शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

जिल्ह्यातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांचे आवाहन माहिती, मदतीसाठी नियंत्रण कक्षांशी संपर्क साधावा



   बीड, दि. 24 :- जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे काही नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहे.  माजलगाव प्रकल्पातून पाण्याचा विसर्गही सुरु होणार आहे. या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील नदीकाठच्या रहिवाश्यांनी सतर्क रहावे. सखल भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी.  नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरुन न जाता अडचणींबाबत व मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी  नवल किशोर राम  यांनी केले आहे.
संततधार पावसामुळे  जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी होऊन काही  छोट्या-मोठ्या नदी, नाल्यांना पूर आला आहे. सखल भागात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रस्ता खचून जाणे, पूल वाहून जाणे, दरडी कोसळून अपघात होणे, रस्ता निसरडा झाल्याने वाहनांचे अपघात होणे, धबधबे आदी पाणीसाठ्यांच्या ठिकाणी बुडून अपघात होणे, असे प्रकार संभवतात. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक बाबींसाठीच  प्रवासाची  जोखीम  घ्यावी. त्यामध्येही सतर्कता बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. पूररेषेतील तसेच यापुर्वी सखल भागात पाणी शिरुन किंवा साचून बिकट परिस्थिती उद्भवणाऱ्या परिसरातील जोखीमीबाबत  नारिकांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी संबंधित यंत्रणांच्या सूचना, इशाऱ्यांचे पालन करावे.
अत्यावश्यक बाबींसाठी तातडीच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाशी तसेच पुढील दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधावा. हे क्रमांक असे जिल्हाधिकारी कार्यालय  नियंत्रण कक्ष- 02442-222604, नि:शुल्क दूरध्वनी क्रमांक (टोल फ्री)- 1077, पोलीस नियंत्रण कक्ष- 02442 -222333 याशिवाय आपत्तकालीन परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी या दूरध्वनी क्रमांकाशी संपर्क साधता येईल, असेही  जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
अफवांवर विश्वास ठेवू नका
बीड जिल्ह्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम हे बारकाईने सतत लक्ष ठेवून आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज असून अधिकारी कर्मचारी प्रसंगी कार्यरत आहेत. मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. माजलगाव धरणात पाणीसाठा वाढत आहे. धरणातून पाणी सोडण्याचा प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही. कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे अवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. स्वतः ते थोड्याच वेळात माजलगावकडे रवाना होत आहेत. त्यानंतर अधिकार्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहेत नदीकाठच्या रहिवाशांना सावधगीरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने पुन्हा केले आहे. प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी माहिती देवून प्रशासनाला सहकार्य करीत असल्याबदलही जिल्हाधिकारी राम यांनी आभार मानले आहेत.

बीड जिल्ह्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज सकाळी NDRF च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व परिस्थितीची संपूर्ण माहिती त्यांना दिली. आज रात्री NDRF ची टिम बीड येथे दाखल होईल अशी आशा आहे. यामुळे जिल्ह्यात होणा-या संभाव्य दुर्घटनांवर मात करणे अधिक शक्य होईल असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा