बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८


बीड जिल्हाधिकारी कार्यालयात युवा माहिती दूत उपक्रमाचा 
पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते शुभारंभ

        बीड, दि 15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत युवा माहिती दूत असा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून या युवा माहिती दूत उपक्रमाचा शुभारंभ राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.
         या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल एडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर,निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अ. माहिती अधिकारी बी.जी. अंबिलवादे यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विद्यार्थी  मोठया संख्येने उपस्थित होते.
         माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत युवा माहिती दूत या उपक्रमाच्या माध्यमातून  शासनाच्या विकास योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत लाभार्थींना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. माहिती दूत त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधून शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. युवा माहिती दूतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ॲप वर ऑनलाईन होणार आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध असेल. प्ले स्टोअर वरुन हे ॲप डाऊनलोड करुन युवा माहिती दूत म्हणून नोंदणी करता येणार आहे. या युवा माहिती दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणार्‍या पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत.  15 ऑगस्ट नंतर सहा महिन्याच्या कालावधीत माहिती दूतांनी 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधून त्यांना विकास योजनांची माहिती द्यावयाची आहे. तसेच डाऊनलोड केलेल्या ॲपवर कुटुंबाशी भेट दिलेल्या बाबतची माहिती अपलोड करावयाची आहे. प्रत्येक तालुक्यात एक समन्वयक निवडला जाणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी,बीड हे या उपक्रमाचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत. जिल्ह्यातील युवक-युवती तसेच युवा माहिती दूत म्हणून इच्छुक व्यक्तींनी  माहिती दूत म्हणून उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने करण्यात येत आहे. 
-*-*-*-*-*-
स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा

देशात बीड जिल्हयाची ओळख मुलीचा जन्मदर
सर्वात जास्त असलेला जिल्हा म्हणून निर्माण करु
                                              - पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे
           बीड दि.15:- बीड जिल्हयाची ओळख मुलीचा अल्प जन्मदर असलेला जिल्हा म्हणून होता परंतु गेल्या काही वर्षात ही ओळख पुसली जात असून आता जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत असून 898 वरुन 936 इतके झाले आहे. येणाऱ्या काळात मुलीचा जन्मदर सर्वात जास्त असलेला जिल्हा म्हणून बीड जिल्हयाची ओळख देशात निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.
           स्वातंत्र्यदिनाच्या 71 व्या वर्धापनदिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी आयोजित समारंभात त्या बोलत होत्या.  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती सविता गोल्हार, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होती.
           यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, आपल्या जिल्ह्यात मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढत असून 898 वरुन 936 इतके झाले आहे. आणखी वाढ होण्यासाठी केंद्र शासनाच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेच्या धर्तीवर माझी कन्या भाग्यश्री ही योजना मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य या मध्ये सुधारणा करणे, उज्वल भविष्याकरीता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रृणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलगी वारसदार ही भूमिका समाजामध्ये रुजविणे या उद्देशाने सुरु करण्यात आली आहे. या योजनेतील पहिल्या अपत्यासाठी मुलीच्या नावे 50 हजार रुपये तर दोन अपत्यासाठी प्रत्येक मुलींच्या नावे 25 हजार रुपये बँकेत गुंतवणूक केली जाते. माझी कन्या भाग्यश्री या योजनेचा जिल्हावासियांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी  यावेळी केले.
          बीड शहराची वाढती लोकसंख्या व रुग्णालयातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत मंजूर झालेल्या एम.सी.एच. विंग 100 खाटासाठीचे निविदा प्रक्रिया सुरु असून अतिरिक्त 200 खाटासाठी तांत्रिक मान्यता मिळाली असून बांधकाम निधीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. अशा एकूण 300 खाटांच्या बांधकामासाठी जागेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हा मोतीबिंदूमुक्त अभियानामध्ये राज्यात अग्रेसर आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानामध्ये जिल्हा देशामध्ये उल्लेखनीय काम करत आहे. तसेच स्वामी रामानंदतीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील 230 खाटांची सर्जिकल इमारत, नर्सिंग होम, धर्मशाळा व नवीन टि.बी. वार्ड लोकार्पण करण्यात आला असल्याचेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.
          शासनाच्या ग्रामविकास विभागाने अत्यंत महत्वाकांक्षी अशी अस्मिता योजना 8 मार्च 2018 पासून राज्यात राबविण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील किशोरवयीन मुलींना 5 रुपये या दराने आणि ग्रामीण भागातील महिलांना सवलतीच्या किंमतीत सॅनिटरी नॅपकीन पुरविण्यात येत आहे. बीड जिल्हयामध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची 11 तालुक्यामध्ये अंमलबजावणी सुरु असून उमेदच्या माध्यमातून मोठया प्रमाणावर बचतगट तयार करुन महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरु आहेत. या बचतगटांना खेळते भांडवल उपलब्ध करुन देण्यात आले आहे. बचतगटांना सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत बॅकामार्फत शून्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असून यावर्षी 30 कोटी रुपयाचे कर्ज  गटांना उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
          प्रधानमंत्री फसल विमा योजनेची यशस्वीरित्या अंमलबजावणी केल्यामुळे बीड जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. या यशाबद्दल नुकताच जिल्हाधिकारी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशेष सन्मानही करण्यात आला आहे. प्रधानमंत्री पीकविमा योजना खरीप हंगाम 2018-19 अंतर्गत बीड जिल्हयातून एकूण 15 लाखाच्या वर विमा अर्ज शेतक-याकडून प्राप्त झाले आहेत. तसेच BLO Net च्या कामामध्येही बीड जिल्हयाने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. रिएडीट आज्ञावलीद्वारे १०० टक्के ७/१२ चे संगणकीकरण करण्यात आले आहे. मिशन दिलासा योजनेतंर्गत आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्यक्ष गृह भेट देऊन शासनाच्या विविध योजनांतर्गत रोजगार निर्मितीबाबत प्रेरीत करुन विविध शासकीय योजनेचा लाभ त्यांना देणेबाबत कार्यवाही करण्यात आली असल्याचे त्यांनी  यावेळी सांगितले.
          जलयुक्त शिवार अभियानाची बीड जिल्हयात प्रभावीपणे अंमलबजावणी होत असून मागील साडेतीन वर्षात तीन टप्प्यात जिल्हयातील एकूण 722 गावातील 15हजार 186 कामांवर 322 कोटी 36 लक्ष निधी खर्च झालेला आहे. त्यातून 1 लाख 42 हजार 103 टीसीएम पाणीसाठी निर्माण होऊन 1 लाख 20 हजार 871 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना संरक्षित सिंचनाची उपलब्धता झालेली आहे. तसेच मागेल त्याला शेततळे ही योजना जिल्हयामध्ये  प्रभावीपणे राबविण्यात येत आहे असे सांगून जिल्हयात क्रीडापटूंना वाव मिळावा यासाठी जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 2.25 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.
          आपले पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी प्राधान्याने घेतलेला अहमदनगर-परळी-बीड मार्गाचे भूसंपादनाचे काम जवळपास पूर्ण झाले असून अहमदनगर ते नारायणडोह 13 कि.मी. पर्यंत रेल्वेने इंजिन चालवून चाचणी घेण्यात आली आहे. राज्य शासनाने आपल्या हिश्याचा निधी रेल्वे बोर्डाकडे वर्ग केला आहे. रेल्वेची कामे युध्द पातळीवर सुरु असून 2019 पर्यंत रेल्वे सुरु होणार असल्याचे सांगून जिल्ह्यात एकूण 8 राष्ट्रीय महामार्गांचे व  मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, पंतप्रधान मंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मोठया प्रमाणात सुरु असून 2019 पर्यंत जिल्हयातील सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्यात येतील,असेही त्यांनी यावेळी सांगितले.
            जिल्हयात ग्रामीण घरकुल योजनाची लाभ लाभार्थ्यांना देण्यात येत आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेंअंतर्गत जिल्हयातील 87 ग्रामपंचायतींना निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच जिल्हयात 6 पंचायत समितींच्या नवीन इमारती बांधकाम करण्यासाठी 28 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अनाथ बालकांना शिक्षण आणि नोकरीत 1 टक्के आरक्षण, सरपंचांना ओळखपत्र, शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन, घरकुल पात्र लाभार्थ्यांनी पंडीत दिनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थ सहाय्य, अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ, भाऊबीज दुप्पट करण्याचा  निर्णय असे विविध निर्णय ग्रामविकास विभाग आणि महिला व बाल विकास विभागाने घेवून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. यामुळे राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारही प्राप्त झाले आहेत, असेही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता  धसे यांनी केले.                                          -*-*-*-*-*-


शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८


‘वारी’ लोकराज्य विशेषांकाचे
जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते प्रकाशन
बीड , दि. 3 :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्य या मासिकाच्या ‘आषाढी वारी’ विशेषांकाचे पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जी श्रीधर  यांनी लोकराज्य ‘आषाढी वारी’ विशेषांक अत्यंत उत्कृष्ट असून वाचकांसाठी वाचनीय असल्याचे मत व्यक्त केले.
 वारी लोकराज्य अंक प्रकाशनाच्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, माध्यमाचे प्रतिनिधी वैभव स्वामी, संजय मालाणी,श्रीमती प्रतिभा गणोरकर,सोमनाथ खताळ, शिरीष शिंदे,उत्तम ओहळ,अ. माहिती अधिकारी बेबीसरोज अंबिलवादे,पर्यवेशक नां.गो.पुठ्ठेवाड, छगन कांडेकर आदी उपस्थित होते.
आषाढी वारीचा संग्राह्य विशेषांक
पंढरपुरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘संवादवारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात आला आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूल मंत्री श्री. पाटील यांनी ‘रंगले हे चित्त माझे विठुपायी’यात पंढरपुरला येणा-या वारक-यांसाठी आध्यामित्क श्राध्दा व्यक्त कली आहे.  अंकामध्ये श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, यांचा बहुत सुकृताची गोडी म्हणून विठठल आवाडी,श्रीधरबुवा देहूकर यांचा पालखी सोहळा, संदेश भंडारे वारी यात्र, बाळासाहेब बोचरे पालखी सोहळयाचे व्यवस्थापन  डॉ. यू. म. पठाण,ज्ञानदेव रचिला पाया,नां.धो महानोर तुका झालासे कळस, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी  वारीच्या विविध अनुषंगाने विचार मांडले आहेत. विठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाय योजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.
हा लोकराज्य विशेषांक जिल्ह्यातील विविध विक्रेत्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे. या अंकाची किंमत 10 रुपये असून लोकराज्य(मराठी) मासिकाची वार्षिक वर्गणी शंभर रुपये आहे. ही वर्गणी तहसील कार्यालयाच इमारतीत, जिल्हा माहिती कार्यालय ,नगर रोड बीड येथे भरता येईल. अंक वाचणीय असून जास्तीतजास्त नागरिकांनी हा विशेषांक संग्रही ठेवावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालय बीड यांच्यावतीने करण्यात आले आहे.*********