गुरुवार, १६ मार्च, २०१७

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीची प्रलंबित प्रकरणासाठी विशेष मोहीम


         
            बीड, दि. 16 :- बीड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे बुधवार दि.15 मार्च 2017 अखेर प्राप्त झालेल्या जाती पडताळणी अर्जांची छाननी करण्यात आली आहे.  छाननी करताना अपूर्ण कागदपत्रे असलेल्या प्रकरणात समितीने त्रुटी नोंदविल्या असून अशी एकूण अंदाजित 1 हजार 400 शैक्षणिक प्रकरणे पुराव्याअभावी प्रलंबित आहेत.  प्रकरणांचा कालबध्द पध्दतीने व जलद निपटारा व्हावा म्हणून समितीद्वारे त्रुटी पूर्ततेसाठी दि.17 ते 19 मार्च 2017 कालावधीत विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

           अर्जातील त्रुटीची पुर्तता करण्यासाठी अर्जदारांना दि.17 ते 19 मार्च कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजता मुलाखतीसाठी बोलविण्यात आले असून त्यांना एसएमएसव्दारे कळविण्यात आले आहे.  एसएमएस प्राप्त होईल अशाच अर्जदारांनी समिती कार्यालयाकडे मूळ कागदपत्रांसह संपर्क साधावा. अनुसूचित जातीसाठी सन 1950, विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी 1961 व विशेष मागास प्रवर्गा व इतर मागास प्रवर्गासाठी सन 1967 पूर्वीचे महाराष्ट्र राज्यातील कायम वास्तव्य व जातीचे पुरावे सोबत आणावेत. अर्जदार यांनी मुख्यत्वे रक्तनातेसंबंधातील व्यक्तींचे उदा- वडील,आजोबा,सख्खे चुलते, आत्या यांचा शाळा सोडल्याचे दाखला, प्रवेश निर्गम उतारा, गांव नमुना नं.14 तसेच ज्या शासकीय कागदपत्रांमध्ये जातीची नोंद दर्शविण्यात आली आहे असे महसुली पुरावे प्रमाणित प्रतीसह सोबत घेऊन यावेत. अर्जदारांना एसएमएसव्दारे लॉट व टेबल क्रमांक कळविण्यात आला असून  संबंधितांनी त्या टेबलवर जाऊन संबंधित कर्मचारी  यांना कागदपत्रे दाखवून प्रकरण तपासून घ्यावे. छाननीअंती परिपूर्ण अर्जावर समितीकडून निर्णय घेण्यात येईल. जे अर्जदार हे यापूर्वी मुलाखतीसाठी येवून गेले आहेत त्यांनी यापूर्वी दिलेल्या सूचनांप्रमाणे कागदपत्रे घेऊन सुनावणीसाठी उपस्थित रहावे. ज्यांची प्रकरणे पोलीस दक्षता पथकाकडे चौकशीसाठी वर्ग करण्यात आलेली आहेत तसेच ज्यांच्या प्रकरणात सुनावणी प्रक्रीया सुरु आहे अशा अर्जदारांनी मुलाखतीसाठी येण्याची आवश्यकता नाही. सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे बीड जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा