शनिवार, १७ सप्टेंबर, २०१६

स्व.सुंदरराव सोळंके यांच्या पुतळ्याचे अनावरण स्व.सुंदरराव सोळंके यांचे कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी - पालकमंत्री पंकजा मुंडे कार्यक्रमास खा. शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती




स्व.सुंदरराव सोळंके यांच्या पुतळ्याचे अनावरण
स्व.सुंदरराव सोळंके यांचे कार्य
नव्या पिढीसाठी प्रेरणादायी
              - पालकमंत्री पंकजा मुंडे
कार्यक्रमास खा. शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती

बीड, दि. 17 :- बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांसाठी स्व.सुंदरराव सोळंके यांनी केलेले कार्य नव्या पिढीला सदैव प्रेरणादायी ठरले असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास व महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
लोकनेते स्व.सुंदरराव सोळंके यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार शरद पवार यांच्या हस्ते तेलगाव (बु) जवळील स्व.सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षतेस्थानावरुन पालकमंत्री मुंडे बोलत होत्या. यावेळी माजी मंत्री आ.जयंत पाटील, आ.जयदत्त क्षीरसागर, आ.सतिश चव्हाण, आ.आर.टी.देशमुख, आ.बाबाजानी दुर्राणी, आ.विजय भांबळे, ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे, आ.विक्रम काळे, आ.अमरसिंह पंडित, आ.संगिता ठोंबरे, जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित, माजी राज्यमंत्री फौजिया खान यांच्यासह मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा व्यक्त करुन पालकमंत्री मुंडे म्हणाल्या की, स्व.सुंदरराव यांचा जवनप्रवास अत्यंत प्रेरणादायि असून त्यांच्या सारख्या लोकनेत्यामुळे जनतेला अत्यंत दिलासा मिळाला आहे. त्यांचे कार्य केवळ बीड जिल्ह्यालाच नव्हे तर संपूर्ण राज्याला  विकासाच्या दिशेने अग्रेसर करणारे ठरले. त्यांच्या कार्याकडे पाहून मला ही जिल्ह्याच्या विकासासाठी पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळाली असून जिल्ह्यातील जनतेच्या स्वप्नांची पुर्तता करण्याचे काम आपल्या हातून होईल याची मी दक्षता घेत आहे. गेल्या अनेक दशकांपासून जिल्हा वासियांनी पाहिलेले रेल्वेचे स्वप्न आता पुर्ण होत आहे. असेही त्या म्हणाल्या.
जून्या पिढीतील नेत्यांची समाजाच्या विकासासाठी केलेल्या कामाची धडपड पाहून आपल्या सारख्या नवीन पिढीतील प्रतिनिधींनाही हुरुप येईल अशी आशा व्यक्त करुन पालकमंत्री मुंडे यांनी खा.शरद पवार यांच्या विकास कामातील पुढाकाराबद्दल कौतूक करावे तेवढे कमी आहे अशा शब्दात उल्लेख केला आणि त्यांच्या कार्यापध्दतीबद्द गौरवोदगार काढले. साखर महासंघाच्या माध्यमातून खासदार पवार यांच्या सहकार्याने आपण साखर कारखानादारीला प्रगती पथावर नेण्याचे प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार शरद पवार यावेळी म्हणाले की, स्व.सुंदरराव सोळंके यांच्या कारकिर्दीकडे अत्यंत जवळून पाहण्याचा योग आला आहे. त्यांचे शेती आणि शेतकरी यांच्या प्रश्नांविषयी कमालीचे ज्ञान व ओढा पाहून आम्ही चकित झालो होतो. शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य माणसांच्या प्रगतीविषयीच्या निर्णयांसाठी सदैव जिवाचे रान करणाऱ्या स्व.सुंदररावांकडून चांगल्या गुणांचे नेहमी दर्शन व्हावयाचे. त्यांच्या अनेक चांगले गुण सरकारला महत्वपूर्ण निर्णय घ्यायला भाग पाडायचे. त्यांच्यासारख्या गुणी आणि ज्ञानी नेत्यांबरोबरचा प्रवास नेहमी आठवणीत राहण्यासारखा आहे. असे सांगत खा.पवार यांनी स्व.सुंदरराव यांच्या अनेक आठवणी आपल्या भाषणात जाग्या केल्या. विधीमंडळातील त्यांच्या आठवणींविषयी ज्येष्ठ पत्रकार मधूकर भावे आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात सविस्तर विवेचन केले.
प्रास्ताविकात माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी स्व.सुंदरराव सोळंके यांचा संपूर्ण जिवनप्रवास मांडला. जिल्हा परिषद अध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, मंत्री असा त्यांचा प्रवास उलगडतांना विविध टप्प्यावर त्यांनी सामान्य जनतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरणही प्रकाश सोळंके यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास माजी आमदार, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा