सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

सिंचन प्रकल्पांच्या सध्यस्थितीचा जिल्हाधिकारी राम यांनी घेतला आढावा

वीजपुरवठा, रस्ते-पुल, तलावांची स्थिती
                            सिंचन प्रकल्पांच्या सध्यस्थितीचा
जिल्हाधिकारी राम यांनी घेतला आढावा
  - दुरुस्ती करण्याचे निर्देश
       - अफवांवर विश्वास ठेवू नका
        - सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश

          बीड, दि.26:- बीड जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सिंचन, पाटबंधारे, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा, लघुसिंचन, जलसंधारण आदि विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन सर्व मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांच्या सध्यस्थितीचा आढावा घेतला. जनजीवन विस्कळीत होणार नाही यासाठी सर्व विभागांना दुरुस्तीची कामे प्राधान्याने हाती घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
          जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे व काही ठिकाणी झालेल्या त्यापेक्षा अधिक पावसामुळे आपत्कालिन परिस्थिती उदभवली. मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पासह गावतलाव, साठवण तलाव आणि पाझर तलावांच्या सध्यस्थितीचा या बैठकीत तालुकानिहाय व विभाग निहाय आढावा घेण्यात आला. अशा सर्व सिंचन प्रकल्पाच्या ठिकाणी संबंधित विभागाची यंत्रणा सतत कार्यरत राहिल याची दक्षता घेण्याचे निर्देश देवून जिल्हाधिकारी राम म्हणाले की, सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीची कामे असल्यास तात्काळ करावीत. एखाद्या लघु प्रकल्पामुळे जिवित अथवा वित्त हानीची शक्यता असल्यास तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या व स्थानिक प्रशासनाच्या संपर्कात राहून विभागांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात असेही निर्देश त्यांनी दिले.
          जिल्ह्यातील वीजपुरवठ्याचा व नुकसानीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राम यांनी महावितरणने जिल्ह्यातील वीजपुरवठा अखंडीत राहिल याची दक्षता घ्यावी आणि वीजसंयत्र व सामुग्रीचे नुकसान झाले असल्यास दुरुस्तीची व पर्यायी व्यवस्थेची कारवाई करावी असे निर्देश दिले. महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनुले यांनी वीजेच्या 150 खांबांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी व्यक्त केला.
          जिल्ह्यातील रस्ते-पुलांच्या स्थितीचा आढावा घेऊन जिल्हाधिकारी राम यांनी सार्वजनिक बांधकाम व इतर विभागांना रस्त्यांच्या व पूलांच्या तात्काळ दुरुस्तींचे निर्देश दिले. याशिवाय रस्ता-पुलावरुन वेगाने पाणी वाहत असतांना नागरिकांनी वाहतूक करु नये याबाबत जनजागृती करण्यात यावी. अशा धोकादायक रस्ते-पुलांची वाहतूक बंद करणे हिताचे राहिल असाही मनोदय जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी व्यक्त केला. थोडी गैरसोय झाली तरी दुर्घटना टाळता येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे असे सांगून त्यांनी इतर सर्व विभागांच्या आपत्ती निवारणाच्या कामाचा आढावा घेतला. आज व 29 तारखेलाही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असल्याने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी दक्ष रहावे कोणत्याही प्रकारची रजा उपभोगू नये तसेच मुख्यालय सोडू नये अशा सुचना देवून जिल्हाधिकारी राम यांनी आपत्कालिन परिस्थितीत जवळपास सर्व विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले आहे. मात्र काही जण निष्काळजीपणा दाखवत असून त्यांच्या विरुध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला. तलाव अथवा लघु प्रकल्पातील पाणी गावांमध्ये येऊन जिवित हानी होणार असल्याच्या अनेक अफवा मागील काही दिवसांपासून पसरविल्या जात आहेत. अशा अफवा कुणीही पसरवू नये व नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही बाबींची प्रशासनाशी संपर्क साधून खात्री करुन घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी राम यांनी पुन्हा केले आहे.

          या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्यासह सिंचन, जलसंधारण, पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, लघुसिंचन, पाणी पुरवठा, भूजल सर्वेक्षण आदि विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा