रविवार, ९ ऑक्टोबर, २०१६

नागरिकांनी सतर्क रहावे अप्रिय घटना टाळण्यासाठी जलसाठ्याजवळ जाणे टाळावे - जिल्हाधिकारी राम यांचे आवाहन




            बीड, दि.9 :- बीड जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२५.३१ टक्के इतके पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाझर तलाव, साठवण तलाव, शेततळे, लघु व मध्यम प्रकल्प, बंधारे, नद्या, ओढे, विहिरी इत्यादी सर्व पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. हे जलसाठे पाहण्यासाठी नागरिक सहपरिवार गर्दी करीत आहेत.तसेच शाळकरी,महाविद्यालयीन लहान मुले पोहण्यासाठी जात आहेत.त्यामुळे पाय घसरून पडणे.पोहताना किंवा पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या युवकांचा आणि लहान मुलांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.या जलसाठ्यांमध्ये कपारी, मोठया प्रमाणात गाळ आदी साचलेले असते.त्यामुळे पोहणा-या या व्यक्तीसुद्धा कपारीत, गाळात फसून बुडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे कोणीही जलसाठ्याजवळ जाऊ नये व नागरिकांनी आपल्या लहान मुलांना कोणत्याही परिस्थितीत जलसाठ्यात पोहण्यासाठी पाठवू नये. तसेच स्वतः आपल्या परिवारासह या जलसाठ्यावर जाण्याचे टाळावे. शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याना याबाबत सूचित करावे. असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यात 3.1 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



            बीड, दि.9 :- बीड जिल्ह्यात 9 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 3.1 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे.  

          बीड-निरंक(733.4),पाटोदा-2.8(904.0),आष्टी-निरंक(641.7),गेवराई-1.4(695.2),शिरुरकासार-निरंक (633.7), वडवणी- निरंक (1025.3), अंबाजोगाई- 6.2 (969.0), माजलगाव-7.2 (1025.2), केज- निरंक (876.1), धारुर- निरंक (842.7) तर परळी वैजनाथ-16.2 (838.2) पावसाची नोंद झाली असून 835.0 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 125.31 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री.धनंजय मुंडे यांचा दौरा


          बीड, दि. 8 :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर असून त्याचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
            रविवार दि.9 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 7 वाजता पंढरी निवासस्थान परळी येथून शासकीय मोटारीने आष्टी ता.परतूर जि.जालनाकडे प्रयाण. दुपारी 3 वाजता आष्टी येथून मौजे टोकवाडी ता.परळी वैजनाथ येथे आगमन व परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4 वाजता परळी वैजनाथ येथे आगमन व नगर परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. रात्री 8 वाजता परळी वैजनाथ येथून शासकीय मोटारीने नांदेडकडे रवाना. रात्री 12 वाजता नांदेड येथून शासकीय मोटारीने परळी वैजनाथ निवासस्थानी आगमन व राखीव.

            सोमवार दि.10 ऑक्टोबर 2016 रोजी परळी वैजनाथ येथे राखीव.

विधानसभा विरोधी पक्षनेते श्री.राधाकृष्ण विखे पाटील यांचा सुधारीत दौरा


                  
          बीड, दि. 8 :- विधानसभेचे विरोधी पक्षनेते श्री. राधाकृष्ण विखे पाटील हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा  सुधारीत दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            सोमवार दि.10 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 9.05 वाजता लातूर येथून स्वामी रामानंद तिर्थ वैद्यकिय महाविद्यालय हेलिपॅड ता.अंबाजोगाई जि.बीड येथे आगमन व मोटारीने अंजनपूर ता.अंबाजोगाईकडे प्रयाण. सकाळी 9.30 वाजता अंजनपूर येथे आगमन. अंजनपूर व कोपरा येथील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व आपदग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा. सकाळी 10 वाजता कोपरा येथून मोटारीने अंबाजोगाईकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता स्वामी रामानंदतिर्थ वैद्यकिय महाविद्यालय हेलिपॅड  अंबाजोगाई येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने ता.धारुरकडे प्रयाण. सकाळी 11.45 वाजता धारुर हेलिपॅड जि.बीड येथे आगमन व मोटारीने जहांगीरमोहाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता जहांगीरमोहा येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व आपदग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 12.30 वाजता बोडका कासारी येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व आपदग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 12.45 वाजता बोडका कासारी येथून मोटारीने धारुरकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता धारुर हेलिपॅड येथे आगमन व खाजगी हेलिकॉप्टरने पाटोदा जि.बीडकडे प्रयाण. दुपारी 1.15 वाजता पीव्हीपी कॉलेज हेलिपॅड  पाटोदा जि.बीड येथे आगमन व मोटारीने दासखेडकडे प्रयाण. सकाळी 1.35 वाजता दासखेड येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व आपदग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 1.50 वाजता दासखेड येथून मोटारीने पाली ता.बीडकडे प्रयाण. दुपारी 2.15 वाजता पाली येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व आपदग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 2.30 वाजता पाली येथून मोटारीने बीडकडे प्रयाण. दुपारी 2.45 वाजता शासकीय विश्रामगृह,बीड येथे आगमन व राखीव. दुपारी 3.15 वाजता पत्रकार परिषद (स्थळ-शासकीय विश्रामगृह,बीड). सायंकाळी 4 वाजता बीड येथून खाजगी हेलिकॉप्टरने लोणी ता.राहाता जि.अहमदनगरकडे प्रयाण करतील.

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम


बीड, दि. 8 :- राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          सोमवार दि.10 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता औरंगाबाद येथून हेलिकॉप्टरने गेवराई नगर परिषद प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता गेवराई जि.बीड येथून हेलिकॉप्टरने निमगांव बोडखा ता.आष्टी जि.बीडकडे प्रयाण. दुपारी 1 वाजता निमगांव बोडखा ता.आष्टी येथे आगमन व वाहिरा येथे व सीना मेहेकरी उपसा सिंचन योजनेचा लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता निमगांव बोडखा ता.आष्टी येथून मा.मुख्यमंत्री महोदय यांच्या समवेत हेलिकॉप्टरने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पांगरी ता.परळीकडे प्रयाण. दुपारी 3.40 वाजता आगमन व शासकीय वाहनाने परळी निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 3.55 वाजता परळी निवासस्थानी आगमन व राखीव.
          मंगळवार दि.11 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 10.45 वाजता परळी निवासस्थान येथून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पांगरी (गोपिनाथगड) कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता गोपीनाथगड येथे आगमन व लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाचे दर्शन. दुपारी 11.30 वाजता वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पांगरी येथील हेलिपॅड वरुन हेलिकॉप्टरने श्रीक्षेत्र भगवानगड ता.पाथर्डी जि.अहमदनगरकडे प्रयाण. दुपारी 3.20 वाजता भगवानगड येथून हेलिकॉप्टरने वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पांगरी ता.परळी येथे आगमन व परळी निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 3.40 वाजता परळी निवासस्थान येथे आगमन व राखीव.

          बुधवार दि.12 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 10.30 वाजता परळी निवासस्थान येथून वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना पांगरी येथील हेलिपॅडकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता आगमन व हेलिकॉप्टरने मुंबईकडे प्रयाण.

महिलांच्या संरक्षण कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी नवल किशोर राम





बीड, दि. 7 :- कौटूंबिक हिंसेपासून महिलांचे संरक्षण करण्याची सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी जिल्ह्यात कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांच्या संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
 महिला व बालविकास आयुक्तालय पुणे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, बीड यांच्यावतीने कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम-2005 अंतर्गत कार्यशाळा बीड येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी राम बोलत होते. यावेळी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या सविता शेटे, बालकल्याण समितीचे दत्ता नलावडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.डी. कुलकर्णी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी राम यांनी कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम-2005 हा कायदा अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगून कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज प्रतिपादन केली. ते पुढे म्हणाले की, महिलांच्या अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कौटूंबिक हिंसाचाराची घटना ही समाजाला काळीमा फासणारी असते. अशा घटना होऊ नयेत म्हणून हा कायदा आहे. त्याचा वापर करण्याची गरज आहे. महिलांनी अशा हिंसाचाराविरुध्द कडक पावलं उचलावी. कायदा त्यांच्या मदतीला आहे. शासकीय यंत्रणेतील  कायद्याच्या पालनाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. कायद्याचे पालन होत असेल तर कौटूंबिक हिंसाचाराची प्रकरणे कमी होतील. महिलांच्या तक्रारीकडे अधिक जागरूकपणे लक्ष देण्याची गरज आहे. तक्रारीची दखल घेऊन अधिक माहिती घेतली गेली तर घटना उघडकीस येऊ शकते असा अनुभव आहे. त्यामुळे महिलांचे कोणत्याही प्रकारे होणारे शोषण थांबविण्याची गरज आहे. असेही ते म्हणाले.
कायदे अनेक आहेत मात्र त्याची चोख अंमलबजावणी अत्यंत महत्वाची आहे असे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, एखाद्या घटनेची चौकशी करुन कायद्यानुसार दोषी लोकांना शिक्षा प्रस्तावित करतो. मात्र महिला संरक्षण कायद्यात संरक्षण अधिकारी नियुक्त करण्यात आले असून अशा घटनेत मार्गदर्शन करुन तक्रार नोंदविण्याची जबाबदारी संरक्षण अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. यामुळे या कायद्याची अंमलबजावणी सोपी आहे.
            या कार्यशाळेच्या माध्यमातून या कायद्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी केले.
            औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील जिल्हा परिवीक्षा अधिकारी विजय देशमुख यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विषद केली. या कार्यशाळेत प्राचार्या सविता शेटे, डॉ. ज्योतीचंद्र काळे व इतर मान्यवरांनी कायद्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.

            या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व संरक्षण अधिकारी, समुपदेशक, पोलीस अधिकारी तसेच पोलीस उप अधिक्षक गणेश गावडे, परीवीक्षा अधिकारी सुदाम निर्मळ, पी. डब्ल्यु. वंजारे, भोईटे, जाधव, पोलीस निरीक्षक विशाखा धुळे आदी उपस्थित होते.

शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

प्रकल्पग्रस्तांनी आपली बाजू मांडण्यासाठी 20 ऑक्टोर रोजी हजर रहावे



बीड, दि. 7 :- मौजे कळसंबर, भंडारवाडी, हिवरापहाडी, बोरफडी, सोनपेठवाडी, सोमनाथवाडी, पिंपळवाडी, वडगाव क., वायभटवाडी, अंजनवती व बावी ता.जि.बीड येथील प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राच्या अनुषंगाने मा.उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील रिट याचिका क्र.942/2015 आयोध्या प्रकाश मुंडे विरुध्द महाराष्ट्र शासन व इतर प्रकरणा संदर्भातील प्रकल्पग्रस्तांच्या यादीतील उपजिल्हाधिकारी (सामान्य), बीड यांच्याकडून प्राप्त झालेले यादीतील नावे असणाऱ्या व्यक्ती संदर्भात मुंबईचा धारणा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 चे कलम 8 अन्वये भंग झालेले खरेदी विक्री व्यवहारावर आधारीत नोंदविण्यात आलेले फेरफेर आहेत. मंजूर करण्यात आलेले फेर फार संबंधी हितसंबंधित व्यक्तींना सुनावणीची व कागदपत्रे सादर करुन आपले म्हणने मांडण्यासाठी संधी मिळावी म्हणून उपविभागीय अधिकारी, बीड यांनी नोटिसा दिलेल्या आहेत.

वरील गावातील नोंदविण्यात आलेल्या फेर फार बाबत कलम 257 च्या तरतुदीस अनुसरुन हिसंबंधितांना आपली बाजू मांडण्यास संधी मिळावी म्हणून संबंधितांनी स्वत: अथवा वकीलाद्वारे उपविभागीय कार्यालय, बीड येथे दि.20 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 11 वाजता हजर रहावे व आपली बाजू मांडावी. नोटीसा निर्गमित करण्यात आलेल्या व्यक्तींची यादी उपविभागीय अधिकारी, बीड कार्यालयात सुचना फलकावर तसेच गावातील तलाठी सज्जावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. ही यादी कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. असे बीडचे उपविभागीय अधिकारी यांनी कळविले आहे.

13 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन



बीड, दि. 7 :-राज्यातील माजी सैनिक, विधवा, वीरनारी व त्यांच्या अवलंबितांच्या विविध अडचणी सोडविण्यासाठी, प्रश्न समस्यावर विचार विनिमय करण्यासाठी दि.13 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता आर्मड कोर, अहमदनगर येथे माजी सैनिक रॅली, मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

          जिल्ह्यातील माजी सैनिक, विधवा, वीरनारी व त्यांच्या अवलंबितांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. उपस्थित राहणाऱ्यांनी दि.15 ऑक्टोबर पर्यंत आपली नावे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नोंदवावीत तसेच 13 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी 5.30 वाजता सैनिकी मुलांचे वसतिगृह, बीड व अंबाजोगाई येथून बसेसची सुविधा केली असून या मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे बीडचे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविल आहे.

वाचन प्रेरणा दिनी ग्रंथालयाकडून ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करावे



बीड, दि. 7 :- भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रीतीने जतन करुन त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी सन 2015 पासून डॉ. कलाम यांचा 15ऑक्टोबर हा जन्मदिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने ज्ञानसंपन्न आणि माहिती समृध्द समाज घडवण्यासाठी वाचन संस्कृतीचा प्रचार, प्रसार विकास होणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शन आयोजित करावेत.

          बीड जिल्ह्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम भारताचे माजी राष्ट्रपती यांच्या जन्मदिनी दि. 15 ऑक्टोंबर रोजी आपआपल्या ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात करावे तसेच शक्य असल्यास व्याख्यान, चर्चासत्र,परिसंवाद, कार्यशाळा, प्रकट मुलाखत, निबंध स्पर्धा, काव्यवाचन, ग्रंथभेट, वृत्तपत्रातील  अग्रलेखांचे वाचन, इ-बुक्सचे सामूहिक वाचन, इ-उपक्रमाचे आयोजन करावे. तसेच आपल्या ग्रंथालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिवसाचा  अहवाल आपल्या तालूका ग्रंथालयास सादर करावा आणि शक्य असल्यास यथोचित साजरा करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा अहवाल आणि छायाचित्रे vinodtawdeminister@gmail.com या ई-मेल पत्यावर किंवा शालेय शिक्षण, क्रिडा युवक कल्याण, उच्च तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक  कार्य, मंत्री महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई-400032 या कार्यालयीन पत्त्यावर पाठविण्यात यावा. असे बीड जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे जिल्हा ग्रंथालय अधिकारी बा. सं. कातकडे यांनी कळविले आहे.   

कृषी व फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा बीड दौरा



बीड, दि. 7 :- राज्याचे कृषी व फलोत्पादन, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि.10 ऑक्टोबर 2016 रोजी दुपारी 1 वाजता बर्दापूर ता.अंबाजोगाई येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी व शेतकऱ्यांशी चर्चा. दुपारी 2 वाजता बर्दापूर येथून चतूरवाडी ता.अंबाजोगाईकडे प्रयाण. दुपारी 2.10 वाजता चतूरवाडी ता.अंबाजोगाई येथे आगमन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी व शेतकऱ्यांशी भेटी. दुपारी 3 वाजता चतूरवाडी येथून शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाईकडे प्रयाण. दुपारी 3.20 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथे आगमन व राखीव. सायंकाळी 6 वाजता शासकीय विश्रामगृह, अंबाजोगाई येथून मोटारीने इस्लामपूर ता.वाळवा जि.सांगलीकडे प्रयाण करतील.

जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे यांचा दौरा


          बीड, दि. 7 :- राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा.राम शिंदे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          सोमवार दि.10 ऑक्टोबर 2016 रोजी दुपारी 12.45 वाजता खर्डा येथून आपेगाव हेलिपॅड ता.अंबाजोगाई वाहीरा ता.आष्टी, जि.बीड येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता मा.मुख्यमंत्री महोदयासोबत सीना-म्हेत्री उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभास उपस्थिती. दुपारी 2 वाजता शासकीय मोटारीने अहमदनगरकडे प्रयाण करतील.

नगर परिषद लेखा परिक्षण व लेखा सेवा परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू


बीड, दि. 7 :- महाराष्ट्र नगर परिषद लेखा परिक्षण व लेखा  सेवा श्रेणी क संवर्गातील लेखी परीक्षा दि.9 ऑक्टोबर 2016 रोजी बीड जिल्हा केंद्रावर दुपारी 2 ते 4 यावेळेत बीड जिल्ह्यातील एका केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेच्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी परीक्षा उपकेंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनूसार या परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांनी त्यांच्याकडील मोबाईल,पेजर, कॅल्क्युलेटर व अभ्यासाचे इतर साहित्य परीक्षा केंद्रावर घेवून जाता येणार नाही तसेच परीक्षेचे आवश्यक साहित्यच उमेदवारांना जवळ बाळगण्याची मुभा राहील. तसेच सर्व उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी प्रवेशपत्रासोबत त्यांचे स्वत:चे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स (फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे) यापैकी कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे. काही उपकेंद्रावर बेंच नसल्याने, लहान बेंच असल्याने खाली बसण्याची  व्यवस्था केली असून उमेदवारांनी लिखाणाचा पुठ्ठा (रायटिंग पॅड) सोबत आणावेत. सकाळच्या परीक्षेसाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 10 वाजेपूर्वी तर दुपारच्या  सत्रातील परीक्षेसाठी दुपारी 1 वाजेपूर्वी उपस्थित रहावे. परीक्षा सुरु झाल्यानंतर येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही सबबीखाली प्रवेश देण्यात येणार नाही. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी  कळविले आहे.

पिंपळवाडी परिसरातील नुकसानीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडून आढावा





बीड, दि. 7 :- पिंपळवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी तातडीने कारवाई करावी असे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले. पिंपळवाडी रिसरातील डोकेवाडी तलावाचा सांडवा फुटल्याने परिसरातील पीक, रस्ते, जलवाहिन्या आणि पशुधनाच्या झालेल्या नुकसानीचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रत्यक्ष भेट देऊन घेतला. यावेळी ते बोलत होते.
          यावेळी बीडचे उपविभागीय अधिकारी विकास माने, पाटोद्याचे उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, बीडच्या तहसीलदार छाया पवार यांची यावेळी उपस्थिती होती.
          यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले की, अतिवृष्टीमुळे पिंपळवाडी परिसरात झालेल्या नुकसानची संबंधितांना तातडीने भरपाई देण्यासाठी आता पंचनाम्याची आवश्यकता  नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनामार्फत नुकसानीचा अहवाल शासनास सादर केल्यानंतर तातडीने मदत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी काळजी करण्याची काहीही कारण नसल्याचे सांगितले. तसेच अतिवृष्टीमुळे या परिसरातील विहीरी बुजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसाचा स्वतंत्र अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

          यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आष्टी तालुक्यातील वाहिरा आणि सीना प्रकल्प येथे भेट दिली. मा. मुख्यमंत्री महोदयांच्या बीड जिल्हयातील संभाव्य दौऱ्याच्या अनुषंगाने येथे करण्यात येत असलेल्या हेलीपॅड, पार्कींग, रस्ते, विद्युत, वाहतुक व्यवस्था, मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था आदीबाबत आढावा घेऊन सदरील कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिल्या. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, जलसंधारण विभागाचे अभियंता श्री. पाचरणे, श्री. घारे, यांच्यासह, पोलीस, महावितरण, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान स्पर्धेचा निकाल जाहीर

बीड, दि.6 :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 160 वी जयंती आणि त्यांनी सुरु केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव चळवळीला 125 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल तसेच ' स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' या त्यांच्या जगप्रसिध्द उदगाराच्या शताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या वतीने लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव अभियान स्पर्धा बीड जिल्ह्यात तालुका व जिल्हा पातळीवर घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असल्याची माहिती बीड जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी तथा स्पर्धा समितीचे जिल्हा अध्यक्ष  यांनी दिली आहे.
            जिल्ह्यात प्रथम क्रमांक कालिका बलभिम गणेश मंडळ, जवकर मंगल केंद्राजवळ, बलभिम चौक, बीड यांनी पटकाविला आहे. द्वितीय क्रमांक राजमुद्रा गणेश मंडळ,  अहिल्यादेवी नगर, केज तर तृतीय क्रमांक शिवराज गणेश मंडळ, रंगार चौक, गेवराई यांनी मिळविला आहे.
            तालुकानिहाय गणेश मंडळ याप्रमाणे बीड तालुक्यातील कालिका बलभिम गणेश मंडळ प्रथम, राष्ट्रीय गणेश मंडळ द्वितीय, वीरशैव गणेश मंडळ तृतीय. गेवराई तालुक्यातील शिवराज गणेश मंडळ प्रथम, नवनिर्माण गणेश मंडळ द्वितीय, श्रीगणेश मंडळ तृतीय. केज तालुक्यातील राजमुद्रा गणेश मंडळ प्रथम, नवरंग गणेश मंडळ द्वितीय, श्रीसंत सावतामाळी गणेश मंडळ तृतीय. माजलगाव तालुक्यातील शिवनेरी गणेश मंडळ प्रथम, शिवगर्जना गणेश मंडळ शेलापूरी यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेसाठी स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन आदि देखावे तयार करण्यात आले होते. स्पर्धेचे पारितोषिक जिल्हास्तरावर प्रथम येणाऱ्यास 1 लाख रुपये, द्वितीय 75 हजार रुपये आणि तृतीय 50 हजार रुपये असे असून तालुकास्तरावर प्रथम 25 हजार रुपये, द्वितीय 15 हजार रुपये आणि तृतीय 10 हजार असे ठेवण्यात आले होते.

            स्पर्धेचे परिक्षक म्हणून शिक्षणाधिकारी (नि) डॉ.विक्रम सारुक, कैलास कला निकेतन महाविद्यालयाचे  प्रा. श्रीकांत पुरी, सौ.के.एस.के. महाविद्यालयाचे प्रा.आसाराम चव्हाण यांनी सहभागी गणेश मंडळाची निवड केली तर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तालुक्यातील स्पर्धेत सहभागी गणेश मंडळाची गुणानूक्रमे निवड केली. असे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) यांनी कळविले आहे.

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची 15 ऑक्टोबर रोजी जयंती




            बीड, दि.6 :- डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती प्रत्येक वर्षी दि.15 ऑक्टोबर रोजी साजरी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार यावर्षी शनिवार दि.15 ऑक्टोबर 2016 रोजी राज्यभर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात यावी असे सुचित करण्यात आले आहे. असे जिल्हाधिकारी, बीड यांनी कळविले आहे.

बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

अन्न-धान्यापासून लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी




            बीड, दि.5 :- सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सण-उत्सवाच्या काळात व संभाव्य पुर परिस्थिती लक्षात घेता अन्न-धान्यापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. बीड तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य वितरण जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या नियतनानूसार, परिमानानूसार पात्र लाभार्थ्यांना तसेच पुर परिस्थितीच्या अनुषंगाने तहसील कार्यालयाकडून माहे ऑक्टोबर 2016 चे धान्य नियतन मंजूर होऊन स्वस्त धान्य दुकानदारांना वाटप सुरु आहे.  बीडचे तहसिलदार व पुरवठा विभागाचे नायब तहसिलदार यांनी माहे ऑक्टोबर 2016 चे धान्य उचल करण्याचे जाहीर केले आहे. असे तहसिलदार,बीड यांनी कळविले आहे.

बीड जिल्ह्यात 1.8 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



            बीड, दि.5 :- बीड जिल्ह्यात 5 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 1.8 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे.  

          बीड-1.3(733.4),पाटोदा-3.5(901.3),आष्टी-3.3(640.8),गेवराई-निरंक(693.8),शिरुरकासार-निरंक (632.7), वडवणी- 8.5 (1025.3), अंबाजोगाई- निरंक (962.8), माजलगाव-1.8 (1018.0), केज- 0.6 (875.5), धारुर- 1.3(841.0) तर परळी वैजनाथ-निरंक (822.0) पावसाची नोंद झाली असून 831.5 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 124.78 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 

मंगळवार, ४ ऑक्टोबर, २०१६

बांगरवाडी येथील नुकसानीचे जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत नूकसान भरपाई देणार - जलसंधारण मंत्री प्रा.राम शिंदे


                  
          बीड, दि. 4 :- बांगरवाडी येथे गाव तलाव फुटल्याने झालेल्या नुकसानीचे जिल्हाधिकारी यांच्या समितीमार्फत नूकसानीची भरपाई शेतकरी-ग्रामस्थांना तातडीने उपलब्ध करुन द्यावी अशा सुचना राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री राम शिंदे यांनी केल्या.
          पाटोदा तालुक्यातील बांगरवाडी येथे अतिवृष्टीमुळे गाव तलाव फुटून तलावातील पाण्याने गाव परिसरातील शेती व जमिनीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन केली.यावेळी ते बोलत होते.
          यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसीलदार मुकेश कांबळे, नायब तहसिलदार गणेश जाधव, मुध्याधिकारी रुपाली कांबळे, जलसंधारण विभागाचे उपअभियंता श्री.घोळवे, श्री.निंबाळकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.कोटेचा, पंकज कांकरिया यांची उपस्थिती होती.

          यावेळी पुढे बोलताना जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले की, बांगरवाडी येथील तलाव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जमिनही खरडून गेली आहे. या नुकसानीचे कृषी व संबंधित विभागांनी तातडीने पंचनामे करावेत जेणेकरुन नुकसानग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करुन देणे शक्य होईल. तसेच पाण्यामुळे वाहून आलेल्या दगड व मातीमुळे या परिसरातील बऱ्याच विहीरी बुजल्या आहेत व मोटारीही बुडल्या आहेत. या नुकसानीचे स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याच्या सुचनाही जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी दिल्या. यावेळी बांगरवाडी गावातील ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

विविध योजनेच्या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात आधारकार्ड सादर करावेत


                  

          बीड, दि. 4 :- वडवणी तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ सेवा निवृत्ती योजनेखालील राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमाअंतर्गत लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी त्यांचे आधारकार्ड बँकेशी संलग्न करण्यासाठी तात्काळ तहसील कार्यालयातील संजय गांधी विभागात सादर करावेत. आधार क्रमांक सिडिंगचा कार्यक्रम हा शासनाच्या सुचनेनूसार राबविण्यात येत असल्यामुळे भविष्यात आधार कार्ड न दिल्यामुळे कोणत्याही लाभार्थीचे मासीक अनुदान, अर्थसहाय्य पुर्व सुचना न देता बंद झाल्यास लाभार्थी स्वत: जबाबदार राहतील. असे तहसिलदार, वडवणी यांनी कळविले आहे.

राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातील सदस्य पदांसाठी अर्ज करावेत

बीड, दि.4 :- महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये गैरन्यायीक सदस्यांची दोन पदे भरावयाची असून उमेदवारांनी अर्ज सादर करावेत.  या पदाचे अर्ज प्रबंधक, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उत्तमनंदा कॉम्प्लेक्स, पांगरी रोड, अंबीका चौक, बीड येथे कार्यालयीन वेळेत उपलब्ध असून नोटीस व अर्जाचा नमुना 100 रुपये शुल्क आकारुन पुरविण्यात येईल. अधिक माहितीसाठी www.grahak.maharashtra.gov.in आणि www.mahafood.gov.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा. असे बीडचे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे प्रबंधक यांनी कळविले आहे.