रविवार, ३१ जुलै, २०१६

बीड जिल्ह्यात 6.5 मि.मी. सरासरी पावसाची नोंद


          बीड, दि. 31 :- बीड जिल्ह्यात 31 जुलै 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 6.5 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाची आहे.

बीड-1.8(200.7), पाटोदा-2 (313.5), आष्टी-निरंक (262.7), गेवराई-1.1(242.1), शिरुरकासार-निरंक (267.7), वडवणी-2.5 (363.3), अंबाजोगाई-37.4 (331.2), माजलगाव-2.8 (366.3), केज- 14.6 (294.0), धारुर- 0.3 (236.0) तर परळी वैजनाथ- 9 (232.8) पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 282.8 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 289.1 मि.मी. सरासरी  पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 42.44 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

शनिवार, ३० जुलै, २०१६

राज्यात 1 ते 15 ऑगस्टदरम्यान पशुधन विमा पंधरवडा साजरा करणार


            बीड, दि. 30 :- राज्यात 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुधन विमा पंधरवडा राबविण्यात येणार आहे. दि. 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान पशुधन विमा पंधरवाड्याचे आयोजन करण्यात येत आहे. राष्ट्रीय पशुधन विमा योजनेची राज्यात अमंलबजावणी करण्यात येत आहे. 
या योजनेंतर्गत देशी, संकरीत (गायी, म्हशी), पाळीव पशु (घोडे, गाढव, वळू, बैल  रेडे) तसेच शेळ्या,मेंढ्याचा समावेश करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत यापुढे मृत्यूमुखी पडणाऱ्या पशुधनासाठी विमा सुरक्षाकवच मिळणार आहे.      योजनेंतर्गत लाभ देणेसाठी जास्तीत जास्त प्रति लाभार्थी प्रति कुटुंब 5 नावरांचा  समावेश आहे. विमा रक्कम ही  जनावराच्या  प्रत्यक्ष  किंमतीवर आधारित असते.  जनावरांची  किंमत  ही  वय, स्वास्थ्य   दुध  उत्पादनांवर पशुपालक, पशुवैद्यकीय अधिकारी  विमा प्रतिनिधी यांच्यामार्फत निश्चित करण्यात येते. शेळ्या, मेंढ्या, डुकरे व ससे यांना लाभ द्यावयाचा असल्यास अनुदान ठरविण्यासाठी एक पशुधन घटक यावर आधिारीत अनुदानाचा लाभ निश्चीत करण्यात आला आहे. एक पशुधन घटक म्हणजे 10 शेळ्या, मेंढ्या, डुकरे इत्यादी असे समजण्यात येईल. 5 पशुधन घटकाप्रमाणे 50 शेळ्या, मेढ्या, डुकरे व ससे यांचा लाभ देण्यात येतो. 5 पेक्षा कमी शेळ्या, मेंढ्या असलेल्या लाभार्थ्यांना 1 पशुधन घटक समजून या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. विमा क्लेम निकाली काढण्यासाठी केवळ चार कागदपत्राची आवश्यता आहे. जनावरांचा विमा उतरविल्याची मुळ पॉलीसी, जनावर मृत झालेबाबत विमा कंपनीस दिलेली सुचना, क्लेम फार्म व शवविच्छेदन प्रमाणपत्र तसेच मृत जनावराच्या कानातील टॅगसह व विमा लाभार्थी यांचा एकत्रि‍त छायाचित्र असावेत.

      विमा रक्कमेच्या 50 टक्के रक्कम अनुदान स्वरूपात शासनातर्फे भरण्यात येईल. उर्वरित 50 टक्के  रक्कम लाभार्थ्यांने भरावयाची आहे.  दारिद्र्यरेषेखालील आणि अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना 70 टक्के पर्यंत शासनातर्फे अनुदान देण्यात येईल.  उर्वरित 30 टक्के रक्कम लाभार्थ्यांने भरावयाची आहे. चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली येथील लाभार्थ्यांना 10 टक्के अधिकचे अनुदान शासनातर्फे देण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी  या योजनेसाठी नजिकचा पशु वैद्यकीय दवाखाना  टोल फ्री क्रमांक पशुसंवर्धन विभाग : 18002330418, विमा कंपनी : 18002091415, संकेतस्थळ : www.ahd.maharashtra.gov.in येथे संपर्क साधावा. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी कळविले आहे.

सहाय्यक कक्ष अधिकारी (पुर्व) परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू


            बीड, दि. 30 :- सहाय्यक कक्ष अधिकारी (पुर्व) परीक्षा-2016 रविवार दि.31 जुलै 2016 रोजी बीड शहरात एकुण 3 केंद्रामधून 1 हजार 344 उमेदवारांची परिक्षा घेण्याचे निश्चित झाले आहे. ही परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या 100 मिटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहे.

            बीड शहरातील केंद्रे याप्रमाणे चंपावती माध्यमिक विद्यालय, नगर रोड. भगवान विद्यालय धानोरा रोड, संस्कार माध्यमिक विद्यालय नवीन इमारत भाजी मंडई, बीड या परीक्षा केंद्राच्या परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी व अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत यासाठी बीडचे उपविभागीय दंडाधिकारी डॉ.विकास सुर्यवंशी यांनी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 मधील शक्तीचा वापर करुन शासनाच्यावतीने सहाय्यक कक्ष अधिकारी (पुर्व) परीक्षा केंद्राच्या परीसरात दि.31  जुलै रोजी परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदर पासून ते परीक्षा पेपर संपेपर्यंत 100 मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, परीक्षार्थी व्यतिरिक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. तसेच परीक्षा केंद्रापासून 100 मीटर अंतराच्या परिसरात फोटोकॉपी, ई-मेल, इंटरनेट सुविधा, ईतर दळणवळण व संदेश कोणत्याही व्यक्तीजवळ मोबाईल, वायरलेससेट, कॅल्कुलेटर, लॅपटॉप, कॉम्प्युटर बाळगण्यास तसेच झेरॉक्स, एसटीडी मशीन चालु ठेवण्यास व ध्वनीक्षेपक वाजवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वेळे अभावी प्रत्येक इसमास नोटीस देणे शक्य नसल्यामुळे हा आदेश एकतर्फी लागु करण्यात येत आहे. असे बीडचे उपविभागीय दंडाधिकारी  यांनी आदेशात नमुद केले आहे.

सुशिक्षीत बेरोजगारांनी प्रशिक्षणातून व्यवसाय कौशल्य आत्मसात करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



          बीड, दि. 30 :- स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुशिक्षीत बेरोजगारांनी व्यवसाय कौशल्य आत्मसात करुन स्वावलंबी व्हावे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
          ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने 30 दिवसीय कॉम्प्युटर बेसिक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाच्या प्रसंगी जिल्हाधिकारी नवल किशोर राम बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गंगाधर बोकाडे, विजय चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एम.पी.वाघमारे, प्रशिक्षक सय्यद चाँद यांची प्रमुख उपस्थिती होती.
          पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री.राम म्हणाले की, जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या खुप जास्त असून केवळ शिक्षण न घेता प्रशिक्षण घेण्यावर युवकांनी भर द्यायला हवा. जेणेकरुन व्यवसायाचे कौशल्य आत्मसात केल्यावर कोणताही व्यवसाय सहज करता येईल. शिक्षण आणि प्रशिक्षण या दोन वेगवेळ्या गोष्टी आहेत. शिक्षण महत्वाचे असून प्रशिक्षणही तेवढेच गरजेचे आहे त्यामुळे उमेदवारांनी प्रशिक्षण घेऊन कौशल्य प्राप्त करावे. सामान्य माणसात व कौशल्ययुक्त माणसात खुप मोठा फरक आहे. आरसेटीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या प्रशिक्षणाचा लाभ प्रत्येक बेरोजगारांने घेतला पाहीजे. देव स्वत: कुणाचीही मदत करत नसतो जो स्वत:ची मदत स्वत: करतो तोच यशस्वी होत असतो. कोणताही व्यक्ती त्याला संधी मिळाली तर तो यशस्वी होत असतो यामुळे आपण आलेल्या प्रत्येक संधीचा पुरेपुर उपयोग करुन घ्यायला हवा असेही त्यांनी यावेळी सांगितले.
          प्रशिक्षीत उमेदवारांनी संकटाची भिती बाळगू नये यशस्वी होण्यासाठी संकटांना तोड द्यायला पाहिजे तुम्ही नक्कीच जीवनात यशस्वी होऊ शकता असे सांगून आरसेटीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थ्याचा डाटाबेस तयार करुन भविष्यात ते काय करतात याची माहिती ठेवावी अशी सुचनाही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी केली.
          जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक श्री.बोकाडे यांनी बेरोजगारांसाठी बँकेकडून चालविण्यात येणाऱ्या विविध योजनाची सविस्तर माहिती  यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात आरसेटीच्या माध्यमातून सुशिक्षीत बेरोजगारांना प्रशिक्षण देवून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी बळ देण्यात येते असे सांगून आरसेटीचे कार्य व उद्देश संचालक एम.पी. वाघमारे यांनी यावेळी विशद केला. यावेळी दत्ता रडे, किशोर मगर, आलम खान, श्रीमती रेखा शिंदे या प्रशिक्षणार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

          कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शरद पाटोळे यांनी केले तर आभार एस.ए.बोचकुरे यांनी मानले. या कार्यक्रमास आरसेटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यासह प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बीड जिल्ह्यात 2.6 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



          बीड, दि. 30 :- बीड जिल्ह्यात 30 जुलै 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 2.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाची आहे.
बीड-3.1(198.9), पाटोदा-2.8 (311.5), आष्टी-निरंक (262.7), गेवराई-0.2 (241.0), शिरुरकासार-निरंक (267.7), वडवणी-निरंक (360.8), अंबाजोगाई-12.4 (293.8), माजलगाव-0.3 (363.5), केज- 6.1 (279.4), धारुर- 3.3 (235.7) तर परळी वैजनाथ- 0.8 (223.8) पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 276.3 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 283.9 मि.मी. सरासरी  पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 41.46 टक्के पावसाची नोंद झाली आहे.

शुक्रवार, २९ जुलै, २०१६

कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मनाई आदेश जारी


बीड, दि. 29 :- बीड जिल्ह्यात दि.1 ते 31 ऑगस्ट 2016 या कालावधीत आण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि.8, 15 व 22 आणि 29 ऑगस्ट 2016 रोजी श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने जिल्ह्यातील तिर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करणार आहेत. यासाठी मुंबई पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37 (1)(3) प्रमाणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागु करण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात सध्या मराठा, मुस्लिम व धनगर समाजाच्या वतीने व राजकीय पक्ष/संघटनेच्यावतीने आंदोलन होत आहेत. जिल्ह्यात विविध पतसंस्था/सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणूक प्रक्रीया चालु असून विविध ठिकाणी मतदान व मतमोजणी प्रक्रीया संपन्न होणार आहे. दि.24 ऑगस्ट 2016 रोजी श्रीकृष्ण जयंती व दि.25 ऑगस्ट रोजी दहीहंडीच्या निमित्ताने जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात अचानक तणावाचे वातावरण निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37 (1)(3) प्रमाणे जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागु करणे आवश्यक असल्याची पोलीस अधिक्षक बीड यांच्या अहवालावरुन खात्री झाली आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37 (1)(3) प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन बीडचे अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी आदेशाद्वारे निर्देश दिले आहेत. की शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरीक्त  अन्य कोणत्याही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास खालील गोष्टी करण्यास मनाई करण्यात येत आहे.
शस्त्र, सोटे, काठी, तलवार बंदूक जवळ बाळगणार नाही. लाठ्या, काठया, शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तु बाळगणार नाहीत. कोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत. दगड किंवा इतर क्षेपणास्त्र किंवा फोडावयाची  किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळा करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत. किंवा तयार करणार नाहीत. आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबणात्मक नकला करणार नाहीत. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगणार नाहीत. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणून-बुजून  दुखवण्याच्या उद्देशाने वाद्य वाजवणार नाहीत किंवा इतर जाहिरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत. व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत. हे आदेश बीड जिल्ह्याच्या हद्दीत दि.30 जुलै रोजीचे 00.05 वाजेपासून दि.27 ऑगस्ट 2016 रोजीचे 24.00 वाजपर्यंत लागु राहतील. तसेच विशेषरीत्या परवानगी दिलेल्या मिरवणूकीस लागु राहणार नाहीत. असे आदेश 29 जुलै 2016 रोजी सही शिक्यानिशी दिले आहेत, असे अपर जिल्हादंडाधिकारी, बीड यांनी आदेशात नमुद केले आहे.


भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदासाठी मोफत पुर्व प्रशिक्षण



          बीड, दि. 29 :- संघ लोकसेवा आयोग (युपीएससी) नवी दिल्ली यांच्यामार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारासाठी कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) ची परीक्षा दिनांक 23 ऑक्टोबर 2016 रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2016 अशी आहे. या परीक्षेची जाहिरात 16 ते 22 जुलै 2016 या कालावधीच्या एम्प्लॉयमेंट न्यूज (रोजगार समाचारपत्र) मध्ये आणि संघ लोकसेवा आयोग नवी दिल्ली यांची वेब साईट www.upsconline.nic.in वर प्रसिद्ध झाली आहे.

          कंम्बाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील स्थायी नवयुवक व नवयुवतीसाठी 2 ऑगस्ट ते 15 ऑक्टोबर 2016 या कालावधीत सीडीएस कोर्स क्र. 52 चालविण्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
          तरी बीड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बीड येथे 1 ऑगस्ट 2016 रोजी मुलाखतीस उपस्थित रहावे. मुलाखतीस येण्याआधी पीसीटीसी ट्रेनिंगच्या गुगल प्लस पेजवरील दिलेल्या चेक लिस्ट सोबत असणारी सर्व कागदपत्रे व महत्त्वाच्या तारखांचे अवलोकन करुन त्यांना डाऊनलोड करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पूर्ण भरुन सोबत ठेवावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा दूरध्वनी क्रमांक 0253-2451031 आणि 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन बीडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन  ढोरजकर यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात 2.4 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



          बीड, दि. 29 :- बीड जिल्ह्यात 29 जुलै 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात सरासरी 2.4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय सरासरी पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाची आहे.

बीड-2.4 (195.8), पाटोदा-2.5 (308.8), आष्टी-1.9 (262.7), गेवराई-2.1 (240.8), शिरुरकासार-11 (267.7), वडवणी-निरंक (360.8), अंबाजोगाई-1.4 (281.4), माजलगाव-निरंक (363.2), केज- 0.4 (273.3), धारुर- 1.3 (232.3) तर परळी वैजनाथ- 3.8 (223.0) पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात 273.6 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 असून 1 जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात 278.7 मि.मी. सरासरी  पाऊस झाला असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 41.06 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

गुरुवार, २८ जुलै, २०१६

एपीएल योजनेंतर्गत ऑगस्ट महिन्याचे धान्याचे नियतन मंजूर



            बीड, दि 28 :- माहे ऑगस्ट  2016 या महिन्यासाठीचे एपीएल योजनेंतर्गत गहू, तांदुळ धान्य दुकानामार्फत जिल्ह्यातील पात्र कार्ड धारकांना वितरित करण्यासाठी नियतन मंजूर झाले आहे. हे नियतन एकूण 22 गोदामामार्फत स्वस्त धान्य दुकानांना वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये वखार महामंडळ, परळी वैजनाथ येथून  एपीएल  गहू 1000 मे.टन व एपीएल तांदुळ 306.402 मे.टन पुरवठा होणार आहे. पीपीपी परळी वैजनाथ केसोना येथून येथून  एपीएल  गहू 509.103 मे.टन व एपीएल तांदुळ 700 मे.टन पुरवठा होणार आहे.  तसेच अन्न महामंडळ अहमदनगर/नागापूर यांच्यामार्फत येथून  एपीएल गहू 489.897 मे.टन व एपीएल तांदुळ 326.598 मे.टन धान्याचा पुरवठा होणार असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड यांनी कळविले आहे. 

31 जुलै रोजी आकाशवाणी केंद्रावरुन मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण


                  

            बीड, दि. 28 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून जनतेशी साधलेला संवाद मन की बात  या कार्यक्रमाचा बावीसवा भाग रविवार दि. 31 जुलै 2016 रोजी सकाळी 11 वाजता प्रसारित होईल तसेच या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता प्रसारित करण्यात येईल. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी बीड अर्थात FM बँडच्या 102 पुर्णांक 9 दशांश मेगाहर्टसवरून सर्व श्रोत्यांना ऐकता येतील. श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या प्रतिक्रिया airmannkibaat@gmail.com या संकेतस्थळावर पाठवाव्यात. असे बीड आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी यांनी कळविले आहे. 

आरसेटीच्यावतीने कपिलधार येथे वृक्षांच्या बियाची लागवड


         
          बीड, दि. 28 :- स्टेट बँक ऑफ हैद्राबाद ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था बीड यांच्यावतीने कपिलधार परिसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम घेवून डोंगराळ परिसरात दोनशे वृक्षांच्या बियाची लागवड करण्यात आली.

            ग्रामिण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था ही भारत सरकारच्यावतीने बीड येथे कार्यरत असून या आरसेटीच्या वतीने कपिलधार परिसरात वृक्षारोपनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमास आरसेटीचे संचालक एम.पी.वाघमारे यांच्यासह शरद पाटोळे, सुरेश बोचकुरे, सय्यद चांद, पठाण शहानवाज तसेच प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षणार्थीनी या सर्वाच्या हस्ते वृक्षारोपण करुन कार्यक्रम संपन्न झाला.

बेरोजगारांना कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण देण्यात यावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



          बीड, दि. 28 :- बीड जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती आणि बाजारपेठेतील गरजा लक्षात घेऊन हमखास रोजगार निर्माण करणाऱ्या व्यवसाय - उद्योग धंद्यांचे कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण बेरोजगार युवक-युवतींना उपलब्ध करुन द्यावे अशी सुचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
          स्टेट बँक ऑफ हैद्राबादच्या माध्यमातून बीड येथे चालविण्यात येणाऱ्या ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जिल्हास्तरीय सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते बोलत होते. प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण कार्याचा  सविस्तर आढावा घेऊन ते पुढे म्हणाले की, प्रशिक्षण संस्थेने जिल्ह्यातील युवक-युवतींना केवळ प्रशिक्षणच उपलब्ध न करुन देता त्यांना रोजगार मिळविण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शन व बँकामार्फत वित्तीय सहाय्य उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. प्रशिक्षण संस्थेने आत्तापर्यंत जिल्ह्यातील 2  हजार 200 युवक-युवतींना व्यवसायासाठी प्रशिक्षित केले असून हे कार्य कौतुकास्पद आहे मात्र प्रशिक्षीत प्रत्येक बेरोजगार युवकाने रोजगार सुरु करुन स्वावलंबी झाल्याची माहिती संकलित केली पाहिजे. त्यांना रोजगाराभिमूख करण्याची संस्थेने जबाबदारी उचलली पाहिजे असेही जिल्हाधिकारी राम यावेळी म्हणाले.
          रोजगार-व्यवसाय करु इच्छिणाऱ्या युवक-युवतींनी प्रशिक्षण सत्रांचा लाभ घ्यावा असे आवाहन करुन जिल्हाधिकारी राम यांनी संस्थेच्या इमारतीसाठी शासकीय जमिन उपलब्ध करुन देण्यात येत असून त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांनी पूर्ण करावी अशी सुचनाही केली. यावेळी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही जिल्हाधिकारी राम यांच्या हस्ते करण्यात आले.

          प्रारंभी संस्थेचे संचालक एम.पी.वाघमारे यांनी संस्थेच्या कार्याची सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. या बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संगीता पाटील, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी विजय चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे अधिकारी दिपक कुमार आणि निकम आदि अधिकारी उपस्थित होते.

बुधवार, २७ जुलै, २०१६

पिक विमा आणि कर्ज वाटपाचा आढावा शेतकऱ्यांना पिक विमा भरण्यासाठी मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखा सज्ज - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



          बीड, दि. 27 :- बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील आपल्या पिकाचा विमा भरण्यासाठी  पुढाकार घ्यावा. आजपासून जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा पिक विमा भरुन घेण्यासाठी सज्ज झाल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
          खरीप हंगामातील पिक विमा व पिक कर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी राम यांनी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आदित्य सारडा, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख, कृषी विभागाचे उपसंचालक बी.एम. गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी गंगाधर बोकाडे आणि विजय चव्हाण व इतर बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
          जिल्ह्यातील पिक विमा भरण्याची कार्यवाही 31 जुलै पर्यंत सुरु राहणार असून यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांना महत्वपूर्ण सूचना या बैठकीत देऊन जिल्हाधिकारी राम यांनी  सर्व बँकांनी शेतकऱ्यांचा विमा मुदतीत भरुन घेण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. पिक विम्यासंदर्भात  काही संभ्रम होते. आता विम्यासंदर्भात  मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या असून त्यामुळे आता संभ्रम राहणार नाहीत. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांशी यशस्वी चर्चा करण्यात आली असून त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. आजपासून त्यांच्या सर्व शाखा पिक विम्याचा स्विकार करणार आहेत. इतरही बँका अधिक प्रभावीपणे पिक विम्याचे काम करणार आहेत.
          पिक विमा जमा करताना लागणाऱ्या कागदपत्राबाबत जिल्हाधिकारी यांनी विशेष सुचना दिल्या. कर्जदार शेतकऱ्याने पिक विमा भरण्यासाठी आपल्या बँकेकडे पिक पेऱ्याचा दाखला व ओळखपत्र म्हणजे आधारकार्ड, पॅनकार्ड इत्यादी सादर करावे. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्याने जोडावयाचा सातबाराचा दाखला जो तलाठीकडून निर्गमित केलेला किंवा इंटरनेटवरून काढलेला स्वसाक्षांकित असावा. पेरणीचा दाखला,छायाचित्र, ओळखपत्र तसेच बँकेच्या खातेपुस्तिकेची प्रत आपल्या सेवा क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बँकेकडे सादर करावी. असेही आवाहन करण्यात येत आहे.
          जिल्हाधिकारी राम यांनी या बैठकीत गेल्या खरीप हंगामातील पिक विम्याच्या रकमेच्या वाटपाचा आढावा घेतला. 893 पैकी 682 कोटी रुपयांचे आतापर्यंत वाटप करण्यात आले आहे. चालु खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटपाचे 1750 कोटी रुपयांचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले असून आतापर्यंत 1186 कोटी म्हणजे 68 टक्के पिक कर्ज  वाटप करण्यात आले आहे. अजूनही बँका प्राधान्याने पिक कर्ज वाटपाचे काम करीत आहेत. यावर्षी बीड जिल्ह्यातील बँकेने फळपिक विम्यापोटी 1774 बागायतदारांकडून 58 लाख 86 हजार रुपये एवढी रक्कम पिक विमा कंपनीकडे पाठविली आहे.
          या बैठकीत सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या बँकेच्या कामकाजाचा आढावा सादर करुन अडीअडचणी विषयी सविस्तर चर्चा केली.

मंगळवार, २६ जुलै, २०१६

तंबाखुच्या व्यसनापासून दूर रहा - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोल्डे

          बीड -  तंबाखु व तंबाखुजन्य इतर पदार्थांच्या व्यसनामुळे मानवाच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तंबाखुच्या व्यसनापासून नागरिकांनी दूर रहावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक बोल्डे यांनी केले.
            राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समिती आणि जिल्हा रुग्णालय बीड यांच्यावतीने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात तंबाखु नियंत्रणाविषयी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            तंबाखुच्या व्यसनामुळे कर्करोग सारख्या आजाराचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तंबाखुच्या व्यसनामुळे रक्त वाहिन्या बंद पडतात, रक्तदाब वाढतो. यामुळे दम लागणे, घाम येणे, थकवा येणे, जड अवघड कामे न होणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे शरीरातील आतड्यांचे काम बंद होते. तंबाखुतील निकोटिन हा द्रव पदार्थ शरीराला अपायकारक असून सर्वांनी योग्य दक्षता घेतली तर या व्यसनापासून मुक्त होता येते. या व्यसनापासून होणाऱ्या भयानक परिणामांची सर्वांनी जनजागृती करावी व आपल्या आसपासच्या लोकांमध्ये या विषयी माहिती द्यावी असे आवाहनही डॉ.बोल्डे यांनी यावेळी केले. त्यांनी सादरीकरणाद्वारे कार्यशाळेत तंबाखु नियंत्रणाबाबत सविस्तर माहिती दिली.
            राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमाच्या माध्यमातून तंबाखु सेवनाचे आरोग्यावरील दुष्परीणाम व तंबाखू नियंत्रण कायद्याविषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचे उद्दीष्ट आहे. तंबाखु नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करणे व शाळा-महाविद्यालयात विविध उपक्रम राबवून जनजागृती करणे व विविध विभागामध्ये समन्वय करणे यासारखी उद्दीष्ट्ये समोर ठेवून समिती बीड जिल्ह्यात कार्यरत आहे.याचाच एक भाग म्हणून तंबाखू नियंत्रणाविषयी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेस सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र तंबाखु नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या ठिकाणी तंबाखु नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. तंबाखुमुळे झालेल्या आजारावर याठिकाणी उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून या शिवाय तंबाखु व्यसन सोडण्यासाठी सुध्दा मदत केली जात आहे. अशी माहितीही या कार्यशाळेत देण्यात आली.
            जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे यावेळी म्हणाले की, तंबाखु खाणाऱ्यांना तंबाखु सोडण्यासाठी प्रवृत्त करणे हे एक मोठे कार्य आहे. या कार्यासाठी सर्व नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. आजुबाजुच्या समाजात तंबाखु व्यसनामध्ये अडकलेल्या अनेक लोकांचा वावर दिसून येतो. त्यांच्यामुळे शहराची-परिसराची व इमारतीची स्वच्छता धोक्यात येते. या अनिष्ठ पध्दतीमुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येत आहे. व्यसनापासून दूर राहणे हाच एकमेव यावर उपाय आहे. असेही ते म्हणाले.
            या कार्यशाळेत तंबाखु नियंत्रणाबाबत दृकश्राव्य चित्रफित आणि पावरपॉईंट सादरीकरण दाखविण्यात आले. या कार्यशाळेस निवासी आरोग्य अधिकारी डॉ. दबडगावकर, सुदाम मोगले यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सुत्रसंचालन श्रीमती रमा गिरी यांनी केले तर शेवटी डॉ. हरदास यांनी आभार मानले.

17 वा कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा सैनिकांच्या खांद्याला खांदा देऊन उभे आहोत हा विश्वास देऊन त्यांचे मनोबल वाढवावे - जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर





            बीड -  देशाच्या संरक्षणासाठी सैनिक अत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत तसेच कुटूंबियांपासून महिनोन महिने दूर राहून प्राणपणाने देशाचे संरक्षण करीत असल्याने आपण सुरक्षित राहतो. त्यांच्या या महान कर्तव्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्याच्या सैनिकांच्या पाठीशी नव्हे तर खांद्याला खांदा देऊन उभे आहोत असा विश्वास सैनिकांना समाजातील प्रत्येकाने देऊन त्यांचे मनोबल वाढवावे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले.
            बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहामध्ये जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने 17 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
            यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, तहसीलदार अशोक नांदलगावकर, गटशिक्षणाधिकारी श्री. हिंगोणीकर, ईसीएच पॉलीक्लीनीकचे केची सिध्दांत, राष्ट्रीय छात्रसेनेचे कमांडंट जगदीश करपे, उद्योजक गौतम खटोड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन सुभाष ढोरजकर (नि.) यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर म्हणाले की, देशावर लढाईच्या स्वरुपात संकटे येतात. पण लढाई जिंकली की सैनिकांचे काम संपले असे कधीही होत नाही. देशाच्या सीमेवर दररोज शत्रु घुसखोरी करतात. त्यांचा सामनाही अविरतपणे सैनिकांना करावा लागतो. कधी-कधी याबाबतची माहिती आपणापर्यंत पोहचत नाही. त्यामुळे सैनिकांच्या कर्तव्यांचे आणि बलिदानांचे महत्व समजण्यासाठी, सैनिकांचा त्याग आणि सामान्य नागरिकांची जबाबदारी याबाबत संदेश समाजामध्ये पोहचण्यासाठी कारगिल वियज दिवसासारख्या कार्यक्रमांचे आयोजन करणे महत्वाचे आहे. जेणेकरुन आजचा तरुणही देशसेवेसाठी सैन्यदलामध्ये जाण्यास प्रवृत्त होईल असेही श्री.पारस्कर यावेळी म्हणाले.
            जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यावेळी म्हणाले की, सैनिकांप्रती ऋण व्यक्त करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे विविध योजनांच्या माध्यमातूनही सैनिक, माजी सैनिक, शहीदांच्या पाल्यांसाठी असलेल्या विविध योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी म्हणाले की, सर्व काही बदलता येते पण देशाच्या सीमा बदलता येत नाही. देशाच्या सिमेवर कर्तव्य बजावताना शत्रुपेक्षा निसर्गाशी मोठया निकराने मुकाबला करावा लागतो. त्यामुळे देशरक्षण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाला आणि कर्तबागारीला तोड नाही हे कारगिल लढाई विजयाच्या माध्यमातून भारतीय सैनिकांनी जगाला दाखवून दिले आहेत. युवकांनी सैनिकांपासून प्रेरणा घेऊन सैन्यामध्ये भरती व्हावे आणि देशाची सेवा करावी असे आवाहन श्री. सुर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित युवक-युवतींना केले. तसेच जिल्ह्यातील सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी मदत करील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
            यावेळी वीरपत्नी, वीरमाता, यांचा भेटवस्तु व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच सैनिक कल्याण विभागामार्फत सैनिकाच्या पाल्यांचे शिक्षण, प्रशिक्षण, मुलींचे विवाह यासाठीच्या धनादेशाचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.  प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले. तसेच दोन मिनीटे शांतता पाळून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बाजीराव केदार  आणि अभिमन्यु शिंदे  यांनी केले तर आभार श्री. मलवाड यांनी मानले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
            यावेळी जिल्हयातील वीरपत्नी, वीरमाता-पिता, माजी सैनिक व त्यांचे अवलंबित यांच्यासह राष्ट्रीय छात्रसैनिक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सैनिक कार्यालयाचे बी.एल.खंडागळे, एस.आर.काशिद, एस.एम.खारे, शेख जमील, के.व्ही. जाधव,आर.व्ही.बांगर यांनी परिश्रम घेतले.