मंगळवार, २७ सप्टेंबर, २०१६

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती

राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती
- अनिल आलुरकर
                          जिल्हा माहिती अधिकारी, बीड  
       सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती देण्यात येते. यासाठी पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती या योजनेअंतर्गत उपलब्ध असणाऱ्या शिष्यवृत्तीची संख्या 100 असून या योजनेविषयी ही माहिती...
     गोरगरीब मागास जनतेच्या प्रगतीसाठी केंद्र व राज्य शासन सदैव विविध योजनेच्या माध्यमातून प्रयत्नशील असते. मागास मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष योजना राबवितांना त्यांच्या सर्वांगिण विकासाला प्राधान्य देण्यात येते व त्यांना अन्य सुविधा देवून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले जाते.
          महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे शैक्षणिक सत्रात देशांतर्गत विविध शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती, नवबौध्द विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या राजर्षी शाहु महाराज शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येतात.
योजनेसाठी आवश्यक पात्रता
       अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी व अनुसूचित जाती, नवबौध्द असावेत. विद्यार्थ्यांच्या पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 4.50 लाख रुपये असावी. अर्जदार संबंधित अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाला शिकत असावेत. विद्यार्थ्यांनी 10 वी व 12 वीची परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ अथवा राज्यातील अन्य परीक्षा मंडळाकडून उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदार विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी 12 वी व सीईटी प्रवेश पात्रता परिक्षेत 55 टक्के तर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत 50 टक्के गुण मिळविलेले असावेत.
शिष्यवृत्तीची संख्या व तपशिल
          या योजनेअंतर्गत पात्रताधारक विद्यार्थ्यांमधून 100 विद्यार्थ्यांची शैक्षणिक शिष्यवृत्तीसाठी निवड करण्यात येऊन त्यांना पुढीलप्रमाणे फायदे उपलब्ध होतील. शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी शुल्क, जिमखाना, ग्रंथालय व संगणक शुल्क. शैक्षणिक संस्थेतील वसतीगृह व भोजन शुल्क. संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतीगृहात जागेअभावी प्रवेश न मिळाल्यास संस्थेने आकारलेले वसतिगृह व भोजन शुल्क, शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी लागणारी पुस्तके, शैक्षणिक साहित्य व इतर शैक्षणिक खर्चापोटी वार्षिक 10,000 रु. आदि‍ फायदे उपलब्ध करुन दिले जातात.

माहिती व तपशिलासाठी संपर्क
          योजनेच्या संदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी महाराष्ट्र  शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभागाच्या www.maharashtra.gov.in/career,  http://mahaeschool.maharashtra.gov.in अथवा  www.sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळांना भेट द्यावी अथवा आयुक्त समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण आयुक्तालय- महाराष्ट्र राज्य 3, चर्च पथ, पुणे-411001 यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
          बीड जिल्ह्यातील अनुसूचित जातीच्या पात्रताधारक विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसह शिक्षण घेण्यासाठी या राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.



                                                      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा