गुरुवार, २२ सप्टेंबर, २०१६

नगर परिषदांनी जनतेशी सुसंवाद साधावा स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी नवल किशोर राम



बीड, दि. 22:- स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषदांनी जनतेशी सुसंवाद साधून स्वच्छतेबाबत जागृती करावी तसेच विहीत मुदतीमध्ये स्वच्छ शहर आणि हागणदारीमुक्त होण्यासाठी नियोजनबध्दरित्या काम करावे. तसेच जलजन्य तसेच किटकजन्य रोग उद्भवणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हयातील सर्व नगर परिषदांच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या कामाचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एका बैठकीत आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, बीड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष  नसीरोद्दीन इनामदार, नगर परिषदेचे जिल्हा प्रशासन अधिकारी सतीश शिवणे, अंबाजोगाईचे उपाध्यक्ष मनोज लखेरा, आष्टीचे अध्यक्ष पठाण नवाब खान बशीरखान, गेवराईचे सभापती राजेंद्र राक्षसभुवनकर, बीडचे नियोजन सभापती सय्यद सादेक अली महेबुब अली, बीड नगर परिषदेच्या स्वच्छता सभापती जयश्री विधाते यांची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, दि. 2 ऑक्टोबर  रोजी सर्व नगर परिषदांनी शहर स्वच्छ व हागंदारीमुक्त करण्यासाठी निर्धार दिन साजरा करावा. या कार्यक्रमास शहरातील नागरीक, व्यापारी, पदाधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींना सहभागी होण्याचे आवाहन करावे. नगर परिषद गेवराई व धारुर 31 डिसेंबर 2016 पर्यंत व नगर परिषद बीड, अंबाजोगाई, परळी-वै, माजलगांव आणि केज 31 मार्च 2017 पर्यंत हागंणदारीमुक्त होतील या दृष्टीकोनातून वैयक्तीक व सार्वजनिक शौचालय बांधकामाचा आराखडा तयार करावा. त्यानूसार संबंधित मुख्याधिकारी यांनी प्रत्येक टप्याचे काम पुर्ण करण्याचे निर्देश दिले. या अभियांनांतर्गत दिलेल्या मुदतीत कामेपूर्ण होणेस्तव निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच 14 वा वित्त आयोग व इतर योजनेचा निधीही उपलब्ध करुन दिला जाईल.  जिल्ह्यात स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी तसेच या अभियानाबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी लवकरच जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी दिली

शहरातील कचऱ्याचे योग्य नियोजन करावे. यासाठी प्रत्येक शहरात ठराविक अंतरावर कचरा कुंडयांची व कचरा उचलण्यासाठी घंटागाडयाची उपलब्धता मुख्याधिकारी यांनी करुन घ्यावी. यापुढे प्रत्येक नगरपरिषद क्षेत्रात शहर स्वच्छतेच्या कामाची पहाणी पथक नियुक्त करुन करण्यात येईल व स्वच्छतेच्या कामात दुर्लक्ष आढळून आल्यास संबंधीत मुख्याधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांचेवर कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येईल असे जिल्हाधिकारी यांनी सांगून शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट मुदतीत पूर्ण करण्यासाठी  निर्देश दिले. तसेच साथ रोग नियंत्रणाबाबत उपाययोजनेबाबतचा नगरपरिषद निहाय सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा