बुधवार, २८ सप्टेंबर, २०१६

जिल्हाधिकारी राम यांनी घेतला पुढाकार बीडच्या मिनी बायपासचा मार्ग मोकळा जमीन देण्यास शेतकरी तयार; काम सुरु





          बीड, दि.28 :- बीड शहराबाहेरुन जाणाऱ्या मिनी बायपासच्या प्रलंबित कामातील अडथळा आता दूर करण्यात आला असून पर्यायी जमिन घेऊन प्रस्तावित रस्त्यांचे काम येत्या 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करुन वाहतूकीसाठी रस्ता उपलब्ध करुन देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.
          शहराबाहेरुन जाणाऱ्या मिनी बायपासच्या प्रस्तावित कामांपैकी बहुतांश काम पूर्ण झाले असतांना केवळ एका जमिन मालकाने 200 मीटरच्या रस्त्यांच्या कामासाठी जमिन न दिल्यामुळे रस्ता पूर्ण होऊ शकत नव्हता. मात्र जिल्हाधिकारी राम यांनी आनंदवाडी येथील त्या जमिनीला पर्याय म्हणून इतर जमिनधारक शेतकऱ्यांशी चर्चा केली व त्यांच्या संमतीने ह्या सुधारीत मार्गाने रस्त्याचे काम पूर्ण करुन मुख्य रस्त्याला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी जिल्हाधिकारी राम यांनी प्रलंबित कामाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली. संमती दर्शविलेल्या शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्या जमिनीची पाहणी करुन प्रस्तावित रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करण्याचे निर्देश दिले. या सुधारीत प्रस्तावामुळे बायपासच्या लांबीमध्ये अंदाजे 200 ते 300 मीटरची वाढ होईल. असा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नाईकवाडे यांनी यावेळी व्यक्त केला. हे काम 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करावयाचे नियोजन असल्याचे ही जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी सांगितले. भूसंपादनाची व इतर आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश ही त्यांनी उपविभागीय अधिकारी विकास माने यांना दुरध्वनीवरुन दिले आहेत. यावेळी पंचक्रोशीतील सरपंच, शेतकरी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी मिनी बायपासच्या झालेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली. कुर्ला रोड ते एमआयडीसी या रस्त्यांचे रुंदीकरण व डांबरीकरण प्रस्तावित करण्याची सुचना करुन जिल्हाधिकारी राम यांनी शहराबाहेरील वळण रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यांची  अवस्था सुधारण्याची गरज प्रतिपादन केली. सध्या बिंदुसरा नदीच्या पूलावरील रस्ता वाहतूक जड वाहनांसाठी बंद करण्यात आली असल्याने मिनी बायपासचे काम जलदगतीने पूर्ण करणे गरजेचे आहे असेही ते यावेळी म्हणाले.

          बहिरवाडीचे सरपंच बाजीराव बोबडे, जिरेवाडीचे सरपंच सर्जेराव मोहिते, हनुमान क्षीरसागर, प्रकाश राका, गिरीष देशपांडे, बाळासाहेब देवकते, नितिन देवकते, श्याम सानप आदि शेतकरी, ग्रामस्थ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा