रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

आपत्कालिन परिस्थितीवर नियंत्रण नागरिकांनी खबरदारी बाळगावी जिल्हाधिकारी राम यांचे आवाहन - प्रशासन सतर्कपणे सर्वत्र कार्यरत - एनडीआरएफची दोन पथके दाखल





बीड, दि. 25 :- बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढल्याने नदी-नाले, तलाव तसेच धरणे पाण्याने भरली. किंबहूना काही ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीला नागरिकांना सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर  जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर तसेच प्रशासनाची संपूर्ण टिम सतर्कपणे कार्यरत असून येत्या सोमवार दि.26 सप्टेंबर रोजीच्या सकाळपासून 24 तासात मराठवाड्यातील काही भागात जोरदार पर्जन्यवृष्टीचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेबरोबरच नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता खबरदारी बाळगावी असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
जिल्ह्यात 25 सप्टेंबर रोजीच्या पहाटेपर्यंत जिल्ह्यात 47.3 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 107 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे. आणखी पाऊस होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे सर्व विभाग सज्ज असून जिल्हाधिकारी राम हे स्वत: याकडे लक्ष ठेवून मार्गदर्शन करीत आहेत. आज सकाळी जिल्हाधिकारी राम आणि पोलीस अधिक्षक पारस्कर यांनी जिल्ह्यातील सर्व धरणांच्या परिस्थितीचा आढावा घेतला व आवश्यक त्या खबरदारीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान माजलगाव धरणातून 84 हजार क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असून धरणातील शंभर टक्के पाणीसाठा कायम राहिल याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. या सोडलेल्या पाण्यामुळे माजलगाव जवळील सिंदफणा नदीवरील पुलाखालून जोराने पाणी वाहत असल्यामुळे धोकादायक परिस्थिती लक्षात घेऊन रस्ता वाहतूक बंद करण्यात आली आहे. गढी-गेवराईकडून येणारी वाहतूक केसापूरीजवळ आणि तेलगाव कडून येणारी वाहतूक परभणी चौक येथे बंद करण्यात आली आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानंतर हा रस्ता वाहतूकीस खुला करण्यात येणार आहे. बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या पुलावरील जड वाहनाची वाहतूक कालपासून बंद करण्यात आली आहे. मांजरसुंबा आणि गढी येथून जडवाहतूक वळविण्यात आली आहे.
नुकसानीचे सर्वेक्षण
गेल्या तीन दिवसातील पर्जन्यवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण प्रशासनाने हाती घेतले असून संपूर्ण महसुल विभागाच्या अधिकारी -कर्मचाऱ्यांना घरे, पिक, जनावरे व खावटीचे झालेले नुकसानीचे दोन दिवसात सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. या शिवाय जिल्ह्यातील वीजपुरवठा अखंडित राहिल याची दक्षता घेऊन महावितरणने नादुरुस्त झालेल्या वीज संयत्रांची तात्काळ दुरुस्ती करावी. रस्ते आणि पुलांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन तातडीने ते दुरुस्त करण्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊलं उचलावी असे निर्देश जिल्हाधिकारी राम यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील महसुल व पोलीस यंत्रणेने चांगला समन्वय ठेवून आपत्कालिन परिस्थिती चांगल्या पध्दतीने हाताळत असल्याबद्दल जिल्हाधिकारी राम यांनी दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले असून यापुढेही सतर्क राहून जनहिताच्या दृष्टीने कार्यरत राहण्याच्या सुचना दिल्या. याशिवाय पाटबंधारे विभागाच्या व इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांचेही त्यांनी कौतूक केले आहे. मात्र आपत्कालिन परिस्थितीचे गांभीर्य न घेता काही अधिकारी-कर्मचारी या काळात गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आले असून अशा बेजबाबदार अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल अशी भूमिका जिल्हाधिकारी राम यांनी व्यक्त केली.
एनडीआरएफ कार्यरत
पूर परिस्थितीमुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी प्रशासनाच्या मदतीला एनडीआरएफची 48 जवानांची दोन पथके दाखल झाली असून 24 जवानांचे एक पथक नागझरी ता.बीड येथे पुरात वाहून गेलेल्या महिलेचा शोध घेत आहे. तर दुसरे 24 जवानांचे पथक रायमोहा ता.शिरुर येथे वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेत आहे.जिल्ह्यात पूरपरिस्थितीमूळे शनिवारी जिवित हानीच्या चार घटना घडल्या. रविवारी कन्हेरवाडी ता.परळी  येथे एका व्यक्तीचा अद्याप शोध लागला नाही.  एका व्यक्तीला जिवित बाहेर काढण्यात यश आले आहे. याशिवाय कोथरुड ता.माजलगाव येथील पुरात अडकलेल्या व्यक्तीला सुखरुप बाहेर काढण्यात आले.

येत्या काळात आणखी पर्जन्यवृष्टी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत: खबरदारी घ्यावी व कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा