गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांनी स्वतंत्र बैठक घ्यावी - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे संबंधित विभाग प्रमुखांनी स्वतंत्र बैठक घेऊन त्वरित निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह समितीचे शासकीय, अशासकीय सदस्य व तक्रारदार उपस्थित होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जिल्हा पुरवठा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषि विभाग, सहकार विभाग, पाटबंधारे विभाग, मृदा सर्वेक्षण विभाग आदि विभागाचे अधिकारी या समितीचे शासकीय व ॲड. अजित देशमुख, ॲड. सय्यद खाजा मिया हे अशासकीय सदस्य आहेत. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, 31 मे च्या बैठकीतील 7 आणि नवीन प्राप्त 8 प्रकरणे समितीपुढे आहेत. यापैकी 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, 11 प्रकरणे प्रलंबित आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी प्रशासन आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीपुढे प्रकरण सादर करण्यापूर्वी तक्रारदारांनी संबंधित विभाग प्रमुखांची भेट घेऊन समस्या मांडावी, जेणेकरून तक्रार निकाली निघण्यास मदत होईल. आजच्या बैठकीत प्राप्त प्रकरणे संबंधित विभागाकडे वर्ग करावीत. संबंधितानी पुढील बैठकीच्या आधी सदर प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा