शुक्रवार, २९ सप्टेंबर, २०१७

विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिमेच्या जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन



          बीड, दि. 29 :- जिल्ह्यामध्ये विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहीम शनिवार दि.7 ऑक्टोबर 2017 पासून राबविण्यात येणार असून मोहिमेच्या जनजागृतीसाठी सर्व तालुका मुख्यालयाच्या गावात रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. इंद्रधनुष्य मोहीम ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या चार टप्प्यात जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. तरी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रॅलीस उपस्थित राहून राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदवावा. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूकीचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर



          बीड, दि. 28 :- महाराष्ट्र राज्याच्या मा.राज्य निवडणूक आयोगाने माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2017 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.
          कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 690 ग्रामपंचायतीसाठी शनिवार दि.7 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी सोमवार दि.9 ऑक्टोबर 2017 रोजी जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने ठिकाण व वेळ तहसीलदार निश्चित करतील तसेच निवडून आलेल्या सदस्यांची नावे दि.11 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करण्यात येतील. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

2 ऑक्टोबरला कर्जमाफीचे ग्रामसभेत चावडी वाचन


         
          बीड, दि. 28 :- महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अन्वये राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रीया दि.22 सप्टेंबर रोजी संपली असून अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी http://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या यादीचे दि.2 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामस्तरीय समितीकडून वाचन करण्यात येणार आहे. चावडी वाचन तसेच कर्जमाफी योजनेची प्रभावी व विहित मुदतीत अंमलबजावणी होण्यासाठी बुधवार दि.27 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी नियोजन समिती सभागृहातील बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योजनेच्या चोख अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती



          बीड, दि. 28 :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, बीड मध्ये सन ऑगस्ट 2017  सत्रात विविध व्यवसायात शिकाऊ उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सुरु आहे. शिकाऊ उमेदवारांनी केंद्र शासनाने तयार केलेल्या एम.आय.एम.पोर्टलवर www.apprenticeship.gov.in या  संकेतस्थळावर शिकाऊ उमेदवार म्हणून भरतीचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. शिकाऊ उमेदवारांच्या निवडी संबंधीत व्यवसायात आवश्यक अर्हता, संख्या शुल्क, शेवटची तारीख इत्यादी अटी व शर्तीच्या माहितीसाठी www.apprenticeship.gov.in या संकेतस्थळावर किंवा विभागीय कार्यालय,  बीड यांच्या दुरध्वनी 02442-222580 क्रमांकावर संपर्क साधावा. असे विभाग नियंत्रण, राज्य परिवहन, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

मतदार याद्यांचा छायाचित्रासह विशेष संक्ष‍िप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर



         बीड, दि. 26 :-  1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रसह मतदार याद्याच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण हा कार्यक्रम दि. 3 ऑक्टोबर 2017 ते 5 जानेवारी 2018 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
         छायाचित्र मतदार याद्याचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हा ईआरएमएस /Ero Net अंतर्गत प्रत्येक उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावर राबविण्यात येणार आहे. दि. 1 जानेवारी 2018 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम पुढील प्रमाणे, प्रारुप मतदार याद्याची प्रसिध्दी मंगळवार दि. 3 ऑक्टोबर 2017, दावे व हरकती स्विकारण्याची कालावधी 3 ऑकटोबर  ते 3 नोव्हेंबर 2017 पर्यंत, मतदार यादी मधील संबंधीत भागाचे/ सेक्शनचे ग्रामसभा/ स्थानिक ग्रामसभा/ स्थानिक संस्था येथे वाचन व आरडब्ल्युए सोबत बैठक इत्यादी आणि नावांची खातरजमा करणे दि.7 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर 2017, विशेष मोहिम  दि. 8 ऑक्टोबर ते 22  ऑक्टोबर 2017, दावे व हरकती निकालात काढणे मंगळवार दि.5 डिसेंबर 2017 पर्यंत, डाटाबेसचे अद्यावतीकरण बुधवार दि.20 डिसेंबर 2017, अंतिम मतदार यादी प्रसिध्दी शुक्रवार दि.5 जानेवारी 2018 वरील कार्यक्रमामध्ये पात्र नागरिकांनी पदनिर्देशीत ठिकाणी किंवा तहसील कार्यालयामध्ये दावे व हरकती दाखल कराव्यात, असे जिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

बीड आकाशवाणी केंद्राकडून स्वर दिपावली-लोकधारा कार्यक्रमाचे आयोजन



         बीड, दि. 26 :-          नगर परिषद, आखील भारतीय मराठी नाट्य परिषद व आकाशवाणी केंद्राच्यावतीने स्वर दिपावली- लोकसंगीताचा सुरेल मैफीलीचा कार्यक्रम गुरुवार दि. 5 ऑक्टोबर 2017 रोजी सायंकाळी 6.45 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे  आयोजित करण्यात आला आहे.
         या कार्यक्रमात सुप्रसिध्द लोककलाकार संध्या गोपाळ साखी, रामदास गणपत धुमाळ,  शाहिर कल्याण काळे आणि सहकारी सहभागी होत आहेत. कार्यक्रमाचे राज्यस्तरीय प्रसारण शनिवार दि. 21 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रावरुन होणार आहे. तरी आपल्या परिसरातील श्रोत्यांनी या लोकधारा संगीत सभेचा लाभ घ्यावा. असे आवाहन केंद्र संचालक, आकाशवाणी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

बीड येथे 21 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीबाबत प्रशिक्षण




          बीड, दि. 20 :- बीड तालुक्यातील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक-2017 चे अंतर्गत एकुण 132 ग्रामपंचायतीच्या निवडणूका दि.7 ऑक्टोबर 2017 रोजी घेण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3 यांचे नियुक्ती आदेश अधिकारी-कर्मचारीऱ्यांना तामिल करण्यात आले आहेत. या आदेशात पहिले प्रशिक्षण दि.21 जुलै 2017 रोजी असल्याचे नमूद करण्यात आली आहे. तथापी पहिले प्रशिक्षण  दि.21 सप्टेंबर 2017 रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. तरी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी पहिल्या प्रशिक्षणासाठी दि.21 सप्टेंबर रोजी तर दुसऱ्या प्रशिक्षणासाठी दि.29 सप्टेंबर 2017 रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे वेळेत उपस्थित रहावे. असे तहसीलदार तथा राज्य निवडणूक आयोग प्राधिकृत अधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

शेतकऱ्यांनी हरभरा मिनी किटसाठी अर्ज करावेत




          बीड, दि. 20 :- महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागातर्गंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य, भरडधान्य सन 2017-2018 रब्बी ज्वारी पिक प्रात्यक्षिक, हरभरा मिनी किट (बियाणे) योजना राबविण्यासाठी  मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या असून जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विष्णु मिसाळ व आत्माचे प्रकल्प संचालक बी.एम.गायकवाड आणि तालुका कृषि अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना रब्बी ज्वारी पिक प्रात्यक्षिक व हरभरा मिनी किटचा (बियाणे) लाभ घेता येणार आहे. अर्ज करण्यासाठी व अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी, बीड यांच्याशी संपर्क साधावा.

ग्रामपंचायत निवडणुकीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे - राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया




          बीड, दि. 20 :- पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंच पद निवडण्यासाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशी होणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेत, निवडणूक कालावधीत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी संबंधित यंत्रणांनी चोखपणे जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज केल्या.
          बीड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नोव्हेंबर-डिसेंबर 2017 कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीबाबत आयोजित आढावा बैठकीत श्री.सहारिया बोलत होते. यावेळी राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसीलदार यांची उपस्थिती होती.
          श्री.सहारिया म्हणाले, इतर निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये फरक आहे. या निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची संख्या अधिक असते. बीडमध्ये 690 ठिकाणी निवडणूक पार पडणार असून त्यासाठी 251 निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले आहेत. क्षेत्रीय अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी आपआपसात योग्य समन्वय ठेऊन आचारसंहिता, निवडणूक प्रक्रियेची योग्य अंमलबजावणी करावी. निर्भय, मुक्त, पारदर्शक वातावरणात निवडणूक पार पाडावी, अशा सूचनाही श्री.सहारिया यांनी यावेळी केल्या. तसेच दि.21 व 22 सप्टेंबर रोजी नामनिर्देशनासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी, आवश्यक संगणक, संगणक चालक यांची योग्य व्यवस्था करावी. गर्दी होणार नाही तसेच गर्दी नियंत्रणात राहील, याबाबत प्रशासनाने कार्यवाही पार पाडावी. मतमोजणीच्या दिवशी वेळापत्रक जाहीर करुन त्यानुसार कार्यवाही करावी. त्याचबरोबर पहिल्यांदाच या निवडणुकीत निवडून आलेल्या विजयी उमेदवाराला प्रमाणपत्र देण्यात येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेत संगणकावर डाटा अपलोड करावा, असे निर्देशही श्री.सहारिया यांनी दिले. ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणूक आहे, त्या ठिकाणी लोडशेडिंग आचारसंहिता कालावधीत म्हणजेच दि.9 ऑक्टोबरपर्यंत होणार नाही याची खबरदारी वीज वितरण कंपनीने घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केल्या. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीसाठी योग्य कार्यवाही केली असून सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले.
          सचिव श्री.चन्ने यांनी चिन्ह वाटप, पोलिस बंदोबस्त, मतदान केंद्रे, केंद्रावरील व्यवस्था, ऑनलाईन नामनिर्देशन, खर्च अहवाल, जनजागृतीवर भर आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
          जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी जिल्हा प्रशासनाकडून दि.7 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या जिल्ह्यातील 690 ग्रामपंचायतींसाठी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 1031 ग्रामपंचायतींपैकी 690 ठिकाणी निवडणूका होत आहेत. यासाठी 2 हजार 224 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. 168 संवेदनशील तर अतिसंवेदनशील 79 मतदान केंद्रे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर आवश्यक मतदान यंत्रे आणि स्थिती याबाबतही माहिती दिली. प्रशासनाकडून जिल्ह्यात एकूण 11 आचारसंहिता पथक, 22 फिरते पथक आहेत, असेही सांगितले, वाहने, खर्च पथक, प्रतिबंधात्मक कार्यवाही, प्रशिक्षण याबाबतही सविस्तर सादरीकरण केले.
          प्रारंभी श्री.सिंह यांनी राज्य निवडणूक आयुक्त श्री.सहारिया आणि सचिव श्री.चन्ने यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. आभार उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी मानले.

-*-*-*-*-

रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण संपन्न







          बीड, दि. 17 :- मराठवाडा मुक्ती संग्राम  दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले.
          तत्पूर्वी प्रियदर्शनी उद्यानातील हुतात्मा स्मृतीस्तंभ येथे  जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, स्वातंत्र्य सैनिक बन्सीधर जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सविता गोल्हार, आमदार विनायक मेटे, जिल्हा पोलीस अधीक्षक अजित बोराडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला आदींनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली. यावेळी पोलीस विभागाच्यावतीने हवेत बंदूकीच्या तीन फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
          मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी परेड संचलन वाहनातून परेड पथकांचे निरीक्षण केले. यावेळी आर.सी.पी., पोलीस मुख्यालय बीड (पुरुष),पोलीस मुख्यालय बीड (महिला), गृहरक्षक दल पुरुष, बलभीम महाविद्यालय एन.सी.सी., के.एस.के. महाविद्यालय एन.सी.सी., सैनिकी विद्यालय, बंकटस्वामी महाविद्यालय एन.सी.सी., महिला गस्ती पथक, पोलीस बँड, अग्नीशामक दल आणि आरोग्य विभागाची रुग्णवाहिका आदि परेड संचलनात सहभागी झाले होते.
          यानंतर यशवंत महाविद्यालय, आदर्श विद्यालय, जि.प.प्राथमिक शाळा, सैनिकी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
          यावेळी माजी आमदार उषाताई दराडे, अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, अधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.
-*-*-*-*-


शुक्रवार, १५ सप्टेंबर, २०१७

शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळणे अत्यंत गरजेचे - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह





          बीड, दि. 15 :- शरीर निरोगी व तंदुरुस्त ठेवण्यासाठी मैदानी खेळ खेळणे अत्यंत महत्वाचे असून  यासाठी सर्वांनी फुटबॉल सारख्या मैदानी खेळाचा स्विकार करण्याची गरज आहे. जीवनात शिक्षणामुळे माणूस मोठा होतो असे न समजता खेळामूळेही नावलौकिक प्राप्त करु शकतो यासाठी शिक्षणाबरोबरच खेळालाही तेवढेच महत्व द्यावे तसेच सर्वांनी फुटबॉलकडे फक्त खेळ म्हणून न पाहता करिअर म्हणून पहावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले.
जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतात होत आहेत. या ऐतिहासिक स्पर्धेच्या निमित्ताने देशभरात क्रीडा संस्कृती रुजविण्याचा ड्रिम प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यात मिशन 1 मिलियन हा फुटबॉलचा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हा पोलीस मैदान बीड येथे महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन  अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय करुया या कार्यक्रमाचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. त्या  प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी विकास माने, शिवछत्रपती पुरस्कारार्थी प्रा.जनार्धन शेळके, अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्री.सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खुरपुडे, राहूल दुबाले यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले की, ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्यानिमित्ताने राज्यात जवळपास 10 लाखांहून अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. देशात अशा प्रकारचा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य आहे. फुटबॉलचे महत्व सर्वांनी समजून घ्यावे फुटबॉलच्या खेळामुळे आणि इतर खेळामुळे आपले शरीर तंदूरुस्त होवून आपले जीवन निरोगी राहण्यास मदत होत असते.
सर्वांनी अशा खेळाकडे वळण्याची गरज आहे असेही त्यांनी यावेळी सांगून उपस्थित सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह व उपस्थित मान्यवरांनी पोलीस बॉईज व बीड जिल्हा फुटबॉल संघटनेच्या खेळाडूंचा परिचय करुन घेतला आणि जिल्हाधिकारी श्री.सिंह यांनी फुटबॉलला किक मारुन खेळाचा शुभारंभ केला.
यावेळी प्रा. जनार्धन शेळके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी नंदा खरपुडे यांनी आयोजित कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली.  या कार्यक्रमास क्रीडा अधिकारी सुहासिनी देशमुख, अरविंद विद्यागर, क्रीडा मार्गदर्शक अजय पवार, संतोष बावळे, डी.के.चंदवडे, प्रशिक्षक प्रा.परवेज खान, माजी क्रीडा परिषद सदस्य प्रा.दिनकर थोरात यांच्यासह क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी, खेळाडू, विद्यार्थी-विद्यार्थींनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-

गुरुवार, १४ सप्टेंबर, २०१७

बीड जिल्ह्याला तीन महिन्यासाठी 1 हजार 282 क्विंटल साखर नियतन मंजूर


          बीड, दि.14 :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एनसीडीईएक्स-ई मार्केटस् लिमिटेड मार्फत ई-लिलावाद्वारे बीड जिल्ह्यासाठी माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर 2017 या तिन महिन्यासाठी 1 हजार 286 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर केलेले असून साखर वाहतूक पुरवठादार म्हणून गुरु गणेश ट्रेडींग कंपनी,बीड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
          गुरु गणेश ट्रेडींग कंपनी,बीड यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणाचे शासकीय धान्य गोदामात साखर  पुरवठा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने माहे सप्टेंबर ते नोव्हेंबर 2017 साठी 1 हजार 25 क्विंटल साखर नियतन जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे. बीड सप्टेंबर 80.81, ऑक्टोबर 80.81, नोव्हेंबर 80.81 क्विंटल साखर मंजूर आहे. गेवराई सप्टेंबर 59.38, ऑक्टोबर 59.38, नोव्हेंबर 59.38 क्विंटल साखर मंजूर आहे. माजलगाव सप्टेंबर 34.12, ऑक्टोबर 34.12, नोव्हेंबर 34.12 क्विंटल साखर मंजूर आहे. वडवणी(चिंचवण) सप्टेंबर निरंक, ऑक्टोबर 15.45, नोव्हेंबर 15.45 क्विंटल साखर मंजूर आहे. धारुर सप्टेंबर निरंक, ऑक्टोबर 29.36, नोव्हेंबर 29.36 क्विंटल साखर मंजूर आहे. अंबाजोगाई सप्टेंबर निरंक, ऑक्टोबर निरंक, नोव्हेंबर 25.04 क्विंटल साखर मंजूर आहे.  केज सप्टेंबर निरंक, ऑक्टोबर 29.04, नोव्हेंबर 29.04 क्विंटल साखर मंजूर आहे. परळी वैजनाथ सप्टेंबर निरंक, ऑक्टोबर 50.25, नोव्हेंबर 50.25 क्विंटल साखर मंजूर आहे. पाटोदा सप्टेंबर 19.72, ऑक्टोबर 19.72, नोव्हेंबर 19.72 क्विंटल साखर मंजूर आहे. आष्टी सप्टेंबर 36.33, ऑक्टोबर 36.33, नोव्हेंबर 36.33 क्विंटल साखर मंजूर आहे. शिरुर कासार सप्टेंबर 20.44, ऑक्टोबर 20.44, नोव्हेंबर 20.44 क्विंटल याप्रमाणे तालुक्यांना साखर नियतन पोहोचविण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी,बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-



जलसाठ्याजवळ जाणे टाळावे; जिल्हा प्रशासनाचे आवाहन



          बीड, दि. 14 :- जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत 80 टक्के पर्जन्यमान झाले असल्याने जिल्ह्यातील पाझर तलाव, साठवण तलाव, शेततळे, लघु व मध्यम प्रकल्प, बंधारे, नद्या, ओढे, विहिरी पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत व काही भरण्याच्या स्थितीत आहेत. जलसाठे पाहण्यासाठी नागरिक सहपरिवार गर्दी करीत आहेत. तसेच शाळकरी, महाविद्यालयीन मुले पोहण्यासाठी जात आहेत.  त्यामुळे पाय घसरुन पडणे,  पोहताना किंवा पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या युवकांचा आणि लहान मुलांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. या जलसाठ्यामध्ये कपारी तसेच मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला असल्यामुळे कोणीही जलसाठ्याजवळ जाऊ नये व नागरिकांनी आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीत या जलसाठ्यात पोहण्यासाठी पाठवू नये तसेच स्वत: आपल्या परिवारासह जलसाठ्याजवळ जाण्याचे टाळावे. शिक्षकांनी शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना याबाबत सुचना करावी. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

माजी सैनिक व संबंधितांनी आधार क्रमांक सादर करावेत



          बीड, दि. 14 :- सैनिक कल्याण विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा आणि त्यांच्या अवलंबितांचे आधार क्रमांक राज्य शासनास आवश्यक असल्याने ते पाठविण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील माजी सैनिक, माजी सैनिक विधवा व त्यांच्या अवलंबितांनी आपला आधार क्रमांक बुधवार दि.20 सप्टेंबर 2017 पर्यंत जिल्हा सैनिक अधिकारी, जिल्हा सैनिक कार्यालय, बीड येथे जमा करावेत. तसेच यासोबत पान क्रमांक, मोबाईल नंबर, बँक पासबूक झेरॉक्स व ई-मेल आयडी ही सादर करण्यात यावा. असे बीडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

स्वच्छता हीच सेवा मोहिम यशस्वीतेसाठी समाजातील सर्व घटकांनी सहभाग घ्यावा - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह




           बीड, दि. 14:-  जिल्ह्यात स्वच्छता हीच सेवा मोहिम दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत राबविण्यात येणार असून या मोहिमेमध्ये प्रशासनाबरोबरच समाजातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवून श्रमदानाच्या माध्यमातून आपले शहर, गाव व आपला परिसर स्वच्छ करावा आणि ''स्वच्छता हीच सेवा'' ही मोहिम यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले.
          जिल्हाधिकारी कार्यालयात ''स्वच्छता हीच सेवा'' ही मोहिम राबविण्यासाठी बुधवारी आयोजित बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, अपर जिल्हाधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मधूकर वासनिक,  डॉ.सुनिल भोकरे, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, गणेश निऱ्हाळी, विकास माने, कृषी विभागाचे श्री.गायकवाड यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
          पुढे बोलतांना जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले की, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) अंतर्गत 2 ऑक्टोंबर पर्यंत राज्यातील सर्व नागरी भाग हागणदारीमुक्त घोषित करण्याचे उदिष्ट ठरविण्यात आले असून त्या अनुषंगाने शहरातील व ग्रामीण भागातील उघडयावर शौचास जाणाऱ्या नागरिकांचा शोध घेवून त्यांना वैयक्तिक घरगुती शौचालय अथवा सार्वजनिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. नागरिकांनी उघड्यावर शौचास जावू नये म्हणून त्यांना प्रवृत्त करण्यासाठी गुड मॉर्निग व गुड इव्हिनिंग पथके अधिक सक्रीय करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
          जिल्हयात स्वच्छ महाराष्ट्र अभियानातर्गंत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2017 या कालावधीत ''स्वच्छता हीच सेवा'' ही मोहिम राबविण्यात येणार असून स्वच्छतेच्या माध्यमातून या मोहिमेचा शुभारंभ 15 सप्टेंबरपासून  करण्यात येणार आहे. दि.15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागात प्रशासनासह लोक सहभागाच्या माध्यमातून त्या त्या भागातील अस्वच्छ भाग स्वच्छ करण्याची कार्यवाही हाती घेण्यात येणार असून  शाळा, हॉस्पिटल, बसस्थानके, उद्याने, स्मारके, तलाव, पर्यटन स्थळे, स्वच्छतागृहाची व्यापक प्रमाणात सफाईचे काम करुन तो भाग तो परिसर स्वच्छ करण्यासाठी सर्वनिशी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या मोहिमेची व्यापक प्रमाणात जनजागृती होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. या मोहीमेमध्ये सर्व यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी सहभागी होवून आपले कार्यालय, परिसर स्वच्छ करावे असेही  जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी सांगितले. या बैठकीस सर्व यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत वाढ; गोदाकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा



          बीड, दि. 7 :- सद्यस्थितीत जायकवाडी धरणाची पाणी पातळी 462.646 मी असून धरण 78.81 टक्के क्षमतेने भरले आहे. जायकवाडी धरणाच्या वरील भागातील धरणे जवळपास 90 ते 100 टक्के क्षमतेने भरलेले असून भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानूसार येत्या काही दिवसात पावसाचा अंदाज वर्तविला जात आहे. तरी वरील धरणातून कमी अधिक प्रमाणात जायकवाडी धरणात विसर्ग चालू  असल्याने धरणातून कधीही विसर्ग सोडण्यात येवू शकतो. धरणाच्या खालील भागात धरणापासू 4 कि.मी. अंतरावर गोदावरी नदीवर एक चणकवाडी बंधारा आहे त्याचा  वापर विद्युत निर्मितीसाठी होतो. सद्यस्थितीत बंधाऱ्याचे गेट काढण्यात आले आहे आणि गोदावरीचा पाणी प्रवाह मोकळा करण्यात आला आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सोडला असता धरणाखालील भागातील गोदाकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.
-*-*-*-*-


डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयासह विविध पुरस्कारासाठी अर्ज करावेत



          बीड, दि. 7 :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा. त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी  प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र  पुरस्कार देण्यात येतो. सन 2017-18 वर्षातील पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडे सादर करावेत.
          राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार, 30 हजार, 20 हजार आणि 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह सन्मानपूर्वक देवून सन्मानित करण्यात येते. राज्यस्तरावर प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभागस्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 15 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात येते. तरी सन 2017-18 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवकांनी आपले अर्ज दि.20 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावेत. असे महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

गुरुवार, ७ सप्टेंबर, २०१७

डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयासह विविध पुरस्कारासाठी अर्ज करावेत



          बीड, दि. 7 :- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा. त्यांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी  प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीस योगदान देणाऱ्या सार्वजनिक ग्रंथालय क्षेत्रातील कार्यकर्ता व सेवक यांनी अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र  पुरस्कार देण्यात येतो. सन 2017-18 वर्षातील पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्याकडे सादर करावेत.
          राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क आणि ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 50 हजार, 30 हजार, 20 हजार आणि 10 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह सन्मानपूर्वक देवून सन्मानित करण्यात येते. राज्यस्तरावर प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 25 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह तसेच राज्यातील प्रत्येक महसूली विभागस्तरावर प्रत्येकी एक कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी 15 हजार रुपये रोख पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात येते. तरी सन 2017-18 च्या पुरस्कार योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रंथालय, कार्यकर्ते व सेवकांनी आपले अर्ज दि.20 सप्टेंबर 2017 पर्यंत सादर करावेत. असे महाराष्ट्र राज्याचे ग्रंथालय संचालक किरण धांडोरे यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-

निवडणूक आचारसंहिता कालावधीसाठी शस्त्रात्रे जमा करण्याचे आदेश



बीड, दि. 7 :- राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी माहे नोव्हेंबर व डिसेंबर 2017 या दोन महिन्यात मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी दोन टप्प्यात सर्व सदस्य व सरपंच पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून त्याबाबतची आदर्श आचारसंहिता निवडणूकीचा कार्यक्रम घोषित झाल्याच्या वेळेपासून लागू झालेली आहे. या निवडणूका शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्याबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत.
निवडणूक आयोगाकडून शस्त्रास्त्रांबाबत तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक ती  कार्यवाही करण्याबाबत आदेश असून निवडणूका जाहिर झाल्यापासून शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध घालण्याबाबत सूचना आहेत. तरी बीड जिल्ह्यातील सर्व शस्त्र परवानाधारकांची शस्त्रे (बँका/महत्वाची कार्यालय/संस्था/विद्युत केंद्र व इतर महत्वाचे कार्यालयाचे शस्त्र परवान्यावरील शस्त्र वगळून) निवडणूक प्रक्रिया शांततेने व खुल्या वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने जमा करणे आवश्यक असल्याने आचारसंहिता कालावधीसाठी जमा करण्याची कार्यवाही पोलीस अधिक्षक, बीड यांनी तात्काळ करावी. तसेच आचारसंहिता कालावधी संपल्यानंतर संबंधितांना त्यांची शस्त्रे परत देण्याची कार्यवाही करावी. असे आदेश बीडचे जिल्हादंडाधिकारी एम.डी.सिंह यांनी जारी केले आहेत.

-*-*-*-*-

मंगळवार, ५ सप्टेंबर, २०१७

बिंदूसरा नदी पुलावरुन वाहतूकीस संपूर्णत: बंदी



          बीड, दि. 5 :- बिंदुसरा नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने या पुलावरून उस्मानाबाद व औरंगाबादकडून येणारी वाहतूक बंद करण्यात यावी असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन युनिट (NHAI-PIU) यांच्याकडून कळविण्यात आले होते. परंतु शहरातील दुचाकी व तीनचाकी वाहनांना या पुलावरून बंदी घातल्यामुळे वाहनधारकांना बीड शहरात येण्यासाठी खूप बाहेरून यावे लागत असल्यामुळे या  पुलावरुन दुचाकी व तीनचाकी वाहन धारकांना वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यास योग्य होईल किंवा कसे याबाबत प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण प्रोजेक्ट इम्प्लीमेंटेशन युनिट (NHAI-PIU) यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्यात आले होते संबधित यंत्रणेचे पत्र दि. ०४ सप्टेंबर २०१७ अन्वये बिंदुसरा हा पूल ८४ वर्षे जुना व जीर्ण झाला असून पूलाचा डेक स्लॅब  वारंवार कोसळत असल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिंदुसरा नदीवरील पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीकरीता बंद ठेवण्यात यावा असे कळविण्यात आले आहे.
            बिंदुसरा पुलावरून होणारी हलकी व जड वाहनांची वाहतूकीमुळे कुठल्याही प्रकारची दुर्घटना तसेच जीवित व वित्त हानी टाळण्याचे दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या पुलावरून होणारी वाहतूक तूर्त बंद करण्यात आली आहे याबाबत जनतेने सहकार्य करावे असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. 

-*-*-*-*-

“संवाद पर्व”अंतर्गत आरोग्याच्या विविध सोयी-सुविधाविषयी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.थोरात यांच्या मुलाखतीचे बीड आकाशवाणी केंद्रावरुन आज प्रसारण

संवाद पर्वअंतर्गत आरोग्याच्या विविध सोयी-सुविधाविषयी
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.थोरात यांच्या मुलाखतीचे
बीड आकाशवाणी केंद्रावरुन आज प्रसारण

बीड, दि. 4 :- गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक जाणीव जागृती व प्रबोधन करता यावे यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या बीड जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संवाद पर्व अभियान घेण्यात येत आहे. या अभियानात शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, उपक्रम जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी बीड आकाशवाणी केंद्राच्या सहकार्याने विविध योजनांच्या माहितीचे प्रसारण करण्यात येत आहे.
या संवाद पर्वअभियानांतर्गत मंगळवार दि.5 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 7.40 वा. बीड आकाशवाणी केंद्रावरुन जिल्हयातील आरोग्य विषयक सोयी सुविधा व उपाय योजना, महा अवयवदान, विशेष मिशन इंद्रधनुष्य मोहिम आदी विषयांवर बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची मुलाखत प्रसारीत होणार आहे. ही मुलाखत बीड आकाशवाणीचे निवेदक गोपाळ ठाकूर यांनी घेतली आहे.
या संवाद पर्व अभियानाअंतर्गत शासनाच्या विविध विकासाच्या योजना, उपक्रमांच्या माहितीचे प्रसारण होणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने
ना. गो. पुठ्ठेवाड व बीड आकाशवाणी केंद्राचे केंद्र प्रमुख अनिल देशमुख यांनी केले आहे.  

-*-*-*-*-