शुक्रवार, २४ मार्च, २०१७

छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन छायाचित्र कलेच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला जावा - जिल्हाधिकारी नवल किशोर राम







         
          बीड, दि. 24 :- पारंपरिक छायाचित्रकलेच्या माध्यमातून समाजातील बऱ्या वाईट घटना टिपतांनाच हे प्रभावी माध्यम सामाजिक संदेश देण्यासाठी सुध्दा वापरले जावे असे प्रतिपादन बीडचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
          माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या बीड येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात भरविण्यात आलेल्या 'महाराष्ट्र माझा' या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी राम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ आणि जेष्ठ छायाचित्रकार विश्वनाथ माणूसमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'महाराष्ट्र माझा' या छायाचित्र प्रदर्शनाच्या उपक्रमाबद्दल कौतूक करुन जिल्हाधिकारी राम म्हणाले की, मोबाईल मधून सेल्फी किंवा फोटो घेणे म्हणजे फोटोग्राफी नसून त्यासाठी उत्तमोत्तम फोटो कॅमेरा, साधने आणि घटनेकडे पाहण्याचा नेमका दृष्टीकोन असणे गरजेचे आहे. उत्तम छायाचित्रे ही लाख मोलाचा संदेश देणारी ठरु शकतात त्यासाठी छायाचित्र कला जोपासण्याबरोबरच कलेची उत्तम जाण असली पाहिजे. प्रदर्शनात मांडलेली उत्तमोत्तम आणि दर्जेदार छायाचित्रे ही अत्यंत बोलकी असून सामाजिक संदेश देणारी आहेत. असेही ते म्हणाले.
          शासनाच्या विविध योजनांच्या विकासकामांची काही छायाचित्रे प्रदर्शनात समाविष्ट असून त्याबद्दल बोलतांना जिल्हाधिकारी राम म्हणाले की, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची छायाचित्रे ही त्याचे महत्व अधोरेखीत करणारी आहेत. जलयुक्त शिवार, स्वच्छ महाराष्ट्र, यासारख्या लोकाभिमूख योजनांची राज्यातील प्रगती अत्यंत समाधानकारक आहे. त्याचेही प्रतिबिंब या प्रदर्शनाच्या माध्यमातून समोर आले आहे. याबरोबरच पुरोगामी महाराष्ट्राच्या विविध कला, संस्कृती, परंपरा, धार्मिक वास्तु तसेच सामाजिक संदेश देणारी छायाचित्रे म्हणजे रसिकांसाठी पर्वणी असल्याचेही जिल्हाधिकारी राम म्हणाले.
          जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे म्हणाले की, समाजाला दिशा देण्याचे काम छायाचित्रे करु शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे 'महाराष्ट्र माझा' छायाचित्र प्रदर्शन आहे. सामाजिक विकासासाठी शासन राबवित असलेल्या जलयुक्त शिवार अभियान आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियान तसेच हागणदारी मुक्तीच्या योजनांची बोलकी छायाचित्रे या दिशेने होत असलेल्या कामाचे प्रतिबिंब निर्माण करतात. सामाजिक प्रगतीच्या या योजनांमध्ये लोकसहभाग अत्यंत  महत्वाचा असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात हागणदारी मुक्तीचे अभियान यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. यासाठी संपूर्ण लोकसहभागाची गरज असल्याचेही ते म्हणाले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानात नागरिकांनी हिरिरीने पुढाकार घ्यावा असे आवाहनही यावेळी ननावरे यांनी केले.
          जेष्ठ छायाचित्रकार विश्वनाथ माणूसमारे यांनी 1972 च्या बीड जिल्ह्यातील दुष्काळाच्या प्रसंगीची छायाचित्रे काढल्याची आठवण सांगत जुन्या काळातील कृष्णधवल छायाचित्रिकरणाच्या आपल्या आठवणी सांगितल्या. जुन्या काळात अपुऱ्या साधन सामुग्रीच्या आधारे अचूक फोटोग्राफी करण्याचे आव्हान आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात फारसे राहिले नाही असे सांगत त्यांनी छायाचित्रण कलेच्या क्षेत्रात झालेल्या अभूतपूर्व प्रगतीची माहिती सांगितली. व छायाचित्रांचे महत्व विशद केले.
          प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर यांनी प्रास्ताविकात सांगितले की, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्र माझा' या छायाचित्र स्पर्धेत राज्यभरातून 3800 छायाचित्रे सहभागी झाली होती. यातून उत्कृष्ट छायाचित्रांना मुंबई येथे पारितोषिके देण्यात आली. उच्चस्तरीय छायाचित्रकारांच्या समितीने प्रदर्शनासाठी निवडलेली तब्बल 190 छायाचित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली असून महाराष्ट्राची कला-संस्कृती टिपलेल्या या छायाचित्रांना पाहण्याची संधी बीड जिल्ह्यातील जनतेला उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 2 एप्रिल पर्यंत हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजे दरम्यान सर्वांसाठी खुले राहणार असून याचा छायाचित्रप्रेमी जनतेनी लाभ घ्यावा असे आवाहनही आलुरकर यांनी केले.

          प्रारंभी जिल्हाधिकारी राम यांच्या हस्ते फित कापून उदघाटन झाले. त्यांनी प्रदर्शनातील छायाचित्रांची पाहणी केली. दिपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, ना.गो.पुठेवाड आणि राजेश लाबडे यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन अमोल मुळे यांनी केले तर राजेश लाबडे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमास छायाचित्रप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयाचे शिवाजी गमे, मिलिंद तुपसमिंद्रे, शेख रईस, भगवान ढाकरे, छगन कांडेकर, श्रीमती लता कारंडे आदिनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा