बीड, दि. 7 :- कौटूंबिक हिंसेपासून
महिलांचे संरक्षण करण्याची सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी जिल्ह्यात कौटूंबिक हिंसाचारापासून
महिलांच्या संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी
नवल किशोर राम यांनी केले.
महिला व बालविकास आयुक्तालय पुणे आणि जिल्हा महिला
व बालविकास अधिकारी, बीड यांच्यावतीने कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम-2005
अंतर्गत कार्यशाळा बीड येथे आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना जिल्हाधिकारी
राम बोलत होते. यावेळी महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या सविता शेटे, बालकल्याण समितीचे
दत्ता नलावडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर.डी. कुलकर्णी, यांची प्रमुख उपस्थिती
होती.
जिल्हाधिकारी राम यांनी कौटूंबिक
हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम-2005 हा कायदा अत्यंत महत्वाचा असल्याचे सांगून
कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज प्रतिपादन केली. ते पुढे म्हणाले की, महिलांच्या
अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. कौटूंबिक हिंसाचाराची घटना ही समाजाला
काळीमा फासणारी असते. अशा घटना होऊ नयेत म्हणून हा कायदा आहे. त्याचा वापर करण्याची
गरज आहे. महिलांनी अशा हिंसाचाराविरुध्द कडक पावलं उचलावी. कायदा त्यांच्या मदतीला
आहे. शासकीय यंत्रणेतील कायद्याच्या पालनाची
जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. कायद्याचे पालन होत असेल तर कौटूंबिक
हिंसाचाराची प्रकरणे कमी होतील. महिलांच्या तक्रारीकडे अधिक जागरूकपणे लक्ष देण्याची
गरज आहे. तक्रारीची दखल घेऊन अधिक माहिती घेतली गेली तर घटना उघडकीस येऊ शकते असा अनुभव
आहे. त्यामुळे महिलांचे कोणत्याही प्रकारे होणारे शोषण थांबविण्याची गरज आहे. असेही
ते म्हणाले.
कायदे अनेक आहेत मात्र त्याची
चोख अंमलबजावणी अत्यंत महत्वाची आहे असे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, एखाद्या
घटनेची चौकशी करुन कायद्यानुसार दोषी लोकांना शिक्षा प्रस्तावित करतो. मात्र महिला
संरक्षण कायद्यात संरक्षण अधिकारी नियुक्त करण्यात आले असून अशा घटनेत मार्गदर्शन करुन
तक्रार नोंदविण्याची जबाबदारी संरक्षण अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. यामुळे या कायद्याची
अंमलबजावणी सोपी आहे.
या कार्यशाळेच्या
माध्यमातून या कायद्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी
राम यांनी यावेळी केले.
औरंगाबाद
विभागीय आयुक्त कार्यालयातील जिल्हा परिवीक्षा अधिकारी विजय देशमुख यांनी प्रास्ताविकात
कार्यशाळा आयोजनामागील भूमिका विषद केली. या कार्यशाळेत प्राचार्या सविता शेटे, डॉ.
ज्योतीचंद्र काळे व इतर मान्यवरांनी कायद्याच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेस
जिल्ह्यातील सर्व संरक्षण अधिकारी, समुपदेशक, पोलीस अधिकारी तसेच पोलीस उप अधिक्षक
गणेश गावडे, परीवीक्षा अधिकारी सुदाम निर्मळ, पी. डब्ल्यु. वंजारे, भोईटे, जाधव, पोलीस
निरीक्षक विशाखा धुळे आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा