रविवार, ९ ऑक्टोबर, २०१६

नागरिकांनी सतर्क रहावे अप्रिय घटना टाळण्यासाठी जलसाठ्याजवळ जाणे टाळावे - जिल्हाधिकारी राम यांचे आवाहन




            बीड, दि.9 :- बीड जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत १२५.३१ टक्के इतके पर्जन्यमान झालेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाझर तलाव, साठवण तलाव, शेततळे, लघु व मध्यम प्रकल्प, बंधारे, नद्या, ओढे, विहिरी इत्यादी सर्व पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. हे जलसाठे पाहण्यासाठी नागरिक सहपरिवार गर्दी करीत आहेत.तसेच शाळकरी,महाविद्यालयीन लहान मुले पोहण्यासाठी जात आहेत.त्यामुळे पाय घसरून पडणे.पोहताना किंवा पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या युवकांचा आणि लहान मुलांचा बुडून मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत.या जलसाठ्यांमध्ये कपारी, मोठया प्रमाणात गाळ आदी साचलेले असते.त्यामुळे पोहणा-या या व्यक्तीसुद्धा कपारीत, गाळात फसून बुडण्याच्या घटना घडू शकतात. त्यामुळे कोणीही जलसाठ्याजवळ जाऊ नये व नागरिकांनी आपल्या लहान मुलांना कोणत्याही परिस्थितीत जलसाठ्यात पोहण्यासाठी पाठवू नये. तसेच स्वतः आपल्या परिवारासह या जलसाठ्यावर जाण्याचे टाळावे. शाळा महाविद्यालयातील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याना याबाबत सूचित करावे. असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा