मंगळवार, २१ मार्च, २०१७

बीड जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदी सविता गोल्हार तर उपाध्यक्षपदी जयश्री मस्केंची निवड










        बीड, दि. 21 :- बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी श्रीमती सविता विजयकुमार गोल्हार (भाजप) यांची तर उपाध्यक्षपदी श्रीमती जयश्री राजेंद्र मस्के (भारतीय संग्राम परिषद) यांची बहुमताने निवड झाली.
          बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीसाठी पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
          अध्यक्ष पदासाठी श्रीमती सविता विजयकुमार गोल्हार आणि श्रीमती मंगल प्रकाशराव सोळंके यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी श्रीमती जयश्री राजेंद्र मस्के आणि श्रीमती शिवकन्या शिवाजी सिरसाट यांनी पिठासीन अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्रे सादर केली. ती छाननीअंती वैध ठरली.
          जिल्हा परिषदेच्या 60 गटांमध्ये निवडून आलेल्या 60 सदस्यापैकी 59 सदस्य निवडणूक प्रक्रीयेच्या विशेष सभेसाठी उपस्थित होते. या 59 सदस्यांनी मतदान केले. अध्यक्षपदासाठी श्रीमती सविता विजयकुमार गोल्हार (भाजप) यांना 34 मते पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी श्रीमती मंगल प्रकाशराव सोळंके (राष्ट्रवादी काँग्रेस) यांना 25 मते मिळाली.   तसेच उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीत श्रीमती जयश्री राजेंद्र मस्के (भारतीय संग्राम परिषद) यांना 34 मते पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी श्रीमती शिवकन्या शिवाजी सिरसाट (राष्ट्रवादी कॉग्रेस)यांना 25 मते मिळाली.
          नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड घोषित केल्यानंतर जिल्हाधिकारी राम यांनी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. जिल्हा परिषदेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनीही पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

          निवडणूक प्रक्रीया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी राम यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, तहसीलदार आशिषकुमार बिरादार, उपकोषागार अधिकारी लहू गळगुंडे आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील 11 पंचायत समित्यांपैकी 8 पंचायत समित्यांचे सभापतीही यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा