शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०१६

जिल्हयातील विकास कामांना गती दयावी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांचे निर्देश



बीड, दि.30 :- बीड जिल्ह्यातील विविध विभागांनी विकास कामांना अधिक गती दयावी असे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले.
            पालकमंत्री पंकजा मुंडे यांना महत्वाच्या बैठकीसाठी अत्यंत तातडीने मुंबईला जावे लागल्याने त्यांच्या सुचनेनूसार पुर्वनियोजित बैठकीत बीड जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. बैठकीस आमदार भिमराव धोंडे, आमदार आर.टी.देशमुख, आमदार लक्ष्मण पवार, आमदार संगीता ठोंबरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान संचालक श्रीमती विमला, सहाय्यक जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
            निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी जिल्ह्यातील पर्जन्यवृष्टी आणि धरणातील पाणी साठ्याची तसेच पिक परिस्थिती व नुकसान भरपाई संबंधी माहितीचे सादरीकरण केले. पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानीचे प्रतिनिधिकस्तरावर सर्वेक्षण सुरु आहे तसेच एनडीआरएफ नूसार नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. सर्वस्तरावरील अहवाल 3 ऑक्टोंबर पर्यंत प्राप्त होणार आहेत. असे सांगून सर्व बाधितांना नियमानूसार आवश्यक नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे.
            महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या राज्यस्तरीय संचालक श्रीमती विमला यांनी अभियानाची सविस्तर माहिती सांगितली. दिनदयाळ ग्रामीण कौशल्य विकास कार्यक्रम राबवून बचतगटांना कौशल्य प्राप्त करुन देण्यात येणार आहे. बचतगट आणि महिलांचे सक्षमीकरण करण्याचे मोठे काम या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. बचतगटांना सहाय्य करण्यासाठी ग्रामीण विकास विभाग शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचे एकत्रित लाभ देण्याचा प्रयत्न करीत आहे. शासकीय विभाग आणि लोकप्रतिनिधींनी या अभियानात जास्तीत जास्त लाभार्थी सहभागी होतील व ग्रामीण विकास साधता येईल या दृष्टीने प्रयत्नशील राहावे. बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. विविध विभागही त्यांच्याकडील सेवावस्तू अशा बचतगटाकडून घेत आहेत असे सांगून महिला किसान, मुद्रा योजना आदि योजनांची माहिती श्रीमती विमला यांनी यावेळी दिली.
            स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत यावर्षी  1 लाख शौचालय बांधण्याचा निर्धार केला असून नाते जबाबदारीचे हा उपक्रम राबवून सर्वांना शौचालय बांधण्याचा आग्रह करण्यात येत आहे. 2 ऑक्टोबर रोजी सर्व गावात ग्रामसभा घेण्यात येणार असून या ग्रामसभेत स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार असून सर्व गावात शौचालये बांधण्याचा निर्धार करण्याची अपेक्षा आहे. असे सांगून जिल्हाधिकारी राम यांनी स्वच्छता अभियानाचे महत्व स्पष्ट करुन जिल्ह्यात अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले.

या बैठकीत लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यातील रस्ते-पुलांच्या दुरुस्ती, शाळा खोल्यांचे बांधकाम, महावितरणची प्रलंबित कामे, सिंचन प्रकल्पांची प्रलंबित कामे तसेच बाधित क्षेत्रातील मदतीचे वाटप इत्यादी विषयी मुद्दे मांडले. याविषयी बैठकीत सविस्तर चर्चा करुन योग्य ते निर्देश देण्यात आले. भारतीय सैन्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांविरूध्द केलेल्या कारवाईबदल यावेळी अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा