शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

वरुण राजाच्या कृपेने जिल्ह्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत -पालकमंत्री पंकजा मुंडे





          बीड, दि.17 :- वरुण राजाने बीड जिल्ह्यावर कृपादृष्टी केल्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे. अजून यासारखा  पाऊस झाला तर जिल्ह्याचा कायमचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल असे मत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.  माजलगाव धरण येथील जलसंचयाचे पूजन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाले त्या प्रसंगी त्या बोलत होत्या.
          यावेळी आमदार आर.टी.देशमुख, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती सुनंदा जगताप, उपविभागीय अधिकारी महेंद्रकुमार कांबळे, पोलीस उपअधिक्षक हरी बालाजी यांची यावेळी व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलतांना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, पावसाने राज्यासह बीड जिल्ह्यात काही काळ दांडी मारल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच पिकेही धोक्यात आली होती. परंतू परतीच्या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले. आणि जलाशयामध्ये पाणीसाठा वाढला त्यामुळे पावसाचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात निकाली निघाला आहे.असाच पाऊस झाल्यास जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
          जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. या कामामध्येही मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण झाला आहे. जलयुक्त शिवाराची कामे यशस्वी झाल्याचे प्रतिक आहे असे सांगून पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून गाव शिवारातील पाणी पातळीमध्ये वाढ होऊन शाश्वत सिंचन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाची कामे करण्यासाठी लोकसहभाग अधिक वाढवावा असेही त्या म्हणाल्या.
          जिल्ह्यातील जलयुक्त शिवाराची कामे दर्जेदार आणि चांगल्या पध्दतीने केल्याबद्दल त्यांनी जिल्हाधिकारी राम आणि यंत्रणेचे अभिनंदन केले.          प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विधीवत जलपूजन करण्यात आले.

           या कार्यक्रमास पदाधिकारी, नागरिक, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जलसंपदा विभागाच्या अधिक्षक अभियंता श्रीमती सुनंदा जगताप यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा