गुरुवार, १६ मार्च, २०१७

लोककलेच्या माध्यमातून एचआयव्ही जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ


            बीड, दि. 16 :- महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या सुचनेनूसार बुधवार दि.15 मार्च 2017 रोजी लोककलेद्वारे एचआयव्ही, एड्सविषयी जनजागृती अभियानाचा शुभारंभ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागेश चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.
          यावेळी बोलताना डॉ.चव्हाण यांनी एचआयव्ही, एड्स कशामुळे होतो.? त्याची लक्षणे काय आणि त्याचा प्रतिबंध कसा करावा तसेच आयसीटीसी, पीपीटीसीटी, एआरटी कलंक व भेदभाव हे कलापथकांच्या माध्यमातून गावपातळीवर सादर करण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात एचआयव्ही एड्स विषयी मनोरंजनातून जनजागृती करण्याकरीता कलापथकांची भूमिका कशी महत्वाची आहे याबाबत मार्गदर्शन केले.

          एचआयव्ही, एड्स जनजागृतीकरीता इतर माध्यमांच्या तुलनेत कलापथकांचे स्थान उच्च आहे. लोकांच्या बोलीभाषेत त्यांना परिचित असा पोवाडा, भारुड, शाहिरी, गोंधळ, लावणी, लोकनाट्य, बतावणी इत्यादी कलापथकामार्फत एचआयव्ही, एड्सविषयी जनजागृती करण्याकरीता प्राधान्य देण्यात येत आहे. कलापथकाचे सादरीकरण मुख्यत: एचआयव्ही, एड्स बाबतीत अतिसंवेदनशील क्षेत्रात केंद्रीत केले जातील. तसेच विद्यापीठातील युवकांमध्ये एचआयव्ही, एड्सविषयी योग्य माहिती लोककलेच्या माध्यमातून पोहचविता येईल. लोककला हे ग्रामीण भागातील जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम  असून ग्रामीण व शहरी भागात एचआयव्ही, एड्स विषयी समता कलापथक बीड यांच्यामार्फत जिल्ह्यातील 20 गावात दि.15 ते 25 मार्च 2017 दरम्यान जनजागृती करण्यात येणार असून ग्रामस्थांना माहिती दिली जाणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता कलापथक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, आयसीटी विभाग, लिंक वर्कर योजना, लक्षगट, हस्तक्षेप संस्था आदिनी परिश्रम घेतले. असे बीड जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा