौशल्य त्यांच्याकडे होते. जल व्यवस्थापनाची त्यांनी घालून दिलेले आदर्श आजही आपण सर्वांना मार्गदर्शक आहेत. आज जागतिक स्तरावर सागरी सुरक्षेला खूप महत्त्व दिले जात आहे. मात्र शेकडो वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सागरी सुरक्षेसाठी स्वत:चे आरमार सुरु केले. यातूनच त्यांच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची आपल्याला ओळख होते. आज जगभरात पर्यटनासाठी अनेक आदर्शवत अशी प्रतिके निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या त्या देशांची ही प्रतिके ओळख बनली आहे. जागतिक स्तरावर नोंद घेण्याजोगी अनेक पर्यटनस्थळे भारताच्या कानाकोपऱ्यात आहेत. जगभरात पर्यटन व्यवसायाला आलेले महत्त्व लक्षात घेता भारतातही साहसी पर्यटनाला चालना देण्याकरिता केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून देशातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्यात येईल. त्याची सुरुवात महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपासून करु, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
            छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या कल्याणाकरिता आपले जीवन समर्पित केले. त्यापासून सामान्यांना प्रेरणा मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक मुंबईच्या अरबी समुद्रात उभारण्यात येत आहे. या स्मारकाची संकल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असा विश्वास व्यक्त करुन पंतप्रधान पुढे म्हणाले की, सर्व समस्यांचे निराकरण हे विकासाच्या माध्यमातूनच होऊ शकते. गरीबांना त्यांचे अधिकार, बेरोजगारांना रोजगार आणि सामान्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी देशाचा विकास हा एकमेव मार्ग असून सामान्यांच्या जीवनात परिवर्तन हाच केंद्रबिंदू ठेवून केंद्र शासनाने विकासाच्या विविध योजना सुरु केल्या आहेत. ज्या निवृत्तीवेतन धारकांना अल्प रक्कमेचे निवृत्तीवेतन मिळत होते, त्यांना आता किमान एक हजार रुपयांचे निवृत्तीवेतन देणारी योजना सुरु केली आहे. गरीबांना स्वस्त दरात औषधे मिळावी यासाठी जेनेरीक औषधांवर भर देण्यात येत आहे. दारिद्रय रेषेखालील नागरिकांना गॅस कनेक्शन देण्याचा संकल्प केला असून येत्या तीन वर्षांत पाच कोटी लोकांना उज्वला योजनेच्या माध्यमातून कनेक्शन देण्यात येणार आहे. देशातील 18 हजार गावे विजेपासून वंचित असून एक हजार दिवसांत ही गावे वीज पुरवठ्याने जोडली जाणार आहे. त्यातील निम्मी गावे वीजेने जोडली गेली आहे. मी देशाच्या 125 कोटी लोकांना विश्वास देतो की, देश बदलत आहे, देश पुढे जात आहे आणि आपला देश जगासमोर उंच मानेने उभा राहत आहे, असे ठाम प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केले.
राज्य सरकारने सामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून विकासाच्या अभिनव योजना सुरु केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून मुंबईमध्ये आज ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले, ते सर्व प्रकल्प एक लाख 6 हजार कोटी रुपयांचे असून मुंबईच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे, असा गौरवोग्दार पंतप्रधानांनी काढले.
            8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्या विरोधात सुरु केलेल्या लढाईत देशातील सामान्य नागरिकांनी साथ दिली. नोटबंदी निर्णयाच्या विरुध्द अनेक अफवा पसरविल्या गेल्या मात्र देशाच्या विकासासाठी घेतलेल्या या निर्णयाला सामान्यांनी साथ दिली. ही लढाई सामान्य नाही. मुठभर भ्रष्ट लोकांमुळे देशातील सव्वाशे कोटी नागरिकांनी त्रास सहन केला. मात्र भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्या विरोधातील ही लढाई यापुढेही सुरुच राहिल. नोटबंदी निर्णयानंतरच्या 50 दिवसांनंतर सामान्य प्रामाणिक नागरिकांना होणारा त्रास कमी होवून जे अप्रामाणिक आहे त्यांच्या त्रासात वाढ होईल. म्हणून अशा अप्रामाणिक लोकांना माझे आवाहन आहे की, अजूनही वेळ गेलेली नाही, देशाच्या कायद्याचा मान राखा. जे कायदा पाळणार नाही त्यांना देशातील जनताच धडा शिकवेल. देशाच्या भल्यासाठी हे स्वच्छता अभियान सुरु केले आहे. काळ्या धनाच्या विरोधात सुरु केलेली लढाई आपण जिंकत नाही तोपर्यंत अशीच सुरु राहील. देशवासियांनी आतापर्यंत दिलेली साथ व सहकार्य असेच कायम ठेवावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले.
महाराष्ट्रात विकासाची कामे वेगाने प्रगतीवर असून वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र नवी उंची गाठत आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख करुन पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले.
            जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले की,आमच्या राज्य शासनाने केंद्र शासनाकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकास परवानगी मिळावी यासाठी पाठपुरावा केला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानतो की, त्यांनी या स्मारकाला परवानगी देण्यासाठी मदत केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारकाच्या कामास जानेवारी 2017 मध्ये  सुरुवात होणार आहे.  ३५२ वर्षांपूर्वी याच महिन्यात याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे जलपूजन केले होते. आता याच दिवशी आपण अरबी समुद्रात शिवछत्रपतींच्या स्मारकाचे जलपूजन केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हा पुतळा नाही तर एक जिवंत वास्तू असणार आहे. त्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळणार आहे. अमेरिका हा देश ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’मुळे ओळखला जातो. आपला भारत देशही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामुळे ओळखला जाईल, जगभरातून लोक शिवरायांना वंदन करायला मुंबईत येतील असा विश्वास व्यक्त करुन ते पुढे म्हणाले की, या स्मारकापासून शूरता, वीरता आणि सुप्रशासनाची प्रेरणा मिळेल. महाराजांच्या स्वप्नातील महाराष्ट्र बनण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मेट्रो मार्ग, उड्डाणपूल त्याचबरोबर रेल्वे व महाराष्ट्र शासनामध्ये होत असलेल्या सामंजस्य करारामुळे मुंबई शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ होणार असून मुंबई महानगर क्षेत्रामध्ये 200 किमी अंतराचे मेट्रोचे जाळे निर्माण केले जाणार आहे. मुंबईतील सर्व सार्वजनिक दळणवळण सेवा एकाच टिकीटावर आणून सामान्यांना सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो २ बी - डीएन नगर-वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स-मानखुर्द, मेट्रो ४- वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली,  मुंबई ट्रान्स हार्बर लिंक,    कुर्ला-वाकोला उन्नत रोड, कलानगर जंक्शन उड्डाणपूल, एमयुटीपी-३ या प्रकल्पांचे व्यासपीठावरुन कळ दाबून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी संबंधित प्रकल्पांची ध्वनीचित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासन व रेल्वे विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की, ‘रेल बढे, देश बढे’, असेच मी या निमित्ताने सांगीन. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यभरातील वातावरण शिवमय झाले आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईकरांना आज रेल्वेची मोठी भेट दिली आहे. आजच्या दिवशी  राज्य शासनाबरोबर रेल्वेने 55 हजार कोटी रुपयांचे दोन सामंजस्य करार केले आहेत. यामुळे आगामी काळात लोकांच्या जीवनात बदल होणार आहे.
            अरबी समुद्रात जागतिक दर्जाचे शिवस्मारक होत आहे याचा मला आनंद होत आहे असे सांगत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले की, आजचा दिवस महाराष्ट्राच्या जनतेसाठी सुवर्णाक्षरांनी लिहीला जावा असाच दिवस आहे. भारतात शिवशाही साकार व्हावी असे पंतप्रधानांचे स्वप्न आहे. मुंबई बदलत असून महाराष्ट्रात तीन लाख कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे येत्या पाच वर्षांत करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, आज मी इथे शिवरायांना वंदन करायला आलो आहे. आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आपण पुढे जात आहोत. तंत्रज्ञान व बुद्धिमत्तेचा वापर करुन महाराजांनी त्या काळात सिंधुदुर्ग किल्ला बांधला. छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले केंद्रिय पुरातत्व खात्याकडून महाराष्ट्र राज्यांकडे द्यावेत, अशी मागणी श्री. ठाकरे यांनी यावेळी केली. 
            प्रारंभी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. श्री. पाटील यावेळी म्हणाले की, आज सगळ्या भारतवासियांसाठी गौरवाचा दिवस आहे. छत्रपतींच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचे भूमीपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झाले आहे. आपल्या देशाचे अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांमुळे असून येत्या काळात तयार होणारे शिवस्मारक हे आगामी पिढ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.
            या सोहळ्यास विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील सदस्य, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, राज्यातील विविध राजघराण्यांतील सदस्य तसेच वरिष्ठ शासकीय अधिकारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदिप भिडे यांनी केले. या सोहळ्याच्या सुरुवातीस शाहिर नंदेश उमप आणि कलाकारांनी शिवराज्याभिषेक सोहळा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सादर केला.

अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जल-भूमिपूजन







राज्यपाल श्री. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे व उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती
            बीड  दि.24 :- अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचे जलपूजन व भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नियोजित स्मारकस्थळी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
            राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजी राजे, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते. प्रारंभी पंतप्रधान श्री. मोदी यांनी कलशांचे पूजन केले. त्यानंतर पंतप्रधान श्री. मोदी यांच्यासह मान्यवरांनी नद्यांचे पाणी व गडकिल्ल्यांची पवित्र माती नियोजित स्मारकस्थळी अर्पण केली. श्रीराम विवेक देवधर गुरुजी यांनी भूमिपूजन विधी पार पाडला.
            स्मारकाच्या नियोजितस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीत बसलेला पुतळा उभारण्यात आला होता. 
मुख्यमंत्र्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कलश सुपुर्द
            कार्यक्रमाच्या प्रारंभी गिरगाव चौपाटी येथे झालेल्या कार्यक्रमात समारंभासाठी  राज्यभरातून  आणण्यात आलेल्या नद्यांचे जल आणि प्रमुख गडकिल्ल्यांच्या पवित्र मातीचे कलश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपुर्द केले.
            याप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागर राव, सार्वजनिक  बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री तथा मुंबई उपनगराचे पालकमंत्री विनोद तावडे, उद्योग राज्यमंत्री प्रवीण पाटील पोटे, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे, खासदार रावसाहेब दानवे, खासदार उदयनराजे भोसले, खासदार छत्रपती संभाजी राजे, आमदार मंगल प्रभात लोढा, आमदार राज पुरोहित, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राजशिष्टाचार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुमित मलिक, गड किल्ले संवर्धनाचे काम करणारे संभाजीराव भिडे गुरुजी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

            कलश सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान श्री. मोदी यांच्यासह राज्यपाल सी. विद्यासागर, मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व विविध मान्यवर हावरक्राफ्टने हे कलश घेऊन अरबी समुद्रातील स्मारकाच्या नियोजित स्थळाकडे रवाना झाले.           या कार्यक्रमानिमित्त गिरगांव चौपाटीवर शिवकालीन आरमाराचे चित्र उभे करण्यात आले होते. याठिकाणी भव्य समारंभदेखील आयोजित करण्यात आला होता. सुरुवातीला पंतप्रधान श्री. मोदी यांच्यासह मान्यवरांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या उपस्थित जनतेने यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा देत जल्लोष केला.