शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

भूमि अभिलेख विभागांतर्गत 7 ऑक्टोबरला पेन्शन अदालत

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : भूमि अभिलेख विभागातून बीड जिल्ह्यातील मागील दहा वर्षांत सेवानिवृत्त झालेल्या ज्या अधिकारी -कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती विषयक लाभ देणे बाबतची कार्यवाही प्रलंबित आहे, अशा अधिकारी-कर्मचारी यांची पेन्शन अदालत दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ३.०० ते ५.०० या वेळेत जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख बीड, चांदमारी शासकीय वसाहत, पालवन चौका जवळ, धानोरा रोड, बीड ४३११२२ या कार्यालयात आयोजित करण्यात आलेली आहे. तरी संबंधित अधिकारी - कर्मचारी यांनी आवश्यक कागदपत्रासह पेन्शन अदालतीस उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. 00000

नवरात्रोत्सवासाठी आज ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबत सूट

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : जिल्ह्यात ध्वनि प्रदूषण नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे तसेच ध्वनी प्रदूषण (नियंत्रण व नियमन) नियम 2000 मधील अटी व शर्तीस अधीन राहून शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग यांच्याकडून नवरात्रोत्सवासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 06.00 वाजेपासून ते मध्यरात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादिच्या वापराबाबत सूट जाहीर करण्याकरिता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केले आहे. त्याअनुषंगाने शासन आदेशानुसार नवरात्रोत्सवासाठी दिनांक 1 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 6.00 वाजेपासून ते रात्री 12.00 वाजेपर्यंत ध्वनीची मर्यादा राखून ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादिच्या वापराबाबत सूट जाहीर करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी निर्गमित केले आहेत. 00000

एमपीएससी परीक्षा केंद्र परिसरात 8 ऑक्टोबरला कलम 144 लागू

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त गट - ब ( पूर्व ) परीक्षा - २०२२ शनिवार, दि. ८ ऑक्टोबर २०२२ रोजी बीड जिल्हा केंद्रावर एकूण (२१) उपकेंद्रांमधून घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण ६ हजार ६९२ उमेदवार बसलेले असून परीक्षा कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आलेला आहे. ही माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दिली आहे. आयोगाच्या सूचनेनुसार या परीक्षार्थींना त्यांच्याकडील मोबाईल, पेजर, कॅल्क्युलेटर, इलेक्ट्रीक वस्तु व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही. परीक्षेच्या वेळेमध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास सक्त मनाई आहे. परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबतच त्यांचे स्वत: चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हींग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतीही दोन ओळखपत्रे व त्यांची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवारांना त्यांच्या परीक्षा उपकेंद्रावर सकाळी ८.३० वाजेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षा सुरु झाल्यानंतर परीक्षा केंद्रावर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबी खाली प्रवेश देण्यात येणार नाही, असेही कळविण्यात आले आहे. 00000

बीडमध्ये 10 ऑक्टोबरला शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : बीड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पीएम राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी मेळाव्याचे सोमवार दि. 10 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील इच्छुक प्रशिक्षणार्थींनी शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्यासाठी वेळेवर हजर रहावे, असे आवाहन बीड मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे अंशकालीन प्राचार्य यांनी केले आहे. 00000

पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आजपासून मतदारनोंदणी

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : मा. भारत निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्यासाठी कार्यक्रम दिनांक 14 जुलै 2022 रोजी जाहीर केला असून, दिनांक 1 ऑक्टोबरपासून मतदार नोंदणी सुरु होणार आहे. दि. 01 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत औरंगाबाद विभागातील शिक्षक मतदार संघासाठी मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, माध्यमिक शाळेपेक्षा कमी दर्जा नसलेल्या शैक्षणिक संस्थांतील शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी होणार आहे. या पार्श्वभूमिवर बीड जिल्ह्यातील दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकास विहित निकषानुसार पात्र मतदारांनी त्यांचे अर्ज नमुना क्र. 19 मध्ये भरुन आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी केले आहे. दर सहा वर्षांनी होणाऱ्या विधान परिषद सदस्यत्वासाठीच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील निवडणुकांसाठी संपूर्ण नव्याने मतदार यादी तयार करण्यात येते. त्यासाठी निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची पहिली पायरी म्हणून मतदार यादीचे काम हाती घेण्यात येते. त्यासाठी मुदत संपणाऱ्या मतदारसंघाच्या मतदार यादीच्या नोंदणीचा कार्यक्रम आयोगाने 1 ऑक्टोबर 2022 ला कार्यक्रमाची सूचना प्रसिध्द होईल. याच दिवसापासून औरंगाबाद विभागाच्या मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरु होणार आहे. दिनांक 07 नोव्हेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. 23 नोव्हेंबर 2022 ला प्रारुप मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यावर, त्या यादीवर दि. 23 नोव्हेंबर ते दि. 9 डिसेंबर 2022 या काळात दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. दि. 25 डिसेंबर 2022 ला दावे व हरकती निकाली काढून पुरवणी यादी तयार करून त्यानंतर दि. 30 डिसेंबर 2022 ला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. सदर मतदार यादीमध्ये अर्ज नमुना क्र. 19 व्दारे नावनोंदणी करावयाची आहे. 00000

जिल्हा लोकशाही दिन सोमवारी

बीड, दि. 30 (जि. मा. का.) : जिल्हा लोकशाही दिन महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा लोकशाही दिन दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी कळविले आहे. लोकशाही दिनाकरिता मुदत पूर्व प्राप्त अर्ज संबंधित विभाग प्रमुख यांना पाठवून जिल्हा लोकशाही दिन बैठकीत त्यांनी सदर अर्जावर कार्यवाहीच्या अहवालासह उपस्थित राहणे आवश्यक आहे. 00000

गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक संपन्न

कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने मृत पालकांची बालके मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी -जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा बीड, दि, 29 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने पालक गमावलेल्या बालकांना त्यांची शैक्षणिक उन्नती व्हावी, या दृष्टीकोनातून मदतीचा हात देणे गरजेचे आहे. त्यामुळे ती बालके शिक्षणाने सक्षम होवून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यास भरीव मदत होईल. तरी जिल्ह्यातील कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने मृत पालकांची बालके शासनाच्या अर्थसहाय्याच्या मदतीपासून वंचित राहणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय कृती दलाच्या (टास्क फोर्स) बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. एन. गोडबोले, सहा.पोलिस निरीक्षक सुरेखा धस, बाल कल्याण समितीचे संतोष वारे, चाईल्ड लाईनचे अतुल कुलकर्णी व रामहरी जाधव, परिविक्षाधिन अधिकारी मंगेश जाधव, संरक्षण अधिकारी ए. एच. कदम यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. शर्मा म्हणाले, राज्य शासनाकडून कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने पालक गमावलेल्या बालकांना जे अर्थसहाय्य प्राप्त झाले आहे, त्यामध्ये एक पालक गमावलेल्या बालकांना प्रत्येकी 5 हजार रुपये तर दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 10 हजार रुपये मंजूर करुन लाभ देण्यात यावा. यासंदर्भात अद्यापही अर्ज सादर न केलेल्या बालकांनी अर्ज सादर करण्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी संबंधितांना दिले. जिल्ह्यातील बालकांसाठी काळजी व संरक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावाने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे यथायोग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) समिती गठीत करण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहत असतात. बीड जिल्ह्यातील एकूण 11 तालुक्यातील कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे एक पालक आणि दोन पालक गमावलेल्या बालकांचे एकूण 425 अर्ज प्राप्त झाले आहेत. हे अर्ज जिल्ह्यातील तालुका संरक्षण अधिकारी यांच्याकडून छाननी करुन गुगल फॉर्मवर अद्ययावत करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. तडवी यांनी यावेळी दिली. 00000

जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची कार्यशाळा संपन्न

बीड, दि, 29 (जि. मा. का.) सेवा पंधरवडाअंतर्गत समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची कार्यशाळा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुहास कुलकर्णी यांची उपस्थित होते. यावेळी सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांनी तृतीयपंथीयांना ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळण्याकरिता अवलंबवयाची कार्यपद्धती सांगून तृतीयपंथीयांच्या विविध प्रकाराच्या समस्याचे निराकरण केले. तसेच यावेळी ऑनलाईन आवेदन केलेल्या चार तृतीयपंथीय व्यक्तिंना ओळखपत्र व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रम अधिकारी डॉ . सुहास कुलकर्णी यांचे तृतीयपंथीयांना आरोग्यविषयक मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास ग्रामीण विकास मंडळ बनसारोळाचे प्रकल्प व्यवस्थापक सय्यद फारुक हुसेन, समुपदेशक बापु लुंगेकर, एफ. आर. फारुकी, (डी. ए .एम अॅन्ड ई.), एल. डब्लू. एस प्रकल्प व्यवस्थापक वाघमारे रामेश्वर व टी. जी. वर्कर कल्पना बांगर आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. एन. हांगे यांनी केले. 00000

लोकगीतांतून लोकशाहीचा जागर स्पर्धा, 31 ऑक्टोबरपर्यंत सहभाग नोंदवण्याचे आवाहन

बीड, दि, 29 (जि. मा. का.) : लोकगीतांचा पारंपरिक गोडवा आणि समाजाला आवाहन करण्याची त्यांची ताकद लक्षात घेऊन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त व्यक्तिंनी स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी, बीड यांनी केले आहे. आपले नाव मतदार यादीत नोंदवणे आणि मताधिकार बजावणे, मतदार यादीतील दुबार नावे वगळण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधार कार्ड जोडणे, मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यास नाव वगळणे, विविध घटकांना (दिव्यांग, तृतीयपंथी, ज्येष्ठ नागरिक) दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधा, हे विषय केंद्रस्थानी ठेवून गीतरचना करता येईल. तसेच मताधिकार बजावताना, जात, धर्म, पंथ निरपेक्ष राहून आपला लोकप्रतिनिधी निवडणे, पैसे किंवा इतर आमिषांना बळी न पडता मताधिकार बजावणे, यासारख्या विषयांवर गीतरचना करून लोकशाहीसंबंधी जागृती करता येईल. स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे - सदर स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. एकल (सोलो) आणि समूह (ग्रुप) दोन्ही प्रकारची लोकगीते पाठवता येतील. स्पर्धेचा अर्ज पुढीलप्रमाणे भरावा. यात समूह गीते पाठवताना अर्ज एकाच स्पर्धकाच्या नावे भरावा. लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी या विषयांशी संबंधित लोकगीत गाऊन त्याची ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवावी. गीतासोबत नाच असला तरी चालेल. एका स्पर्धकाने किंवा समूहाने एकच गीत पाठवावे. आपल्या गीताची ध्वनिचित्रफीत पाठवताना, ती कमीत-कमी दोन मिनिटांची आणि जास्तीत-जास्त पाच मिनिटांची पाठवावी. ध्वनिचित्रफितीची (व्हिडिओची) साईज जास्तीत-जास्त ५०० एमबी असावी आणि ती एमपी 4 फॉरमॅटमध्ये असावी. ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) गूगल अर्जावर जोडताना, त्यावर व्यक्तिचे किंवा मंडळाचे नाव, लोगो येणार नाही याची काळजी घ्यावी, अन्यथा सदर अर्ज स्पर्धेतून बाद केला जाईल. लोकशाही, निवडणूक, मताधिकार, आधार जोडणी या विषयांवर लोकगीत पाठवणाऱ्या स्पर्धकाचाच अर्ज ग्राह्य धरला जाईल. आपली ध्वनिचित्रफीत https://forms.gle/hRoUEKUEb6bT2x4g9 या गुगल अर्जावरील माहिती भरून त्यावर पाठवावी. ज्या स्पर्धकांना ध्वनिचित्रफीत (व्हिडिओ) पाठवण्यास अडचण येईल, त्यांनी ८६६९०५८३२५ (प्रणव सलगरकर), ९९८७९७५५५३ (तुषार पवार) या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संदेश (मेसेज) पाठवून कळवावे. दिनांक २६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ या काळात आलेले साहित्यच स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. लोकगीत बोलीभाषेतले असेल तर गुगल अर्जावर त्याचा मराठीत अनुवाद करून पाठवावा. बक्षिसांचे स्वरूप पुढीलप्रमाणे असेल. समूह लोकगीतास प्रथम क्रमांक २१,०००/- रुपये, द्वितीय क्रमांक ११, ०००/- रुपये, तृतीय क्रमांक ५,०००/- रुपये आणि उत्तेजनार्थ १००० रुपयांची एकूण दहा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तर एकल लोकगीतास प्रथम क्रमांक ७,०००/- रुपये, द्वितीय क्रमांक ५, ०००/- रुपये, तृतीय क्रमांक ३,०००/- रुपये आणि उत्तेजनार्थ ५०० रुपयांची एकूण दहा बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. एकल लोकगीतासाठी २५ पेक्षा कमी प्रवेशिका आल्यास त्यांचे स्वतंत्रपणे मूल्यमापन न करता समूह गटांतर्गत त्यांचे मूल्यमापन केले जाईल. सहभागी सर्व स्पर्धकांना (समूह गीतात सहभागी प्रत्येकाला) मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येईल. समूहामध्ये जास्तीत जास्त पंधरा व्यक्तिंचा समावेश असावा, त्यापेक्षा अधिक व्यक्तिंचा समावेश असल्यास अधिकच्या व्यक्तिंना प्रमाणपत्र दिले जाणार नाही. विजेत्यांना बक्षिसाची रक्कम, प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. आलेल्या लोकगीतांमधून सर्वोत्तम गीते निवडण्याचा, तसेच स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल करण्याचा अंतिम निर्णय परीक्षक आणि आयोजक यांच्याकडे राहील. स्पर्धकाने पाठवलेल्या साहित्यावर अन्य कुणी स्वामित्व हक्क सांगितल्यास त्याची पडताळणी करण्याची जबाबदारी सदर स्पर्धकाची असेल. स्पर्धेतील उत्कृष्ट साहित्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यमांवर प्रसारित केले जाईल. निवडणूक कार्यालयात कार्यरत कर्मचारी / अधिकारी सदर स्पर्धेत सहभागी होऊ शकतात, मात्र त्यांच्या साहित्याचा बक्षिसासाठी विचार केला जाणार नाही. 00000

गळीत हंगामासाठी जिल्हा प्रशासनाकडून नियोजन

बीड, दि, 28 (जि. मा. का.) : जिल्ह्यात यावर्षी म्हणजे 2022-23 मध्ये मागील वर्षापेक्षा ऊस लागवड क्षेत्र जास्त प्रमाणावर आहे. त्यामुळे भविष्यात गाळपाअभावी अतिरीक्त ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीकोनातुन आवश्यक ती खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासन योग्य ते नियोजन करत आहे. जिल्हाधिकारी यांनी साखर आयुक्त, पुणे यांना जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र अधिक असल्याने जिल्ह्यातील व नजीकच्या भागातील साखर कारखाने लवकरात लवकर चालू करण्यात यावेत म्हणून विनंती केली आहे. जिल्ह्याचा गळीत हंगाम 2021-2022 मध्ये बीड जिल्ह्यात 89193 हेक्टर क्षेत्र ऊस या पिकाखाली लागवडीस होते. या क्षेत्रापैकी कृषि विभागाने अंदाज केलेले क्षेत्र 69864 हेक्टर क्षेत्रावर 59.07 लाख मेट्रिक टन ऊस संभाव्य गाळपास उपलब्ध असल्याबाबत निदर्शनास आले होते. त्याअनुषंगाने सन 2021-2022 या साली अतिरीक्त ऊस शिल्लक राहू नये या दृष्टीने नियोजन करण्यात आले होते. 00000

राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान पौष्टिक तृणधान्यअंतर्गत गोदाम बांधकामासाठी अर्ज स्वीकार प्रक्रियेस प्रारंभ

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान - पौष्टिक तृणधान्य सन २०२२-२३ या वर्षात निविष्ठा साठवणुकीसाठी २५० मे. टन क्षमतेच्या गोदाम बांधकामासाठी अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेस 27 सप्टेंबरपासून प्रारंभ झाला आहे. तरी गोदाम बांधकामासाठी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांची कंपनी ज्या तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आहे, त्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथे दि. २७ सप्टेंबर ते दि. ७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र नोंदणीकृत शेतकरी उत्पादक कंपन्यांनी आपल्या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क करून गोदाम बांधकामासाठी अर्ज करावेत. गोदाम बांधकामाची क्षमता २५० मे. टन असून, अनुदान जास्तीत जास्त १२.५० लाख किंवा गोदाम बांधकामास आलेल्या खर्चाच्या ५० टक्के यापैकी जे कमी असेल ते देय आहे. तसेच ते राष्ट्रीयकृत बँकेचे कर्जाशी निगडित आहे. अर्जासोबत शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी प्रमाणपत्र, ज्या जागेवर गोदाम उभारणी करण्याचे नियोजन आहे, त्या जागेचा सातबारा व ८-अ जोडण्यात यावा. जिल्हास्तरावर कार्यपद्धतीनुसार लक्षांकाएवढे अर्ज निवड प्रक्रिया करण्यात येईल. निवड झालेल्या शेतकरी उत्पादक कंपनीस आवश्यक छाननीनंतर पूर्वसंमती देण्यात येईल. गोदाम बांधकाम २५० मे. टन क्षमतेचे असून राष्ट्रीयकृत बँकेचे कर्ज घेणे बंधनकारक आहे. तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ प्राधिकृत अधिकारी अथवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मान्यताप्राप्त डिझाइन्स, स्पेसीफिकेशन, गोदाम बांधकामाच्या अंदाजपत्रकास तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक आहे. पूर्व संमती भेटल्यावर बँक कर्ज व सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिक मंजुरी घेतल्यानंतरच गोदाम बांधकामास कार्यारंभ आदेश देण्यात येईल. तसेच निवड ते पूर्वसंमतीने काम पूर्णत्वासाठी विशिष्ट कालमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. 00000

शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : चालू शैक्षणिक वर्षात प्रवेशित व भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी प्रणाली दि. 22 सप्टेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. ऑनलाईन प्रणालीवर अर्ज नोंदणी व अर्जाची पडताळणी करुन समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगिनवर पाठविण्याबाबत संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांनी कार्यवाही करण्याबाबत सर्व महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. तरी जिल्ह्यातील पात्र अनुसूचित जाती, विजाभज, इमाव तसेच विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज नोंदणी करावी. ऑनलाईन प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जावर महाविद्यालयांनी विहित वेळेत कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त आर. एम. शिंदे यांनी केले आहे. 00000

पोकरा योजनेत अर्ज सादर करण्यासाठी 30 सप्टेंबरची मुदत

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत फळबाग व बांबू लागवडीकरिता अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत शुक्रवार, दि. 30 सप्टेंबर 2022 असून, ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप अर्ज केले नसतील, त्यांनी पुढील दोन दिवसात तात्काळ पोकरा योजनेअंतर्गत अर्ज सादर करावेत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बी. के. जेजुरकर यांनी केले आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पअंतर्गत फळबाग व बांबू लागवड अंतर्गत अंतिम मुदतीनंतर पोर्टलवरील फळबाग व बांबू लागवड घटक बंद होणार आहे. फळबाग व बांबू लागवड अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 30 सप्टेंबर 2022 असून लागवड पूर्ण करण्याची अंतिम मुदत दि. 30 नोव्हेंबर 2022 आहे. शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी आपल्या क्षेत्राचे कृषि सहायक अथवा समूह सहायक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 00000

पावसाळ्यातील संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तालुका स्तरावर शीघ्र प्रतिसाद दल स्थापन करावे - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : पावसाळ्यात संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी तहसीलदार यांच्या नेतृत्त्वाखाली तालुका स्तरावर एक शीघ्र प्रतिसाद दल स्थापन करावेत. त्यांना प्रशिक्षण द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिल्या. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या मान्सून आढावा बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजदीप बनसोड आदि व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, प्रत्येक तहसील स्तरावर प्रथम शीघ्र प्रतिसाद दल आणि जिल्हा स्तरावर द्वितीय शीघ्र प्रतिसाद दल स्थापन करावेत. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ, आर्थिक बळ आणि साधनसामुग्री याबाबतचा स्थानिक स्तरावर आढावा घेऊन योग्य ते नियोजन आतापासूनच करावे. त्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर पाठविण्यात यावा. सदर प्रस्ताव तयार करताना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचा तंतोतंत अवलंब करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, मान्सून कालावधीत पाणी आणि वीज यांच्याशी संबंधित दुर्घटना घडतात. त्यामुळे संबंधितांना प्रशिक्षण देताना या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. माजलगावसारख्या मोठ्या प्रकल्पाच्या ठिकाणी 2 टीम तयार कराव्यात. एक टीम तालुका स्तरावरील असेल व दुसरी टीम स्थानिक स्तरावरील असेल. आपत्ती व्यवस्थापन ही एका विभागाची जबाबदारी नसून, याबाबत व्यापक विचार करावा. आपत्तीशी मुकाबला करताना सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे ते म्हणाले. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले, गावातले पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्ती, साप पकडणाऱ्या व्यक्ती आदि आपत्तीशी संबंधित व्यक्तिंच्या संपर्क क्रमांकाची यादी गावनिहाय तयार ठेवावी. शीघ्र प्रतिसाद दलातील व्यक्तिंना व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे. वैद्यकीय पथक तयार ठेवावे. तसेच, आपत्तीशी लढण्यासाठी लागणारी साधन सामग्रीची मागणी करावी. जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सदर शीघ्र प्रतिसाद दलामध्ये गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश करण्याबाबत सूचना केल्या. याशिवाय प्रत्येक गावस्तरावर एक पथक तयार करावे, त्यामुळे आपत्ती टाळण्यासाठी तात्काळ मदत होईल, असे ते म्हणाले. बैठकीस उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, अधीक्षक अभियंता तथा प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, मच्छिमार समुदायाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 00000

भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांनी स्वतंत्र बैठक घ्यावी - जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची प्रलंबित प्रकरणे संबंधित विभाग प्रमुखांनी स्वतंत्र बैठक घेऊन त्वरित निकाली काढावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष राधाबिनोद शर्मा यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह समितीचे शासकीय, अशासकीय सदस्य व तक्रारदार उपस्थित होते. लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, जिल्हा पुरवठा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, कृषि विभाग, सहकार विभाग, पाटबंधारे विभाग, मृदा सर्वेक्षण विभाग आदि विभागाचे अधिकारी या समितीचे शासकीय व ॲड. अजित देशमुख, ॲड. सय्यद खाजा मिया हे अशासकीय सदस्य आहेत. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा म्हणाले, 31 मे च्या बैठकीतील 7 आणि नवीन प्राप्त 8 प्रकरणे समितीपुढे आहेत. यापैकी 4 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, 11 प्रकरणे प्रलंबित आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी प्रशासन आहे. त्यामुळे जिल्हास्तरीय समितीपुढे प्रकरण सादर करण्यापूर्वी तक्रारदारांनी संबंधित विभाग प्रमुखांची भेट घेऊन समस्या मांडावी, जेणेकरून तक्रार निकाली निघण्यास मदत होईल. आजच्या बैठकीत प्राप्त प्रकरणे संबंधित विभागाकडे वर्ग करावीत. संबंधितानी पुढील बैठकीच्या आधी सदर प्रकरणे निकाली काढण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 00000

बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२

केंद्रीय उपसचिव प्रियांक चतुर्वेदी यांनी घेतला जलशक्ती अभियानाचा आढावा

बीड, दि, 28 (जि. मा. का.) : केंद्रीय उपसचिव प्रियांक चतुर्वेदी यांनी जलशक्तीअभियानांतर्गत बीड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या कामांचा आढावा आज घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रगती सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी आदित्य जीवने यांच्यासह संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जलशक्ती अभियान - कॅच द रेन ही एक कालबद्ध मोहीम आहे. दि. 29 मार्च 2022 ते 30 सप्टेंबर 2022 असा या अभियानाचा कालावधी आहे. हा केंद्र शासनाच्याविविध मंत्रालयांचा व राज्य शासनांचा एकत्रित उपक्रम आहे. जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायती,रोजगार हमी योजना, कृषि, वन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण,बांधकाम विभाग, भूजल सर्वेक्षण विभाग, जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य विभाग, महिला वबालकल्याण विभाग, पाटबंधारे विभाग व जलसंधारण विभाग आदि विभाग या मोहिमेत सहभागी आहेत. या मोहिमेंतर्गत बीड जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत कामे हाती घेऊन पूर्ण करण्यातआली आहेत. या कामांची पाहणी करण्याकरिता केंद्र शासनामार्फत एक समिती नियुक्त करण्यातआली असून, या समितीमार्फत जिल्ह्यात पूर्ण झालेल्या कामांना भेटी देण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्रीय उपसचिव प्रियांक चतुर्वेदीयांनी आज या अभियानांतर्गत झालेल्या कामांचा आढावा घेतला तसेच विविध मौलिक सूचनाकेल्या. यावेळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी जिल्ह्यात या अभियानांतर्गतविविध विभागांमार्फत राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती दिली. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार म्हणाले, जिल्हाधिकारीकार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयसीआयसीआय यांच्या माध्यमातून 100 गावांमध्येजलपुनर्भरणाची (रेनवॉटर हार्वेस्टिग) कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील शासकीय व वैयक्तिकइमारतींवरील छतांवर पडणारे पावसाचे पाणी नजीकच्या विहिरीत सोडण्यात येते. यामुळे विहिरीचापाणीसाठा व भूजलपातळी वाढण्यास मदत होत आहे. पुढील टप्प्यात 500 गावांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगची कामे कार्यान्वित होणार आहेत. जिल्हा जलसंधारण अधिकारी अजित परांडे म्हणाले, पावसाच्यापाण्याचे पुनर्भरण करणे, नागरिकांमध्ये यासंदर्भात जनजागृती करणे, पाणी बचत व पाण्याचा विवेकी वापर, जलसाठ्यांचे जिओ टॅगिंग करणे आदि जलशक्ती अभियानाची मुख्य उद्दिष्टे आहेत.जिल्ह्यात जलसंवर्धन व जलपुनर्भरणाची 385 कामे पूर्ण कऱण्यात आली असून, 356 कामे सुरू आहेत. पारंपरिक व अन्य जलसाठ्यांचे पुनरूज्जीवन अंतर्गत 143 कामे पूर्ण कऱण्यात आली असून, 43 कामे सुरू आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे दिली. -*-*-*-*-

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

बीड, दि.27 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी महामंडळाच्या www.msobefdc.in ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एस.आर. गुट्टे यांनी केले आहे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई जिल्हा कार्यालय , बीड यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील इतर मागास प्रवर्गातील होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे , त्यांना शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी कर्जावरील व्याज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना राबविण्यास शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. ही योजना आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रकिया व पशुविज्ञान या क्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच लागू असेल या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी महामंडळाच्या www.msobefdc.in या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन सर्व माहिती भरुन अर्ज सादर करावेत व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी. विद्यार्थ्यांनी काही अडचण अथवा समस्या असल्यास जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा. तसेच इतर मागास प्रवर्गातील व्यक्तींना व्यवसायासाठी अर्थ सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी रुपये एक लक्ष थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व 20 टक्के बीज भांडवल योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क करावा. -*-*-*-*-

सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२

नवरात्रीच्या अनुषंगाने हॉटेल व किराणा अन्न व्यावसायिकांनी नियमानुसार काळजी घेण्याचे अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

बीड, दि. 26 (जि. मा. का.) : अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६, नियम व नियमने २०११ अंतर्गत पुढीलप्रमाणे दिलेल्या सूचनांचे पालन करून भंडारा व प्रसाद वाटप करावे जेणेकरून भक्तगणास चांगल्या प्रकारचा प्रसाद मिळेल. हॉटेल व किराणा अन्न व्यावसायिकांनी नवरात्रीच्या अनुषंगाने नियमानुसार काळजी घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अन्न व्यावसायिकांनी तयार केलेला प्रसाद शक्यतो प्लॉस्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा, जेणेकरून प्रसादाला धूळ, माती, माशा, मुख्यतः इतर कीटकांचा प्रादुर्भाव होणार नाही. काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिने नाक, कान, डोके, केस खाजवणे वा डोळे चोळणे टाळावेत. अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिने शिंकणे, थुंकणे, नाक शिंकरणे, तंबाखु वा धूम्रपान करणे टाळावे. संसर्गजन्य आजार असणाऱ्या व्यक्तिने अन्न पदार्थ बनविणे व हाताळण्याची कामे करू नये. अन्न पदार्थ हाताळणाऱ्या सर्व व्यक्तिंचे कपडे स्वच्छ असावेत. अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिंची नखे व्यवस्थित कापलेली असावीत व त्यात घाण साचलेली असू नये. अन्न पदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिने साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामास सुरुवात करावी. अन्न व्यावसायिकांनी आवश्यक तेवढेच अन्न पदार्थ विशेषतः दूध व दुग्धजन्य अन्न पदार्थ ताजे तयार करून भक्तांना वाटावेत, जेणेकरून ताजे अन्न पदार्थ भक्तांना मिळतील व ते उरणार नाहीत वा साठवण्याची तजबीज करावी लागणार नाही. शिळा प्रसाद भक्तांना वाटप करु नये. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्य तेलाचा पुनर्वापर करु नये. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी व भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे. पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात साठवावे, त्यावर स्वच्छ झाकण झकलेले असावे, पाणी घेण्यासाठी लांब दांड्याचे स्वच्छ वगराळे असावे. पिण्याचे पाणी निर्जंतुक करून पिण्यास द्यावे. पिण्याचे पाणी देताना त्यात बोटे बुडवु नयेत. भांड्याचा वापर करण्यापूर्वी ती डिटर्जंट पावडरने स्वच्छ घासून व स्वच्छ पाण्याने धुवुनच वापरावीत. भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा तसेच भांडी स्वच्छ व कोरड्या जागेत ठेवावी. हात पुसण्यासाठी स्वच्छ कपडा वापरावा व अन्न पदार्थ तयार करणाऱ्या व्यक्तिने हातमोजे व अॅप्रॉन घालावा. तसेच, केस संपूर्णपणे झाकणारी टोपी व तोंडाला मास्क घालावा. कच्च्या अन्न पदार्थांची खरेदी बिले बाळगावीत व कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक दुकानातून खरेदी करावी. भगर, शाबुदाणा, खाद्यतेल विकत घेताना ते पॅकबंद विकत घ्यावे. भगर, शाबुदाणा, खाद्यतेल विकत या अन्नपदार्थावर कुठल्याही अन्नपदार्थाचा नाव ब्रॅन्ड नसल्यास दुकानदारास ब्रँडबद्दल विचारणा करावी. प्रक्रिया उद्योगात भगर, शाबुदाणा, खाद्यतेल यांचे उत्पादन केव्हा झाले याचा तपशील असतो तो पाहुन घ्यावा त्यासह बेस्ट बिफोर म्हणजे त्या अन्नपदार्थाची मुदत केव्हा कालबाह्य होते तेही तपासून पाहावे. भगरीचे खुले व विनालेबल असलेले पीठ बाजारतून विकत घेवू नये. भगर विकत घेतल्यानंतर ती स्वच्छ धुवुन त्यानंतरच घरगुती पध्दतीने पीठ तयार करावे. भगरीचा वापर करताना ती स्वच्छ धुवन घ्यावी. नवरात्रीच्या अनुषंगे दुकानदारांनी घ्यावयाची काळजी 1. विनाबिलाने कोणतेही अन्नपदार्थ खरेदी व विक्री करु नये, ब्रँडेड ( चांगल्या प्रतीची ) भगर व पॅकबंदच अन्नपदार्थ विकी करावे, मुदतबाह्य झालेले अन्नपदार्थ विकी करु नये, हॉटेल चालकांनी घ्यावयाची काळजी हॉटेल चालकांनी एकमेकात अंतर राखणे मास्क वापरणे. वारंवार हाताची सॅनिटाईज करणे व स्वच्छ करणे. या बाबींचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. हॉटेलचे किचन तसेच अन्नपदार्थ सेवन करण्यासाठीची जागा त्या ठिकाणच्या भिंती, जमीन व फरशी स्वच्छ असावी, कच्चे अन्नपदार्थ घटक पदार्थ यांचा खरेदी बिल तपशील व्यवस्थित असावा, तसेच साठा रजिस्टरमध्ये त्यांची नोंद असावी. अन्नपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिंना गणवेश, टोप्या, मास्क, ग्लोव्हज इत्यादी स्वच्छतेच्या बाबी पुरविण्यात याव्यात. हॉटेलमधील सर्व कामगार तसेच अन्नपदार्थ हाताळणाऱ्या व्यक्तिंची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. हॉटेलमध्ये हात धुण्यासाठी वॉशबेसिन व्यवस्था व त्या ठिकाणी साबण, सॅनिटायझर ठेवावे. ताज्या अन्नामध्ये शिळे अन्न मिसळू नये तसेच शिळे अन्नपदार्थ, वास येणारे अन्न पदार्थ हे कोणत्याही परिस्थितीत ग्राहकाला पुन्हा शिजवून देऊ नये. अन्न व्यावसायिकांनी वरील सर्व सूचनांचे पालन करून अन्न व औषध प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन बीड यांनी केले आहे. 00000

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचा जिल्हा दौरा

बीड, दि. 26 (जि. मा. का.) : राज्याच्या विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत. शुक्रवार, दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी तुळजापूर येथून बीड शासकीय विश्रामगृहात सायंकाळी 7:30 वाजता आगमन व राखीव. शनिवार, दि. 1 ऑक्टोबर 2022 रोजी शासकीय विश्रामगृहातुन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण, सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आगमन व विविध विषयांवर बैठक, सकाळी 11:30 वाजता कार्यकर्त्यांसमवेत भेटी व पत्रकार परिषद (शासकीय विश्रामगृह, बीड), दुपारी 1:15 वाजता शासकीय विश्रामगृह येथे राखीव, दुपारी 2 वाजता सीमा कुलकर्णी यांच्या कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 3:30 वाजता परळी वैजनाथकडे प्रयाण, दुपारी 5 वाजता परळी वैजनाथ येथे आगमन व दर्शन, दुपारी 5:45 वाजता नांदेडकडे प्रयाण. 00000