गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्यअंतर्गत गोदाम बांधकामासाठी अर्ज स्वीकार प्रक्रियेस प्रारंभ

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - पौष्टिक तृणधान्य सन २०२२-२३ या वर्षात निविष्ठा साठवणुकीसाठी २५० मे. टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेस 27 सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. तरी गोदाम बांधकामासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांची कंपनी ज्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आहे, त्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे दि. २७ सप्टेंबर ते दि. ७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क करून गोदाम बांधकामासाठी अर्ज करावेत. गोदाम बांधकामाची क्षमता २५० मे. टन असून, अनुदान जास्तीत जास्त १२.५० लाख किंवा गोदाम बांधकामास आलेल्या खर्चाच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल ते देय आहे. तसेच ते राष्ट्रीयकृत बँकेचे कर्जाशी निगडित आहे. अर्जासोबत शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, ज्या जागेवर गोदाम उभारणी करण्याचे नियोजन आहे, त्या जागेचा सातबारा व ८-अ जोडण्यात यावा. जिल्हास्तरावर कार्यपद्धतीनुसार लक्षांकाएवढे अर्ज निवड प्रक्रिया करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीस आवश्यक छाननीनंतर पूर्वसंमती देण्यात येईल. गोदाम बांधकाम २५० मे. टन क्षमतेचे असून राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझाइन्स, स्पेसीफिकेशन, गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक आहे. पूर्व संमती भेटल्यावर बँक कर्ज व सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी घेतल्यानंतरच गोदाम बांधकामास कार्यारंभ आदेश देण्यात येईल. तसेच निवड ते पूर्वसंमतीने काम पूर्णत्वासाठी विशिष्ट कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा