शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०१६

विजा चमकत असताना घ्यावयाची काळजी



अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर का होईना पावसाने अलिकडे बीड जिल्ह्यात चांगलीच हजेरी लावली. अनेकांना काल रात्रीची झोप शांती व समाधानाची लागली असावी. शेतक-यांच्या जीवनातही कालचा पाउस प्रगतीची एक चाहुल देवून गेला. मुक्या जनावरांच्या तर भावना आपण व्यक्त करू शकत नाही परंतू तेही आनंदाच्या भरात असावीत कारण पिण्याच्या पाण्याबरोबरच हिरवाकंच चारा जो आता खायला मिळणारआहे.
मित्रांनो पावसाला चांगली सुरूवात झाली आहे. पावसाबरोबरच आकाशात विजा चमकण्याचे व विजा कोसळण्याचेही प्रमाण वाढत चालले आहे. रात्री पावसात हे आपणा सर्वांना जाणवले आहे. ढगांचा गडगडाट, विजांचा लखलखाट, वादळी वारे आणि जोडीला टपोऱ्या थेंबांची बरसात.. मान्सूनच्या आगमनाची अशी वाजतगाजत उशीरा वर्दी मिळते आणि उन्हाने तापलेल्या व निराश मनाला पावसाच्या आगमनाचा सुखद गारवा हवा-हवासा वाटत असतो आणि विजेचा लोळ पाहून पोटात भितीचा गोळाही उठत असतो. या वातावरणात सुरक्षिततेसाठी नेमकी काय दक्षता घ्यावी, याविषयी लोकांच्या मनात अनेक संभ्रम असतात. काही किरकोळ बाबींची काळजी घेतली तर, या विजांपासूनही आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. असेच काही उपाय पुढे देत आहोत.

घराबाहेर असाल तर..
-          एकाकी असलेल्या शेडखाली उभे राहू नका
-          मोकळ्या मैदानातील अथवा परिसरात केवळ एकमेव उंच असलेल्या झाडाखाली उभे राहू नका
-          धातूची कोणतीही वस्तू जवळ बाळगू नका
-          प्रवासात असल्यास पूर्णतः बंद असलेल्या वाहनात बसून राहा
-          मैदानात असाल तर वाकून अथवा केवळ गुडघ्यावर बसा. शरीराचा कमीत कमी भाग जमिनीला स्पर्श करेल, असे पाहा. जमिनीवर पूर्णपणे आडवे होऊ नका कारण ओली जमीन विजेची वाहक असते.
-          पाण्यात असाल तर झटकन बाहेर या, तसेच समुद्र किनाऱ्यावर असाल तर तेथूनही तात्काळ दूर व्हा
-          बोटीत बसला असाल तर बोटीच्या मध्यभागी वाकून बसा
-          कोणत्याही उंच ठिकाणी थांबू नका. वीज आकर्षून घेणाऱ्या उंच ठिकाणांपासून, इमारतींपासून दूर उभे राहा.

 घरात असाल तर..
-          घराबाहेर पडू नका.
-          लोखंडी पाइप, पाण्याचे नळ, स्टिलचे सिंक अशा वीजवाहक वस्तूंपासून दूर राहा
-          दारे खिडक्यांपासूनही दूर राहा.
-          दूरध्वनीचा वापर करू नका
-          कोणतेही विद्युत उपकरण (टीव्ही, मिक्सर, टोस्टर, ओव्हन आदी) वापरू नका.

दूरध्वनी अथवा मोबाइल वापराबाबत..
            विजा चमकत असताना मोबाइलवर संभाषण करावे की करु नये, याबाबत जनतेत संभ्रम असतो. याबाबतीत मोबाइल कंपन्या आणि संशोधक यांच्यातही मतमतांतरे आढळतात. पण विजा चमकत असताना कोणतीही धातूची वस्तू जवळ ठेवणे धोकादायक असल्याने साहजिकच मोबाइलही त्यामध्ये येतो. मानवी शरीर विजेचे वाहक असल्याने या धातूकडे वीज आकर्षित झाल्यास विजेचा धक्का बसू शकतो. त्यामुळे अशाप्रसंगी मोबाइलवरील अथवा दूरध्वनीवरील संभाषण टाळणे अधिक हितावह आणि सुरक्षित ठरेल.                           

                                                             -संकलन :  अनिल आलुरकर ,जिल्हा माहिती अधिकारी, बीड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा