बुधवार, १० जून, २०२६

वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे - जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन

* बीड जिल्ह्यात 29.50 लक्ष रोपे तयार * ‘एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड’ उपक्रम * 300 कोटी वृक्षारोपणासाठी प्रशासनाची जय्यत तयारी बीड, दि.10 (जिमाका): राष्ट्रीय वन धोरण 1988 च्या उद्दिष्टानुसार राज्याचे वनाच्छादन आणि वृक्षाच्छादन सन 2047 पर्यंत एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यात 300 कोटी वृक्षारोपण अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, बीड जिल्ह्यामध्ये आगामी 2026 च्या पावसाळ्यासाठी प्रशासनाने विभागनिहाय वृक्ष लागवडीचे विशेष उद्दिष्ट निश्चित केले असून, संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी वृक्ष लागवडीसाठी जमिनीच्या उपलब्धतेचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात वर्ष 2026 च्या पावसाळ्यातील वृक्ष लागवड कार्यक्रमाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला उपजिल्हाधिकारी प्रभुदय मुळे, विभागीय वन अधिकारी एस.एम. लखमावाड, प्रादेशिक अधिकारी ए.डी.गरकल यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले की, वर्ष 2026 ते 2047 या कालावधीत 300 कोटी वृक्ष लागवड अभियाना दरम्यान परिणाम आधारित अंमलबजावणी आराखड्याचा अवलंब करणार आहे, ज्यामध्ये वृक्ष 10 वर्षापर्यंत जतन व संवर्धनाची तरतूद असणार आहे. जेणेकरून लागवड केलेल्या वृक्षांचे दीर्घकालीन अस्तित्त्व आणि वाढ सुनिश्चित होण्यास मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यातील वृक्षारोपण कार्यक्रमात केवळ शासकीय यंत्रणाच नव्हे, तर पर्यावरण स्नेही स्वयंसेवी संस्था यांनाही मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेण्यात यावे. सर्वच विभागांना नेमून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करणे बंधनकारक आहे. तसेच शालेय स्तरावर एक शाळा, एक विद्यार्थी, एक झाड हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जनजागृती निर्माण करावी. अशा सूचनाही जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केल्या. वर्ष 2026 ते 2047 या दीर्घकालीन कालावधीत चालणाऱ्या या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी शासनाने हरित महाराष्ट्र आयोग या विशेष उद्देशीय स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणेची स्थापना केली आहे. या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या जिल्हा पातळीवरील प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नियमित देखरेखीसाठी विशेष सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदाची धुरा स्वतः जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्याकडे असून, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे सह-अध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. तर सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी यांच्याकडे या समितीचे सदस्य सचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बीड जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेसाठी सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणावर रोपनिर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाकडे 20 लक्ष तर प्रादेशिक वनविभागाकडे 9.50 लक्ष अशी एकूण 29.50 लक्ष रोपे सध्या उपलब्ध असल्याची माहिती उपवनसंरक्षक श्री. बिराजदार यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे बैठकीत दिली. -*-*-*-*-

सारथी संस्थेच्या संशोधकांनी राबविली किल्ले धारूर येथे स्वच्छता मोहीम

बीड,दि.10 (जिमाका) :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या अर्थात सारथीच्या वतीने बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले धारूर येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. सारथीचे व्यवस्थापकीय संचालक महेश पाटील आणि उपव्यवस्थापकीय संचालक सुवर्णा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ६ आणि ८ जून २०२६ रोजी ही मोहीम पार पडली. या मोहिमेदरम्यान एकूण सहा पी.एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी किल्ला परिसरातून सुमारे ८ किलो प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा केला. राजर्षी शाहू महाराजांची जयंती २६ जून रोजी असून, त्यानिमित्त सारथी संस्थेच्या वतीने २६ मे ते २५ जून २०२६ या कालावधीत विविध सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून १ ते ७ जून दरम्यान अधिछात्रवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून नजीकच्या गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती. धारूर किल्ल्यावर सकाळी ६ ते १० या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी किल्ला आणि परिसर पिंजून काढत ४ गोणी कचरा गोळा केला. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिकच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या आणि इतर टाकाऊ वस्तूंचा समावेश होता. संकलित केलेला सर्व कचरा धारूर प्रशासनाच्या सहकार्याने योग्य पद्धतीने नष्ट करण्यात आला. या मोहिमेत सारथी संस्थेच्या ६ पी.एच.डी. संशोधक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या मोहिमेचे नेतृत्व गटप्रमुख रामेश्वर झोडगे आणि गटप्रमुख वैशाली घोलप यांनी केले. त्यांच्यासह इतर सदस्यांनी दिलेल्या योगदानामुळे ही मोहीम यशस्वीरित्या पार पडली. असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. _*_*_*_*_

बुधवार, ३ जून, २०२६

बीड एसटी महामंडळात शिकाऊ उमेदवारांची भरती

बीड,दि.3 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बीड विभागीय कार्यालयाअंतर्गत सन 2026-27 या सत्रासाठी विविध व्यवसायांमध्ये शिकाऊ उमेदवार निवड प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. एसटी महामंडळाच्या कार्यशाळेत थेट कामाचा अनुभव मिळविण्याची सुवर्णसंधी बीड जिल्ह्यातील तांत्रिक शिक्षण घेतलेल्या तरुणांना या निमित्ताने मिळणार आहे. कौशल्याधारित रोजगाराला चालना देण्यासाठी केंद्र शासनाने तयार केलेल्या अधिकृत एम.आय.एस पोर्टलच्या नियमानुसार ही भरती होत आहे. ही निवड प्रक्रिया प्रथम ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारून आणि त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी केंद्र सरकारच्या अधिकृत Apprenticeship India.org या संकेतस्थळाला भेट देऊन माहिती घ्यावी. इंटरनेट किंवा तांत्रिक अडचणी असल्यास उमेदवारांनी थेट विभागीय कार्यालय, राज्य परिवहन महामंडळ, बीड येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी महामंडळाच्या ०२४४२-२२२५८० या अधिकृत दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बीड एसटी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. _*_*_*_*_

वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन (HSRP) नंबरप्लेट 30 जुन पुर्वी बसविणे बंधनकारक

बीड, दि.3 (जिमाका) :- केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भात प्रशासनाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली असून, 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना दि. 30 जून 2026 पर्यंत ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे. अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बालाजी धनवे यांनी दिली आहे. केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या 6 डिसेंबर 2018 रोजीच्या राजपत्रानुसार, 1 एप्रिल 2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट इन-बिल्ट म्हणजेच कंपनीकडूनच बसवून देणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, आता 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व खाजगी तसेच शासकीय वाहनांनाही ही नंबर प्लेट बसवण्यासाठी दि. 30 जून 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. या नियमाच्या पार्श्वभूमीवर, सर्व शासकीय कार्यालय प्रमुखांना विशेष पत्रान्वये सूचित करण्यात आले आहे. आपल्या कार्यालयाच्या अभिलेखावर नोंद असलेल्या आणि 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केलेल्या सर्व शासकीय वाहनांना विहित मुदतीत म्हणजेच दि. 30 जून 2026 पूर्वी उच्च श्रेणी नोंदणी पाटी बसवून घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुदतीपूर्वी हे काम पूर्ण झाल्यास या संदर्भातील अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करणे सोयीचे होईल, असेही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली जनगणना प्रगणकाला स्वतःची माहिती

*सक्रिय सहभागातून करून दिली कर्तव्याची माहिती बीड, दि.3 (जिमाका) :- बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बुधवार दि. 3 जून 2026 रोजी आपल्या शासकीय निवासस्थानी आलेल्या जनगणना प्रगणकाला स्वतःची व कुटुंबाची संपूर्ण माहिती देऊन नोंदणी पूर्ण केली. या औपचारिक नोंदणीसह बीड जिल्ह्यात जनगणनेच्या राष्ट्रीय मोहिमेला गती मिळाली आहे. याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगीण विकासात जनगणनेचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. शासकीय योजनांचे अचूक नियोजन, आखणी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जनगणना हा अत्यंत महत्त्वाचा आणि मुख्य आधार आहे. जनगणना ही देशाच्या विकासाचा पाया मानली जाते. लोकसंख्या, शिक्षण, रोजगार, निवास, आरोग्य यासारखी महत्त्वाची माहिती जनगणनेतून मिळते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाची नोंद होणे हे देशाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले. पुढे बोलताना त्यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. आपल्या घरी येणाऱ्या जनगणना प्रगणकाला कोणतीही भीती किंवा संकोच न बाळगता अचूक, खरी आणि योग्य माहिती देऊन पूर्ण सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. नागरिकांनी दिलेल्या या सकारात्मक सहकार्यामुळेच ही राष्ट्रीय मोहीम पूर्णपणे यशस्वी होईल, असा दृढ विश्वासही विवेक जॉन्सन यांनी यावेळी व्यक्त केला. याप्रसंगी जनगणनेशी संबंधित प्रगणक, अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. _*_*_*_*_