बीड, दि.22:- केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंबकल्याण,
राज्य शासन तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या
वतीने देशभरात माता-बाळ आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्य जनजागृती अभियान राबविण्यात येत
आहे. आई, बाळाचे आरोग्य, कुटुंब नियोजन, किशोरवयीन आरोग्याविषयी सर्व सामान्य जनतेपर्यंत
माहितीचा प्रसार व्हावा यासाठी माता-बाळ आरोग्य अभियान राबविण्यासाठी केंद्र सरकारने
बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रायमोह गावाची निवड केली आहे. या गावात 28 व 29
सप्टेंबर 2016 या दोन दिवशी सर्वांच्या सहकार्याने विविध कार्यक्रम घेऊन अभियान राबविण्यात
येणार आहे.
बुधवार दि.28 सप्टेंबर 2016 रोजी कार्यक्रमाचे
उदघाटन सकाळी 9 वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार असून गावातील जनता तसेच विद्यार्थ्यांच्या
आरोग्याविषयी मनोंरजनातून जनजागृती, विद्यार्थी आणि जनतेसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले आहे. तसेच गुरुवार दि.29 सप्टेंबर 2016 रोजी सकाळी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचा
सहभाग असलेल्या रॅलीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात पदाधिकारी, अधिकारी आणि तज्ञ
व्यक्ती आरोग्याविषयी मार्गदर्शन करतील. तसेच राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत
विविध आरोग्यविषयक तपासण्या करण्यात येतील. असे क्षेत्रीय प्रचार निदेशालयाचे अधिकारी
माधव जायभाये यांनी कळविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा