शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा जिल्हाधिकारी राम यांच्याकडून आढावा - विज व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवावी





                  
          बीड, दि. 23 :- बीड जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील नदी-नाल्यांना पूर आला आणि काही ठिकाणच्या धरणातील पाण्याच्या साठ्यात प्रचंड वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. या बैठकीस पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
            बीड जिल्ह्यात 23 सप्टेंबर रोजी पहाटे पर्यंतच्या 24 तासात सरासरी 55.4 मि मी पावसाची नोंद झाली. यामुळे बीड शहरासह अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. पाण्यामुळे रस्ते व पुलांच्या नुकसानीला सामोरे जावे लागले पर्यायाने वाहतुकीवर परिणाम झाल्याचेही चित्र आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले असून मोठी हानी झाली नाही असे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, रस्ते व पुलांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन अहवाल तयार करावा. प्रत्यक्ष पथक पाठवून तपासणी करण्यात यावी. कुंडलिका नदीचे दरवाजे उघडल्यामुळे चिखलबीड येथील रस्त्यांचे नुकसान झाले. या शिवाय तीन-चार ठिकाणी रस्त्यांचे नुकसान झाल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. रस्ते दुरुस्ती लवकर करावी पावसामुळे बाधित झालेल्या रस्ते-पुलाच्या नुकसानीची माहिती शासनाला सादर करण्यात येईल. महावितरणने जिल्ह्यात पावसामुळे वीज खंडीत होण्याच्या प्रकरणांची माहिती घेऊन पाऊस थांबल्यानंतर लगेचच दुरुस्ती व देखभालीची कार्यवाही करावी. महावितरणने विज पुरवठ्याच्या अडचणी दूर कराव्यात. लघु पाटबंधारे व जलसंधारण विभागाने आपल्या जिल्ह्यातील लहान-मोठ्या प्रकल्पातील पाणी साठ्याकडे लक्ष ठेवावे. मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्याकडे लक्ष ठेवावे. मध्यम प्रकल्पातील पाण्याच्या वाढत्या संचयाकडे पाटबंधारे विभागाने कायम लक्ष ठेवून कार्यवाही करावी. सर्व यंत्रणा सज्ज ठेवावी. प्रत्येक तलाव-प्रकल्पाच्या ठिकाणी नियुक्त केलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांचे नाव व दुरध्वनी क्रमांकाची माहिती प्रशासनाला देण्याची सुचना जिल्हाधिकारी राम यांनी केली.
            जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पातील पाणी साठ्याची माहिती यावेळी सांगण्यात आली. बिंदुसरा प्रकल्पात सकाळपर्यंत 60 टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून आणखी पाण्याचा येवा सुरु आहे. येत्या 48 तासात मराठवाड्यासह राज्याच्या काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. याची नोंद घेऊन त्या दृष्टीने सर्व प्रशासकीय यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले. पोलीस यंत्रणा संभाव्य परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज असल्याचे सांगून पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी सविस्तर माहिती यावेळी दिली.
            जिल्ह्यातील 144 मध्यम व लघु सिंचन प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा निर्माण झाला असून इतरही प्रकल्पात पाण्याची चांगली आवक होत असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.
            या बैठकीस पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आर.बी.करपे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अतिश शिंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.व्ही.चव्हाण, महावितरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद राख, लघु पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री.द.दासखेडकर, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भुवैज्ञानिक डी.एस. मेश्राम यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी उमेश शिर्के आदि उपस्थित होते.
बिंदुसरा धरणाला भेट

            बिंदुसरा सिंचन प्रकल्पाला भेट देवून जिल्हाधिकारी राम आणि पोलीस अधिक्षक पारस्कर यांनी पाहणी केली. अनेक वर्षानंतर या धरणात मोठ्या प्रमाणात पाणी वाढत असल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. या ठिकाणी धरणातील पाण्याचे दृष्य पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असून बिंदूसरा धरणातील पाण्यामुळे आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम यांनी वरुणराजाच्या कृपादृष्टीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश गावडे आणि जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा