शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड येथे मुख्य ध्वजारोहरण संपन्न








          बीड, दि. 17 :- गेल्या काही वर्षांपासून सातत्याने टंचाईचा सामना करणाऱ्या आपल्या बीड जिल्हयावर यावर्षी वरुणराजाने बरी कृपादृष्टी केल्याने आपणा सर्वांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मी वरुणराजाचे ऋण व्यक्त करते असे सांगून राज्याच्या महिला व बालविकास तसेच ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.
            मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
            तत्पुर्वी हुतात्मा स्मृतीस्तंभ येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे पंडीत रंगनाथ कापसे, नगराध्यक्षा सौ. रत्नमालाताई दुधाळ आदींनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली.
            यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यात मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. आता पाऊस चांगला झाला आहे आणि पीकेही चांगली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे  नुकसान होऊ नये यासाठी आता कृषीपंपांसाठी 12 तास वीज पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गतच्या कामांमुळे गावशिवारातील  भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी जिल्हयातील 256 गावातील जलसंधारणाच्या कामांवर सुमारे 55 कोटी 16 लाख रुपयांचा निधी खर्च केला जात आहे.

मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करुन त्यांच्या उज्वल भविष्याकरीता समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांची वाढती संख्या  ही अभिमानाची बाब आहे असे सांगून या योजनेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
            अंगणवाडयांचे बळकटीकरण व  पुर्नरचना अंतर्गत समावेश असलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये आपल्या बीड जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला असून आतापर्यंत जिल्हयातील 117 अंगणवाडी केंद्रे डिजिटल करण्यात आलेली आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यास मंजूरी मिळाल्याने त्यांचा मोठा प्रश्न निकाली निघणार आहे असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. गावे विकसित झाली तर संपूर्ण समाज विकसित होऊ शकतो. त्यामुळे गावे स्मार्ट करण्याचा आमचा संकल्प आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात निधी थेट ग्रामपंचायतींना मिळणार आहे. आपल्या गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आमचा गाव आमचा विकास या उपक्रमात सहभागी होऊन गावाच्या विकासाला हातभार लावावा असे माझे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
नजिकच्या काळात जिल्ह्यात 3674 घरकुले बांधून देण्यात येणार असल्याने गोरगरीब जनतेच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत केंद्र शासनाचे प्रत्यक्षात व्याज अनुदान पात्र कार्यरत महिला स्वयंसहायता समुहांना 0 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्याकरीता सुमतीबाई सुकळीकर उद्योगिणी महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाचा फार मोठा आणि महत्वाकांक्षी कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून नवीन ग्रामीण रस्त्यांचे जाळे निर्माण करतांनाच जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीवरही भर दिला जात असल्याने आपल्या जिल्ह्यातीलही रस्त्यांचे रुप पालटून जनतेला दळणवळणाच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत अशी माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.
बीड जिल्हा परिषदेने लोकसहभाग मिळविण्यासाठी  समुदाय संचलित गाव हागणदारी निर्मुलन कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी केली. जिल्ह्यात यशस्वी झालेला हा उपक्रम राज्यभर पोहचविण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने  पाऊले उचललेली आहेत. नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामासाठी 962 कोटी 22 लाख रुपये एवढा भरीव निधी या प्रकल्पासाठी उपलब्ध झाला असल्याने आपली रेल्वेमार्गाची स्वप्नपूर्ती व्हायला वेळ लागणार नाही असा विश्वास पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी पोलीस दलात फिरत्या फॉरेन्सिक लॅब आणि सायबर लॅबसारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा समावेश करण्यात आल्याने सोशल मिडीयातून सामाजिक जीवनमान बिघडविणाऱ्या घटनांची उकल होणास व शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यास निश्चितच मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते स्वयंसहाय्यता बचतगटांना खेळते भांडवल निधी वितरण पत्र देण्यात आले.

मुख्य शासकीय ध्वजारोहणाप्रसंगी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परेड संचलन वाहनातून परेड पथकांचे निरिक्षण केले. या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी, पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा