गुरुवार, ३० मार्च, २०१७

तंबाखू व्यसनाच्या दुष्परिणामाची जनजागृती आवश्यक - हेमंत क्षीरसागर


                   
          बीड, दि. 30 :- तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकांमध्ये नैराश्याचे प्रमाण वाढत आहे. अशा व्यसनांच्या दुष्परिणामांची जनजागृती होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन बीडचे उपनगराध्यक्ष तथा स्वच्छता व आरोग्य सभापती हेमंत क्षीरसागर यांनी केले.  
          बीड शहरातील अन्वीता हॉटेलमध्ये जिल्हा रूग्णालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी संदीप सांगळे, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, डॉ.पाटील, डॉ.हरिदास, आदि मान्यवर उपस्थित होते.
          क्षीरसागर पुढे म्हणाले की, शाळा, महाविद्यालयस्तरावर व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत चर्चासत्र घेवुन चांगला बदल घडेल, सगळ्यांनी एकत्र येवुन व्यसनाधीनतेच्या विरोधात काम करणे गरजेचे आहे. नगर पालिकेच्या माध्यमातुन स्वच्छता, आरोग्य व मुलभुत प्रश्नांबरोबरच शहरातील युवकांना व्यसनापासुन दुर ठेवण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम राबवु असेही क्षीरसागर म्हणाले.
          प्रारंभी धन्वंतरी पुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. डॉ.धबडगावकर यांनी प्रास्ताविक केले. दंत चिकित्सक संघटनेचे अध्यक्ष डॉ..अशोक उनवणे व हरणमारे यांनी सादरीकरणाव्दारे तंबाखू व्यसनाच्या दुष्परिणामाची सविस्तर माहिती दिली. यावेळी डॉ.अमोल बनसोडे, डॉ.सुजाता नरवणे यांच्यासह नगरसेवक, सामाजीक संस्थांचे प्रतिनिधी व नागरीकांची उपस्थिती होती.

          हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.राजेंद्र दबडगावकर, सिमा पाटील, डॉ.अमोल बनसोडे, सुजाता नरवणे, श्रीकांत उजगरे, दामोदर सुरेश, कृष्णा शेंडगे, वाव्हुळ व जिल्हा रूग्णालयातील तंबाखु नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा