गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रृती प्रकल्पातील जलसंचयामुळे शेती-उद्योगांना चालना मिळण्यास मदत- पालकमंत्री






            बीड, दि.29 :- परतीच्या दमदार पावसाने जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात जलसंचय निर्माण झाला असून जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रृतीही सर्वांसमोर आली आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह, व्यापार व उद्योग धंद्यांना होऊन जिल्ह्याची विकासाकडे होणारी वाटचाल अधिक जोमाने होण्यास निश्चितच मदत होईल असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
            परळी तालुक्यातील नागापूर येथील वाण धरण येथे पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जलपुजन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
            यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव आघाव, संचालक जुगलकिशोर लोहिया, वैद्यनाथ बँकेचे अशोक जैन, श्रीहरी मुंडे यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, सतत दुष्काळाचा सामना करण्याच्या बीड जिल्ह्याचा पाणीप्रश्न परतीच्या जोरदार पावसाने मिटला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व प्रकल्प तुडूंब भरले असून नदी-नाले खळखळून वाहत आहे. हे पाहून मला मनस्वी आनंद होत आहे. जिल्ह्यातील या मुबलक जलसंचयामुळे शेतकऱ्यांसह व्यापार व उद्योग धंद्यानाही नवसंजीवनी मिळणार आहे. या माध्यमातून जिल्ह्याची विकासाकडे होणारी वाटचाल अधिक जोमाने होईल यात शंकाच नाही अशी ग्वाही देऊन अशीच कृपादृष्टी जिल्ह्यावर राहू दे अशी प्रार्थना प्रभू वैद्यनाथांच्या चरणी केली.
            जलयुक्त शिवार योजनेला जनतेचा उर्त्फुत सहभाग लाभल्याने ही योजना खऱ्या अर्थाने शासनाची, प्रशासनाची आणि जनतेची करण्यामध्ये आमच्या सरकारला यश आले आहे. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत मोठ्या प्रमाणावर कामे झाली असून यावर आतापर्यंत 65 कोटी रुपये खर्च झाला आहे. जलयुक्त शिवार अभियानाला जनतेने दिलेल्या प्रतिसाद बद्दल पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी जनतेचे आभार मानले आणि जिल्ह्यात ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केलेल्या शासकीय, यंत्रणा व सेवाभावी संस्थांचे अभिनंदन केले.
            जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटला असून आता शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकारी आणि पुढाकार घ्यावा असे आवाहनही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

            यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विधीवत जलपुजन करण्यात आले. या कार्यक्रमास जलसंपदा विभागाच्या अधिक्षक एस.एन. जगताप, माजलगाव पाटबंधारे विभाग परळीचे कार्यकारी अभियंता डी.एच. शिंदे, शाखा अभियंता टी.जे.फारुकी यांच्यासह वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक, सदस्य, नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा