शनिवार, ९ मार्च, २०१९


                                               
                                                                   






                                               सामान्य माणसासाठी रस्ते कामांच्या


                                             माध्यमातून विकासाचा पाया मजबूत केला
                                                                           -- पालकमंत्री पंकजा मुंडे
                                                     
बीड, दि.9:- राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 च्या औरंगाबाद ते येडशी या 190 कि.मी. लांबीच्या मार्गाच्या चौपदरीकरण कामाचा लोकार्पण सोहळा राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री  तथा जिल्हयाच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा  मुंडे यांच्या उपस्थितीत झाला. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हीडीओ कॉन्फरन्स द्वारे आणि मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते प्रत्यक्ष  महामार्गाचे लोकार्पण आणि केंद्रीय मार्ग निधीतून पैठण ते शहागड रस्ते सुधारणा व औरंगाबाद जिल्हयातील बोरगाव-देवगाव-लासूर स्टेशन  या राज्य मार्गाचे रुंदीकरण अशा 77 कोटी रुपयांच्या कामाच्या कोनशिलेचे डिजीटल अनावरण करुन  भूमीपूजन करण्यात आले.
 कार्यक्रमास खा. डॉ.प्रीतम मुंडे, जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार, आ.जयदत्त क्षीरसागर, आ.लक्ष्मण पवार, आ.भिमराव धोंडे, आ.संगिता ठोंबरे, आ.आर.टी.देशमुख, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, गेवराईचे नगरराध्यक्ष सुशील जवंजाळ, सां.बा. विभागाचे मुख्य अभियंता खंडेराव पाटील, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक अजय गाडेकर, श्री.घाणेकर, दिपक राऊत आदी उपस्थित होते.
आज लोकार्पण झालेल्या औरंगाबाद-येडशी महामार्गाच्या कामासाठी 1 हजार 871 कोटी रुपये खर्च आला असून यामधून महामार्गावर 5 नदीवरील मोठे पूल, 5 उड्डाण पूल,59 लहान पूल,77 कि.मी. लांबीचे सर्व्हीस रोड यासह तीन टोल प्लाझा,दोन सुविधा व विश्रांती स्थळ आदी कामे पूर्ण करण्यात आले आहेत.आज पासून हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
यावेळी बोलताना श्रीमती मुंडे म्हणाल्या, रस्ते विकास,स्वच्छता अ‍भियान, महिलासांठी उज्वल योजनेतून स्वयंपाकाचा गॅस, सौभाग्य योजनेमधून वीज जोडणी अशा अनेक  योजनांमधून विकासापासून दूर असलेल्यांना दिलासा देण्याचे व विकासाच्या मार्गावर आणण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या  मार्गदर्शनाखाली झाले तर जिल्हयाच्या विकासाचा पाया घालण्याचे काम  मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाले आहे. 810 कि.मी. चे रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करताना जिल्हयास 55 कोटी रुपये तर ग्राम विकास विभागाच्या माध्यमातून 25:15 योजनेतून 58 कोटी रुपये निधी दिला आहे.
श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या, नुसता रस्ते विकास करुन न थांबता जिल्हयातील श्रध्दास्थानांच्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून नारायणगड,गहिनीनाथगड,पोहरागड आदीसांठी ही मोठा निधी उपलब्ध केला आहे. पोहरागडला देशभरातून भाविक येत असतात याचा विचार करुन 25 कोटी रुपये प्राथमिक मंजूर केले असताना त्यात वाढ करुन प्रत्यक्षात 125 कोटी रुपयांचे विकास कामांचे नियोजन केले आहे. जिल्हयातील रेल्वे मार्गाचे स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण होत आहे. याचबरोबर मराठवाडयाला वॉटरग्रीड मधून पाणी उपलब्ध करुन देण्यात येणार असून या माध्यमातून हा भाग विकसित व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
 रस्ते झाल्याने वाहतूक,प्रवासी,भाविक यांच्या संख्येत वाढ होवू लागली आहे. रस्त्याच्या बाजूने हॉटेल,ढाबे आदी व्यवसाय निर्माण होऊन रोजगारात वाढ होते. यातूनच सामान्य माणसाच्या विकासासाठी मोठे काम होत आहे. या विकास कामांमधून मराठवाडयातील बीडबरोबरच इतर जिल्हयामध्ये नदी वाहणार, रस्ते धावणार व जनता समृध्द होणार यासाठी विकास योजनांचे नियोजन करुन  पाया मजबूत करण्याचे काम केले आहे, असे मंत्री पंकजाताई म्हणाल्या.
खासदार डॉ. प्रीतमताई म्हणाल्या साडेचार वर्षामध्ये जिल्हयाच्या विकासासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून साडे दहा हजार कोटी रुपये उपलब्ध झाले असून यासाठी जिल्हयापासून केंद्रापर्यंत असलेली विकासाची मजबूत साखळी कारणीभूत ठरली आहे. रस्ते विकासासाठी मोठा निधी देताना कृषी उत्पादनांच्या वेगवान वाहतुकीची सोय होईल, बाजारपेठ जवळ आल्याने त्याचा फायदा शेतक-याना होणार आहे. यासाठी जिल्हयातून जाणारे 18 राष्ट्रीय महामार्ग महत्वाचे ठरणार असून देशातील इतर कोणत्याही जिल्हयापेक्षा ही संख्या मोठी आहे, असे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे महामार्गाचे लोकार्पण
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग,जलसंपदा, नौकानयन व नदी विकास, गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे आजच्या कार्यक्रमात सहभागी होत मार्गदर्शन केले.ते म्हणाले, जिल्हयामध्ये बाराशे किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्गाची कामे होत असून यासाठी प्रशासनाने केलेली वेगवान कार्यवाही महत्वाची आहे. आजचा लोकार्पण होणारा महामार्गाचा टप्पा पूर्ण होण्यासाठी औरंगाबाद,जालना व बीड येथील जिल्हाधिकारी आणि शासन यंत्रणेचे मी अभिनंदन करतो.या महामार्गासोबतच यास जोडणारे विविध मार्ग,बायपास आदींची अनेक कामे केली जात आहे.  विकास रस्त्याशिवाय होऊच शकत नसल्याने बीडसह आठही जिल्हयात  कामे पूर्ण केली जात आहे. रस्त्याबरोबरच मराठवाडयासाठी पाण्याचा प्रश्न महत्वाचा असून महाराष्ट्र समृध्द संपन्न व्हावा, यासाठी ठाणे व कोकण भागातून समुद्रात वाहून जाणारे पाणी दमन गंगा- पिंजाळ प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीमध्ये आणण्यात येईल. नाशिक,नगर व जायकवाडीमध्ये येणा-या पाण्यामुळे मराठवाडा संपन्न होईल.साखरेसह दाळ आदी शेतीतील  उत्पादने मागणीपेक्षा जास्त झाल्याने दर मिळू शकत नाही यावर उपाय करतांना इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्याचे धोरण केंद्राने अवलंबिले असून साखर कारखान्यामध्ये त्या दृष्टीने प्रकल्प उभारण्यास चालना दिली जात आहे.इथेनॉलपासून बायोप्लास्टीक तयार करता येत असल्याने त्याची मोठी मागणी पूर्ण करण्यासाठी शेतक-याच्या उत्पन्नात वाढ होईल असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
लोकार्पण सोहळयामध्ये प्रधान मंत्री आवास योजना,कौशल्य विकास योजनांच्या लाभार्थ्याचा प्रमाणपत्र देऊन मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये प्रातिनिधीक स्वरुपात प्रधानमंत्री आवास योजनेतील पाच लाभार्थी, कौशल्य प्रशिक्षण पूर्ण करुन रोजगार मिळालेले पाच लाभार्थी यांचा समावेश होता. यावेळी आमदार सुरेश धस,आ.लक्ष्मण पवार,माजी आ. गोविंद केंद्रे आदींनी भाषणाव्दारे विचार व्यक्त केले.
*-*-*-*-*-*

शुक्रवार, ८ मार्च, २०१९





जागतीक महिला दिनानिमित्त
मतदार जनजागृती रॅली संपन्न

            बीड,दि.8:- भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनूसार जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांच्यावतीने जागतीक महिला दिनानिमित्त मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, नायब तहसीलदार श्रीमती कमल कुटे, अव्वल कारकुन अर्चना गवळी,  श्रीमती बेबीसरोज अंबिलवादे, प्रतिभा खाडे, एस.एम.जावळे, मुख्यमंत्री फेलो सायली काकडे यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय ते शिवाजी चौक व परत जिल्हाधिकारी कार्यालय येथे येवून रॅलीचा समारोप  झाला. या रॅलीमध्ये शहरातील विविध शाळा व नर्सीग कॉलेजच्या विद्यार्थीनींचा सहभाग होता. यावेळी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, संबंधित शाळेचे शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते.
                                                                      *-*-*-*-*-*





महिलांनी सक्रीयपणे मतदानात सहभाग नोंदवावा
              --उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर

             बीड,दि. 8 :- (जिमाका)  महिला आज कोणत्याच क्षेत्रात मागे नसून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात त्यांनी प्रगती साधली असून मतदारामध्ये जनजागृतीचे कामही महिलांनी उत्कृष्टपणे पार पाडले आहे. महिलांनी जिल्हयात होणारी लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 मध्ये सक्रीयपणे आपला मतदानाचा हक्क बजवावा, महिलामध्ये कोणतेही काम चोखपणे करण्याची जिद्द, चिकाटी, ध्येय असते. त्याचा त्यांनी एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर यांनी जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमा प्रसंगी केले.
              यावेळी पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी श्रीमती चाटे, सर्पराज्ञी प्रकल्पाच्या संचालिका सृष्टी सोनवणे, शिक्षणाधिकारी भगवान सोनवने,  विस्तार अधिकारी सिध्देश्वर माटे, नायब तहसीलदार आर.बी. नागरे इत्यादी उपस्थित होते.
            आयोगाने निवडणूक प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला असून  निवडणूक प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी ॲप्स विकसित करण्यात आले आहेत. 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या मुलींचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ठ करण्यासाठी www nvsp. com या वेबसाईटवर जाऊन नवीन मतदारांना आपले नाव समाविष्ठ करण्याची जलद प्रक्रिया असल्याचे श्री. धरमकर यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने निवडणूक काळात सामान्य नागरिकांना तक्रारी करण्यासाठी C-VIGIL ॲप्स विकसित करून दिले असून या ॲप्सवर आचार संहीता भंग, पैसे वाटप, दारू विक्री, मतदानासाठी प्रलोभने दाखविणे या प्रकारच्या तक्रारींचे फोटो, व्हिडीओ  कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचा-यानां जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून संगणकाव्दारे ही माहिती  दिली.
            सर्पराज्ञी प्रकल्पाच्या संचालिका  श्रृष्टी सोनवणे  आपल्या मनोगतात म्हणाल्या की, निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत असून याचा समतोल राखयचा असेल तर वन्यजीवाचे रक्षण करायला पाहिजे. वन्यजीव हे जंगलात राहतात जंगले नष्ट झाल्याने त्यांची संख्या घटत असून जंगलाचे जतन करणे ही काळाजी गरज बनली आहे. वन्यजीवांचा मानवी जीवनात मोलाचा सहभाग असून सर्वानी वन्यजीव जपण्याचा संकल्प केला पाहिजे. उपविभागीय अधिकारी श्रीमती चाटे म्हणाल्या की, आज विविध व्यवसायाच्या माध्यमातून महिला सक्षम होत असून  मतदार प्रक्रियेत तिने आपली नैतिक जबाबदारी निभावली पाहिजे. मतदान हा आपला हक्क असून तो बजवायलाच पाहिजे यामुळे आपली लोकशाही बळकट होते. दिव्यांग,वृध्द या मतदारांसाठी मतदान केंद्रावर त्यांची व्यवस्था केली असल्याचे श्रीमती चाटे यांनी सांगितले. यावेळी श्रीमती भणगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
            यावेळी 39-बीड लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिका-यांनी मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करुन त्यांची नावे मतदान यादीमध्ये समाविष्ठ करण्याची जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडली व पुढील कामेही ते चोखपणे पार पाडतील यासाठी  श्री. धरमकर यांनी गुलाब पुष्प देऊन त्यांचे मनोबल वाढविले. या कार्यक्रमास विविध शाळेच्या विद्यार्थीनी, महिला, पुरुष मोठया संख्येने  उपस्थित होते.
               कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती सायली काकडे यांनी केले तर आभार सय्यद बेगम यांनी मानले.
                                                    
मुलींचा जन्मदर वाढला असून 866 वरुन 890 वर
         मुलीचा  जन्मदर वाढला असून तो 2014 मध्ये 1 हजार पुरुषामागे  866 होता तर 2019 मध्ये एक हजार पुरुषामागे 890 झाला असून बीड जिल्हयासाठी  जागतिक महिला दिनानिमित्त ही अभिमानाची बाब आहे. मुलीचा जन्मदर वाढणे म्हणजे मुलीबाबत पालकामध्ये सकारात्मक विचाराचे बीज रुजले असल्याचे हे फलीत दिसते.
*-*-*-*-*-*



गुरुवार, ७ मार्च, २०१९







निवडणूक काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी
सोपविलेली कामे जबाबदारी गंभीरतेने पार पाडावी
                                                                  --जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडे

            बीड, दि. 6 :
जिल्हयात होणारी लोकसभा निवडणूक नि:पक्ष, भयमुक्त आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी  निवडणुकीसाठी नियुक्त  अधिकाऱ्यांनी  जबाबदारीने व समन्वयाने कामे  करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडे यांनी दिले.
            39- बीड लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019  निवडणूक विषयक कामाची  आढावा बैठकीचे आयोजन बीड येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात  करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस  अधीक्षक जी श्रीधर,  अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर,  उपविभागीय अधिकारी   प्रभोदय मुळे आदी उपस्थित होते.
            पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री पांडे म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेमध्ये क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे काम महत्वाचे असल्याने त्यांना निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांची व कायद्यांची माहिती असणे आवश्यक आहे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील निवडणुकीचा क्षेत्रिय आराखडा तयार करुन त्यांना लागणारी वाहने, बुथची संख्या, त्यामध्ये असणारी सुविधा व लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती तयार करणे गरजेचे आहे.  त्यांच्या क्षेत्रामध्ये निवडणूक कालावधीत चुक झाल्यास पहिली कारवाई क्षेत्रिय अधिकाऱ्यांवर होणार  असल्याने त्यांनी आपले काम निर्भयपणे बजावणे गरजेचे आहे.  तसेच  क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या अंतर्गत साधारणत: 10 ते 12 मतदान केंद्र राहणार असल्याने सर्व मतदान केंद्राची पहाणी करुन त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेसाठी व मतदानासाठी  सर्व व्यवस्था असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्‍यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            निवडणूक आयोगाने निवडणूक काळात सामान्य नागरिकांना तक्रारी करण्यासाठी C-VIGIL  हे ॲप्स विकसित करून दिले आहे. या ॲप्सवर आचार संहीता भंग, पैसे वाटप, दारू विक्री, मतदानासाठी प्रलोभने दाखविणे या प्रकारच्या तक्रारींचे फोटो, व्हिडीओ अपलोड करता येतील. केलेल्या तक्रारीचे विहित कालावधीत निराकरण करणे सर्व संबंधित अधिकाऱ्यांची  जबाबदारी राहणार आहे. या कामामध्ये निष्काळजी करता येणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. आयोगाने निवडणूक प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत असून  निवडणूक प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी ॲप्स विकसित करण्यात आले आहे.  निवडणूकीमध्ये नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविलेली कामे जबाबदारीने पार पाडावी या कामामध्ये हयगय केल्यास त्यांच्या विरुध्द कारवाई होणार आहे. तसेच 39- बीड लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019   यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. निवडणूक प्रक्रियामध्ये बाधा आणणाऱ्या समाज कंटकासह गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करावी. जिल्ह्यात गैरमार्गाने मद्य विक्री करण्याऱ्यांचा शोध घ्यावा.  जिल्ह्यातील  संवेदनशील,अतिसंवदेनशील मतदान केंद्राची गावनिहाय माहिती घ्यावी व तशी यादी तयार  करुन त्या ठिकाणी योग्य त्या उपाय योजना कराव्यात अवैद्य  शस्‍त्र बाळगण्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व ज्यांना  शस्त्र परवाना देण्यात आले आहेत त्यांच्या कडील शस्त्र  तात्काळ  जमा करुन घ्यावे निवडणूक प्रक्रियामध्ये बाधा आणणाऱ्या समाज कंटकासह गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करावी.  असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक जी श्रीधर म्हणाले की, निवडणुकीच्या कामामध्ये सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी राहणार असून निवडणूक यशस्वीपणे पारपाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. लोकसभा निवडणूक  कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केले असून निवडणूक प्रक्रियामध्ये बाधा आणणाऱ्या समाज कंटकासह गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी  आवश्यकती कार्यवाही करण्यात यआली आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, आयोगाने निवडणूक प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत असून  निवडणूक प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी ॲप्स विकसित केले आहे याची माहिती सर्वांनी करुन घ्यावी व आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना याची माहिती करुन दयावी असे सांगून या निवडणुक प्रक्रीयमध्ये कोणतीही चुक होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, प्रणीण चोपडे, पोलीस अधिकारी श्री मानकर यांनी  विविध विषयावर माहिती दिली.  या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उप जिल्हा निवडणुकअधिकारी प्रवीण धरमकर यांनी केले. तर आभार उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यानी मानले. याकार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते. 
-*-*-*-*-*-*-

शुक्रवार, १ मार्च, २०१९


मतदार नोंदणीसाठी  2 व 3 मार्चला विशेष मोहीम

नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांना विशेष संधी

 बीड, दि. 01 :- (जिमाका) आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीपासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी 2 व 3 मार्च 2019 रोजी  जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नोंदणीपासून वंचित राहिलेल्या अर्हता प्राप्त नागरिकांनी या विशेष संधीचा लाभ घेऊन मतदान प्रक्रीयेत सहभागी व्हावे.
जिल्हा प्रशासनातर्फे 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. मतदार नोंदणीसाठी  23 व 24 फेब्रुवारी रोजीदेखील विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या दिवशी नोंदणी करू न शकलेल्या मतदारांसाठी ही विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.
या दिवशी सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) नागरीकांकडून नाव नोंदणीसाठी अर्ज स्वीकारणार आहेत. बीएलओंकडे नमुना क्र. 6, 7, 8 व 8 अ चे अर्ज उपलब्ध असतील. तसेच नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्यासाठी  1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी बीएलओंकडे उपलब्ध असेल.
मतदार ओळखपत्र हे मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक असून मतदाराचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येणार आहे. मतदार ओळखपत्र असले तरी नागरिकांनी मतदार यादीत आपल्या नावाची खातरजमा करून घ्यावी. विशेषत: 18 वर्ष पुर्ण केलेल्या युवकांनी आणि पात्र दिव्यांग नागरिकांनी मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मतदारांच्या सोयीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. अधिक माहितीwww.ceo.maharashtra.gov.in  या  संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1950 हा टोल फ्री क्रमांकही उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
*-*-*-*-*-*-*-*