शनिवार, २९ जुलै, २०१७

सेवा केंद्र चालकांनी आगाऊ रक्कम शेतकऱ्यांकडून घेऊ नये अन्यथा फौजदारी कार्यवाही

सेवा केंद्र चालकांनी आगाऊ रक्कम
शेतकऱ्यांकडून घेऊ नये अन्यथा फौजदारी कार्यवाही


            बीड, दि. 29 :-  शेतकऱ्यांचे पीक अर्ज दाखल करुन घेताना काही आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून पीक विमा रक्कमेव्यतिरिक्त आगाऊ स्वरुपात रक्कमेची मागणी करण्यात येत आहे. अर्जासाठी प्रती अर्ज 24 रुपये शासनामार्फत अनुदान देण्यात येत असूनही जर अशा प्रकारे आगाऊ स्वरुपातील रकमेची मागणी करताना आपले सरकार सेवा केंद्र चालक आढळून आल्यास किंवा तशा स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधीत आपले सरकार सेवा केंद्र बंद करुन सबंधित आपले सरकार केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच दि. 24 ऑगस्ट 2017 पासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत शेतकऱ्यांचे नोंदणी व अर्ज मोफत भरणेबाबतच्या प्रक्रियेस सुरुवात झालेली आहे. या योजनेतंर्गत कोणत्याही प्रकारचे शुल्क शेतकऱ्यांकडून आकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी. असे तहसीलदार, बीड यांनी कळविले आहे.

2 ऑगस्ट पासून वेतन पडताळणी पथकाचा बीड दौरा

2 ऑगस्ट पासून वेतन पडताळणी पथकाचा बीड दौरा

            बीड, दि. 29 :-  सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद येथील वेतन पडताळणी पथकाचा दि. 2 ते 5 ऑगस्ट 2017 या कालावधीत बीड येथे येणार आहे. या दौऱ्यामध्ये हे पथक दिनांक 2 व 3 ऑगस्ट 2017 रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील सेवापुस्तकांची पडताळणी करणार असून दि. 4 ते 5 ऑगस्ट 2017 रोजी जिल्हा व तालुकास्तरावरील कार्यालयातील सेवापुस्तकांची पडताळणी करणार आहे.

            जिल्हयातील संबधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सेवापुस्तके पडताळणीसाठी सादर करताना महाकोषमधील व वेतनिका प्रमाणित डीडीओ लॉगईन करावे, डीडीओ लॉगीन करण्यासाठी बीडीएससाठी वापरण्यात येत असलेले युजरनेम व पासवर्ड यांचा वापर करावा. ज्या कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके पडताळणी करावयाची आहेत त्या कर्मचाऱ्यांचा सेवार्थ एम्प्लॉयर आय.डी. टाकून सबमिट करुन वेतन पडताळणी पथक, औरंगाबाद यांच्या नावे तयार होणारे पत्र पडताळणी करावयाच्या सेवापुस्तकांसोबत सादर करावे  व सेवापुस्तकांची पडताळणी करुन घ्यावी असे सहसंचालक, लेखा व कोषागारे, औरंगाबाद यांनी कळविले आहे.

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

जिल्हयातील उर्दु भाषिकांनी उर्दु लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार व्हावे - जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के






         

          बीड, दि. 28:- जिल्हयातील अल्पसंख्याक समाजातील विशेषत: उर्दु भाषिक नागरिकांना व त्यांच्या कुटुंबांना उर्दु लोकराज्य मासिकाच्या माध्यमातून  शासनाच्या सर्व योजनांची व विविध उपक्रमांची माहिती व्हावी व त्यांना या योजनाचा फायदा व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालयाच्यावतीने "उर्दू लोकराज्य" हे मासिक दरमहा प्रसिध्द करण्यात येत असून हे मासिक सर्व उर्दु भाषिक नागरिकांपर्यंत पोहण्यासाठी  त्या  समाजातील नागरिकांनी या कामात पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के यांनी केले.
            बीड येथील अलहुदा उर्दु महाविद्यालय येथे उर्दु लोकराज्य मासिकाचे वाचक संख्या वाढविण्यासाठी आयोजित कार्यक्रमात जिल्हा माहिती अधिकारी श्री. सोनटक्के बोलत होते. या कार्यक्रमास अलहुदा उर्दु महाविद्यालय मुख्याद्यापक सिराज खान, जिल्हा माहिती कार्यालयाचे ना. गो. पुठ्ठेवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे बोलतांना जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के म्हणाले की,  महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र "लोकराज्य" हे मासिक दरमहा प्रसिध्द करण्यात येते. या मासिकामध्ये राज्य शासनाने घेतलेले निर्णय, शासनामार्फत राबविण्यात  येणा-या योजना, मंत्रीमंडळाचे निर्णय, महाराष्ट्राची ऐतिहासीक, भौगोलीक, सांस्कृतिक माहिती प्रसिध्द करण्यात येते. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्टया उपयुक्त व त्यांच्या सामान्य ज्ञानात भर घालणारी माहिती तसेच शासनाने घेतलेले निर्णय, योजना व राज्याच्या कारभाराची माहिती यातुन मिळते. मराठी लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 100 रुपये  आहे तर उर्द लोकराज्य मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त 50 रुपये असुन वर्गणीदाराला वर्षभर अंक पोस्टाने घरपोच पाठविले जातात.  तसेच हे अंक स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सर्व उर्दु भाषिक समाजातील नागरिकांनी उर्दु लोकराज्य मासिकाचे 50 रुपये वर्गणी भरुन मोठया प्रमाणावर वर्गणीदार व्हावे  असे आवाहन त्यांनी  यावेळी केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मुख्याद्यापक सिराज खान यांनी या कार्यक्रमाविषयी माहिती उपस्थितांना सविस्तर करुन देवून  उर्दु लोकराज्य अल्पसंख्यांकासाठी महत्वाचे असून त्यामध्ये शासनाची सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असून अल्पसंख्यांकाच्या योजनांची तसेच विविध कार्यक्रमाची माहिती यामध्ये देण्यात येत असते. उर्दु लोकराज्य समाजातील सर्वांच्या उपयोगाचे आहे. त्याची वार्षिक वर्गणी 50 रुपये असल्याने खुपच माफक आहे तसेच हे अंक आपणास पोष्टाने घरपोच उपलब्ध होत असल्याने अल्पसंख्यांक समाजातील जास्तीत जास्त नागरिकांनी वर्गणीदार होवून शासनाच्या या उपक्रमाला सहकार्य करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            कार्यक्रमाचे सुत्र सचालन सय्यद रहेबर यांनी केले तर आभार शेख अब्दुल हकमी यांनी मानले. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातील विद्यार्थीनी शेख मुस्कान मुसा, मिर्झा अदिबा तौफीक यांच्या स्वागत गिताने करण्यात आले.    या कार्यक्रमास जिल्हा माहिती कार्यालयाचे राजेंद्र वाणी, शेख मोईजोद्दीन, शेख शेख रफीक, शेख मसुद, युनुस खान यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.-*-*-*-

गुरुवार, २७ जुलै, २०१७

प्रधानमंत्री पीक विमा योजना बँकेत किंवा आपले सरकार केंद्रावर शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत



          बीड, दि. 27 :-  राज्यात खरीप हंगाम 2017-18 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना दि.20 जून  व 23 जून 2017 रोजीच्या शासन निर्णयानूसार जिल्ह्यात युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी मार्फत राबविण्यात येत आहे. जिल्हयातील कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना बंधनकारक असल्याने त्यांचा विमा हप्ता भरण्याची बँकेवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी त्यांचा  पीक विमा भरण्यासाठीचा अर्ज त्यांचे खाते असलेल्या बँकेत किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC),  आपले सरकार केंद्रावर ऑनलाईन पद्वतीने भरावा. या शिवाय इतर कोणत्याही मार्गाने पीक विमा अर्ज भरु नये. असे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

          जिल्हयातील काही शेतकरी नेट कॅफेवर जाऊन अग्री इंन्सूरन्स पोर्टल (Agri insurance Portal)  वरील ‍Farmer या option  मधून अर्ज भरणा करत असल्याचे निदर्शनास आले आहे.  अशा पध्दतीने भरणा केलेले  अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी.  नेटकॅफे चालकांनी अशा प्रकारे कोणतेही अर्ज भरणा करत असतील अशा नेटकॅफे चालकावर  दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच काही कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC),आपले सरकार सेवा केंद्र चालक पीक विमा हप्ताच्या रक्कमेच्या व्यतिरिक्त पैसे घेत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांचेवरही दंडात्मक कार्यवाही करुन ब्लॅक लिस्टमध्ये नोंद करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. असे जिल्हाधिकारी,बीड यांनी कळविले आहे

जिल्हास्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक जाहिर



बीड, दि. 27 :- महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाअंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड यांच्यामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धांना जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेने सुरवात होत आहे. जिल्हास्तर सुब्रतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा दि. 28 ते 29 जुलै 2017 या कालावधीत बीड येथील जिल्हा क्रीडा संकुल आणि पोलीस मुख्यालय मैदानावर होत आहेत.
सन 2017-18 या वर्षातील  मैदानी, खो-खो, कबड्डी, कुस्ती, व्हॉलीबॉल, क्रिकेट, योगा, बुध्दिबळ, फुटबॉल, कराटे  या दहा खेळाच्या शालेय स्पर्धा तालुकास्तरापासून होत असून इतर सर्व खेळांच्या स्पर्धा ह्या सरळ जिल्हास्तरापासून पुढे होत आहेत. तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन हे संबंधीत तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी तथा तालुका क्रीडा स्पर्धा संयोजकामार्फत होत असून जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन हे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद, बीड मार्फत होत आहे. तालुकास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संबंधीतांनी तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा स्पर्धा संयोजक यांच्याशी संपर्क साधून स्पर्धेचा कार्यक्रम प्राप्त करुन स्पर्धेत सहभागी व्हावे. जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे संपर्क साधून जिल्हास्तरीय स्पर्धा कार्यक्रम प्राप्त करुन घेवून स्पर्धेत सहभाग घ्यावा. तालूकास्तर व जिल्हास्तर स्पर्धेत सहभागी होण्याकरीता सर्व संबंधीत शाळा, विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये यांना गतवर्षीच्या नियमाप्रमाणे संलग्नता व खेळाडू, संघ प्रवेश फी दि. 8 ऑगस्ट 2017 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड येथे जमा करणे आवश्यक आहे.

 जिल्हास्तरीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम सुब्रतो फुटबॉल दि.28  व 29 जुलै 2017, फुटबॉल दि.8 ते 10 ऑगस्ट, ज्युदो दि.16 ऑगस्ट, सिकाई मार्शल आर्ट दि.18 व 19 ऑगस्ट, सायकलींग दि.19 ऑगस्ट, वेटलिफ्टींग दि.22 ते 23 ऑगस्ट,  शुटिंग बॉल स्पर्धा दि.22 ऑगस्ट, टेबल टेनिस दि.23 व 24 ऑगस्ट, कॅरम दि.23 व 24 ऑगस्ट, स्क्वॅश दि.28 ऑगस्ट, रायफल शुटींग दि.28 व 29 ऑगस्ट, नेहरु हॉकी दि.30 ऑगस्ट,जिम्नैस्टिक दि.4 व 5 सप्टेंबर, हॉकी दि.4 व 5 सप्टेंबर, जलतरण दि.4,6व 7 सप्टेंबर, वाटरपोलो दि.7 सप्टेंबर, बॅडमिंटन दि.6 व 7 सप्टेंबर, व्हॉलीबॉल दि.6 ते 8 सप्टेंबर,क्रिकेट दि.7 ते 10 सप्टेंबर, योगा दि.7 व 8 सप्टेंबर, बास्केटबॉल दि.7 ते 9 सप्टेंबर, आर्चेरी दि.8 सप्टेंबर, बॉल बॅडमिंटन दि.8 सप्टेंबर, क्रिकेट दि.11 ते 14 सप्टेंबर, बॉक्सिंग दि.11 ते 13 सप्टेंबर, सॉफ्टबॉल दि.11 ते 13 सप्टेंबर, तायक्वाँदो दि.12 ते 14 सप्टेंबर, रोलबॉल दि.13 व 14 सप्टेंबर, डॉजबॉल दि.13 व 14 सप्टेंबर, रोलर स्केटींग दि.13 व 14 सप्टेंबर, रोलर हॉकी दि.13 सप्टेंबर, कबड्डी दि.13 ते 15 सप्टेंबर, किक बॉक्सिंग दि.14 व 15 सप्टेंबर, थ्रोबॉल दि.14 व 15 सप्टेंबर, तलवारबाजी दि.14 सप्टेंबर, नेटबॉल दि.14 सप्टेंबर, लॉन टेनिस दि.15 सप्टेंबर, वुशु दि.15 व 16 सप्टेंबर, क्रिकेट दि.15 ते 20 सप्टेंबर, मैदानी दि.18 ते 20 सप्टेंबर, हॅण्डबॉल दि.19 व 20 सप्टेंबर, बेसबॉल दि.19 ते 21 सप्टेंबर, क्रॉसकंट्री दि.21 सप्टेंबर, मल्लखांब दि.25 सप्टेंबर, बुध्दीबळ दि.25 ते 27 सप्टेंबर, खो-खो दि.26 ते 28 सप्टेंबर, कुस्ती (फ्रीस्टाईल) दि.26 ते 28 सप्टेंबर, कराटे दि.27 ते 29 सप्टेंबर, कुस्ती (ग्रीकोरोमन) दि.29 सप्टेंबर याप्रमाणे  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बीड यांच्याशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील सर्व शासन मान्यताप्राप्त  शाळा, विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयांचे मुख्याध्यापक, प्राचार्य, क्रीडा शिक्षक, क्रीडा प्राध्यापक, खेळाडूंनी या स्पर्धा कार्यक्रमाची दखल घेवून वेळेत सहभाग नोंदवावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

शालेय, महिला ग्रामीण क्रीडा स्पर्धांना जिल्हास्तर सुब्रोती मुखर्जी फुटबॉल स्पर्धेने सुरुवात


            बीड, दि. 26 :- भारतीय शालेय खेळ महासंघ व भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येते. सन 2017-18 या शैक्षणिक वर्षातील तालुका, जिल्हा,  विभाग, राज्यस्तर, शालेय, महिला, ग्रामीण व इतर स्पर्धांना सरळ जिल्हास्तर सुब्रोतो मुखर्जी स्पर्धेने सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे आयोजन 14 वर्षाखालील मुले, 17 वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात  खालीलप्रमाणे आहेत.

          खेळाचे नाव सुब्रोतो वयोगट 14 वर्षाखालील मुले, खेळाचे नाव मुखर्जी वयोगट 17 वर्षाखालील मुले, फुटबॉल वयोगट 17 खालील मुली तसेच जिल्हास्तरीय स्पर्धा शुक्रवार दि. 28 जुलै 2017  रोजी घेण्यात येणार  आहे. तरी जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, उच्च माध्यमिक विद्यालये, ज्युनियर कॉलेज, ग्रामपंचायती, क्रीडा संस्था, क्लब, खेळाडू यांनी  या स्पर्धा कार्यक्रमाची दखल घेवून स्पर्धेत सहभाग नोंदवावा. असे जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा क्रीडा संकुल, सुभाष रोड, बीड यांनी कळविले आहे. 

कर्मचाऱ्यांचा सर्वकष माहितीकोष ऑनलाईन भरण्याकरीता जिल्हा सांख्यिकी कार्यालयाशी संपर्क साधावा


        बीड, दि. 26 :- महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष दरवर्षी अद्यावत करण्यात येणार आहे. सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी माहिती कोषासाठी नियमित आस्थापनेवरील व नियमित्तेवर आस्थापनेवरील कर्मचारी (कार्यव्ययी आस्थापनेवरील,रोजंदारीवरील, अंशकालीन, मानसेवी इत्यादी) तसेच तदर्थ तत्वावर नेमणूका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती दि.1 जुलै 2017 या संदर्भ दिनांकास अनुसरुन गोळा करण्यात येणार आहे.

          तरी बीडजिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्याची कार्यवाही जिल्हा सांख्यिकी कार्यालय, सुभाष रोड, बीड यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. ही सर्वंकोष माहितीकोष तयार  करण्याकरीता आवश्यक असणारी ऑनलाईन संगणकीय आज्ञावली महाराष्ट्र शासनाच्या www.mahasdb.maharashtra.gov.in  या वेबसाईटवर EMDb  या नावाने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही आज्ञावलीत माहिती नोंदणीकरीता User ID व PASSWORD  दि. 16 ऑगस्ट 2017 ते 31 ऑगस्ट 2017 या कालावधीत प्राप्त करुन घेण्यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. व सर्वंकष माहिती कोषाकरीता असणाऱ्या ऑनलाईन आज्ञावलीमध्ये माहिती नोंदणी तात्काळ पुर्ण करण्यात यावी. तसेच आहरण व संवितरण अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वेबसाईटवर नोंदणी करुन जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडे सादर करावी. ही माहिती सादर केल्यानंतर अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून माहिती प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र संबंधितांना उपलब्ध करुन देण्यात येईल.  माहे नोव्हेंबर 2017 च्या वेतन देयकासोबत व नोंदवलेली माहिती बरोबर असल्याबाबत माहे फेब्रुवारी 2018 वेतनदेयकासोबत अशा प्रकारचे प्रमाणपत्र जोडले नसल्यास वेतन देयके कोषागार कार्यालय, उपकोषागार कार्यालय येथे पारीत केली जाणार नाहीत याची सर्व  आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

बुधवार, २६ जुलै, २०१७

मिशन दिलासा कार्यक्रमातंर्गत गरजू वंचित घटकांना मदतीचा हात - जिल्हाधिकारी एम.डी. सिंह





बीड -जिल्हयात मिशन दिलासा कार्यक्रमातंर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याबरोबरच जिल्हयातील पीडित व गरजू वंचित घटकांनाही आधार देण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. याकामामध्ये सामाजिक बांधिलकी समजून सामाजिक संस्था व नागरिकांनीही पुढाकार घ्यावा आणि पीडित व गरजू वंचित घटकांना मदतीचा हात द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मिशन दिलासा कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या कार्यक्रमास बीड अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, अंबाजोगाई अपर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, विकास माने, गणेश निऱ्हाळी, महेंद्रकुमार कांबळे,उप जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ.एन.आर. शेळके, भागीरथ बियाणी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी एम.डी. सिंह म्हणाले की, जिल्हयाच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना असून त्या योजना विविध विभागाच्यामार्फत जिल्हयात राबविण्यात येत आहेत. या योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य केल्यास जिल्हयाचा विकास होण्यास मदत होणार आहे असे सांगून जिल्हयात दिलासा कार्यक्रमाअंतर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंबातील सदस्यांच्या आवश्यकतेनुसार शासनाच्या विविध विभागामध्ये सुरु असलेल्या योजनांचा लाभ देवून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला पुन्हा आपल्या पायावर उभे करण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
बीड येथील शिवाजी विद्यालयाचा विद्यार्थी दत्ता रामकिशन वाघिरे उदंड वडगाव इयत्ता 10 वीमध्ये 96.60 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याच्या पुढील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेण्याबाबत मशिन दिलासाअंतर्गत आवाहन करण्यात आले होते त्यास प्रतिसाद देवून भगीरथ बियाणी यांनी या विद्यार्थ्याची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. तसेच त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिवासी पारधी समाज मुला-मुलींचे निवासी वसतीगृह, बीड यांनाही मदत केल्याने त्यांच्या सामाजिक कार्याबदृल त्यांचे जिल्हाधिकारी एम. डी सिंह यांनी भगीरथ बियाणी यांचे आभार व्यक्त केले आणि अशा सामाजिक कार्यात जिल्हयातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाबद्दल अनुभव सांगतांना म्हणाले की, दत्ता रामकिशन वाघिरे यांच्या सारखीच कौटुंबिक परिस्थिती होती. या सर्व अडचणीवर मात करुन मी शिक्षण घेतले आणि माझे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जिद्दीने स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून यशस्वी झालो आहे असे सांगून दत्ता वाघिरेनेही आपली जिद्द कायम ठेवून उच्च शिक्षण घ्यावे व जीवनात मोठा अधिकारी व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करुन वाघिरेच्या आई वडीलानीही मुलाबरोबर मुलींनाही शिक्षणामध्ये पाठबळ देवून मदत करावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलतांना भगीरथ बियाणी म्हणाले की, दत्ता वाघिरे यांच्या शिक्षणाबरोबर इतर आवश्यक असणारी सर्व मदत करण्याची आपण जबाबदारी घेतली असून सर्व नागरिकांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून, सामाजिक बांधिलकी समजून काम केले पाहिजे. वंचितांना व गरजवंताना आवश्यक ती मदत केली पाहिजे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दत्ता रामकिशन वाघिरे यांनी आपल्या मनोगतात म्हणाला की, माझ्या घरची परिस्थिती साधारण असून मला शिक्षणामध्ये आई-वडील, गावकरी, गुरुजनांनी मोलाची मदत केली. मी माझ्या जीवनातील माझे ध्येय पुर्ण करुन स्वतंत्र भारताचा आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करीन असे सांगून आपण सर्वांनी मला मदतीचा आधार देवून माझ्यावर जो विश्वास टाकला आहे त्याची पुर्तता करण्यासाठी मी जिद्दीने प्रयत्न करुन आपल्या सर्वांच्या अपेक्षा पुर्ण करणार असल्याचे त्याने यावेळी सांगितले.


यावेळी शिवाजी विद्यालयाचा उदंड वडगाव येथील रहिवासी असलेला विद्यार्थी दत्ता वाघिरे यास कपडे व इतर साहित्य तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदिवासी पारधी समाज मुला-मुलींचे निवासी वसतीगृह, बीड यांना किराणा साहित्य भगीरथ बियाणी यांनी केलेली मदत मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी एम.डी. सिहं यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, अधिकारी-कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

मंगळवार, २५ जुलै, २०१७

जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचे आवाहन शेतकऱ्यांनी युरीया खताची आवश्यकतेनूसार खरेदी करावी

जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचे आवाहन
शेतकऱ्यांनी युरीया खताची
आवश्यकतेनूसार खरेदी करावी
                  
          बीड, दि. 25 :- खरीप हंगाम सन 2017-18 मध्ये जिल्हयात सर्वच पिकांची पेरणी झालेली असून सरासरी खरीप क्षेत्राच्या तुलनेत पेरणी 109 टक्के इतक्या क्षेत्रावर झाली आहे.  मागील आठवड्यात  झालेल्या पावसामुळे पिकाची वाढ होत असून शेतकरी आंतर मशागतीची कामे करीत आहेत. शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेला युरीया खत आवश्यकतेप्रमाणे  खरेदी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.   
          जिल्हयात सर्वच प्रकारच्या रासायनिक खताचा पुरवठा मोठया प्रमाणात असून खत उपलब्धता  ही समाधानकारक आहे.  झालेल्या पावसामुळे युरीया खताची मागणी वाढत असून या बाबीचा विचार करुन या खताचा पुरवठा वेळेत कसा होईल यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मार्केटमध्ये इफ्को, झुआरी, कोरोमंडल, कृभको, आरसीएफ या उत्पादकाचा युरीया उपलब्ध आहे. मागील आठवडयात जिल्हयात 2 हजार 878 में.टन युरीया खताचा पुरवठा झाला असून अजुनही पुरवठा चालु आहे.
          शेतकऱ्यांनी एका विशिष्ट नावाच्या, कंपनीच्या  युरीया खताची मागणी न करता उपलब्ध झालेला व आपणास आवश्यक असेल तेवढाच युरीया खत खरेदी करावा. निम कोटेड युरीया वापरल्याने पिकास निश्चित फायदा होतो.  तसेच जमीन,  हवा  आणि पाणी प्रदूषण कमी होण्यास मदत होते. उपलब्ध असलेला  युरीया खताचे आकारमान लहान, मोठे असले तरी त्यांत नायट्रोजन प्रमाण 46 टक्केच आहे. तसेच तो पिकास वापरण्याची पध्दत ही सारखीच असून त्यामधुन पिकास उपलब्ध होणारा नायट्रोजन ही तेवढाच कालावधीत पिकास उपलब्ध होतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी युरीया खताचा आवश्यकतेप्रमाणे वापर करावा असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले आहे.  

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनाची प्रभावी अमलबजावणीसाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती -जिल्हाधिकारी एम.डी. सिंह


          बीड, दि.25:- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 ची प्रभावीपणे अमलबजावणी व संबंधितावर समन्वय ठेवून संनियंत्रण करण्यासाठी जिल्हयातील सर्व तालुक्यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी  निर्गमीत केले आहेत.
          छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ची  प्रभावीपणे अमलबजावणी व्हावी तसेच शेतकरी व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात समन्वय ठेवून संनियंत्रण करण्यासाठी तसेच या योजनेअंतर्गत आपल्या तालुका कार्यक्षेत्रातील  पात्र शेतकऱ्यांना आपल्या अधिनस्त प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थेच्या गटसचिवांमार्फत विहित पोर्टलवर अर्ज भरण्यासाठीचे प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी.
          छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 ची  अमलबजावणी  प्रभावीपणे होईल यावर संनियंत्रण ठेवावे व त्याचा अहवाल वेळोवेळी  कार्यालयास सादर करावेत असे जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी ‍काढलेल्या नियुक्ती आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-