शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जिल्हाधिकारी राम यांच्याकडून आढावा - विज व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी





                  
          बीड, दि. 23 :- बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आणि काही ठिकाणच्या धरणातील पाण्याच्या साठ्यात प्रचंड वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. या बैठकीस पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            बीड जिल्ह्यात 23 सप्टेंबर रोजी पहाटे पर्यंतच्या 24 तासात सरासरी 55.4 मि मी पावसाची नोंद झाली. यामुळे बीड शहरासह अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पाण्यामुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले पर्यायाने वाहतुकीवर परिणाम झाल्याचेही चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून मोठी हानी झाली नाही असे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, रस्ते व पुलांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन अहवाल तयार करावा. प्रत्यक्ष पथक पाठवून तपासणी करण्यात यावी. कुंडलिका नदीचे दरवाजे उघडल्यामुळे चिखलबीड येथील रस्त्यांचे नुकसान झाले. या शिवाय तीन-चार ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. रस्ते दुरुस्ती लवकर करावी पावसामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलाच्या नुकसानीची माहिती शासनाला सादर करण्यात येईल. महावितरणने जिल्ह्यात पावसामुळे वीज खंडीत होण्याच्या प्रकरणांची माहिती घेऊन पाऊस थांबल्यानंतर लगेचच दुरुस्ती व देखभालीची कार्यवाही करावी. महावितरणने विज पुरवठ्याच्या अडचणी दूर कराव्यात. लघु पाटबंधारे व जलसंधारण विभागाने आपल्या जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पातील पाणी साठ्याकडे लक्ष ठेवावे. मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्याकडे लक्ष ठेवावे. मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या वाढत्या संचयाकडे पाटबंधारे विभागाने कायम लक्ष ठेवून कार्यवाही करावी. सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी. प्रत्येक तलाव-प्रकल्पाच्या ठिकाणी नियुक्त केलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांचे नाव व दुरध्वनी क्रमांकाची माहिती प्रशासनाला देण्याची सुचना जिल्हाधिकारी राम यांनी केली.
            जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पातील पाणी साठ्याची माहिती यावेळी सांगण्यात आली. बिंदुसरा प्रकल्पात सकाळपर्यंत 60 टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून आणखी पाण्याचा येवा सुरु आहे. येत्या 48 तासात मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. याची नोंद घेऊन त्या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले. पोलीस यंत्रणा संभाव्य परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असल्याचे सांगून पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी सविस्तर माहिती यावेळी दिली.
            जिल्ह्यातील 144 मध्यम व लघु सिंचन प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून इतरही प्रकल्पात पाण्याची चांगली आवक होत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
            या बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर.बी.करपे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अतिश शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही.चव्हाण, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद राख, लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री.द.दासखेडकर, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भुवैज्ञानिक डी.एस. मेश्राम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उमेश शिर्के आदि उपस्थित होते.
बिंदुसरा धरणाला भेट

            बिंदुसरा सिंचन प्रकल्पाला भेट देवून जिल्हाधिकारी राम आणि पोलीस अधिक्षक पारस्कर यांनी पाहणी केली. अनेक वर्षानंतर या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी वाढत असल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. या ठिकाणी धरणातील पाण्याचे दृष्य पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून बिंदूसरा धरणातील पाण्यामुळे आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम यांनी वरुणराजाच्या कृपादृष्टीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे आणि जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर उपस्थित होते.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री.हरिभाऊ बागडे यांचा दौरा


                  
          बीड, दि. 23 :- महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          रविवार दि.25 सप्टेंबर 2016 रोजी सायंकाळी 5 वाजता मोटारीने उस्मानाबाद येथून शासकीय  विश्रामगृह, बीड येथे आगमन व राखीव. सायंकाळी 5.30 वाजता पंडीत दीनदयाळ उपाध्याय व राष्ट्रऋषी नानाजी देशमुख जन्मशताब्दी वर्ष कार्यक्रम व पुस्तक प्रकाशन सोहळा (स्थळ-डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, नगर रोड, बीड). सोईनूसार मोटारीने औरंगाबादकडे प्रयाण करतील.

बीड जिल्ह्यात 55.4 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



           बीड, दि.23:- बीड जिल्ह्यात 23 सप्टेंबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 55.4 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे. 
      बीड-69.2 (485.3) पाटोदा- 57.5 (580.0), आष्टी- 10.4 (460.6), गेवराई-31.4 (524.5), शिरुरकासार- 30.7 (490.3), वडवणी-109 (754.3), अंबाजोगाई- 54.4 (671.0), माजलगाव-56.2 (756.4), केज- 83.7 (591.5), धारुर- 50 (557.0) तर परळी वैजनाथ-56.8 (593.8) पावसाची नोंद झाली असून 587.7 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 88.20 टक्के पावसाची नोंद झाली आहे.  

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

नगर परिषदांनी जनतेशी सुसंवाद साधावा स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



बीड, दि. 22:- स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषदांनी जनतेशी सुसंवाद साधून स्वच्छतेबाबत जागृती करावी तसेच विहीत मुदतीमध्ये स्वच्छ शहर आणि हागणदारीमुक्त होण्यासाठी नियोजनबध्दरित्या काम करावे. तसेच जलजन्य तसेच किटकजन्य रोग उद्भवणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील सर्व नगर परिषदांच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या कामाचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष  नसीरोद्दीन इनामदार, नगर परिषदेचे जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, अंबाजोगाईचे उपाध्यक्ष मनोज लखेरा, आष्टीचे अध्यक्ष पठाण नवाब खान बशीरखान, गेवराईचे सभापती राजेंद्र राक्षसभुवनकर, बीडचे नियोजन सभापती सय्यद सादेक अली महेबुब अली, बीड नगर परिषदेच्या स्वच्छता सभापती जयश्री विधाते यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, दि. 2 ऑक्टोबर  रोजी सर्व नगर परिषदांनी शहर स्वच्छ व हागंदारीमुक्त करण्यासाठी निर्धार दिन साजरा करावा. या कार्यक्रमास शहरातील नागरीक, व्यापारी, पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींना सहभागी होण्याचे आवाहन करावे. नगर परिषद गेवराई व धारुर 31 डिसेंबर 2016 पर्यंत व नगर परिषद बीड, अंबाजोगाई, परळी-वै, माजलगांव आणि केज 31 मार्च 2017 पर्यंत हागंणदारीमुक्त होतील या दृष्टीकोनातून वैयक्तीक व सार्वजनिक शौचालय बांधकामाचा आराखडा तयार करावा. त्यानूसार संबंधित मुख्याधिकारी यांनी प्रत्येक टप्याचे काम पुर्ण करण्याचे निर्देश दिले. या अभियांनांतर्गत दिलेल्या मुदतीत कामेपूर्ण होणेस्तव निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच 14 वा वित्त आयोग व इतर योजनेचा निधीही उपलब्ध करुन दिला जाईल.  जिल्ह्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच या अभियानाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली

शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन करावे. यासाठी प्रत्येक शहरात ठराविक अंतरावर कचरा कुंडयांची व कचरा उचलण्यासाठी घंटागाडयाची उपलब्धता मुख्याधिकारी यांनी करुन घ्यावी. यापुढे प्रत्येक नगरपरिषद क्षेत्रात शहर स्वच्छतेच्या कामाची पहाणी पथक नियुक्त करुन करण्यात येईल व स्वच्छतेच्या कामात दुर्लक्ष आढळून आल्यास संबंधीत मुख्याधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांचेवर कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगून शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करण्यासाठी  निर्देश दिले. तसेच साथ रोग नियंत्रणाबाबत उपाययोजनेबाबतचा नगरपरिषद निहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

25 सप्टेंबर रोजी मन की बात कार्यक्रमाचे प्रसारण




          बीड, दि.22:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीच्या माध्यमातून जनतेशी साधलेला संवाद मन की बात  कार्यक्रमाचा चोवीसावा भाग रविवार दि. 25सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 11  वाजता प्रसारीत होणार असून या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता प्रसारीत होईल. कार्यक्रम आकाशवाणी बीड अर्थात FM बँडच्या 102 पुर्णांक 9 दशांश मेगाहर्टसवरून  सर्व श्रोत्यांना ऐकता येतीलश्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि आपल्या प्रतिक्रीया airmannkibaat@gmail.com या संकेत स्थळावर पाठवाव्यात. असे आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी यांनी कळविले आहे.

आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळावा



          बीड, दि.22:- हरियाणा राज्यातील मनेसर येथील मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड कंपनीत भरतीसाठी शुक्रवार दि.30 सप्टेंबर 2016 रोजी बीड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

            मेळाव्यात फिटर, टर्नर, वेल्डर, पेंटर जनरल, मशिनिष्ट, ॲटोमोबाईल, पीपीओ, मोटर मेकॅनिक (हिट इंजिनआणि ॲटोमोबाईल) हा व्यवसाय उत्तीर्ण असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आवश्यक प्रमाणपत्रांच्या मुळ व साक्षाकिंत प्रतिसह स्वखर्चाने उपस्थित रहावे. उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्ष असावे. हरियाना राज्यातील गुरगाव व मनेसर हे कामाचे ठिकाण राहील. वेतन अंदाजे 18 हजार 752 रुपये, बोनस, गणवेश, कॅन्टीन इत्यादी सुविधा राहतील. आयटीआयचा 2 वर्षाचा पुर्णवेळ व्यवसाय उत्तीर्ण शैक्षणिक पात्रता राहील. द्विस्तरीय पात्रता फेरीत निवड झालेल्या उमेदवारांची प्रथम 7 महिन्यासाठी नेमणूक केली जाईल नंतर आपोआप ही नेमणूक समाप्त होईल व नंतर कंपनीच्या गरजेनूसार पुढील आदेश दिले जातील. असे बीडचे मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्राचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार आर.बी.शिंदे यांनी कळविले आहे.

28 व 29 सप्टेंबर रोजी रायमोह येथे माता, बाळ आणि किशोरवयीन मुलांसाठी आरोग्य जनजागृती अभियान



          बीड, दि.22:- केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण, राज्य शासन तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीने देशभरात माता-बाळ आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्य जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. आई, बाळाचे आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्याविषयी सर्व सामान्य जनतेपर्यंत माहितीचा प्रसार व्हावा यासाठी माता-बाळ आरोग्य अभियान राबविण्यासाठी केंद्र सरकारने बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रायमोह गावाची निवड केली आहे. या गावात 28 व 29 सप्टेंबर 2016 या दोन दिवशी सर्वांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम घेऊन अभियान राबविण्यात येणार आहे.

            बुधवार दि.28 सप्टेंबर 2016 रोजी कार्यक्रमाचे उदघाटन सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून गावातील जनता तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याविषयी मनोंरजनातून जनजागृती, विद्यार्थी आणि जनतेसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुरुवार दि.29 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा सहभाग असलेल्या रॅलीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात पदाधिकारी, अधिकारी आणि तज्ञ व्यक्ती आरोग्याविषयी मार्गदर्शन करतील. तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्यविषयक तपासण्या करण्यात येतील. असे क्षेत्रीय प्रचार निदेशालयाचे अधिकारी माधव जायभाये यांनी कळविले आहे.

बीड जिल्ह्यात 22.3 मि.मी. सरासरी पावसाची नोंद



          बीड, दि.22:- बीड जिल्ह्यात 22 सप्टेंबर 2016 रोजी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासात 22.3 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या तालुकानिहाय पावसाची  आकडेवारी मिलीमिटरमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी यंदाच्या एकुण पावसाचे आहे.
बीड-18.9 (416.1) पाटोदा- 16 (522.5), आष्टी- 16.7 (450.1), गेवराई-24.6 (493.1), शिरुरकासार- 29.7 (459.7), वडवणी-26.5 (645.3), अंबाजोगाई- 9.4 (616.6), माजलगाव-44.7 (700.2), केज- 15.1 (507.8), धारुर- 19 (507.0) तर परळी वैजनाथ-24.8 (537.0) पावसाची नोंद झाली असून 532.3 मि.मी. एकुण पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी 666.36 मि.मी. असून वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत 79.88 टक्के पावसाची नोंद झाली आहे. 


बुधवार, २१ सप्टेंबर, २०१६

ऑक्टोबरसाठी बीड जिल्ह्याला 8 हजार 18 क्विंटल साखर मंजूर



          बीड, दि.21 :- अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एनसीडीईएक्स-ई मार्केटस् लिमिटेड मार्फत ई-लिलावाद्वारे बीड जिल्ह्यासाठी माहे ऑक्टोबर 2016 साठी 8 हजार 18 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर केलेले असून साखर वाहतूक पुरवठादार म्हणून हरी किशन ॲन्ड कंपनी हैद्राबाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

            हरी किशन ॲन्ड कंपनी हैद्राबाद यांच्यामार्फत बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणाचे शासकीय धान्य गोदामात साखर  पुरवठा करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने माहे ऑक्टोबर 2016 साठी 8 हजार 18 क्विंटल मंजूर असलेले साखर नियतन जिल्ह्यातील सर्व तालुक्यासाठी पुढीलप्रमाण मंजूर करण्यात येत आहे. बीड 1 हजार 542, गेवराई 1 हजार 260, माजलगाव 396, वडवणी(चिंचवण) 324, धारुर 483, अंबाजोगाई 581, केज 981, परळी वैजनाथ 809, पाटोदा 440, आष्टी 703, शिरुर कासार 499 क्विंटल याप्रमाणे तालुक्यांना साखर नियतन पोहोचविण्यात येत आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी,बीड यांनी कळविले आहे.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री.धनंजय मुंडे यांचा दौरा


          बीड, दि. 21 :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्याचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          गुरुवार दि.22 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 9 वाजता शासकीय मोटारीने औरंगाबाद येथून शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन. सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बीड येथे आयोजित रा.कॉ.युवक केडर कॅम्पला उपस्थिती. दुपारी 1 वाजता शासकीय विश्रामगृह, बीड येथे आगमन.

मंगळवार, २० सप्टेंबर, २०१६

26 सप्टेंबर रोजी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या जिल्हास्तरीय थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन



बीड, दि. 20 :- जिल्हयातील सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शांळांसाठी दिनांक 26 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 10 वाजता  केंद्रीय प्राथमिक शाळा, चऱ्हाटा येथे सर्व गटाच्या (14,17 व 19 वर्षे मुले व मुली ) जिल्हास्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी त्यांचे संघ सहभागी करावेत असे जिल्हा क्रीडा अधिकारी अजय पवार यांनी कळविले आहे.

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांनी सन 2015-16 च्या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करावेत



बीड, दि. 20 :- सहकार क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना शासनामार्फत पुरस्कार देण्यात येतात. सन 2015-16 मध्ये सहकार क्षेत्रात उत्कृष्‍ट कार्य करणाऱ्या सहकारी संस्थांना पुरस्कार देण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र सहकारी संस्थांनी त्यांचे पुरस्कारासाठीचे परिपुर्ण प्रस्ताव तालुका मुख्यालय सहाय्यक निबंधक, उपनिबंधक यांच्या कार्यालयात दिनांक 7 ऑक्टोबर 2016 पर्यंत सादर करावेत. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी सहाकर संस्थांनी संबंधित सहाय्यक निबंधक, जिल्हा उपनिबंधक किंवा विभागीय सहनिबंधक कार्यालयाशी संपर्क साधावा असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, बीड यांनी कळविले आहे. 

पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांचा बीड जिल्हा दौरा कार्यक्रम

बीड, दि.20:- राज्याच्या ग्रामविकास‍ आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

            गुरुवार दि.22 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता शासकीय मोटारीने लातूर येथून शासकीय विश्रामगृह परळी येथे आगमन व राखीव. सकाळी 10 ते 12 वाजता परळी औष्णीक ‍विद्युत केंद्राची पाहणी.व औष्णीक ‍विद्युत संच सुरु करण्याच्या कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता पत्रकार ‍ परिषद. दुपारी 1ते 1.30 वाजता राखीव. दुपारी 1.30 वाजता संगम ता.परळी येथील 33 केव्ही उपकेंद्राचे उदघाटन. दुपारी 2.30 वाजता इंजेगाव ता.परळी येथील 33 केव्ही उपकेंद्राचे  उदघाटन. दुपारी 3.30 वाजता गोवर्धन ता.परळी येथील 33 केव्ही उपकेंद्राचे  उदघाटन. व दुपारी 4 वाजता परळी येथून मोटारीने लातूरकडे प्रयाण.

शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते बीड येथे मुख्य ध्वजारोहरण संपन्न








          बीड, दि. 17 :- गेल्या काही वर्षांपासून सातत्याने टंचाईचा सामना करणाऱ्या आपल्या बीड जिल्हयावर यावर्षी वरुणराजाने बरी कृपादृष्टी केल्याने आपणा सर्वांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे मी वरुणराजाचे ऋण व्यक्त करते असे सांगून राज्याच्या महिला व बालविकास तसेच ग्रामविकास मंत्री तथा बीड जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी  मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.
            मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
            तत्पुर्वी हुतात्मा स्मृतीस्तंभ येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे पंडीत रंगनाथ कापसे, नगराध्यक्षा सौ. रत्नमालाताई दुधाळ आदींनी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहिली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटूंबियांची भेट घेतली.
            यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यात मराठवाडा, विदर्भासह अन्य भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. आता पाऊस चांगला झाला आहे आणि पीकेही चांगली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे  नुकसान होऊ नये यासाठी आता कृषीपंपांसाठी 12 तास वीज पुरवठा होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गतच्या कामांमुळे गावशिवारातील  भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली आहे. यावर्षी जिल्हयातील 256 गावातील जलसंधारणाच्या कामांवर सुमारे 55 कोटी 16 लाख रुपयांचा निधी खर्च केला जात आहे.

मुलां इतका मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य यामध्ये सुधारणा करुन त्यांच्या उज्वल भविष्याकरीता समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य शासनामार्फत माझी कन्या भाग्यश्री योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या लाभार्थ्यांची वाढती संख्या  ही अभिमानाची बाब आहे असे सांगून या योजनेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.
            अंगणवाडयांचे बळकटीकरण व  पुर्नरचना अंतर्गत समावेश असलेल्या 20 जिल्ह्यांमध्ये आपल्या बीड जिल्ह्याचाही समावेश करण्यात आला असून आतापर्यंत जिल्हयातील 117 अंगणवाडी केंद्रे डिजिटल करण्यात आलेली आहेत. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यास मंजूरी मिळाल्याने त्यांचा मोठा प्रश्न निकाली निघणार आहे असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. गावे विकसित झाली तर संपूर्ण समाज विकसित होऊ शकतो. त्यामुळे गावे स्मार्ट करण्याचा आमचा संकल्प आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मोठया प्रमाणात निधी थेट ग्रामपंचायतींना मिळणार आहे. आपल्या गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी आमचा गाव आमचा विकास या उपक्रमात सहभागी होऊन गावाच्या विकासाला हातभार लावावा असे माझे आवाहन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
नजिकच्या काळात जिल्ह्यात 3674 घरकुले बांधून देण्यात येणार असल्याने गोरगरीब जनतेच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत केंद्र शासनाचे प्रत्यक्षात व्याज अनुदान पात्र कार्यरत महिला स्वयंसहायता समुहांना 0 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्याकरीता सुमतीबाई सुकळीकर उद्योगिणी महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाचा फार मोठा आणि महत्वाकांक्षी कार्यक्रम आम्ही हाती घेतला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून नवीन ग्रामीण रस्त्यांचे जाळे निर्माण करतांनाच जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीवरही भर दिला जात असल्याने आपल्या जिल्ह्यातीलही रस्त्यांचे रुप पालटून जनतेला दळणवळणाच्या चांगल्या सुविधा मिळणार आहेत अशी माहिती पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिली.
बीड जिल्हा परिषदेने लोकसहभाग मिळविण्यासाठी  समुदाय संचलित गाव हागणदारी निर्मुलन कृती आराखड्याची यशस्वी अंमलबजावणी केली. जिल्ह्यात यशस्वी झालेला हा उपक्रम राज्यभर पोहचविण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने  पाऊले उचललेली आहेत. नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामासाठी 962 कोटी 22 लाख रुपये एवढा भरीव निधी या प्रकल्पासाठी उपलब्ध झाला असल्याने आपली रेल्वेमार्गाची स्वप्नपूर्ती व्हायला वेळ लागणार नाही असा विश्वास पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला.
पोलीस दलाच्या सक्षमीकरणासाठी पोलीस दलात फिरत्या फॉरेन्सिक लॅब आणि सायबर लॅबसारख्या अत्याधुनिक यंत्रणांचा समावेश करण्यात आल्याने सोशल मिडीयातून सामाजिक जीवनमान बिघडविणाऱ्या घटनांची उकल होणास व शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यास निश्चितच मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.  यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते स्वयंसहाय्यता बचतगटांना खेळते भांडवल निधी वितरण पत्र देण्यात आले.

मुख्य शासकीय ध्वजारोहणाप्रसंगी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परेड संचलन वाहनातून परेड पथकांचे निरिक्षण केले. या कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, नागरिक, विद्यार्थी, पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते.

वरुण राजाच्या कृपेने जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत -पालकमंत्री पंकजा मुंडे





          बीड, दि.17 :- वरुण राजाने बीड जिल्ह्यावर कृपादृष्टी केल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. अजून यासारखा  पाऊस झाला तर जिल्ह्याचा कायमचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल असे मत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.  माजलगाव धरण येथील जलसंचयाचे पूजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
          यावेळी आमदार आर.टी.देशमुख, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती सुनंदा जगताप, उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, पोलीस उपअधिक्षक हरी बालाजी यांची यावेळी व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, पावसाने राज्यासह बीड जिल्ह्यात काही काळ दांडी मारल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच पिकेही धोक्यात आली होती. परंतू परतीच्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले. आणि जलाशयामध्ये पाणीसाठा वाढला त्यामुळे पावसाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात निकाली निघाला आहे.असाच पाऊस झाल्यास जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
          जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. या कामामध्येही मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आहे. जलयुक्त शिवाराची कामे यशस्वी झाल्याचे प्रतिक आहे असे सांगून पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून गाव शिवारातील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन शाश्वत सिंचन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यासाठी लोकसहभाग अधिक वाढवावा असेही त्या म्हणाल्या.
          जिल्ह्यातील जलयुक्त शिवाराची कामे दर्जेदार आणि चांगल्या पध्दतीने केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी राम आणि यंत्रणेचे अभिनंदन केले.          प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विधीवत जलपूजन करण्यात आले.

           या कार्यक्रमास पदाधिकारी, नागरिक, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती सुनंदा जगताप यांनी केले.

जिल्हा न्यायालयाच्या इमारतीची पालकमंत्री मुंडे यांच्याकडून पाहणी




          बीड, दि.17 :- बीड शहरातील जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीची पाहणी करुन पालकमंत्री मुंडे यांनी वकील संघाशी चर्चा करतांना त्यांना लागणाऱ्या फर्निचर व इतर साधन सामुर्गीसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल अशी घोषणा केली.

          बीड शहरातील नगररोडवर जिल्हा न्यायालयाची भव्य दिव्य इमारत उभारण्यात आली असून यासाठी 65 कोटी 42 लक्ष रुपये खर्च आला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या नूतर इमारतीची पाहणी करुन पालकमंत्री मुंडे यांनी इमारतीमधील सोई सुविधाबाबत समाधान व्यक्त केले. वकील संघाच्यावतीने त्यांचे स्वागत केले गेले. त्यानंतर संघाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलतांना त्यांनी कै.गोपिनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगितल्या. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी मुंडे साहेबांनी वकीली केल्याचे सांगून पालकमंत्री मुंडे यांनी वकील संघाला शुभेच्छा दिल्या. यावेळी ॲड.अजय राख यांच्यासह विधीज्ञ मंडळी उपस्थित होती.

स्व.सुंदरराव सोळंके यांच्या पुतळ्याचे अनावरण स्व.सुंदरराव सोळंके यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी - पालकमंत्री पंकजा मुंडे कार्यक्रमास खा. शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती




स्व.सुंदरराव सोळंके यांच्या पुतळ्याचे अनावरण
स्व.सुंदरराव सोळंके यांचे कार्य
नव्या पिढीसाठी प्रेरणादायी
              - पालकमंत्री पंकजा मुंडे
कार्यक्रमास खा. शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती

बीड, दि. 17 :- बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांसाठी स्व.सुंदरराव सोळंके यांनी केलेले कार्य नव्या पिढीला सदैव प्रेरणादायी ठरले असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
लोकनेते स्व.सुंदरराव सोळंके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार शरद पवार यांच्या हस्ते तेलगाव (बु) जवळील स्व.सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानावरुन पालकमंत्री मुंडे बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री आ.जयंत पाटील, आ.जयदत्त क्षीरसागर, आ.सतिश चव्हाण, आ.आर.टी.देशमुख, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे, आ.विक्रम काळे, आ.अमरसिंह पंडित, आ.संगिता ठोंबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी राज्यमंत्री फौजिया खान यांच्यासह मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करुन पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, स्व.सुंदरराव यांचा जवनप्रवास अत्यंत प्रेरणादायि असून त्यांच्या सारख्या लोकनेत्यामुळे जनतेला अत्यंत दिलासा मिळाला आहे. त्यांचे कार्य केवळ बीड जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला  विकासाच्या दिशेने अग्रेसर करणारे ठरले. त्यांच्या कार्याकडे पाहून मला ही जिल्ह्याच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळाली असून जिल्ह्यातील जनतेच्या स्वप्नांची पुर्तता करण्याचे काम आपल्या हातून होईल याची मी दक्षता घेत आहे. गेल्या अनेक दशकांपासून जिल्हा वासियांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न आता पुर्ण होत आहे. असेही त्या म्हणाल्या.
जून्या पिढीतील नेत्यांची समाजाच्या विकासासाठी केलेल्या कामाची धडपड पाहून आपल्या सारख्या नवीन पिढीतील प्रतिनिधींनाही हुरुप येईल अशी आशा व्यक्त करुन पालकमंत्री मुंडे यांनी खा.शरद पवार यांच्या विकास कामातील पुढाकाराबद्दल कौतूक करावे तेवढे कमी आहे अशा शब्दात उल्लेख केला आणि त्यांच्या कार्यापध्दतीबद्द गौरवोदगार काढले. साखर महासंघाच्या माध्यमातून खासदार पवार यांच्या सहकार्याने आपण साखर कारखानादारीला प्रगती पथावर नेण्याचे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार शरद पवार यावेळी म्हणाले की, स्व.सुंदरराव सोळंके यांच्या कारकिर्दीकडे अत्यंत जवळून पाहण्याचा योग आला आहे. त्यांचे शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नांविषयी कमालीचे ज्ञान व ओढा पाहून आम्ही चकित झालो होतो. शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य माणसांच्या प्रगतीविषयीच्या निर्णयांसाठी सदैव जिवाचे रान करणाऱ्या स्व.सुंदररावांकडून चांगल्या गुणांचे नेहमी दर्शन व्हावयाचे. त्यांच्या अनेक चांगले गुण सरकारला महत्वपूर्ण निर्णय घ्यायला भाग पाडायचे. त्यांच्यासारख्या गुणी आणि ज्ञानी नेत्यांबरोबरचा प्रवास नेहमी आठवणीत राहण्यासारखा आहे. असे सांगत खा.पवार यांनी स्व.सुंदरराव यांच्या अनेक आठवणी आपल्या भाषणात जाग्या केल्या. विधीमंडळातील त्यांच्या आठवणींविषयी ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात सविस्तर विवेचन केले.
प्रास्ताविकात माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी स्व.सुंदरराव सोळंके यांचा संपूर्ण जिवनप्रवास मांडला. जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, मंत्री असा त्यांचा प्रवास उलगडतांना विविध टप्प्यावर त्यांनी सामान्य जनतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरणही प्रकाश सोळंके यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास माजी आमदार, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शुक्रवार, १६ सप्टेंबर, २०१६

विधानपरिषद विरोधी पक्षनेते श्री.धनंजय मुंडे यांचा दौरा


          बीड, दि. 16 :- विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. धनंजय मुंडे हे बीड जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा  दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

          शनिवार दि.17 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी 8.30 वाजता औरंगाबाद येथून शासकीय मोटारीने सिंदफना पब्लीक स्कुल माजलगाव येथी कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता तेलगाव येथील कै.सुंदरराव सोळंके यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वाजता तेलगाव (माजलगाव) येथून शासकिय मोटारीने औरंगाबादकडे रवाना.

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०१६

अपंग विद्यार्थ्यांनी केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावेत



            बीड, दि 15:-  केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण विभागाच्या विगलांगजन सशक्तीकरण विभागामार्फत 9 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांकरीता मॅट्रीक पूर्व शिष्यवृत्ती, इयत्ता 11 वी ते पदवित्तर पदवी व पदविका यामध्ये देशातील केंद्र शासनाने उच्च दर्जा दिलेल्या 197 संस्थामधून शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांकरीता शिष्यवृत्ती देण्याची योजना ऑनलाईन पध्दतीने शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख शुक्रवार दि.30 सप्टेंबर 2016 असून अपंग विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत.

            शिष्यवृत्ती योजनेच्या समन्वयाचे कामकाज अपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत करण्यात येत असून ज्या अपंग विद्यार्थ्यांनी राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेला आहे व ते केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतात अशांनी राज्य शासनाच्या शिष्यवृत्तीऐवजी केंद्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पध्दतीने www.schlorships.gov.in  या वेबसाईटवर अर्ज करावेत. वेबसाईटवर गेल्यास प्री मॅट्रीक स्कॉलरशिप फॉर पर्सन विथ डिसॲबॅलीटीज या समोर गाईडलाईन्स असून त्या डाऊनलोड केल्यास त्याबाबतची सर्व माहिती उपलब्ध होईल तसेच या प्रकारे पोस्ट मॅट्रीक व टॉप क्लास स्कॉलरशिपची माहिती उपलब्ध होईल. यामध्ये सर्वात आधी वेबसाईट उघडल्यास वरील बाजूस रजिस्ट्रेशन न्यु लॉग इन दिसून येते यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:चा रजिस्ट्रेशन नंबर तयार करावयाचा आहे यानंतर रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लॉग इन अप्लायवर क्लिक करुन डॉक्युमेंट अपलोड करुन सर्व माहिती भरावयाची आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.30 सप्टेंबर 2016 राहील. असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

शिरुर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्क्रॅप साहित्याची निविदा पध्दतीने विक्री




            बीड, दि 15:- बीड जिल्ह्यातील शिरुर कासार येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निर्लेखित केलेली छोटी हत्यारे व उपकरणे, फर्निचर तसेच किरकोळ स्क्रॅप साहित्याची विक्री निविदा पध्दतीने करावयाची आहे. ही निविदा दि.26 सप्टेंबर 2016 रोजी दुपारी 1 वाजता सादर कराव्यात. विक्री करावयाचे साहित्य दि.26 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत पाहता येईल. इच्छुक खरेदीदारांनी अधिक माहिती व निविदेच्या अटी व शर्तीबाबत भांडार विभागात संपर्क साधावा. असे शिरुर कासार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.